बिहारमध्ये बनावट कोविड रुग्णः चौकशीचे आदेश

बिहारमध्ये बनावट कोविड रुग्णः चौकशीचे आदेश

पटनाः बिहारमधील तीन जिल्ह्यात ८८५ कोरोना रुग्णांच्या नोंदी बनावट आढळल्याने राज्य सरकारने या घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या ८८५ नोंदींमध्ये खोटी नावे, पत्ते, मोबाइल क्रमांक व अन्य माहिती देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. गुरुवारी बिहार सरकारने चौकशीचे आदेश दिले तर शुक्रवारी राज्यसभेत या घोटाळ्यावर प्रश्न उपस्थित करण्यात आले.

इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार त्यांच्या प्रतिनिधींनी बिहारमधील जमुई, शेखपुरा व पटना येथील ६ प्राथमिक आरोग्य केंद्रांना १६, १८ व २५ जानेवारी रोजी भेट दिली व तेथील कोरोना रुग्णांच्या नोंदीची तपासणी केली. यात जमुईमधील ३ प्राथमिक आरोग्य केंद्रावर ५८८ कोरोनाच्या नोंदी होत्या पण त्यांची नोंद चुकीची झाली होती. त्यात खोटे पत्ते, मोबाइल क्रमांक, बनावट नावे समाविष्ट करण्यात आली असल्याचे दिसून आले.

जमुईतील बरहटमध्ये २३० नोंदींमधील केवळ १२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले. त्यानंतर सिकंदराबाद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ४३ नोंदी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा व जमुई सदरमध्ये १५० पैकी ६५ नोंदी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आढळून आल्या.

या प्राथमिक आरोग्य केंद्रावर काम करणार्या आरोग्य कर्मचार्यांनी आपले दैनंदिन उद्दिष्ट्य पूर्ण करण्यासाठी बनावट नावाच्या रुग्णांची नोंद केल्याचे दिसून आले.

हा घोटाळा दिसून आल्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री मंगल पांडेय यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

अन्य जिल्ह्यातही घोटाळा शक्य

इंडियन एक्स्प्रेसने जमुई, शेखपूरा, पटना या ३ जिल्ह्यातला घोटाळा बाहेर काढला असला तरी तो राज्यात सर्वत्र असल्याचा आरोप प्रमुख विरोधी पक्ष आरजेडीने केला आहे. आरजेडी हा मुद्दा शुक्रवारी संसदेतही उपस्थित केला.

मूळ बातमी

COMMENTS