‘थप्पड’ : घुसमटीच्या संसाराला पर्याय असतो…

‘थप्पड’ : घुसमटीच्या संसाराला पर्याय असतो…

घुसमट सहन करून, स्वतःला बाहुली बनण्याचा उत्सव साजरा करून, संसाराचा गाडा रेटणं आजच्या शिक्षित मुलींना न पटणारं आहे. कसंही करून लग्नसंस्थेला चिकटून राहिलंच पाहिजे, या विचारावर अनुभव सिन्हांचा ‘थप्पड’ आघात करतो.

व्होडाफोन प्रकरणः एक फसलेली खेळी
नेहरूंचा निर्णय चुकला होता?
काश्मीरमध्ये शेतकऱ्यांचे ७ हजार कोटींचे नुकसान

“आपल्याला बालपणीच दिली जाते एक बाहुली
गोरीगोमटी, सुंदर सतरंगी
आपल्याला नेहमीच बनायचं असतं बाहुली तेव्हा
म्हणूनच जिवापाड जपतो तिला
जिवाभावाची मानतो तिजला
सगळं काही सांगतो तिला

पण ती कधीच बोलत नाही
किंबहुना तशी व्यवस्थाच नाही
ते आपल्याला खटकलंही नाही
अगदी तसंच जसं आपली बाहुली होतांना उमजलं नाही

लग्नानंतर ‘जुन्या’ बाहुल्या ‘नविला’ बाहुली बनवतात
अभिमानाच्या संस्कारांत या उन्मादानं न्हातात
‘ती’ही धरते फेर मग ‘नाच गं घुमा’च्या तालावर
संस्कृतीची इमारत आता तिच्याच मौन शब्दांवर

एकमेकींच्या मुकेपणाचा उत्सव, आम्ही अभिमानानं नाचतो
पुरुषांच्या घरात आजही आम्ही बाहुल्या म्हणूनच वागतो.’

१९८२मध्ये आलेला शबाना आझमी आणि स्मिता पाटील यांचा ‘अर्थ’ हा सिनेमा तत्कालीन समाजासाठी मोठा धक्काच होता. या दोघींनीही जगण्यासाठी पुरुषाचा आधार घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर ‘थप्पड’ यायला तब्बल ४ दशकं लागलीत. कारण दुर्दैवाने १९८२ पासून २०२० पर्यंत आमच्या पुरुषप्रधान व्यवस्थेत बाईला ‘बाहुली’ म्हणून वागवणं कधीच थांबलं नाही. पण स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाचं स्वप्न तिच्या उराशी होतंच, जे ‘थप्पड’ या चित्रपटातून ठळकपणे व्यक्त झालं आहे. स्वतःला बाहुली म्हणवून घेण्यास नकार देणाऱ्या स्त्री मनाच्या निर्धाराचा हा चित्रपट आहे.

आपल्या समाजाच्या पुरुषप्रधान प्रवृत्तीला सौम्य आणि अतिशय हळुवारपणे पडद्यावर दाखवण्याचं काम अनुभव सिन्हानं ‘थप्पड’ या चित्रपटातून केलं आहे. या चित्रपटातील कोणतंही उदाहरण वा पात्र जाणकार आणि संवेदनशील प्रेक्षकाला नवीन वाटणार नाही. पण हा अनुभव फक्त त्याच्या मानवी समानतेच्या जाणिवांवरच अवलंबून असेल, हे मात्र नक्की.

या जाणिवा येतात शिक्षणातून. त्यामुळेच समाजसुधारकांनी स्त्री शिक्षणाचा वसा उचलला होता. शिकल्यानं स्त्रीच्या जाणिवा तयार होतात किंवा त्या नेणिवेतून बाहेर डोकावायला लागतात. तिला स्वत्वाची जाणीव होते. मग ती आवाज उठवायला लागते आणि तथाकथित संस्कृतीच्या नावावर कलंक बनते. कारण बाईला शिक्षण देऊन आपण तिला विचारशील, कृतिशील बनवलं. पण अशी ‘विकसित विचारांची बाई’ कशी स्वीकारावी, त्याचं शिक्षण मात्र आपण आपल्या पुरुषांना दिलं नाही. परिणामी आमची शिकलेली बाई तिच्या पूर्वजांपेक्षा अधिकच घुसमटून जगू लागली कारण अज्ञानाला स्वयंपाक घरात कोंबण अधिक सोपं असतं.

