के. चंद्रशेखर राव यांचे नव्या आघाडीचे संकेत

के. चंद्रशेखर राव यांचे नव्या आघाडीचे संकेत

मुंबईः देशात तिसरी आघाडी निर्माण करण्याच्या दृष्टीने राजकीय हालचाली सुरू झाल्या असून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी मुंबईत शिवसे

कोरोना से कुछ नया सिखोना
गिलगिट-बाल्टिस्तानला प्रांताचा दर्जा; भारताचा विरोध
नागरिकत्व कायदा राबवणारच – गृहमंत्री

मुंबईः देशात तिसरी आघाडी निर्माण करण्याच्या दृष्टीने राजकीय हालचाली सुरू झाल्या असून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत राव यांनी केंद्रातील भाजपच्या सरकारवर निशाणा साधत देशातील राजकारण खालच्या स्तरावर जात असून देशातील विरोधकांनी एकत्र येऊन परिवर्तन आणण्याची गरज असल्याचे विधान केले. या परिवर्तनासाठी प्रत्येक नेत्याला जोडणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

देशाचे राजकारण व विकासाची गती यांना प्राधान्य देण्यासाठी असून सध्या जी देशाची परिस्थिती आहे, त्यावर चर्चा करण्यासाठी आपण महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलो असल्याचे राव यांनी सांगितले. देशात परिवर्तन हवे, विकासाला गती देण्याची गरज आहे. त्यासाठी काही मूलभूत बाबींवर लक्ष्य केंद्रीत करण्याची गरज असून देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ७५ वर्षानंतर देशात जे काही परिवर्तन हवे होते, ते झाले नाही. आता मोठ्या परिवर्तनाची गरज आहे, अशी आमच्यासारख्या अनेक नेत्यांची इच्छा असल्याचे मत राव यांनी व्यक्त केले.

राव यांनी देशातल्या परिवर्तनाचा मार्ग महाराष्ट्रातून जातो व तो यशस्वी होतो असे सांगत छ. शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरेंसारख्या व्यक्तिमत्वाने देशाला प्रेरणा मिळाली आहे. ही प्रेरणा घेऊन पुढे लढले पाहिजे. महाराष्ट्रातून याची सुरूवात झाली, आज ठाकरे व पवारांशी चर्चा केल्यानंतर त्याचे परिणाम चांगले दिसून येतील, असा आशावाद व्यक्त केला.

राव यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, देशातील राज्ये एकमेकांचा शेजारधर्म विसरले आहेत. महाराष्ट्र आणि तेलंगणाला १००० किलोमीटरची एकत्रित सीमारेषा असल्याचा उल्लेख झाला. आम्ही सख्खे शेजारी आहोत. देशात राज्याराज्यांमध्ये चांगलं वातावरण राहिलं पाहिजे. नाहीतर प्रत्येकजण आपआपला हेतू ठेऊन पुढे चालेल आणि राज्य गेलं खड्ड्यात, देश गेला खड्ड्यात अशी परिस्थिती निर्माण होईल. हे राजकारण देशाला परवडणारं नाही. आज एका नव्या विचाराची सुरुवात झालीय. त्याला आकार यायला थोडा अवधी लागेल. देशाच्या मुलभूत प्रश्नांना हात न घालता दुसऱ्यांना बदनाम करण्याचा प्रकार सुरू आहे. मी काय केलं हे न सांगता तुम्ही काय नाही केलं हे खोट्या पद्धतीने सांगितलं जातंय. हा कारभार मोडायला पाहिजे. त्यासाठी आम्ही दोघांनी मिळून एक दिशा ठरवली आहे,” असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.

“गेल्या काही दिवसांपासून आम्ही भेटणार, भेटणार अशा चर्चा होत्या, बातम्याही येत होत्या. तो दिवस आज प्रत्यक्ष उजाडला. चंद्रशेखर राव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा, बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. कालच शिवरायांची जयंती होती आणि दुसऱ्याच दिवशी ही भेट होत आहे. या भेटीत आम्ही काही लपवल्यासारखं ठेवलेलं नाही. आतमध्ये काहीतरी बोलायचं आणि बाहेर येऊन सदिच्छा भेट होती असं म्हणायचं असं नाही, असेही ठाकरे म्हणाले.

“जे आहे तसं मागील पानावरून पुढे चालू ठेवायचं असेल तर कोणी मुख्यमंत्री बनेल, कोणी पंतप्रधानपदावर बसेल, पण देशाचं काय होईल हा विचार कोणीतरी करायला पाहिजे होता. तो विचार आजपासून आम्ही करायला सुरुवात केलीय. आज आम्हाला नव्याने साक्षात्कार झालाय असा काही भाग नाही, पण सुरुवात कोणी करायची, तर ती सुरुवात आम्ही करतो आहोत,” असेही ठाकरे म्हणाले.

राव-पवार भेट

ठाकरे यांच्या भेटीनंतर राव यांनी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. सुमारे दीड तास येथे चर्चा झाली. या चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी आमच्या बैठकीत बेरोजगारी, गरीबी अशा समस्यांवर चर्चा झाली. देशात वेगळे परिवर्तन आणले पाहिजे, त्यासाठी काम सुरू केले पाहिजे, असे आमचे मत बनल्याचे सांगितले.

राव यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना देशापुढे लवकरच नवा अजेंडा ठेवण्यात येईल असे सांगितले. लवकरात लवकर आम्ही देशातील इतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून बैठक आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0