पक्ष्यांच्या आवाजाची किमया

पक्ष्यांच्या आवाजाची किमया

उन्हाळ्यात सातपुड्यात काही खास पाहुणे पक्षी यायचे. तसंच काही इथलेच पक्षी या नव्या पाहुण्यांसोबत गाऊ लागायचे. सगळं जंगल अगदी सुकून कोरडं-शुष्क झालेलं असताना एखाद्या झ‍र्‍यापाशी गेल्यावर नटरंगासारखा नवरंग झोकात उभा असायचा. अगदी रुबाबात ‘हाय-पीच.....हाय-पीच’ करत गायचा.

धुळ्याचे पक्षी नंदनवन – नकाणे तलाव
स्वर्गीय नर्तकाच्या पिल्लांचे पुनर्वसन
चिगा (सुगरण)

पक्ष्यांच्या आवाजाशी आपलं नातं अगदी सहज जुळून येतं. अगदी चिऊ-काऊच्या गोष्टीतून झालेली ओळख आपल्याला अवती-भवतीच्या इतर कित्येक वेगवेगळ्या पक्ष्यांची गाठ घालून देते. मी सातपुड्याच्या जंगलात ‘नॅचरलिस्ट’ (Naturalist) म्हणून काम करताना मला पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करण्याचा छंद जडला. पॅराबोला-डिश (parabola dish), मायक्रोफोन (microphone) आणि डिजिटल रेकॉर्डर (Digital recorder) घेऊन, मी पक्ष्यांचे आवाज रेकॉर्ड करत जंगलाचा कानोसा घ्यायला लागलो.

अगदी सुरूवातीला मी लाल-बुड्या-बुलबुल, रान-सातभाई,  सुभग  अशा पक्ष्यांचा पाठलाग सुरू केला. एकतर हे पक्षी आसपास हमखास असायचे आणि जरा धीटही होते. लाल-बुड्या-बुलबुल तर अगदी समोर येऊन “पीट-पीटीव्ह” म्हणत छ्त्री-सारखी दिसणारी पॅराबोला-डिश बघत पिट-पिट करायचा. रान-सातभाईंशी दोस्ती व्हायला जरा वेळ लागला. घोळक्याने फिरताना रान-सातभाई एकमेकांशी सतत ‘च्यक-च्याक’ करत संपर्क ठेवायचे. त्यांचा टेहेळणी हेर मात्र, मी पॅराबोला-डिश घेऊन उभा आहे हे बघून धोक्याची सूचना द्यायचा. मग काय सगळे रान-सातभाई एकत्र कल्ला, कलकलाट करत पसार व्हायचे. मग हळुहळू ते माझ्या अवताराला सरावले. पण तोवर मला त्यांच्या धोक्याच्या सूचना आणि कलकलाट छान टिपता आले.

सुभग पक्ष्याची एक जोडी नित्यनेमाने रोज पाणी प्यायला अंगणातल्या पसरट भांड्यावर यायची आणि बराच वेळ रेंगाळायची. या जोडीनं जवळच्या रींझाच्या झाडावर घरटंही बांधलं. या सुभगाचा रियाज अगदी पहाटे सुरू व्हायचा आणि दिवसभर टप्या-टप्यांनी पठ्या गात राहायचा. अगदी दुपारी देखील त्याची कापरी शीळ ऐकू यायची. उजाडताना गारव्यासोबत पहिल्या चहाचे घोट घेत ‘सुभग-संगीत’, मनाला तजेला देऊन जायचे. (Spectogram ref: 1_Common_Iora)

सुभग पक्षाचे गाणे

शिकारी पक्षी काही गाण्यात तरबेज नाहीत, पण आपलं वर्चस्व दाखवायला मात्र हमखास हाकारे देतात. विणीच्या हंगामात जोडीदाराला साद घालून घरट्याची जागा दाखवताना, हवेत गिरक्या घेत किंवा एखाद्या उंच झाडावर बसून अगदी टिपेचा स्वर लावतात. अशाच ऐका मोर घारीनं मला मोहात पाडलं. त्याच्या टिपेच्या स्वरात त्याच्या नजरेइतकीच भेदकता होती. मोठ्या पिंपळाच्या झाडावर बसून तुरेबाज तोर्‍यातला त्याचा बाज निराळाच असायचा. (Spectrogram ref: 2_Changeble_hawk_Eagle (Crested).

