ठाकरे गेले, शिंदे आले; आता पुढे?

ठाकरे गेले, शिंदे आले; आता पुढे?

भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या चार पक्षांबरोबर समाजवादी पक्ष, एमआयएम आणि रिपब्लिकन, जनता पक्ष असे सगळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांशी लढणारच. प्रश्न असा आहे की शिवसेना, शिंदे-सेना, मनसे हे तीन पक्ष एकमेकांच्या पायात पाय घालत जी मतं खाणार, ती मतं कुठली?

पाकिस्तानचे हल्ले म्हणून दाखवले व्हिडिओ गेमचे फूटेज
कुलगुरुंनी राजीनामा द्यावा – आयेशी घोष
हे त्यांच्यापैकी कुणाच्याही बाबतीत घडू शकते!

बहुतेक निरिक्षकांचे अंदाज चुकवून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री चक्क फुटिरांचे नेते एकनाथ शिंदे हेच झाले! असो. शिंदे यांचं अभिनंदन. आता ते कामाला लागतील, अशी अपेक्षा. महाराष्ट्र हे प्रगत राज्य असलं तरी इथे सारंच काही आलबेल नाही. करण्यासारखं खूप काही आहे. उद्धव ठाकऱ्यांच्या आड कोविडची भली थोरली धोंड आली, याउलट शिंद्यांना ‘डबल इंजिन’ मिळालं आहे. आता महाराष्ट्राचा विकास विद्युतवेगाने होणार! तसं होण्यासाठी शिंदे आणि त्यांचे सहकारी यांना शुभेच्छा.

आता पुढे? कोणालाच असं वाटत नाही की महाराष्ट्रातल्या नाट्यावर पडदा पडला, महाविकास आघाडीचं राज्य गेलं आणि फुटीर शिवसेना -भाजप या युतीचं राज्य चालू झालं, संपलं नाट्य. कोणी म्हणतात, फडणविसांना भाजपच्या हायकमांडने धोबीपछाड घातला. कोणाला वाटतं, शिंदे हे शिवसैनिक. एक शिवसैनिक मुख्यमंत्री झाला, हे पाहून बंडखोर गटात उलटी बंडाळी होणार नाही, उलट ठाकऱ्यांच्या बरोबर असणाऱ्यांमध्येच गळती लागेल; भाजपने सत्तेसाठी तमाशा केला असं म्हणता येणार नाही, असं वाटणारेदेखील आहेत, तर काहींच्या मते पुढच्या अडीच वर्षांत शिवसेनेला खिंडार पाडण्याच्या बोलीवरच शिंद्यांना मुख्यमंत्री करण्यात आलं आहे. मग पुढच्या निवडणुकीनंतर भाजपला कोण रोखणार!

असो. या बोलधुमाळीत न पडता काही गोष्टींचा विचार करायला हवा.

  • शिंदे मुख्यमंत्री झाले तरी युतीत त्यांचा गट हा छोटा पार्टनर आहे. उद्या खरोखर ठाकऱ्यांची ताकद कमकुवत झाली, की शिंद्यांचं महत्त्वसुद्धा कमीच होणार. एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणते पत्ते आहेत? त्यांनी शिवसेना फोडली. हिंदुत्व सोडलं म्हणून, मान दिला नाही म्हणून, आपल्याला निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेतलं नाही म्हणून, महत्त्वाकांक्षेला पंख फुटले असताना मोकळेपणी भरारी मारू दिली नाही म्हणून; कुठल्याही कारणाने नाराज असलेल्या आमदारांचा मोठा गट त्यांनी एकत्र केला, हे त्यांचं कर्तृत्व. त्या गटातल्या सगळ्यांना त्यांचं नेतृत्व मान्य झालं, ही आणखी एक जमेची बाजू. शिवसेनेसारख्या कट्टर निष्ठेला मोठं मोल असणाऱ्या संघटनेत बंड करण्याचं धारिष्ट्य त्यांनी दाखवलं, हासुद्धा सद्यस्थितीत एक गुणच.