‘थप्पड’ हा चित्रपट सहा महिलांचा आहे, ज्या अमृताशी (तापसी) संबंधित असतात आणि अमृताच्या कथेतून यांच्याही आयुष्याबद्दल प्रेक्षकांना कळत जातं. श्रीमंत घरातील अमृताचं लग्न अतिश्रीमंत घरात झालेलं असतं. घरात फक्त तीन लोक. सासू, अमू म्हणजे अमृता आणि तिचा नवरा विक्रम. एक कामवाली- सुनीता. सुखी कुटुंब. अमू तिच्या गृहिणीच्या भूमिकेत खुश आहे हे सुरुवातीच्या मोंताजमधून दिग्दर्शक दाखवतो. पण नंतर हाच मोंताज अमूच्या मर्यादित जगण्यातील ‘तोच तो पणा’ बद्दलसुद्धा प्रभावीपणे बोलतो. ती रोज उठते. चहा बनवते. झाडांना पाणी घालते. शेजारीणीशी बोलते. मग नवऱ्याला उठवते. सासूची शुगर तपासते. नवऱ्यासाठी नाश्ता आणि जेवण बनवते. कॉफी, ऑफिस बॅग घेऊन नवऱ्याला गाडीपर्यंत सोडवायला जाते. रोज हेच काम. काही वेगळं नाही. तोच तो पणा. शेवटी गृहिणीच्या वाट्याला कोणत्या हॅप्निंग गोष्टी येणार आहेत?? नवऱ्याचं लंडनमधील प्रोमोशन हेच तेवढं काय कारण.

त्या दिवशी घरी पार्टी असते ज्यात अमू नाचते आणि विक्रम तिला कौतुकानं पाहतो.(अमू ही उत्तम नर्तकी असते आणि त्यात तिनं नाव कमवावं असं तिच्या वडिलांना वाटत असतं. पण लग्नानंतर विक्रमच्या प्रेमात ती स्वखुशीने गृहिणीची भूमिका स्वीकारते.) त्याच पार्टीत कळतं की विक्रमला संपूर्ण अधिकार मिळालेले नाही आणि त्याला कुणाच्या तरी अधीन राहून लंडनला काम करावं लागेल. त्यावर तो पार्टीत आलेल्या कंपनीतील राजहंसवर भडकतो. त्याला समजवायला अमू येते आणि तो रागाच्या भरात सर्वांदेखत अमूला मुस्काटात मारतो आणि निघून जातो. बस. एवढीच ही कथा.

पुरुष प्रचंड मानसिक तणावात असतांना बायकोला एखादी थप्पड सर्वांदेखत मारल्यास फार काय बिघडतं? चालतंच! असे संस्कार अमूच्या आई आणि सासूवर झालेले असतात. त्यामुळेच अमू त्या थप्पडीनं सुन्न झालेली असतांना सुद्धा या दोघी तिला फ्रेश होऊन पाहुण्यांच्या सरबराईसाठी जायला लावतात अन्यथा ‘लोक काय म्हणतील’, याची चिंता त्यांना होत असते. पण काय बिघडलं हे तिथं असलेल्या काही मोजक्या लोकांना कळतं असतं, ज्यात तिची शेजारी दिया मिर्झा, तिच्या भावाची प्रेयसी कविता, दियाची मुलगी सानिया, अमूचे वडील आणि राजहंस हे असतात. पण कुणी काही बोलत नाही. कारण तेव्हा विक्रमसोबत झालेला अन्याय सर्वांत अधिक महत्त्वाचा असतो.अमूच्या भावासाठी सुद्धा.
दुसरा दिवस उजाडतो. ‘सासूबाई विचारतात विक्रम ठीक आहे ना?’ अमू तिच्याकडे आश्चर्यानं पाहते. तिला वाटत असतं कदाचित सासू आपल्याला जवळ घेईल, विक्रमला दोष देईल. पण असं काहीच घडत नाही. उलट काहीच झालं नसल्याचा आविर्भाव सासूच्या चेहऱ्यावर असतो. विक्रम तिची माफी मागत नाही. तर उलट तिला मनवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या चुकीच्या वागण्याला तिनं समजून घ्यावं असं त्याला वाटत असतं. दिवस जात राहतात. पण तिला तिच्या आयाबहिणींप्रमाणे सहज पुढे जाता येत नाही. त्यामुळं ती तिच्या वडिलांच्या घरी काही दिवसांसाठी निघून जाते.

एक समज आहे की, स्त्री ही पुरुषांच्या आधारानं जगत असते पण खरं म्हणजे ती पुरुषांसाठीच जगते. लग्नाच्या माध्यमातून पुरुष स्वतःची आणि त्याच्या आई वडिलांची सेवा करण्यासाठी बाईला घरात आणत असतो. जेव्हा पत्नी असलेली ही बाई निघून जाते तेव्हा तिच्या सेवेची जागा कधी आई घेते तर कधी बहीण नाहीतर कामवाली. पण असते ती स्त्रीच.
‘द सेकंड सेक्स’ची लेखिका सिमोन द बहुआर म्हणते, “मानवी अस्तित्वाला दोन मूलभूत बाजू आहेत. एक बाजू म्हणजे अस्तित्व टिकवण्यासाठी करावी लागणारी-खाणे, पिणे, झोपणे, पुनरुत्पत्ती, स्वच्छता, स्वयंपाक, बालसंगोपन इत्यादी नित्यकर्मे. आणि दुसरी बाजू म्हणजे दैनंदिन देहधर्माच्या पलीकडे जाऊन काहीतरी भव्यदिव्य, व्यापक परिणाम साधणारी निर्मिती करणे. स्त्रीजीवनाचे दुर्दैव म्हणजे पुरुषाने मानवी अस्तित्वाची सर्जनशील बाजू स्वतःकडे ठेवली आणि सर्व दैनंदिन नित्यकर्मे स्त्रीच्या खांद्यावर टाकली. परिणामतः स्त्रीने काहीही भव्यदिव्य कामगिरी करण्याची शक्यताच संपुष्टात आली. आणि पुरुषांची सेवेकरी म्हणूनच तिचे अस्तित्व सीमित व्हायला लागले.’

त्यामुळेच जेव्हा विक्रमच्या लक्षात येतं की अमूच्या ‘Specialised’ सेवेविना त्याला दैनंदिनी सुरळीत चालवता येत नाही, तेव्हा हा मालक आपल्या ‘सेवेकरी’ला आणायला जातो तेही महागडं ब्रेसलेट घेऊन. आपल्या आधुनिक पुरुषांचा बाईच्या बाबतीतला वैचारिक विकास अजूनही सोन्यापलिकडे गेलेला दिसत नाही. पण अमू ही स्वाभिमानी असते आणि महत्त्वाचं म्हणजे ती स्वतःच्या विचारांसोबत प्रामाणिक असते. ती काही बाहुली नसते. त्यामुळेच ती विक्रमला सांगते, “I don’t love you any more. त्यामुळे मी तुझ्यासोबत तुझ्या घरात राहू शकत नाही. मला तू अनोळखी वाटतोस. ” पण प्रेम नाही म्हणून कुणी लग्न तोडत का? भारतीय विवाह संस्थेत तर प्रेमाविनाही कुटुंब वाढत राहतं. या संस्थेत नवऱ्यानं बाहेर लफडं केल्यावरसुद्धा अधिकांश बायका घटस्फोट घेत नाही, तिथं एक थापड मारली म्हणून घटस्फोट घेणं हे अनाकलनीयच! आणि या विचारांशी अगदी प्रामाणिक असलेला विक्रम आपला पती होण्याचा हक्क दाखवून, अमूला घरी येण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठवतो. त्यावर उत्तर म्हणून नेत्रा जयसिंग या प्रसिद्ध वकिलामार्फत ती त्याला घटस्फोटाची नोटीस पाठवते. त्यावेळी सर्वांनाच आश्चर्य वाटतं. पण ती म्हणते,” गृहिणी बनणं हा माझा निर्णय होता, पण त्यामुळं जर विक्रम मला गृहित धरत असेल आणि मला असं कुणीतरी समजत असेल जिला सहजासहजी थापड मारली जाऊ शकते, तर माझा स्वतःच्या अशा स्टेट्सला नकार नाहे. माझ्या दुखावलेल्या स्वाभिमानाची भुलावन करून मी माझा आदर न करणाऱ्या माणसासोबत संसार चालवू शकत नाही, पुढे जाऊ शकत नाही.’

मारणं हे सुद्धा प्रेमाचंच लक्षण आहे असा विश्वास नव्हे, तर ठाम समज असलेल्या समाजाला अमूची ही भूमिका न पटणारीच आहे.(त्यामुळेच सोशल मीडियावर संस्कृतिरक्षक पुरुष या चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी करत आहेत.)
आणखी एका महत्त्वाच्या मुद्याला हा चित्रपट हलकेच स्पर्शून जातो; ते म्हणजे बाईचं पुरुषांपेक्षा अधिक कमावणं. आपली प्रतिस्पर्धी वा शेजारील स्त्री ही अधिक कमवत असेल तर नक्की ती कुणासोबत तरी ‘झोपून’ पैसे कमवत असेल असा पुरुषांचा समज असतो. कारण स्त्री स्वतःच्या बुद्धीने काही करू शकते हे मान्य करायला ते तयारच नाहीत. त्यामुळेच दिया मिर्झाची नवी गाडी पाहून तिळतीळ होणारा विक्रम अमूला विचारतो, ‘आखिर ये करती क्या है?’

वकील नेत्रा ही हुशार. पण तिच्या नवऱ्याला त्याचं कौतुक नाही. त्याला वाटतं जयसिंग आडनावामुळेच तिला प्रसिद्धी मिळते. त्यामुळे ती तिच्यापेक्षा लहान पुरुषाशी संबंध बनवते कारण त्याच्यासोबत तिला तिचं सुख तिच्या स्वाभिमानासह मिळत असतं. तर दिया मिर्झाच्या नवऱ्याचे निधन झालेले असते. तिची मुलगी तिला दुसरं लग्न करण्यासाठी सतत आग्रह करत असते. पण दियाच्या मते तिच्या आयुष्यात येणाऱ्या पुरुषासोबत तिला ‘effortless’ संसार करता येईल याची शाश्वती नाही. त्यामुळे ती सिंगल राहणेच पसंद करते. इथं ‘effortless’ हा शब्द फार महत्त्वाचा वाटतो कारण आपल्या संसारात काहीच ‘efforless’ म्हणजे सहज नसतं. आपल्याकडे स्त्री पुरुष सतत ‘ऍडजस्ट’ करत असतात. अमूच्या घरी काम करणाऱ्या सुनीताला फक्त गृहिणी बनून ‘डान्स इंडिया डान्स’चा अनुभव घ्यायचा असतो पण तिचा नवरा तिला बदडून कामावर पाठवत असतो.(येथे ‘भूमिका’ मधील स्मिता पाटील आणि तिचा नवरा अमोल पालेकर आठवतो.) तर अमूची आई आणि सासू सतत ‘बाई’ असण्याचं आदर्शवत ओझं वाहत असतात. अमूच्या वडिलांचे उत्तम संस्कार असूनदेखील तिचा भाऊ विक्रमच्या बाजूनं उभा राहतो जे कविताला (त्याची प्रेयसी) त्याच्यापासून दूर घेऊन जातं.

सहा स्त्रियांचा हा चित्रपट. पण त्यातील अतिशिक्षित आणि अल्पशिक्षित स्त्रिया घुसमटीच्या व्यवस्थेला वाचा फोडतांना दिसतात. स्वतंत्र जगण्यासाठी पुरुषी वर्चस्वाची गरज नाही हे या स्त्रिया दाखवून देतात.असं असतांनाही नातं टिकवण्यावर त्यांचा विश्वास असतो. अमृता तिच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी जितकी ठाम असते तितकीच ती माणुसकी आणि सासरच्यांसोबत नातं जपण्याबद्दल सुद्धा स्पष्ट असते. मात्र अमूची आई आणि सासू या दोन किमान शिक्षित, मध्यमवर्गीय विचारांच्या स्त्रिया त्यांच्या नेणिवेतही स्वतंत्र होऊ शकत नाही असं दिसतं.

‘बाईला ऍडजस्ट करावं लागतं’ हे एकच पालुपद त्यांच्या जन्माची शिदोरी असते, जी त्यांना त्यांच्या आयांकडून मिळाली असते आणि मुलींना द्यायची असते.

हा चित्रपट महिलांना शस्त्र करून पुरुषांवर वार करू पाहतो, असा गैरसमज सामान्य माणसाचा होऊ शकतो. कारण यातील पुरुष आपल्या बायकांना मारझोड करत नाहीत, शिवीगाळ करीत नाहीत, तरीही एका थप्पडसाठी पुरुषांना बदनाम करण्याचा घाट दिग्दर्शकानं घातला आहे असं वाटू शकतं. पण हा विचार म्हणजे अज्ञानातून आलेल्या जाणिवांचा परिणाम आहे. हा चित्रपट एक टिपिकल स्त्रीवादी, अतिगंभीर बनवता आला असता. पण दिग्दर्शकाने तसं केलं नाही. उलट सुरुवातीपासूनच हळुवार, आनंदी आणि खेळकर संगीताचा वापर करून चित्रपटाचा लाईट मूड बनवून ठेवला, जो शेवटपर्यंत कायम राहतो. कदाचित त्याला हेही सांगायचं असेल की घरगुती (मानसिक, भावनिक आणि शारीरिक) हिंसा किती ‘लाईटली’ होत असतात. सुनीता तिच्या नवऱ्याला विचारते “मने मारे क्यू हैं?’ त्यावर तो म्हणतो , “तने मारनेको लायसन्स थोडी लागत हैं मनें?’ हे असे संवाद अगदी लाईटली घराघरांत होत असतात हे देखील दिग्दर्शक सांगू पाहतो.
या चित्रपटातील पुरुष मुळातच श्रीमंत घरातील. जेटलमन. कौटुंबिक आणि बायकोची काळजी करणारे.(जरी पुरुष जेवत असतांना बायका फक्त वाढण्याचं काम करतात.) तरी अमूच्या वागण्याचं कारण या पुरुषांना कळत नाही. आपल्या बायकोला, आईला ‘स्त्री’ म्हणून त्यांना समजून घेता येत नाही कारण शिकलेल्या बायकांच्या आशाआकांक्षा, इच्छा समजून घेण्याचं शिक्षणच आपण आपल्या मुलांना दिलेलं नाही. त्यामुळेच प्रेम असूनदेखील आपल्या स्त्रीवर वर्चस्व प्राप्त करण्याचा हरेक प्रयत्न हे पुरुष करताना दिसतात कारण कसं वागावं आणि कसं रिऍक्ट व्हावं हा त्यांच्या संस्कारांचा भागच राहिलेला नाही. पण शिक्षण, आधुनिकीकरण आणि मुळातच असलेला प्रेमभाव या पुरुषांना अंतर्मुख होण्यास भाग पाडतो आणि आपल्या ‘स्त्री’पुढं आपली चूक मान्य करतांना त्यांची ‘मर्दानगी’ आड येत नाही. पुरुषप्रधान व्यवस्थेनं पुरुषांच्या मनाचं किती नुकसान केलं आहे हे यानिमित्तानं पहिल्यांदा पुढं येतं कारण आपल्या आई, बहीण, प्रेयसी, पत्नीवर प्रेम असूनसुद्धा व्यक्त होण्याची परवानगी नसल्यानं आपल्या पांढरपेशी पुरुषांची घुसमट अनाकलनीय आहे, जी या चित्रपटातून अनुभवायला मिळते.

अलीकडील दिग्दर्शक शेवट गोड करण्यावर जास्त विश्वास ठेवताना दिसत नाहीत कारण बदलत्या समाजात गोडाचे अर्थही बदलत आहेतच. त्यामुळेच घटस्फोट मागणारी हिरॉईन हिरोच्या भावना विवश्यतेला मोहून हिरोकडे परत येत नाहीत. ‘बाला’मधील यामी गौतम असो वा ‘थप्पड’ मधील अमृता असो. सुशिक्षित स्त्रिया आता ‘effortless’ संसाराला आणि स्वाभिमानाला अधिक महत्त्व द्यायला लागल्या आहेत आणि लग्न हा त्यांच्या आयुष्याचा केवळ एक भाग बनत आहे, संपूर्ण आयुष्याचा आधार नव्हे. घुसमट सहन करून, स्वतःला बाहुली बनण्याचा उत्सव साजरा करून, संसाराचा गाडा रेटणं आजच्या शिक्षित मुलींना न पटणारं आहे. कसंही करून लग्नसंस्थेला चिकटून राहिलंच पाहिजे, या विचारावर आघात करणारा हा चित्रपट. त्यामुळेच घटस्फोट घेणं ही काही फारशी वाईट, नकारात्मक गोष्ट नाही आणि घुसमटीच्या संसाराला हा एक पर्याय आहे असा संदेश हा चित्रपट देतो. (ऑस्कर नामांकित ‘मॅरेज स्टोरी’ हा चित्रपट सुद्धा हाच संदेश देतो.)

सर्जनशीलतेत सुद्धा ‘थप्पड’ सरस ठरला आहे. अनेक गोष्टी रूपकात्मक पद्धतीनं सांगितल्या आहे. नारिंगी, पिवळा, निळा या रंगांचा वापर आणि उल्लेख चित्रपटांत अनेक ठिकाणी येतो. या चित्रपटात मुख्य पात्राचं नाव अमृता ठेवलं आहे. कदाचित अमृता प्रीतम या लेखिकेपासून ते प्रेरित असावं, कारण तत्कालीन समाजव्यवस्थेला हादरे तर तिनंही दिले होतेच. चित्रपटाच्या सुरुवातीला सगळ्या स्त्रिया ऑरेंज कॅण्डी खातांना दिसतात कारण ऑरेंज रंग हा लाल रंगातील ऊर्जेचा आणि पिवळ्या रंगातील आनंदाचा मिलाफ आहे. बायकांची मुक्त आणि आनंदी जीवन जगण्याची सुप्त इच्छा तर दिग्दर्शकाला यातून दाखवायची नसेल? संपूर्ण चित्रपटात शहनाई ऐकू येते. शहनाई ही शुभ गोष्टींचं, लग्नाचं प्रतीक! आणि त्या शुभ कार्याचं ओझं वाहताना बाईची किती घुसमट होते हा ‘अंडर करंट’ कदाचित या शहनाईच्या सुरांमध्ये असेल. ती तलाक घेते तेव्हाही हेच सूर! नवीन मंगलमय स्वतंत्र आणि आनंदी आयुष्यासाठी; अगदी ऑरेंज कॅण्डी प्रमाणे. वकील नेत्राचा शेवटचा निर्धार ‘अर्थ’ सिनेमातील शबाना आझमीच्या निर्धाराची प्रखरतेंनं आठवण करून देतो. आणि शेवटी हा निर्धार अनुभव सिन्हाच्या शब्दांतून व्यक्त होतो, सकल स्त्री जाणिवेसाठी-

हाँ मैंने अपने आँचल का अम्बर बनाया है।
के कहीं गर मेरा रास्ता,
चाहतों से अलग जो चले। के कहीं गर मेरे सीने में,
साँस थोड़ी भी जो कम पड़े, मेरा अपना भी इक आसमाँ हो, ख़ुद को हर इक दिशा में बिखेरूँ,
मुझ को हर इक दिशा से बुलाना,
मैं अगर फिर से मिल भी जाऊँ
मुझे पाश में भींच लेना
मगर मेरे आसमाँ को
तहा कर मुझे सौंप देना,
ताकि तेरा भी इक आसमाँ हो
और मेरा भी इक आसमाँ हो
और मेरा भी इक आसमाँ हो।
– अनुभव सिन्हा

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0