नाराच गरुड / मोर घार पक्षाचा आवाज किंवा हाकाळी

उन्हाळ्यात सातपुड्यात काही खास पाहुणे पक्षी यायचे. तसंच काही इथलेच पक्षी या नव्या पाहुण्यांसोबत गाऊ लागायचे. सगळं जंगल अगदी सुकून कोरडं-शुष्क झालेलं असताना एखाद्या झ‍र्‍यापाशी गेल्यावर नटरंगासारखा नवरंग झोकात उभा असायचा. अगदी रुबाबात ‘हाय-पीच…..हाय-पीच’ करत गायचा. कधी कधी संध्याकाळी इतर पक्ष्यांची पांगोपांग होत असतानाच दोन चार नवरंग त्यांच्या-त्यांच्या फडावरून ‘‘हाय-पीच…..हाय-पीच’! ‘हाय-पीच…..हाय-पीच’! करत खेळ मांडायचे. नवरंगाचा खेळ संपायच्या आधीच भारतीय कोकीळ बहार-रागात रात्र-आरंभ करायचा. कधी कधी चांदण बहरत असताना भारतीय कोकीळाचं गाणं अचूक ठेक्यावर “आयी बहार, आयी बहार’ करत बहरत जायचं. (Spectrogram ref: 3_Indain_Cuckoo_and_Indian_Pitta).

भारतीय कोकीळ आणि नवरंग या दोन पक्षांचा आवाज.

याउलट पावश्या मात्र उनाडक्या करत, ‘ए, गड्या, गड्या, गड्या, गड्या, गड्या, गड्या, पेर्ते व्हा, पेर्ते व्हा, पेर्ते व्हा!’ असं दिवस-रात्र इतकं भंडाऊन सोडायचा, की असं वाटायचं की सगळ्या मशागतीच्या कामांवर याचं बारीक लक्ष आहे. आता पेरतं झाल्याशिवाय हा गडी अजिबात सुट्टी देणार नाही. (Spectrogram ref 4 Common_hawk_Cuckoo).

पावश्याचे गाणे

भरीस भर म्हणून पावश्यासोबत कोतवाल कोकीळ ‘करा-कामं-करा, करा-कामं-करा, करा-कामं-करा, करा-कामं-करा,’ असं टुमणं लावायचा.

हवेत आताशा कुठे गारवा आला होता. दिवसभर चांगलाच राप देणारी ऊन्हं आता कलली होती. दुपारभर पांगलेल्या पाखरांची आता लगबग सुरू झाली होती. रात्रीच्या विसाव्याची जागा पटकवण्याची लाल-बुड्या-बुलबुलांची धावपळ ऐकू येत होती. सातभाई ‘च्याक…च्याक..च्याक’ करत पोटभर किडे टिपत होते. कोतवाल झाडाच्या शेंड्यावर बसून होता आणि मधेच एखादी गिरकी घेत, सातभाईंच्या तावडीतून निसटलेले किडे मटकवत होता. अशातच पानं‌-गळून पडलेल्या सागाच्या झाडाच्या शेंड्यावर बसून दयाळानं गायला सुरूवात केली. संध्याकाळच्या शांत वातावरणात दयाळाचं वेगवेगळ्या सुरावटींनी नटलेलं हे गाणं म्हणजे यमन रागातलं ‘दयाळ’ पक्ष्याचं प्रेमगीतच. या दयाळाचं गाणं रेकॉर्ड करत असताना अजून एक नर दयाळ शेजारच्या झाडावर आला, क्षणभर रेंगाळला आणि थोडं दूर जाऊन बसला. मग या दुसर्‍या नर दयाळानं गायला सुरूवात केली खरी पण त्याला लागलीच काढता पाय घ्यावा लागला. या दुसर्‍या दयाळ नर पक्ष्याचं गाणं मी पुढल्या दोन दिवसात रेकॉर्ड केलं. या दोन्ही नरांचं गाणं वेगळं होतं. अवती-भवती असणार्‍या इतर पक्ष्यांच्या आवाजांच्या नकला त्यांनी आपापल्या गाण्यात सजवून परिणामकारक विविधता साधली होती. (Spectrogram_Ref: 5_Oriental_magpie_Robin_m1)