तर मिळालेल्या संधीचा योग्य फायदा उठवून आपलं स्थान पक्कं करण्याइतकं मुरब्बी राजकारण ते करू शकतील का? एका बाजूने पवार, तर दुसरीकडून मोदी-शहा (आणि बगलमें साक्षात फडणवीस!) यांना तोंड देत ते स्वत: मोठे होतील का? तशी इच्छा त्यांना नाही, असं तर असूच शकत नाही. कारण, ज्याला महत्त्वाकांक्षा नाही, तो राजकारणी कसला!

  • मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर आली आहे. देशातली सर्वात मोठी, श्रीमंत महापालिका. देशाच्या आर्थिक राजधानीवर नियंत्रण राखणारी महापालिका. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या चार पक्षांबरोबर समाजवादी पक्ष, एमआयएम आणि रिपब्लिकन, जनता पक्ष असे सगळे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत एकमेकांशी लढणारच. प्रश्न असा आहे की शिवसेना, शिंदे-सेना, मनसे हे तीन पक्ष एकमेकांच्या पायात पाय घालत जी मतं खाणार, ती मतं कुठली? मतदारांचे हिंदुत्ववादी मतदार आणि इतर मतदार, असे भाग पाडले, तर हे तीन अधिक भाजप, यांनी परस्परांना छेद दिल्याचा फायदा बिगरहिंदुत्ववादी पक्षांना होणार. पण सध्या भाजप हाच सर्वात वजनदार पक्ष आहे, हे लक्षात घेऊन मतदारांना भाजपवाले आणि भाजपविरोधी, असं विभागलं तर या भाजपेतर पक्षांच्या मतांमधल्या विभाजनाचा प्रचंड फायदा भाजपला होणार!

यात फायदा नेमका कोणाला होणार, हा मुख्य मुद्दा नाही; या तिढ्याचा लाभ स्वत:साठी उचलण्याची चपळाई, तजवीज कोण कशी करेल, हा आहे. मुंबईत पवारांच्या राष्ट्रवादीला फारसं स्थान नाही, हे इथे लक्षात ठेवलेलं बरं. जिथे स्वपक्षाला एकूणच संधी कमी, तिथे पवार कितीसा रस घेतील? आणि त्यांनी रस घेतला नाही, तर मग कोणाचे डावपेच सरस ठरतील? शिंदे कितीसे धोरणी, भविष्यवेधी आहेत? त्यांचं संघटनकौशल्य कसं आहे? सत्तेच्या, विशेषत: मुंबईसारख्या भल्या मोठ्या घबाडावरील सत्तेच्या लढाईत जे मनी-मसल, वगैरे विविध प्रकारचं पाठबळ लागतं, ते उभं करण्याची क्षमता शिंद्यांपाशी किती आहे? भाजप त्यांच्याशी जागावाटप करेल, तेव्हा काय होईल? मराठी भागात शिवसेनेची मतं खाणे आणि गुजरातीबहुल जागा भाजपला सोडणे, अस शिंदे करतील का?

  • विरोधकाशी लढाई करायची, ती पूर्ण त्वेषाने, तयारीने आणि सर्व आघाड्यांवर करायची, असा भाजपचा बाणा असतो. त्यांचा आयटी सेल तात्काळ कामाला लागतो आणि खोट्यानाट्या कंड्या पिकवून वाटेल त्या पातळीपर्यंत उतरून भाजप लढतो. ‘चुनावी जुमला’ असं त्याचं समर्थनही करतो. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविना सत्ता हस्तगत केल्यावर ठाकरे आणि त्यांचे सोबती यांना भाजप थेट शत्रू मानणार. तर प्रचाराच्या आघाडीवर शिंद्यांना, सामान्य शिवसैनिकांना सेफ ठेवून ठाकऱ्यांना किती, कसं बदनाम केलं जाईल, हे आता पहायचं आहे. स्वत:ला अजूनही शिवसैनिक मानणारे शिंदे आणि त्यांचे सध्याचे साथीदार यांचा त्यात किती, कसा सहभाग असेल? ‘मला राडा हवा, राड्याचा फायदा हवा, पण अंगावर चिखल उडलेला नको आहे,’ असं त्यांना म्हणता येणार नाही. माघारी जाण्याचे त्यांचे दोर कापलेले आहेत, हे त्यांच्या लक्षात आलं नसेल का? चिखलच काय, राडा म्हटलं की रक्तसुद्धा अंगावर उडतं! उलट, शिवसेनेशी राडा करण्याची जबाबदारीच त्यांना उचलावी लागेल.
  • आता शेवटचं. थोडा दुरून विचार केला तर या सगळ्या उलटसुलट मांडणीला फार अर्थ नाही, असं जाणवतं. कारण जो भाजपच्या वळचणीला गेला, तो संपला. शिंदे आणि त्यांच्या सोबतचे आमदार, खासदार, कार्यकर्ते, वगैरे यांपैकी एकालाही भाजपच्या अजेंड्याविरुद्ध एक अक्षर उच्चारता येणार नाही.

म्हणजे काय, हे समजून घ्यायला हवं.

हा देश एक संघराज्य आहे; कारण इथे भाषा, चालीरीती, अस्मिता आणि श्रद्धा यांत इतकं वैविध्य आहे की सगळ्यांना एकाच मापाच्या कपड्यांत कोंबणं अशक्य आहे. ‘नेशन’ – राष्ट्र या संकल्पनेच्या कोणत्याही व्याख्येत भारत बसत नाही. पण भाजपसाठी हे एक एकजिनसी हिंदुराज्य आहे. इथे बिगरहिंदू केवळ एक आश्रित म्हणून राहू शकतो. संस्कृत ही सर्व भारताची आद्य भाषा आहे. वर्णाश्रम, जातिव्यवस्था ही इथली प्राचीन आणि पवित्र परंपरा आहे. इथे राजा हा देवाचा अंश मानला जातो. न्यायव्यवस्थासुद्धा प्रशासनाप्रमाणे राजाच्या नियंत्रणाखालीच येते. राजा कायदे करतो आणि प्रसारमाध्यमं राजाच्या शब्दाला आव्हान देत नाहीत. राजा हेच सर्वोच्च सत्ताकेंद्र असतं आणि राजाचे सरदार राजाच्या वतीने राज्यातल्या वेगवेगळ्या प्रांतांचा कारभार बघतात.

मोदीसरकारच्या अंमलाखाली या मार्गाने देशाची वाटचाल होते आहे. आंबेडकरांनी घडवलेल्या घटनेला कागदावर तशीच ठेवून जे संस्थात्मक बदल केले जात आहेत, त्यांच्यांवरून ही वाटचाल अगदी स्पष्ट दिसून येते. शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शिवाजी महाराज सगळ्यांचे मोठमोठाले पुतळे उभारले जातील; पण ‘शूद्र कोण होते’, ‘शेतकऱ्याचा असूड’, मागासवर्गियांना आरक्षण आणि धर्म-जातनिरपेक्ष स्वराज्य या संकल्पनांचा मागमूस रहाणार नाही. भ्रष्टाचार केलेला चालेल; पण मुसलमानांना नामोहरम करण्याच्या भाजपच्या धोरणाला हलकासुद्धा धक्का लावता येणार नाही. यात तसूभर बदल करण्याची शिंद्यांची औकात नाही.

की त्यांनासुद्धा हिंदुत्व म्हणजे हेच अभिप्रेत आहे? अगदी सगळं सगळं? मनातून त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक प्रणित हिंदुत्वात विलीनच व्हायचं आहे?

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0