टेक फॉग इन अॅक्शन: महिला पत्रकारांना लक्ष्य करणे, कोविडला धार्मिक रंग देणे आणि दिल्लीतील दंगलबाजी

टेक फॉग इन अॅक्शन: महिला पत्रकारांना लक्ष्य करणे, कोविडला धार्मिक रंग देणे आणि दिल्लीतील दंगलबाजी

भारतात व्यापक स्तरावर प्रचार करण्यासाठी भारतीय जनता पार्टीशी निगडित राजकीय हस्तकांकडून वापरल्या जाणाऱ्या 'टेक फॉग’ या अत्याधुनिक अॅपमागील दाव्यांच्या अन्वेषण मालिकेतील हा तिसरा भाग. मागील भागांमध्ये ‘द वायर’ने, अॅप ऑपरेटर्सना उपलब्ध असलेल्या अनेक सोशल मीडिया विपर्यास तंत्रांबाबतच्या दाव्यांचे परीक्षण केले. यामध्ये 'निष्क्रिय’ व्हॉट्सअॅप अकाउंट्सचा ताबा घेणे आणि त्यांचा वापर एन्क्रिप्टेड चॅट अॅपवर संदेश पसरवण्यासाठी करणे आदींचा समावेश होतो. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपैकी ट्विटरवर भाजप आणि हिंदुत्वाचा प्रसार करण्यासाठी ऑपरेटर्सनी हे अॅप कोणत्या मार्गांनी वापरले, हे आपण या भागात बघणार आहोत.

नवी दिल्ली: छुप्या पद्धतीने व व्यापक स्तरावर प्रचार मोहिमा राबवणाऱ्यांची फौज हाताळणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या हस्तकांकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर शिवीगाळ आणि लक्ष्यिकृत छळाचा स्वयंचलित पूर आणण्याची क्षमता तर प्राप्त झाली आहेत, शिवाय, यातील बहुतेक आशय हा पुरुषप्रधान तसेच सांप्रदायिक मनोवृत्तीचे दर्शन घडवणारा आहे. टेक फॉग या छुप्या अॅपद्वारे व्यवस्थापित बनावट अकाउंट्सना सोशल मीडियावरील संदेश फुगवण्याची मुभा तर मिळतेच पण त्याचबरोबर त्यांनी आपल्या राजकीय पक्षाचा जास्तीतजास्त गाजावाजा व्हावा या दृष्टीने कल्पक कार्यप्रवाहही शोधून काढला आहे. ज्या व्हिसलब्लोअरने केलेल्या दाव्यामुळे ‘द वायर’ने अन्वेषणाला सुरुवात केली, त्याने पाठवलेल्या टेक फॉगमधील स्क्रीनशॉट्स व स्क्रीनकास्ट्सवरून असे दिसते की, ही अॅप निवडणुका किंवा राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या अन्य समारंभाच्या काळात कामगिरीला उत्तेजन देण्यासाठी निष्पत्ती-प्रधान ‘सर्ज प्रायसिंग’ मॉडेलचा वापर करते.

अॅपमध्ये शिजणारी शिवीगाळ व स्त्रीद्वेष

या अॅपमधील सर्वांत महत्त्वाच्या तसेच सर्वांत अस्वस्थ करणाऱ्या फीचर्सपैकी एक म्हणजे शिवीगाळाच्या मोड्युल्सचे हार्ड-कोडिंग आणि हे व्यवस्थापित अकाउंट्सच्या व्यापक नेटवर्कद्वारे, टीकाकार, राजकीय विरोधक आणि सामान्य नागरिकांच्या विरोधात, ज्या पद्धतीने वापरली जाते ती पद्धत होय. टेक फॉग विशेषत: सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या व ज्यांचे काम किंवा पोस्ट्स भाजपच्या अधिकृत भूमिकेला विरोध करणारे असते अशा महिला पत्रकारांविरोधात परिणामकारकतेने वापरले गेले आहे. विरोध किंवा टीका मोडून काढण्यासाठीच नाही, तर व्यक्तींना चिथावण्यासाठी किंवा गप्प करण्यासाठी शिवीगाळ व छळाचा वापर करणे यमागील उद्दिष्ट आहे.

तर हे ‘अॅब्युस’ फीचर काम कसे करते? अॅपचे ऑपरेटर प्रथम टेक फॉगमध्ये समाविष्ट लक्ष्यिकृत व्यक्तींच्या डेटाबेसमध्ये प्रवेश करतात आणि लक्ष्य करण्यासाठी व्यक्ती निश्चित करतात. या डेटाबेसमध्ये विद्यार्थी, पत्रकार, कमेडियन्स, चित्रपट अभिनेते, सोशल मीडियावरील प्रभावी व्यक्ती, अध्यात्मिक नेते यांसारख्यांचा समावेश असतो. यात या व्यक्तींचा धर्म, लैंगिक कल, भाषा, वय, राजकीय संबंध आणि काही वेळा तर त्वचेचा रंग किंवा अगदी स्तनांचे आकारमान येथपर्यंत शारीरिक गुणधर्मांची माहितीही दिली जाते. या सगळ्या माहितीमुळे ऑपरेटर्सना या निदर्शकांच्या आधारे विशिष्ट व्यक्तींना लक्ष्य करण्याची मुभा मिळते. यात व्यक्तीचा अनेकविध अकाउंट्सवरून छळ करण्यापासून ते तिच्या खासगी ट्विटर इनबॉक्समध्ये आक्षेपार्ह संदेश पाठवण्यापर्यंत बऱ्याच गोष्टी येतात. सर्वाधिक लक्ष्य करण्यात आलेल्या व्यक्ती स्त्रिया आणि मुस्लिमधर्मीय होते, असे स्रोताने पुरवलेल्या अॅपच्या स्क्रीनशॉट्स व स्क्रीनकास्ट्सचे परीक्षण केले असता दिसून आले.

एका स्क्रीनशॉटमध्ये शिव्या व स्त्रीद्वेष्ट्या कीवर्ड्सची मालिका दिसून आली. हे कीवर्ड्स निवडून ऑपरेटर्स महिला पत्रकारांना पाठवण्यासाठी संदेश तयार करू शकतात.

लक्ष्य करण्याची प्रक्रिया समजून घेण्याच्या उद्देशाने प्रस्तुत लेखकांनी, ज्यांची ट्विट्स मोठ्या प्रमाणात रिट्विट केली जातात अशा २८० महिला पत्रकांच्या समूहावर एक ओपन-सोर्स डेटा कलेक्शन टूल वापरून देखरेख ठेवली.

१ जानेवारी २०२१ ते ३१ मे २०२१ या काळात लेखकांनी महिला पत्रकारांच्या ट्विट्सना आलेल्या ४६ लाख रिप्लाइजमधील परस्पर संबंधांचा अभ्यास केला. यातील १८ टक्के (आठ लाखांहून अधिक) रिप्लाइज, टेक फॉगद्वारे व्यवस्थापित अकाउंट्सच्या नेटवर्कमधून आले होते, असे यात दिसून आले. या निष्कर्षाला पुष्टी मिळवण्यासाठी लेखकांनी प्रोफॅनिटी डिटेक्शन लायब्ररी हा ओपन-सोर्स वापरला. याद्वारे शिवीगाळ करणारे आणि/किंवा अपमानास्पद रिप्लाय फिल्टर करण्यात आले. यातील सुमारे ६७ टक्के (५.३६ लाख) रिप्लाइज ‘आक्षेपार्ह’ वर्गात मोडणारे होते.

लक्ष्य करण्यात आलेल्या स्त्रियांपैकी बहुतेकींना त्यांचे स्वत:चे अनुभव टेक फॉग अॅपबद्दल उघडकीस आलेल्या बाबींशी जुळवून बघता आले. “मला अजिबात आश्चर्य वाटलेले नाही,” अशी प्रतिक्रिया, लक्ष्य करण्यात आलेल्या पत्रकारांमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या पत्रकार राणा अयुब यांनी, ‘द वायर’ने ट्विटरवर डेटा प्रसिद्ध केल्यानंतर दिली. “पॉर्न व्हिडिओज, स्त्रीद्वेष्ट्या टिप्पण्या, धार्मिक शिवीगाळ, चारित्र्यहनन, हे सगळे मी सहन केले आहे. हे सगळे सरकारच्या कृपाछत्राखाली चालले आहे. अनेक महिला पत्रकारांनी अनेक वर्षे जो मुद्दा लावून धरला आहे त्यावर ‘द वायर’च्या #tekfog अन्वेषणाने शिक्कामोर्तब झाले आहे.”

“एका छुप्या अॅपमार्फत महिला पत्रकारांना अवघ्या पाच महिन्यांत लाखो शिव्या देण्यात आल्या,” असे रोहिणी सिंग यांनी ट्विटरवर पोस्ट केले आहे. “भारतातील सर्वांत शक्तीशाली पक्ष स्त्रियांना शांत करण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर चिखलफेक करण्यासाठी आपली संसाधने खर्च करत आहे. सोशल मीडियावरील अस्तित्वाची किंमत स्त्रिया मोजत आहेत…” असे सागरिका घोष यांचे मत आहे. छुप्या अॅपच्या खुणा जाणवल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. “#TekFog हे निनावी अॅप नाही. त्याचे हस्तक राजकीय पक्षाशी संबंधित आहेत. भारतातील सत्ताधारी यावर मौन राखून आहेत यात आश्चर्य वाटण्याजोगे काहीच नाही. स्त्रियांवर होणाऱ्या गलिच्छ चिखलफेकीत वावगे असे काहीच नाही हाच अर्थ त्यांच्या मौनातून निघत आहे. उद्या तुमच्या मुलींनाही हे भोगावे लागू शकते,” असे त्यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

व्हिसलब्लोअर्सनी स्वत:, भाजप आयटी सेलने लक्ष्य करण्यासाठी निवडलेल्या स्त्रियांचे लैंगिक ट्रोलींग, जवळून बघितले आहे याची नोंद येथे घेतली पाहिजे. या स्त्रियांमध्ये जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी नेत्या शहला रशीद यांचा समावेश होता.

एप्रिल २०२० मध्ये पोस्ट केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते, “शहला रशीदला ट्रोल करण्यासाठी त्रासदायक पद्धती वापरण्याचे आदेश हस्तकांना दिले जात होते. @Shehla_Rashidचे बनावट पॉर्न फोटो व्हॉट्सअॅप ग्रुप्समार्फत पसरवले जात होते आणि तिच्या ट्विटर व फेसबुकवरील भूमिकेला विरोध केला जात होता. त्यामुळेच शहलाला तिचे ट्विटर हॅण्डल डिअॅक्टिव्हेट करणे भाग पडले. आता मी तिची माफी मागतो. मला माझ्या चुकांतून बरेच काही शिकायला मिळाले आहे.”

टेक फॉग अॅपद्वारे लक्ष्य करण्यात आलेल्या आणि ‘द वायर’ने स्वतंत्रपणे पडताळणी केलेल्या अन्य ठळक महिला पत्रकारांमध्ये इस्मत अरा, हिबा बेग, नेहा दीक्षित, फातिमा खान, ज्योती यादव, साक्षी जोशी, शेरीन भान आणि मधू त्रेहन यांचा समावेश होतो. सर्वाधिक चिखलफेक करण्यात आलेल्या २० महिला पत्रकारांच्या यादीत कुरतुलैन रहबर आणि मसरत झाहरा या काश्मीरमधील स्वतंत्र पत्रकार स्त्रियांचाही समावेश आहे.

या नियमित कार्यप्रवाहाचा भाग म्हणून टेक फॉग होमस्क्रीनवर, हस्तकांना, अॅपमधील अंगभूत स्वयंचलन फीचर्सचा वापर करून, दररोज ट्विटरवर व फेसबुकवर मोठ्या प्रमाणावर प्रसृत करण्याच्या, ‘डेली ट्रेण्ड्स’ची यादी दिसते.

हे फीचर विश्लेषणाच्या वेळी कार्यात्मक होते की नाही हे तपासण्यासाठी स्रोताने त्यांच्या ‘डेली टास्क’चे स्क्रीनशॉट्स, ४ मे ते ६ मे असे सलग तीन दिवस पाठवले. मोठ्या नमुन्याची निष्पत्ती तपासण्यासाठी तसेच सोशल मीडिया निदर्शकांचा विपर्यास करण्याची हस्तकांची क्षमता समजून घेण्यासाठी प्रस्तुत लेखकांनी टेक फॉग वापरून ‘ट्रेण्ड’ करण्यात आलेल्या आधीच्या हॅशटॅग्जची यादीही मागितली. हस्तक भाजपला अनुकूल प्रवाह तयार करण्याच्या उद्देशाने, कथने व नेत्यांची लोकप्रियता ट्विटर व फेसबुकवर अतिशयोक्त स्वरूपात आणण्यासाठी, अकाउंट्सचे स्वयंचलन कसे करतात, यावर या कृतींच्या परीक्षणातून, प्रकाश पडला.

स्रोताने पाठवलेल्या ‘डेली टास्क्स’च्या यादीत काही कलर-कोडेड हॅशटॅग्जचा समावेश होता. या भगव्या रंगाच्या हॅशटॅग्सचा संदर्भ इंडियन नॅशनल काँग्रेस, अन्य विरोधीपक्ष व त्यांच्या पाठीराख्यांनी सुरू केलेल्या ट्रेण्ड्सशी होता. या ट्रेण्ड्सना स्पॅम किंवा चुकीच्या वा दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या आधारे मोडून काढणे हा दैनंदिन कामांचा भाग होता, असे स्रोताने सांगितले. स्रोताने टेक फॉगच्या माध्यमातून नियंत्रित केलेल्या अकाउंट्द्वारे अपलोड करण्यात आलेल्या पोस्ट्सचे स्वतंत्र विश्लेषण करून ‘द वायर’ने या दाव्याची पडताळणी केली. अॅपच्या फीचर्सची ट्विटरद्वारे पडताळणी करण्यासाठी, स्रोताने लेखकांना, अॅपद्वारे प्रसारित होणाऱ्या हॅशटॅग्जचे दोन स्क्रीनशॉट्स आधीच पाठवले. जुन्या हॅशटॅग्जची यादी टेक फॉग अॅप वापरून विस्तारित करण्यात आली आणि फेसबुक व ट्विटरवरील अॅप वापरणाऱ्या हस्तकांद्वारे व्यवस्थापित अकाउंट्सची यादीही पाठवण्यात आली. या डेली-टास्क स्क्रीन्सद्वारे टीमने क्रिएट केलेल्या प्रत्येक टास्कचे स्वरूप व उद्दिष्ट याबद्दलही माहिती मिळाली. यातील एक टास्क ट्विटरवर विशिष्ट हॅशटॅग्ज तयार करण्यासाठी व ते लोकप्रिय करणे हे होते. हे साध्य करण्यासाठी हस्तकांनी प्लॅटफॉर्मवरील ‘ट्रेण्डिंग’ विभाग, टेक फॉगद्वारे नियंत्रित अकाउंट्सच्या महाकाय नेटवर्कच्या माध्यमातून बनावट एंगेजमेंट (ट्विट्स, रिट्विट्स, कोट-ट्विट्स, लाइक्स आदी) निर्माण करून, ताब्यात घेतला. ब्रॅण्डवॉट आणि मेल्टवेअर एक्स्लोअर ही सोशल मीडिया चॅटर ऐकण्यासाठी सामान्यपणे वापरली जाणारी दोन टूल्स वापरून प्रत्येक हॅशटॅगच्या ऑन-प्लॅटफॉर्म अॅक्टिव्हिटीचे विश्लेषण करण्यात आले.

हस्तकांना अधिक दीर्घकाळ तसेच अधिक कष्टपूर्वक काम करण्यास प्रेरणा देण्यासाठी अॅपच्या रचनेत आर्थिक बक्षिसांचा समावेश करण्यात आल्याचेही डेली-टास्क स्क्रीनवर दिसत होते. ऑपरेटरने अॅपमध्ये केलेल्या प्रत्येक कृतीचा संबंध पैशाच्या रकमेशी असतो.

निवडणुकांसारखे महत्त्वाचे राजकीय कार्यक्रम आल्यानंतर अॅपचे सूत्रधार आर्थिक बक्षिसांमध्ये वाढ करतात, असा आरोप स्रोताने केला. ओला आणि उबरसारख्या टॅक्सी अॅपवर मागणीत वाढ झाली की भाडे जसे वाढवले जाते तोच हा प्रकार आहे. टेक फॉगमधील सर्ज प्रकरण प्रत्येक कृतीमागे दुप्पट किंवा तिप्पट वाढीपर्यंत जाते, असे स्रोताने सांगितले. टेक फॉगच्या माध्यमातून त्यांना मिळालेले एकूण तसेच मासिक पेमेंट दाखवणारे स्क्रीनशॉट्सही स्रोताने पुरवले तसेच एप्रिल २०२० मध्ये त्यांना मिळालेल्या रकमेची बँक स्टेटमेंट्सही दाखवण्यात आली. मात्र, हे ‘सर्ज प्रायसिंग’ वृत्तांत प्रसिद्ध करताना सक्रिय होते की नाही हे ‘द वायर’ला स्वतंत्ररित्या पडताळून बघता आले नाही. 

जुन्या हॅशटॅग प्रवाहांतून राजकीय अजेंडाचे स्वरूप स्पष्ट

स्रोताने अॅपचा वापर करून विस्तारलेले ‘पास्ट ट्रेण्ड्स’ दाखवणारे, टेक फॉगचे स्क्रीनशॉट्सही स्रोताने ‘द वायर’ला पाठवले. या प्रवाहांतून अॅपचे ऑपरेटर्स (नागपूर आस्थापनातून) प्रसारित करत असलेल्या राजकीय व विचारसरणीशी निगडित संदेशांची सखोल माहिती मिळाली. काही हॅशटॅग्ज हे बहुसंख्याकांच्या भावनांना हात घालणारे होते. यांमध्ये #HinduRiseAsOne आणि #भगवा_तो_लहराएगा यांसह #SoniaSpeakNow, #PappuDiwas and #WeStandWithArnabGoswami आदी भाजप विरोधकांना लक्ष्य करणारे तसेच माध्यमांतील व्यक्तींना पक्षपाती पाठिंबा देणारे हॅशटॅग्ज होते.

या हॅशटॅग्जचे परीक्षण केले असता असे दिसून आले की, ट्विटर अकाउंट्सद्वारे वारंवार हे हॅशटॅग्ज वापरले गेल्यानंतर अॅक्टिविटीमध्ये अचानक वाढ झाली आणि ते भारतातील प्लॅटफॉर्मच्या ‘ट्रेण्डिंग’ सेक्शनमध्ये पोहोचले. ही प्रक्रिया काही मिनिटांत पार पडली. यातून त्यातील कृत्रिमता दिसून येते. या विषयाशी निगडित कोणतीही राष्ट्रीय स्तरावरील घटना वा बातमी झालेली नसूनही हॅशटॅग्ज ट्रेण्डिंग सेक्शनमध्ये पोहोचले. ट्विटर ट्रेण्ड्स निर्माण करणाऱ्या नेटवर्कमधील अकाउंट्सची स्रोताने पाठवलेल्या यादीचे प्रस्तुत लेखकांनी विश्लेषण केले. हस्तकांनी ट्विटरवरील ट्रेण्ड्स चालवण्यासाठी वापरलेल्या अकाउंट्सचे नेटवर्क पकडण्यासाठी तसेच डोळ्यापुढे आणण्यासाठी, स्रोताने थेट नियंत्रणाखाली असल्याचा दावा केलेल्या ट्विटर अकाउंट्सची यादी, टीमने तयार केली. तसेच फॉलो करणारी व फॉलो केली जाणारी सगळी अकाउंट्स यात समाविष्ट करण्यात आली. शिवाय, स्रोताने पाठवलेल्या अॅप स्क्रीनशॉटवर दिसणारी, लक्ष्यिकृत हॅशटॅग्ज ट्विट करणारी अकाउंट्ही यात समाविष्ट करण्यात आली. परिणामी १०२,००० ट्विटर अकाउंट्सचा संच तयार झाला. टेक फॉगद्वारे व्यवस्थापित विविध अकाउंट्स, त्यांचे फॉलोअर्स व अन्य अकाउंट्स यांमधील परस्परसंबंध डोळ्यापुढे आणण्यासाठी, टीमने, स्क्रेपिंग, ओपन-सोर्स इंटेलिजन्स आणि जटील डेटा अॅनालिसिस टूल्सचा (ट्विंट आणि ग्राफिस्ट्री) वापर केला. या अकाउंट्सचे वर्तन वेगवेगळे व बदलते असल्यामुळे पारंपरिक पद्धतीने त्यांचे वर्गीकरण्याच्या सुरुवातीच्या प्रयत्नांत अनेक अडथळे आले. उदाहरणार्थ, या नेटवर्कमधील काही अकाउंट्स किमान मानवी हस्तक्षेपासह स्वायत्त वर्तन करत होती, तर काही अकाउंट्स काही वेळा मानवी नियंत्रणाखाली असल्यासारखी वाटत होती, लेखी पोस्ट्स शेअर करत होती, उजव्या विचारसणीच्या अन्य प्लॅटफॉर्म्सशी तसेच भाजप कार्यकारिणीशी संवाद साधत होती.

म्हणूनच वरील नेटवर्कमधील अधिक ढोबळ नमुने समजून घेण्यासाठी ‘द वायर’ने ऐहिक फीचर्स, आशयाचे गुणधर्म आणि १०२ अकाउंट्सच्या भावनांचे विश्लेषण यांना एकत्र करणारे तांत्रिक विश्लेषण एकत्र केले व त्याचा वापर केला. ऐहिक फीचर्समध्ये अकाउंट निर्मितीची तारीख, पोस्टिंगचे नमुने आणि एंगेजमेंटचा स्तर (लाइक्स, शेअर्स) यांचा समावेश होतो. याशिवाय, अकाउंट्सद्वारे पोस्ट झालेल्या काँटेण्टचे विश्लेषण केले असता सर्वाधिक वापरल्या गेलेल्या कीवर्ड्सची तसेच अकाउंट्सद्वारे शेअर करण्यात आलेल्या न्यूज लिंक्सची यादी हाती आली. अखेरीस, या अकाउंट्सद्वारे विविध भाषांमध्ये ट्विट केले जाते का, हे तपासण्यासाठी तसेच अपलोडेड पोस्ट्समधील भावनांच्या विश्लेषणासाठी टीमने AWS Comprehend, हे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग टूल वापरले. या पद्धतीद्वारे, स्रोताने पाठवलेल्या अॅप स्क्रीन्समध्ये ट्रेण्डिंग हॅशटॅग्ज दिसत असताना, मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्हिटी दाखवणारी, सुमारे ४०,५०० अकाउंट्स फिल्टर करण्यात आली. यातील काही अकाउंट्स बरेच दिवस दररोज ३५० वेळा ट्विट करत होती. काही वेळा तर या अकाउंट्सद्वारे १५ मिनिटांत ९००हून अधिक ट्विट्स झाल्याचे दिसत होते. अनेक स्वतंत्र संशोधन प्रयोगशाळांच्या दृष्टीने दिवसभरात ७२ ट्विट्स (सलग १२ तास दर दहा मिनिटाला एक ट्विट) हे प्रमाण संशयास्पद समजले जाते, तर दिवसाला १४४ ट्विट्स हे वर्तन खूपच संशयास्पद समजले जाते. यातून जे काही डोळ्यापुढे उभे राहिले (व्हिज्युअलायझेशन- खाली दाखवल्याप्रमाणे), त्यातून ट्विटरवर उजव्या विचारसरणीचा, भाजपला अनुकूल प्रचार करणाऱ्या घट्ट जोडलेल्या व संघटित अशा अकाउंट्सच्या विशाल समूहाचे अस्तित्व सिद्ध झाले. १ जून २०२१ ते १४ जून २०२१ या काळात, अकाउंट्सचे नेटवर्क आणखी विस्तारले. ते ४०,५०० यूजर्सवरून ७७,८०० यूजर्सपर्यंत गेले.

या अकाउंट्सच्या ट्विटरवरील वर्तनाचे १ डिसेंबर २०१९ ते ३० एप्रिल, २०२० या काळातील ऐतिहासिक विश्लेषण केले असता, अॅप्सच्या ऑपरेटर्सनी हेच नेटवर्क, फेब्रुवारी २०२० मध्ये दिल्लीत झालेल्या दंगलींच्या काळात, सांप्रदायिक धृवीकरणासाठी वापरल्याचे, उघड झाले.

उदाहरण १: दिल्ली हिंसाचार, फेब्रुवारी २०२०

दिल्ली सांप्रदायिक हिंसाचाराच्या नेटवर्क आलेखातील ४,५२३ छेदबिंदू (नॉड्स) दिसत (प्रत्येक छेदबिंदू वेगळे अकाउंट दाखवतो) .  @kapilmishra_ind या पडताळणीकृत अकाउंटशी केंद्रीभूत झाले आहेत. हे अकाउंट भाजप नेते कपिल मिश्रा यांचे आहे. ते एका टोकाला आहेत, तर @OpIndia_com ही उजव्या विचारसरणीची वेबसाइट दुसऱ्या टोकाला आहे.  @Rudraravisharma, @Kuldeep78328755, @vishkanyaaaa आणि @nationalist_kid ही आणखी काही, स्रोत टेक फॉग अॅपद्वारे व्यवस्थापन करत असलेली अकाउंट्स नेटवर्कच्या केंद्रस्थानी आहेत. ही अकाउंट्स नेटवर्कमधील अन्य अकाउंट्सना ट्विट्स रिले करत असल्याचे दिसत आहे.

राजधानीत हिंसाचाराचा उद्रेक होण्यापूर्वी मिश्रा यांनी प्रक्षोभक भाषण केले होते. नागरिकत्व कायद्याविरोधात रस्त्यांवर निदर्शने करणारा जमाव पोलिसांनी ‘क्लीअर’ केला नाही, तर कायदा हातात घेण्याची धमकी त्यांनी या भाषणात दिली होती. त्या दिवशी केलेले हिंसेचे आवाहन किंवा ‘गोली मारो सालों को’ सारखे शब्द अजिबात चुकीचे नव्हते, अशी दर्पोक्ती मिश्रा यांनी, २३ फेब्रुवारी, २०२१ रोजी ‘द वायर’ला दिलेल्या मुलाखतीत केली होती. जून २०२० मध्ये न्यूजलॉण्ड्रीने ‘ऑपइंडिया’चे अन्वेषण केले आणि त्यात असे दिसून आले की, या आउटलेटने गेल्या दोन वर्षांत किमान २५ चुकीच्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या तसेच चुकीच्या वार्तांकनाची किमान १४ उदाहरणे यात दिसत होती. जातीय हिंसाचार सुरू असताना, ऑपइंडिया हा चुकीच्या व धृवीकरण करणाऱ्या कथनांचा स्रोत होता, हे नेटवर्क आलेखात स्पष्ट दिसत आहे. दुसऱ्या बाजूला कपिल मिश्रा यांनी चुकीची आणि दिशाभूल करणारी माहिती वारंवार प्रसृत करून तसेच या समूहात नवीन व बनावट खात्यांची भर घालून, त्यांच्या नेटवर्कमधील लोक एकत्र केेले.

१८ जून, २०२१ रोजी प्रस्तुत लेखकांनी ट्विटर ग्लोबल पब्लिक पॉलिसी टीमला या नेटवर्कमधील ५,००० अकाउंट्सची यादी पुरवली, त्यानंतर या नेटवर्कमधील अनेक अकाउंट्स निलंबित करण्यात आली किंवा काढून टाकण्यात आली.

उदाहरण २: कोविड-१९ला धार्मिक रंग देणे तबलिगी जमातवर लक्ष केंद्रित करून भारतात २०२०मध्ये झालेल्या कोविड-१९च्या पहिल्या उद्रेकाला धार्मिक रंग देण्यातही ऑपरेटर्स सक्रियपणे सहभागी होते हे टेक फॉगच्या स्क्रीनशॉटवरील ‘पास्ट ट्रेण्ड्स’मधील अनेक हॅशटॅग्टच्या याद्यांतून दिसून येते. त्यांनी #तब्लीगी_जमात_जिहाद आणि  #TablighiJamatVirus यांसारखे ट्रेण्ड्स, मुस्लिम संमेलनांना राक्षसी स्वरूप देण्यासाठी तसेच देशातील वाढत्या साथीचे खापर या संमेलनाच्या आयोजकांवर तसेच उपस्थितांवर तसेच एकदंरीत मुस्लिम समाजावर फोडण्याच्या उद्देशाने, तयार करण्यात आले होते.

या हॅशटॅग्जच्या नेटवर्क आलेखात १,८९६ छेदबिंदू आहेत (प्रत्येक छेदबिंदू म्हणजे वेगळे अकाउंट). या जाळ्याच्या केंद्रस्थानी पुढील चार अकाउंट्स आहेत: @ManojKureel (आता निलंबित), @KiranKS (१५८,००० फॉलोअर्स), @rose_k01 (६३,००० फॉलोअर्स) आणि @RameshwarArya (आता निलंबित). हे नेटवर्क व्यापक टेक फॉग नेटवर्कशी मिळतेजुळते आहे. १,८९६पैकी १७०० अकाउंट्स टेक फॉगच्या समूहात आहेत. कपिल मिश्रा यांच्याशिवाय संबित पात्रा आणि अमित मालविय यांसारख्या भाजपा नेत्यांची तसेच कार्यकारिणी सदस्यांची व्हेरिफाइड अकाउंट्स या नेटवर्कमध्ये आढळली आहेत. सुदर्शन न्यूजचे मुख्य संपादक सुरेश चव्हाणके यांनी ऑपइंडियाबरोबर या नेटवर्कचा वापरही चुकीच्या तसेच दिशाभूल करणाऱ्या बातम्या पसरवण्यासाठी तसेच धार्मिक गोष्टी पसरवण्यासाठी केला आहे.

#TablighiJamatVirus हा ऑपरेटर्सनी प्रसृत केलेला एक हॅशटॅग या नेटवर्कमध्ये विस्तृतपणे शेअर करण्यात आला आहे. हा हॅशटॅघ १५६,००० ट्विट्सद्वारे विस्तारण्यात आला आणि सुमारे आठ कोटी यूजर्सपर्यंत पोहोचवण्यात आला.

टेक फॉग यादीतील, कोविड-१९ साथीला धार्मिक रंग देणाऱ्या अकाउंट्सपैकी @rosek01 या अकाउंटद्वारे करण्यात आलेले एक ट्विट (आता डिलीट करण्यात आले आहे), नेटवर्कमध्ये खूपच लोकप्रिय होते.

टेक फॉगच्या फीचर्सची व्याप्ती व अत्याधुनिकता या लेखात आणि एकंदर मालिकेत अधोरेखित करण्यात आली आहे. इंटरनेटमार्फत स्वयंचलित प्रचाराचा वापर आणि भारतातील सरकार व कॉर्पोरेटद्वारे जनमताचा विपर्यास करण्यातील या प्रचाराची भूमिका यांबद्दल एक प्राथमिक सूत्र या मालिकेने जनतेला देऊ केले आहे. भारतातील सत्ताधारी पक्षाच्या बाजूने जनमताचा विपर्यास करण्याच्या उद्देशाने, चुकीची माहिती प्रसृत करण्याची युक्ती पगारी कार्यकर्ते व स्वयंसेवकांमार्फत राबवणाऱ्या या विस्तृत आणि अद्याप कोणाच्या फारशा नजरेत न आलेल्या या व्यापक नेटवर्कचा कणा ‘टेक फॉग’ हाच आहे, असे एकंदर परिस्थितीवरून दिसते.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सची लोकप्रियता जशी वाढत जाईल, तसा व्यक्तिगत श्रद्धा व मते यांवरील ऑनलाइन भाष्याचा प्रभावही वाढत जाणार आहे. जेव्हा बेईमान राजकीय पक्ष आणि खासगी कंपन्या असे प्लॅटफॉर्म्स ताब्यात घेतात, तेव्हा भारतीय नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला तसेच राजकीय विचारधारेला पूर्वी कधी नव्हता एवढा धोका निर्माण होतो, यात वाद नाही.

अन्य देशांमधील राजकीय हस्तकांद्वारे अशाच प्रकारची अॅप्स अन्य देशांतील राजकीय हस्तकांद्वारे वापरली जात असल्याची शक्यता नक्कीच आहे. ही अॅप्स टेग फॉगच्या तुलनेत कमी आधुनिक असली, तरीही लोकशाही तत्त्वांना तसेच जनमताच्या स्वातंत्र्याला यामुळे मोठा धोका आहे हे निश्चित आणि लोकशाहीची तत्त्वे व स्वतंत्र जनमत हे दोन्ही घटक लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत हेही तितकेच खरे.

टीप: जर तुम्ही पर्सिस्टण्ट सिस्टम्स, शेअरचॅट किंवा भाजयुमोमध्ये काम करत असाल आणि टेक फॉग अॅपबद्दल तसेच

त्याचा वापर करणाऱ्या व्यापक ऑपरेशनविषयी तुम्हाला माहिती असेल, तर कृपया आमच्याशी

[email protected] या पत्त्यावर संपर्क साधा. तुमचे नाव गोपनीय राहील व खासगी बाबी उघड होणार नाही याची संपूर्ण काळजी आम्ही घेऊ.

आयुष्मान कौल, हे दक्षिण आशिया कव्हर करणारे स्वतंत्र संरक्षण व इंटेलिजन्स अॅनालिस्ट आहेत.

देवेश कुमार, हे ‘द वायर’मधील स्वतंत्र डेटा अॅनालिस्ट व वरिष्ठ डेटा व्हिज्युअलायझर आहेत.

मूळ लेख

COMMENTS