दयाळचे गाणे

सातपुड्याच्या जंगलात ‘चुरना’ या ठिकाणी वन विभागाच्या विश्रामगृहात राहायची बातच निराळी आहे. रात्री जेवणं झाल्यावर वर्‍हांड्यात बसून शेकोटीच्या गप्पांची मैफल रंगणं आणि रातकिडे, रातवे, जंगली-पिंगळे, सांबर-चितळांच्या हकाळ्या ऐकून मग हळुहळू स्तब्ध होणारं जंगल अनुभवणं, शब्दात मांडणं कठीणच आहे.

चांदणं पसरल्यावर साज, अर्जुन, वड, पिंपळ, ऊंबर अशा मोठ्या झाडांच्या आकृत्या एकसंध दिसू लागतात. माळरानावरचं गवत शिणून पेंगत असतं आणि माळरानाच्या खेटून वाढलेली बांबूची-बेटं स्तब्ध झुकलेली वाटतात.

अशातच अचानक एखादी टिटवी, “टिट्‍- टिट्‍-टिटी-टीव…… टिटी-टीव…… टिटी-टीव……” दंगा करायला लागते. मग एखादा भारतीय करवानक (Indian Thick-knee), जोरदार हाकारा देत “ट्वी—ट्वी—ट्वी—ट्वी— ट्वी—ट्वी—ट्वी—ट्वी—ट्वी – ट्वी- टेट्वी- टेट्वी – टेट्वी – टेट्वी” करत पसार होतो. रातकिडे ताल धरतात आणि किर्र रात्री रान-पिंगळे कल्ला करायला लागतात. अशातच रातव्यांच्या गप्पांना गप्प करत ऐकल्या वाघाच्या डरकाळीच्या आवाजाचा हुंकार आणि त्या घुमणार्‍या आवाजानं उठणारे तरंग हे आठवतानाही अंगावर शहारे येतात. जंगलाचं संगीत हे असंच मनात खोलवर तरळत राहतं. (Spectrogram ref: 6_Acoustic_Night_JUOW_JUNI_Tiger)

सिद्धार्थ बिनिवाले, निसर्ग-निरीक्षक आणि निसर्ग-अभ्यासक आहेत. पक्ष्यांचे आवाज आणि जंगलांचे वर्गवारी या कान्हा मध्य-प्रदेश येथे सुरू असलेल्या, संशोधनात ‘संशोधन-सहाय्यक’ म्हणून काम करत आहेत.

(सर्व स्पेक्टोग्राम आणि लेखाचे छायाचित्र – सिद्धार्थ बिनिवाले) NatureNotes

Reference: Araya-Salas, Marcelo and Wilkins, Matthew R. (2020), dynaSpec: dynamic spectrogram visualizations in R. R package version 1.0.0.

ही मालिका ‘नेचर कजर्वेशन फाउंडेशन‘ द्वारे राबवलेल्या ‘नेचर कम्युनिकेशन्स‘ या कार्यक्रमाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतून निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे हा या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहण्याची तुमची इच्छा असल्यास फॉर्म भरा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: