भारतातील धार्मिक छळाचा वेध घेणारी ‘शेमलेस’!

भारतातील धार्मिक छळाचा वेध घेणारी ‘शेमलेस’!

तस्लिमा नसरीन यांच्या गाजलेल्या 'लज्जा’चे सिक्वल 'शेमलेस’ प्रकाशित होण्यासाठी याहून चांगली वेळ असू शकत नाही.

लताची विविधरंगी, विविधढंगी मराठी गाणी
अफगाणिस्तानात सर्वच धर्मांची होरपळ – हमीद करझाई
‘भारतीय लोकशाहीची वाटचाल अधिकारशाहीकडे’

जेव्हा एखादी लेखिका तिच्या कादंबरीतील व्यक्तिरेखा होते तेव्हा नेमके काय घडते? तस्लिमा नसरीन यांनी त्यांच्या लज्जा (शेम) या कादंबरीच्या माध्यमातून बांगलादेशमध्ये स्त्रिया व धार्मिक अल्पसंख्यांवर होणाऱ्या अत्याचारांकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधले होते. शेमलेस या नवीन कादंबरीच्या माध्यमातून त्यांनी आपणच निर्माण केलेल्या कल्पनाविश्वातील एक व्यक्तिरेखा होण्याचा प्रयत्न केला आहे. नसरीन यांना बांगलादेशात करावा लागलेला संघर्ष सर्वज्ञात आहे. मात्र, त्यांनी शेमलेस या नवीन कादंबरीद्वारे उपस्थित केलेला प्रश्नही तेवढाच मर्मभेदी आहे. समकालीन भारतामध्ये धर्माच्या नावाखाली होणाऱ्या छळाबद्दल आपण काय म्हणू शकतो?

शेम या कादंबरीतील प्रमुख व्यक्तिरेखा सुरंजन एक दिवस तस्लिमाच्या दारात येऊन उभी राहते. आपल्या मूळ देशात- बांगलादेशात- झालेल्या धार्मिक छळाला कंटाळून त्याच्या कुटुंबाने तो देश सोडला आहे आणि ते सगळे कोलकात्यात येऊन स्थायिक झाले आहेत. तस्लिमाला त्यांच्याबद्दल उत्सुकताही आहे आणि चिंताही. त्यामुळे त्यांच्या नवीन घरातील संघर्षात ती स्वत:ला गुंतवून घेते.

स्थलांतराच्या प्रक्रियेत मदत करण्याचे वायदे करणाऱ्यांनी प्रत्यक्षात या कुटुंबाची केलेली फसवणूक, आपल्या महत्त्वाकांक्षांना साजेसे काम मिळवण्यात त्यांना येणारे अपयश आणि सुरंजनची बहीण मायाचे भारतात झालेले लैंगिक शोषण हे सगळे नसरीन यांच्या तरल कथनातून समारे येते.

आसरा घेतलेल्या देशाचे वास्तव जसजसे या व्यक्तिरेखांच्या समोर येत जाते, तसतशी त्यांची निराशा वाढत जाते. हिंदू असल्यामुळे बांगलादेशात मुस्लिम जमावाच्या बलात्काराला बळी पडलेल्या मायावर भारतात त्यांच्या कुटुंबाला आसरा देणाराच बलात्कार करतो.

लेखक साध्या शब्दांत विचारतात- बांगलादेशातील छळातून निसटून भारतात आलेले हिंदू स्थलांतरित भारतातील समकालीन राजकारणात काय करतील? वृत्तवाहिन्यांवर दररोज चाललेल्या चर्चांमधून आपणा भारतीयांना ज्यावर विश्वास ठेवण्यास भाग पाडले जाते, त्याहून हे उत्तर वेगळे आहे. नसरीन यांचे काम आणखी रोचक आहे, कारण, त्या स्वत: निर्वासित आहेत. शिवाय या कादंबरीतील एक व्यक्तिरेखा म्हणून त्यांना भारतातील ढासळत चाललेल्या सेक्युलॅरिझमची जाणीव वाचकांना करून द्यायची आहे.

कादंबरी छोटी आहे पण उत्कट भावनांनी भरलेली आहे. वाचक एका दु:खद घटनेतून बाहेर येत नाही, तर त्यातच गुंफलेले दुसरे दु:ख समोर येते. सुरंजन एका उजव्या हिंदुत्ववादी संघटनेशी जोडला जातो आणि बलात्कारा करायलाही मागेपुढे पाहत नाही.  त्याचवेळी त्यानेच अपहरण केलेल्या झुलेखा नावाच्या मुस्लिम स्त्रीबद्दल प्रणयाच्या भावना त्याच्या मनात फुलू लागतात. तिच्या प्रेमात पडल्याचे तो तिलाही सांगतो पण ती त्याच्याशी लग्न करण्यासाठी तिचे घर सोडून येते तेव्हा तिला वाऱ्यावर सोडतो.

बलात्कारांची परिणती सुडापोटी हत्यांमध्ये होते आणि त्यातून आणखी बलात्कार होतात. एखाद्या स्त्रीवर ती एका विशिष्ट धर्माची आहे म्हणून बलात्कार होतो, तर दुसऱ्या स्त्रीवर ती दुसऱ्या धर्माची आहे म्हणून बलात्कार होतो. एखाद्या माणसाचा तो हिंदू आहे म्हणून खून होतो, तर दुसऱ्याचा तो मुस्लिम आहे म्हणून खून होतो. जे जे दुर्बल असतात ते यात भरडले जातात. स्त्रिया, लहान मुले आणि अनाथांना कायमच अन्यायाला तोंड द्यावे लागते.

टोकदार तपशील

तस्लिमाच्या लेखणीतून उतरलेले टोकदार तपशील वाचकाला दमवून सोडतात. व्यक्तिरेखांचा निराशावाद, त्यांनी आपल्या घृणास्पद कृत्यांसाठी दिलेली समर्थने प्रत्येक पानावर वाचकाला नामोहरम करून सोडतात. हे कथन वाचकाला आज चाललेल्या अनेक गुन्ह्यांची आठवण करून देते. ही कादंबरी वाचताना मी स्वत:ला विचारते की, यातील प्रत्येक व्यक्तिरेखा कायम निराशावादी का आहे? हे गुन्हे निंदनीय असले तरी त्यामागे काही कारणे आहेत यावर विश्वास ठेवण्यास वृत्तपत्रातील बातम्यांनी आणि अनेकविध पत्रकार परिषदांनी भाग पाडले आहे. “ही सगळी व्यक्तिगत भांडणे आहेत, धार्मिक वाद नव्हेत” असे पटवून दिले जाते. नसरीन मात्र यावर अंधपणे विश्वास ठेवणाऱ्यांतील नाहीत. भारतातील समस्यांचे मूळ धर्म आणि राजकारण हेच आहेत यावर त्या ठाम आहेत. म्हणूनच त्या एक जटील कथा सांगतात मात्र, भावनिकदृष्ट्या थकलेल्या वाचकाला वरवर साध्या भासणाऱ्या, छोट्या संवादांच्या कथनात गुंतवतात. एकीकडे सुलभ वर्णनांतून सांप्रदायिकतेच्या हिंसक संघर्षाचा गुंता वाढत जातो. नसरीन यांचे कथन सरळ आहे. त्यावर शब्दबंबाळ पाल्हाळाचं ओझं नाही. समकालीन भारताच्या भंगलेल्या राजकारणाचे चित्र त्या आहे त्याहून जटील रंगवत नाहीत. त्या घटना, कांड, कडवट भाषणे सगळे काही कमालीच्या टोकदार साधेपणाने मांडतात. त्यांची भाषा कधीकधी शुष्क वाटते हे नाकारता येणार नाही. मायावर बांगलादेशात व भारतात झालेल्या बलात्काराचे कथन आणि तिचा सेक्स वर्कर होण्याचा निर्णय हे सगळे काही पानांत मांडण्याची क्षमता त्यांच्यात आहे. मात्र, या कादंबरीच्या इंग्रजी अनुवादाला मिळाले आहे त्याहून अधिक श्रेय मिळवण्यास तो पात्र आहे. बांगला वाक्यरचनेचे रूपांतर इंग्रजीत करण्याचे काम अनुवादक अरुनव सिन्हा यांनी उत्कृष्ट पार पाडले आहे. छोटी, नाट्यमय वाक्ये (भारतीय भाषांची ती सहज प्रवृत्ती आहे पण इंग्रजी भाषेत अशा प्रकारची वाक्ये विचित्र वाटतात) एकमेकांना जोडण्याची त्यांची हातोटी भारतीय वाचकांच्या नक्की लक्षात येईल.

या कादंबरीत नसरीन यांनी बरेच धोके पत्करले आहेत. कादंबरीच्या रचनात्मक गृहितकांवर प्रश्न उपस्थित करण्यात त्या अजिबात कचरत नाहीत. काल्पनिक (फिक्शनल) व्यक्तिरेखा म्हणजे काय? ही व्यक्तिरेखा म्हणजे एखाद्या कल्पनेला व्यक्तित्व देण्याचा प्रयत्न आहे की ती खरीखुरी व्यक्ती आहे? लेखक-व्यक्तिरेखा धार्मिक वादांवरील आपला सिद्धांत मांडते, तेव्हाच सुरंजन आणि त्याचे कुटुंबीय “व्यक्तीत्वा”ची मागणी करत असतात- दुखावलेपण व्यक्त करण्याचा, नाकारण्याचा आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा सूड घेण्यासाठी दुसऱ्यांना दुखावण्याचा हक्क मागत असतात. लेखक-व्यक्तिरेखा नेहमी बरोबरच असते असे नाही पण ती निराशावाद नाकारते आणि कल्पित साहित्याच्या विश्वात क्वचितच चर्चिले जाणारे सर्व अवघड प्रश्नही विचारते.

काही महत्त्वाच्या मुद्द्यांकडे काणाडोळा

अर्थात ही कादंबरी काही महत्त्वाच्या मुद्द्यांना स्पर्श करणे टाळते. तिच्या व्यक्तिरेखांमध्ये आणि तिच्यामध्ये वर्गाचा लक्षणीय भेद आहे. सुरंजन, झुलेखा आणि माया यांच्या रागाशी व असुरक्षिततांशी तादात्म्य न पावणे जवळपास अशक्य आहे. त्यांच्या वाट्याला आलेले वास्तव भोगणे कोणासाठीही कठीण आहे. सुस्थितीतील तस्लिमा त्यांच्याशी तटस्थ शांतपणे बोलते, चांगल्या-वाईटाचा तर्क लावण्याचा प्रयत्न करत राहते. तिला ज्या पत्रकार परिषदांमध्ये आमंत्रित करण्यात आले होते, त्यात तिने काय युक्तिवाद केले होते, यावर त्यांना व्याख्यान देत राहते. मात्र, कादंबरीतील व्यक्तिरेखांच्या मनातील क्रोध आणि तस्लिमाचा शांतपणा या दोन वास्तवांमध्ये कोणतीच संगती नाही. त्याहून महत्त्वाचे म्हणजे नसरीन पश्चिम बंगालमधील सर्व राजकीय पक्षांवर टीकास्त्र सोडतात. अपवाद फक्त सत्ताधारी पक्षाचा. ही त्रुटी दुर्लक्ष करण्याजोगी नाही.

अर्थात या त्रुटी असल्या तरी कादंबरी वाचलीच पाहिजे अशी आहे. कोरोना साथीमुळे जाहीर झालेली टाळेबंदी हटून सर्व काही पूर्ववत झाले की, आपल्याला धार्मिक दुही व नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या चर्चांकडे परत जावे लागणार आहे आणि म्हणूनच निर्वासितांचे म्हणणे ऐकूण घेणे गरजेचे आहे. ते नेमके कोणत्या परिस्थितीत येथे येत आहेत, हा प्रश्न आपण विचारला पाहिजे. या देशातील वाढत्या धार्मिक हिंसाचाराला त्यांनी कसे तोंड द्यावे? आपल्या मनातील अनेक द्विधांचे उत्तर या प्रश्नांत सामावलेले आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे हे प्रश्न निर्वासितांना नव्हे तर आपल्या नागरिकांना विचारले गेले पाहिजेत. या मुद्दयावर तस्लिमा नसरीन यांनी अचूक लक्ष्यभेद केला आहे. शेमलेस प्रसिद्ध होण्यासाठी याहून चांगली वेळ असूच शकत नाही.

गार्गी बिंजू, या नवी दिल्लीतील पुस्तक समीक्षक आहेत.

मूळ लेख:

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: