टेक फॉग: ‘व्हॉट्सअॅप हायजॅक’द्वारे भाजपचा प्रचार; यूआरएल्सचे मॉर्फिंग

टेक फॉग: ‘व्हॉट्सअॅप हायजॅक’द्वारे भाजपचा प्रचार; यूआरएल्सचे मॉर्फिंग

टेक फॉग अन्वेषणाच्या दुसऱ्या भागात ‘द वायर’ने, भाजपच्या सायबर फौजांना व्हॉट्सअॅप अकाउंट्स हॅक करण्याची तसेच थर्ट-पार्टी ऑटोमेशन टूल्स वापरून विशिष्ट हेतूने मोहिमा राबवण्याची क्षमता देणाऱ्या, या छुप्या अॅपमागील तंत्रज्ञान उलगडून बघितले.

नवी दिल्ली: भारतातील सत्ताधारी पक्षाचे हितसंबंध जपण्यासाठी काम करणाऱ्या राजकीय हस्तकांनी विकसित व तैनात केलेल्या तंत्रज्ञानाने त्यांना व्हॉट्सअॅप अकाउंट्स हॅक करण्याची आणि त्यापुढे जाऊन लक्षावधी भारतीयांची ओळख चोरण्याची क्षमता दिल्याचे दिसत आहे.

या उपक्रमाचे उद्दिष्ट निष्क्रिय हॅक्ड अकाउंट्सचा वापर करून चुकीची माहिती व बनावट बातम्या पेरणे हेच असल्याने व्हॉट्सअॅप वापरकर्ते अडचणीत येण्याची शक्यता आहे. ज्या व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांची अकाउंट्स व फोन क्रमांक वापरून हा खेळ खेळला जात आहे, त्यांना आक्षेपार्ह मजकुराचा प्रसार केल्याप्रकरणी फौजदारी केसेसचा सामना करावा लागू शकतो.

भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी तसेच मोदी सरकारच्या टीकाकारांना लक्ष्य करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या  टेक फॉग या छुप्या अॅपबद्दल २० महिने केलेल्या अन्वेषणाचा पहिला भाग गेल्या आठवड्यात ‘द वायर’ने प्रसिद्ध केला होता.

टेक फॉगला अनन्यसाधारण आणि घातक स्वरूप देणारी चार फीचर्स आम्ही स्पष्ट करून दाखवली होती- (१) ट्विटर व फेसबुकवरील ट्रेण्ड्स ताब्यात घेणे, (२) निष्क्रिय व्हॉट्सअॅप अकाउंट्सचा ताबा घेणे, (३) लक्ष्यिकृत नागरिकांचा छळ करण्यासाठी अत्यंत विशिष्ट डेटाबेस तयार करणे व उपयोगात आणणे आणि (४) या अॅपचा वापर करण्यासाठी झालेली राजकीय-कॉर्पोरेट संभाव्य हातमिळवणी. आम्ही वृत्तांत प्रसिद्ध केल्यानंतर यामधील स्रोताने ज्यांचे नाव घेतले होते, त्या पर्सिस्टण्ट सिस्टम्स आणि शेअरचॅट या दोन कंपन्यांनी, या अॅपबद्दल काहीही माहिती नाही, असे सांगणारी निवेदने प्रसिद्ध केली आहेत.

टेक फॉगद्वारे व्हॉट्सअॅप अकाउंट्स ताब्यात घेण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान आणि यातील प्रक्रियांचा आवाका वाढवण्यातील सुलभता यांवर वृत्तांताच्या दुसऱ्या भागात आम्ही प्रकाश टाकत आहोत.

व्हॉट्सअॅप हायजॅककशा प्रकारे काम करते

@Aarthisharma08 या ट्विटर अकाउंटशी संबंधित मूळ व्हिसलब्लोअरच्या, ३० एप्रिल २०२० रोजी घेण्यात आलेल्या मुलाखतीत, त्याने सांगितले की, हे अॅप सायबर फौजांना नागरिकांची व्यक्तिगत व्हॉट्सअॅप अकाउंट्स ताब्यात घेण्याची क्षमता त्यातील एका अंगभूत फीचरद्वारे देते. हे अॅप वापरणारे, अॅपच्या कॉण्टॅक्ट लिस्टमधील ‘निष्क्रिय’ व्हॉट्सअॅप अकाउंट्स दूरस्थपणे अक्सेस करू शकतात आणि हे ताब्यात घेतलेले फोन क्रमांक वापरून त्यांच्या ‘फ्रिक्वेण्टली कॉण्टॅक्टेड’ किंवा ‘ऑल कॉण्टॅक्ट्स’ना विशिष्ट हेतू असलेले संदेश पाठवू शकतात. निष्क्रिय अकाउंट्स म्हणजे अशी अकाउंट्स, ज्यांचे प्रत्यक्षातील वापरकर्ते व्हॉट्सअॅपला जोडलेले नसतात. त्यांनी एक तर व्हॉट्सअॅप काढून टाकलेले असते किंवा फोन रिसेट केलेला असतो.

ताब्यात घेतलेल्या अकाउंटची कॉण्टॅक्ट लिस्ट ही अॅपमधील एका क्लाउडवर आधारित राजकीय डेटाबेसशी जुळवलेली असते आणि त्यामुळे या व्यक्तींचा वापर भविष्यकाळात चुकीची माहिती पसरवण्यासाठी, छळासाठी किंवा ट्रोलिंगसाठी होऊ शकतो, असाही दावा व्हिसलब्लोअरने केला.

व्हॉट्सअॅप अकाउंट्स हॅक करण्याची प्रक्रिया ही अनेक पायऱ्यांची आहे असाही दावा स्रोताने केला. ‘अॅक्टिव’ लक्ष्यिकृत अकाउंट्सना प्रथम, अज्ञात कॉण्टॅक्टतर्फे, मीडिया फाइलच्या (इमेज किंवा व्हिडिओ) स्वरूपात, व्हॉट्सअॅप मेसेज पाठवला जातो. या पहिल्या फाइलमध्ये स्पायवेअर असते असा दावा स्रोतांनी केला. स्पायवेअर सामान्यपणे टेहळणीशी निगडित द्वेषपूर्ण कारवाया करते. लक्ष्याने मीडिया फाइल डाउनलोड केल्यानंतर स्पायवेअर अॅक्टिव्हेट होते आणि फोन कोणाच्याही ताब्यात जाऊ शकतो.

सुरुवातीची फिशिंग फाइल पोहोचली की, लक्ष्यीकृत अकाउंटच्या अॅक्टिविटी स्टेट्सवर टेक फॉगद्वारे लक्ष ठेवले जाऊ शकते. जेव्हा अकाउंट ‘निष्क्रिय’ होते, तेव्हा हस्तकांना ते अॅपच्या ऑटो-कम्प्लीट सर्चमध्ये बघता येते. सर्च रिझल्ट्समध्ये अकाउंट आल्यानंतर लगेचच हस्तकांना लक्ष्यिकृत व्हॉट्सअॅप अकाउंट दूरस्थपणे अक्सेस करता येते. यासाठी अकाउंटधारकाची संमतीही लागत नाही किंवा त्याला याचा पत्ताही लागत नाही. केवळ निष्क्रिय व्हॉट्सअॅप अकाउंट्स अक्सेस करण्याचा पर्याय व्यवहार्य असावा असे दिसते. ही तंत्रज्ञानाची मर्यादा नव्हे. सक्रिय अकाउंटद्वारे बनावट संदेश पाठवल्यास संशय वाढू शकतो, हे लक्षात घेऊन निष्क्रिय अकाउंट्सचा वापर केला जात असावा.

व्हॉट्सअॅप हायजॅकचे प्रात्यक्षिक

अकाउंट ताब्यात घेतली जात असल्याच्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी ‘द वायर’ने व्हिसलब्लोअरला या फीचरचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगितले. आमच्या टीममधील एका सदस्याचे व्हॉट्सअॅप अकाउंट, त्याच्या ‘फ्रिक्वेण्टली कॉण्टॅक्टेड’ कॉण्टॅक्ट्सना कस्टम मेसेज पाठवून, ताब्यात घेण्यास आम्ही त्याला सांगितले. ही पडताळणी करण्यासाठी प्रस्तुत लेखकांपैकी एकाचा फोन क्रमांक आवश्यक आहे का असे व्हिसलब्लोअरला सांगितले असता, त्या लेखकाचे व्हॉट्सअॅप अकाउंट तपशील अॅपमध्ये आधीपासूनच आहेत, असे त्याने सांगितले. प्रस्तुत लेखकाचे अकाउंट ३० जानेवारी, २०२० या तारखेपासून टेक फॉगमध्ये आहे असे स्रोताने स्पष्ट केले. या तारखेला लेखकाला एका अज्ञात क्रमांकावरून व्हॉट्सअॅप मेसेज आला होता आणि त्याने त्याच्या व्यक्तिगत उपकरणावर इमेजेसची गॅलरी डाउनलोड केली होती. हे अकाउंट हॅक होण्याच्या काही दिवस आधी, २५ जानेवारी २०२० रोजी, प्रस्तुत लेखकाने स्वतंत्रपणे एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला होता (हा अहवाल नंतर ‘फर्स्ट पोस्ट’नेही प्रसिद्ध केला). ट्विटरवरील भाजप आयटी सेलच्या काही बॉट-अकाउंट्सद्वारे झालेले समन्वयित हल्ले, जटील उतरंडी आणि महाकाय ट्विट्स यांचा आढावा या अहवालात घेण्यात आला होता.

आमच्या व्हॉट्सअॅप अकाउंट्सपैकी एकाचा फोन क्रमांक व्हिसलब्लोअरकडे आधीपासूनच असल्यामुळे टीमने त्याला त्याच दिवशी पहाटे ०२:०७ वाजता कस्टम टेक्स्ट मेसेज पाठवला. “This is a ping from 123.212.789.1 from Devesh” असा तो मेसेज होता. टेक फॉगच्या डेटाबेसमध्ये आधीपासून जो क्रमांक होता, त्याच्या उपकरणावरून आम्ही व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल केले.

‘द वायर’ टीमने स्रोताला त्याच्या उपकरणावरून करण्यात आलेली ‘हायजॅकिंग’ प्रक्रिया स्क्रीन-रेकॉर्ड करण्याची विनंती केली आणि तो व्हिडिओ शेअर करण्यास सांगितला.

पहाटे ०२:१९ वाजता, म्हणजे कस्टम मेसेज पाठवल्यानंतर काही मिनिटांतच, सर्व पाच ‘फ्रिक्वेंटली कॉण्टॅक्टेड’ यूजर्सना (यात या वृत्तांतावर काम करणाऱ्या दुसऱ्या लेखकाचाही समावेश होता) तोच मेसेज प्राप्त झाला. तो जसा काही आमच्या टीम सदस्याकडून आला असावा असे वाटत होते. यामुळे अॅपच्या या विशिष्ट अॅपची पडताळणी झाली. हे विश्लेषण प्रसिद्ध झाले तेव्हा हे फीचर सक्रिय होते हे नक्की. सहा मिनिटांनंतर स्रोताने टेक फॉग अॅप हे काम कसे करते हे दाखवणारे स्क्रीन रेकॉर्डिंग शेअर केले.

देवेश यांचा क्रमांक टेक फॉग कॉण्टॅक्ट लिस्टमध्ये आधीपासून असल्यामुळे, व्हिसलब्लोअर टेक फॉग सर्चमध्ये दिसणारे  ‘देवेश’ हे नाव सिलेक्ट करताना व्हिडिओच्या सुरुवातीला दिसत आहे.

लक्ष्यिकृत व्हॉट्सअॅप अकाउंटच्या ‘फ्रिक्वेण्टली कॉण्टॅक्टेड’ यूजर्सना पाठवल्या गेलेल्या कस्टम टेक्स्ट मेसेजचा स्क्रीन शॉट (स्रोत: द वायर)

लक्ष्यिकृत व्हॉट्सअॅप अकाउंटच्या ‘फ्रिक्वेण्टली कॉण्टॅक्टेड’ यूजर्सना पाठवल्या गेलेल्या कस्टम टेक्स्ट मेसेजचा स्क्रीन शॉट (स्रोत: द वायर)

उपकरण हॅक करण्याची ही पद्धत बऱ्यापैकी वापरली जाते. ट्रोजन हॉर्स स्टोरीची आठवण ही पद्धत करून देते. एनएसओ ग्रुपने झिरो-क्लिक एक्स्लॉइट विकसित करण्यापूर्वी पिगॅसस स्पायवेअरही अशाच प्रकारची पद्धत वापरत होते. आम्ही ही शक्यता पडताळून बघितलेले नाही, पण एकदा का ‘निष्क्रिय’ अकाउंट ताब्यात घेतले की, ते असुरक्षित होईल आणि पिगॅसस व अन्य स्पायवेअर्सही त्यात घुसू शकते अशी दाट शक्यता आहेच.

प्रस्तुत लेखकांपैकी एकाला एका स्रोताकडून कळलेल्या माहितीनुसार, मीडिया फाइल डाउनलोड केल्यानंतर स्पायवेअर सक्रिय होत असावे आणि मग त्याद्वारे यूजरच्या व्हॉट्सअॅप अकाउंटचे खासगी युनिक टोकन किंवा की चोरली जात असावी. टेक फॉगच्या हातात एकदा खासगी की आली की, ते अकाउंटचा अॅक्टिव्हिटी स्टेटस बघू शकत असेल आणि व्हॉट्सअॅपद्वारे मेसेजेस डिलिव्हर करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या एपीआयमार्फत दूरस्थपणे मेसेजेस पाठवू शकत असेल. या फीचरमधील ‘फ्रिक्वेण्टली कॉण्टॅक्टेड’ किंवा ‘ऑल कॉण्टॅक्ट्स’ना मेसेज पाठवण्याची प्रक्रिया ही व्हॉट्सअॅपच्या सर्व्हरवरील डेटा व एपीआयच्या रचनेशी मिळतीजुळती आहे हेही एका वेगळ्या स्रोताने स्पष्ट केले.

याचा अर्थ टेक फॉग कोणत्या विशिष्ट यंत्रणेद्वारे व्हॉट्सअॅप अकाउंट ताब्यात घेते ते स्वतंत्रपणे पडताळून बघणे ‘द वायर’ला वृत्तांताच्या प्रसिद्धीच्या वेळी शक्य झाले नव्हते.

अस्तित्वात असलेल्या माहितीमध्ये बदल करून बनावट बातम्या तयार करणे

स्रोताने टेक फॉगच्या आणखी एका प्रगत फीचरचे प्रात्यक्षिकही दिले. या फीचरद्वारे अस्तित्वात असलेल्या वृत्तांतांमध्ये बदल करून बनावट बातम्या तयार केल्या जातात. (‘काँग्रेस’च्या जागी ‘भाजप’ किंवा ‘डाव्यां’च्या जागी ‘उजवे वगैरे’) आणि त्यातून प्रसिद्ध लेखांच्या लिंक्स बदलून कपोकल्पित गोष्टी पसरवल्या जातात.

उदाहरणार्थ, thewire.in/pets/cat-dog-parrot ही लिंक योग्य त्या लेखाकडे घेऊन जाऊ शकते पण हे अॅप लिंकमध्ये बदल घडवून आणून ती thewire.in/pets/cat-dog-piranha अशी करेल आणि त्याद्वारे बनावट लेखाकडे घेऊन जाईल. सामान्य वाचकाला हे लक्षात येणार नाही, कारण, लिंकचा बराचसा भाग तसाच आहे. भरीस भर म्हणजे फेक पेजची शैली ‘द वायर’च्या वेबसाइटसारखीच असेल. या क्षमतेचा पुरावा म्हणून व्हिसलब्लोअरने ‘द वायर’ला टीमला एक लिंक दिली. ही लिंक ‘प्रिंट’वरील एका लेखाच्या विपर्यस्त व्हर्जनकडे घेऊन जाणारी होती (हा लेख प्रस्तुत लेखकांपैकी एकानेच लिहिलेला होता.) तयार केलेली लिंक मूळ नियतकालिकाच्या पेजशी मिळत्याजुळत्या एका पेजकडे घेऊन गेली. मात्र, स्रोताने शीर्षकामध्ये तसेच मजकुराच्या काही भागात फेरफार केले होते, जेणेकरून, लेखकाने न म्हटलेल्या गोष्टी त्याच्या तोंडी घातल्या गेल्या होत्या. हा लेख प्रसिद्ध झाला त्यापूर्वी ती लिंक निष्क्रिय करण्यात आली होती. त्यामुळे आम्ही खालील स्क्रीनशॉट्स देत आहोत.

 

 

 

या प्रात्यक्षितामध्ये दाखवलेल्या क्षमता या बझफीडमधील डेटा साइंटिस्ट मॅक्स वूल्फ यांनी २०१९ मध्ये अधोरेखित केलेल्या क्षमतांशी मिळत्याजुळत्या आहेत.

या लेखात वूल्फ म्हणतात की, जीपीटी-टू नावाचे एक एआय मॉडेल वापरून सुसंगत, मजकुराप्रमाणे भासणारे मेसेजेस निर्माण केले जाऊ शकतात. (जीपीटी-टू हे ओपनएआय या अमेरिकास्थित एआय संशोधन कंपनीने विकसित केले आहे. त्यांच्या सल्लागारांपैकी एक एलॉन मस्क आहेत. ओपनएआयने मे २०२० मध्ये जीपीटी-थ्री नावाचे अद्ययावत प्रारुप रिलीज केले होते.)

मात्र, सेल्सफोर्स नावाच्या आणखी एका कंपनीचे सीटीआरएल हे एआय मॉडेल ‘अधिक चांगले’ आहे. यामध्ये दीर्घ स्वरूपातील लेख निर्माण करून ही क्षमता आणखी पुढे नेण्याची क्षमता आहे. हे मॉडेल कोणत्याही वृत्तांतांच्या मालिकेतून ‘आश्चर्यकारक प्रमाणात मेटाडेटा’ निष्कासित करू शकते हे वूल्फ यांनी दाखवले आहे. आपण केवळ लिंक्स शेअर करायच्या आणि त्यांतील वैशिष्ट्यपूर्ण मजकुराची तपशीलवार माहिती द्यायची. म्हणझेच शैली व सूर काय आहे याचे तपशील द्यायचे. या माहितीचा वापर करून जंक न्यूज तयार करण्यासाठी सीटीआरएल उपयोगात आणले जाऊ शकते आणि ही बातमी मूळ बातमीसारख्याच पण काही शब्द बदलून तयार केलेल्या लिंकवर अपलोड केली जाऊ शकते.

तयार केलेला लेख खराखुरा भासतो, मूळ लेखाची शैली व सूर यात जसाच्या तसा येतो. त्यामुळे आपण बनावट लेख वाचत आहोत अशी शंकाही वाचकांच्या मनात येत नाही.

अशा अत्याधुनिक एआय मॉडेल्समुळे अॅप चालवणाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यात मदत होते. त्याऐवजी हे हस्तक भाजपच्या व्हॉट्सअॅप ग्रुप नेटवर्कमध्ये जंक न्यूज लिंक्सचा प्रसार करण्यावर शक्ती खर्च करू शकतात. खाली दिलेल्या टास्करच्या मदतीने ते हे करू शकतात.

ऑटोमेशन इंजिन्स: टास्कर आणि ओपनएआय 

निष्क्रिय व्हॉट्सअॅप अकाउंट्स ताब्यात घेण्याखेरीज तसेच खऱ्या बातम्यांमधून बनावट बातम्या तयार करण्याखेरीज, भाजपचे राजकीय संदेशवहन ऑटोमेट व स्ट्रीम करण्यासाठीही टेक फॉग अॅपचा वापर केला जातो, असा दावा व्हिसलब्लोअरने केला आहे. यात बहुतांशी शिवीगाळ आणि प्रचार असतो. मोठ्या प्रमाणात बनावट अकाउंट्स निर्माण करून हा उद्योग चालवला जातो. अॅप हाताळणारे मग ही दुय्यम अकाउंट्स वापरून राजकीय चॅट ग्रुप्सच्या विस्तृत जाळ्याद्वारे त्यांना हव्या त्या गोष्टींचा प्रसार करतात.

२०१९ मध्ये व्हॉट्सअॅपचा वापर राजकीय प्रचाराव्यक्तिरिक्त अन्य कारणांसाठी कसा केला गेला याबद्दल ‘टाइम’ने केलेल्या अन्वेषणानुसार, हे चॅट ग्रुप्स वारंवार चुकीची माहिती आणि द्वेषपूर्ण कथने प्रसारित करत राहतात. यातील बहुतांश प्रसार फॉरवर्डेड मेसेजेसद्वारे केला जातो. हे ग्रुप्स धार्मिक व वांशिक अल्पसंख्यांना लक्ष्य करणारे मेसेजेस पसरवतात. ज्या देशामध्ये चुकीच्या माहितीचे पर्यवसान हिंसेत होऊ शकते तेथे हे अत्यंत धोकादायक आहे.

मूळ व्हिसलब्लोअरने दिलेल्या प्राथमिक माहितीच्या तसेच पर्सिस्टण्ट सिस्टम्सच्या अन्य स्रोतांनी शेअर केलेल्या स्क्रीनशॉट्सवर बरेच काम करून ‘द वायर’ने हा वृत्तांत तयार केला आहे. टेक फॉग टास्कर नावाचे अँड्रॉइड वापरून मेसेजेसच्या वेळा निश्चित करते तसेच ते प्रसारित करते याची पडताळणी आम्ही केली आहे. हे मेसेजेस व्यक्तिगत यूजर्सना तसेच सत्ताधारी पक्षाकडून व्यवस्थापित हजारो अतिस्थानिक व्हॉट्सअॅप ग्रुप्सना पाठवले जातात.- [Screen B] 

टास्कर जोओ दियास नामक डेव्हलपरने विकसित केले आहे. अँड्रॉइड अॅप स्टोअरमध्ये उपलब्ध सर्वांत लोकप्रिय अॅप्सपैकी हे एक आहे. हे अॅप यूजर्सना अनेक ऑटोमेटेड टास्क क्रिएट करून त्याद्वारे विशिष्ट कृतीला चालना देण्याची मुभा देते. यामध्ये कॅमेरा ओपन करणे किंवा कॉण्टॅक्टला कॉल करणे आदी कृतींचा समावेश होतो. त्याचप्रमाणे अन्य स्थापित अॅप्सवरील फंक्शन्स जारी करण्याचाही म्हणजेच फेसबुक मेसेंजरद्वारे मेसेज पाठवण्याचा किंवा यूट्यूबवर म्युझिक प्ले करण्याचाही, समावेश यात होतो.

टास्करच्या माध्यमातून ऑटोमेशनदरम्यान अॅप उघडणे किंवा बंद करण्याची प्रक्रिया पार्श्वभूमीला होत राहते. यासाठी सक्रिय देखरेखीची गरज भासत नाही. त्यामुळे अॅप ऑपरेटरला अन्य गोष्टी करण्याचे स्वातंत्र्य मिळते. डेव्हलपर्स टास्करच्या कार्यत्मकता थर्ड-पार्टी प्लगइन्स निर्माण करून विस्तारू शकतात. त्यामुळे अन्य लोकही विशिष्ट उपयोगासाठी अॅप कस्टमाइझ करून घेऊ शकतात.

टेक फॉग ऑपरेट करणारे लोक टास्करला एक लिंक देतात. ती लिंक विविध ‘अॅक्शन्स’ ट्रिगर करण्याच्या सूचना असलेल्या डेटाबेसला जाते. यामध्ये व्हॉट्सअॅप ओपन करणे किंवा मेसेज पाठवणे अशा अॅक्शन्स असू शकतात, असे स्रोताने स्पष्ट केले.

व्हॉट्सअॅपवर मेसेज ऑटोमेट करण्याचे सॅम्पल टास्क दाखवणारा टास्करचा स्क्रीनशॉट (स्रोत: Medium/archive)

व्हॉट्सअॅपवर मेसेज ऑटोमेट करण्याचे सॅम्पल टास्क दाखवणारा टास्करचा स्क्रीनशॉट (स्रोत: Medium/archive)

सरकारच्या वतीने व्हॉट्सअॅप मेसेजेस ऑटोमेट करू शकणारी अॅप्स खासगी कंपन्यांद्वारे विकसित केली जात असून, हा उद्योग जोमाने चालला आहे, असे हफपोस्टने २०१९ मध्ये प्रसिद्ध केलेल्या वृत्तांतात नमूद करण्यात आले होते. सध्याच्या व्यवस्थेमध्ये, ओपन-सोर्स आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तंत्रांच्या एकात्मीकरणामुळे ऑटोमेशन प्रक्रियेने प्रचंड मोठी झेप घेतली आहे. 

निष्कर्ष

ट्विटर, व्हॉट्सअॅपसारखे प्लॅटफॉर्म्स एकट्या भारतातील कोट्यवधी वापरकर्त्यांमध्ये खासगीत्व तसेच जवळिकीची भावना निर्माण करतात. मात्र, राजकीय हस्तक याच फीचर्सचा गैरवापर करून चुकीची व घातक माहिती, विपर्यस्त बातम्या यांचा प्रसार करत आहेत आणि प्लॅटफॉर्मचे मालक तसेच कायदा प्रवर्तन यंत्रणांच्या चाळणीतून निसटत आहेत.

व्हॉट्सअॅपचा ताबा किती सुलभतेने व सफाईने घेतला जाऊ शकतो तसेच तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ऑटोमेटेशन, व्याप्ती वाढवणे हे प्रकार भारतातील माहिती परिसंस्थेला आणि नागरिकांच्या खासगीत्वाला कसे धोक्यात आणू शकतात हे यातून उघड झाले आहे. याच फीचर्समधून भाजपची तळी उचलणाऱ्या तंत्रज्ञानात्मक सुसज्जतेबद्दल व व्हॉट्सअॅपचे शस्त्र वापरून जगातील सर्वांत मोठ्या लोकशाहीतील सार्वजनिक व राजकीय मतांवर वर्चस्व गाजवण्याच्या प्रवृत्तीबद्दल, आजवर कधीही आली नव्हती, एवढी माहिती पुढे आली आहे.

आमच्या वृत्तांताच्या तिसऱ्या भागात आपण राजकीय कथने तयार करण्यासाठी व महिला पत्रकारांना, विशेषत: नरेंद्र मोदी सरकारवर टीका करणाऱ्या महिला पत्रकारांना, लक्ष्य करण्यासाठी टेक फॉगचा वापर कसा करण्यात येत आहे हे बघणार आहोत.

आयुष्मान कौल हे दक्षिण आशिया कव्हर करणारे स्वतंत्र संरक्षण व इंटेलिजन्स अॅनालिस्ट आहेत.

देवेश कुमार हे वायर’मधील स्वतंत्र डेटा अॅनालिस्ट व वरिष्ठ डेटा व्हिज्युअलायझर आहेत.

टीप: जर तुम्ही पर्सिस्टण्ट सिस्टम्स, शेअरचॅट किंवा भाजयुमोमध्ये काम करत असाल आणि टेक फॉग अॅपबद्दल तसेच त्याचा वापर करणाऱ्या व्यापक ऑपरेशनविषयी तुम्हाला माहिती असेल, तर कृपया आमच्याशी [email protected] या पत्त्यावर संपर्क साधा. तुमचे नाव गोपनीय राहील व खासगी बाबी उघड होणार नाही याची संपूर्ण काळजी आम्ही घेऊ.

लेखाचे छायाचित्र स्रोत: @oddbench

 

COMMENTS