मिथकीय हिंसेचे रचनाशास्त्र

मिथकीय हिंसेचे रचनाशास्त्र

रेवती लाल यांच्या The Anatomy Of Hate (दी अॅनाटॉमी ऑफ हेट -वेस्टलँड बुक्स) या पुस्तकात दंगलखोर वृत्तीच्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून विद्वेषातून उद्भवणाऱ्या हिंसेच्या रचनाशास्त्राची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उकल करण्यात आली आहे. यातली बातमी ही आहे, की हे पुस्तक ‘क्राऊड फण्डिंग'च्या बळावर वाचकांपर्यंत पोहोचलेलं आहे. सामान्यजन, कलावंत, पत्रकार आदींकडून पैसे गोळा करून पुस्तकं प्रकाशित करावं लागणं, हे वर्तमानावरचं एकप्रकारचं भाष्यच आहे.

अस्वस्थ करणारी कोरोनाकथा
‘आठवडी बाजारा’ची मुशाफिरी
‘इंपॉर्टन्स ऑफ लिव्हिंग’

जर्मन-ज्युईश तत्वज्ञ वॉल्टर बेंजामिन यांनी मानवी हिंसेची दोन प्रकारांत विभागणी केली होती. एक-मिथकीय हिंसा आणि दोन-अलौकिक हिंसा. जी तत्पर आणि रक्तलांच्छित हिंसा असते, जी तिच्या अस्तित्वासाठी सामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर सत्ता गाजवते, असे मिथकीय हिंसेबाबतचे त्यांचे म्हणणे होते. तर अलौकिक हिंसा न्यायासाठी त्याग आणि समर्पण मान्य करते असे त्यांना सांगायचे होते. याबाबतचे चित्तवेधक विवेचन गेल्या वर्षी प्रकाशित “डॉ. आंबेडकर, दलित आणि मार्क्सवाद’ या डॉ. उद्धव कांबळे यांच्या पुस्तकात विस्ताराने आले आहेच, परंतु नुकत्याच प्रकाशित झालेल्या रेवती लाल यांच्या  The Anatomy Of Hate (दी अॅनाटॉमी ऑफ हेट -वेस्टलँड बुक्स) या पुस्तकात दंगलखोर वृत्तीच्या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून विद्वेषातून उद्भवणाऱ्या हिंसेच्या रचनाशास्त्राची प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष उकल करण्यात आली आहे. यातली बातमी ही आहे, की हे पुस्तक ‘क्राऊड फण्डिंग’च्या बळावर वाचकांपर्यंत पोहोचलेलं आहे. सामान्यजन, कलावंत, पत्रकार आदींकडून पैसे गोळा करून पुस्तकं प्रकाशित करावं लागणं, हे वर्तमानावरचं एकप्रकारचं भाष्यच आहे.

(Hate) हेट अर्थात विद्वेष, तिरस्कार माणसाच्या मनात असतोच. तो कुणाला तरी नामशेष करण्याच्या इराद्याने आकारास येतो. विद्वेषाची पुढची पायरी हिंसा असते. परंतु, या पायरीपर्यंत पोहोचण्यासाठी पोषक घटकही आवश्यक असतात, ते नसतील तर प्रत्यक्ष हिंसा आपलं अस्तित्व दाखवत नाही. जेव्हा ते असतात, ते पद्धतशीरपणे, कुणाच्याही नकळत हिंसेचंही रचनाशास्त्र रचत असतात. ते कसं रचलं जातं, यात बळी कोण असतो, हत्यार कोण आणि ते हत्यार वापरणारा कोण असतो, हे अत्यंत संयमाने रेवती लाल यांनी तीन केस स्टडींच्या माध्यमातून वाचकांपुढ्यात आणलं आहे. प्रस्तुत पुस्तकासाठी त्यांनी गोध्रा हत्याकांडानंतर उफाळून आलेल्या दंगलीत प्रत्यक्ष हिंसा करणाऱ्या जवळपास ४०-५० जणांच्या तब्बल १० वर्षं प्रदीर्घ मुलाखती घेतल्या. हेतू, माणसाच्या मनात दडलेल्या हिंसक मनोवृत्तीचा माग काढणे हा होता. त्यातली भीषणता, निष्ठूरपणा, हिंस्रता अधोरेखित करण्यासाठीच रेवती लाल यांनी मुलाखत घेतलेल्यांपैकी तीन जणांचा सविस्तर आयुष्यपट मांडून हिंसक मानसिकतेची उकल केली आहे.

यातला सगळ्यात मनोवृत्तीने हिंसक आहे तो, सुरेश. हा अहमदाबादेतली बदनाम वस्ती अशी ओळख असलेल्या छारा नगरातला भरकटलेला युवक आहे. याचं शिक्षण शून्य.चोरी करणे, दहशत माजवणे, पुरुषार्थाचं दर्शन घडवण्यासाठी वस्तीतल्या पोरीबाळींवर वाईट नजर ठेवणे, त्यांचा शारीरिक उपभोग घेणे यात तो माहीर आहे. त्याचा बापही परंपरेने चोर. आईला दारु पिऊन बेदम मारहाण करणारा आहे. सुरेशने दहशतीच्या बळावरच वस्तीबाहेरच्या मुस्लिम मुलीशी लग्न केलेलं आहे. बापाचेच संस्कार असल्यामुळे तोही बायकोवर चारित्र्याच्या संशयावरून वारंवार अत्याचार करणारा आहे आणि एका टप्प्यावर बायकोचा सूड घेण्यासाठी त्याने बायकोवर बलात्कारही केलेला आहे. असा हा पूर्णपणे गुन्हेगारी वृत्तीचा तरुण दंगलीचे नियोजन करणाऱ्यांच्या जा‌ळ्यात अडकतो आणि ओळखीतल्याच मुस्लिमांना जिवंत जाळण्याचे, मुस्लिम स्त्रियांवर बलात्कार करण्याचे अक्षम्य गुन्हे करत जातो.

यातली दुसरी व्यक्तिरेखा आहे, डुंगर. हा भील जमातीतला तरुण. त्याचीही कौटुंबिक पार्श्वभूमी थोडीफार सुरेशसारखीच. निरक्षरता, व्यसनांनी वेढलेली. आपण भील असल्याचा त्याच्यामध्ये न्यूनगंड मोठा. परंतु कर्मधर्मसंयोगाने तो “पवित्र आणि देशभक्त’  आणि धर्माभिमानी शिक्षकाच्या संपर्कात येतो. हा शिक्षक त्यांची संपूर्ण जबाबदारी घेतो आणि इथून पुढे डुंगरचं स्वत:च्या आयुष्यावरचं नियंत्रण कायमस्वरुपी सुटतं. तो परधर्मद्वेषातून राजकारण साधणाऱ्यांच्या हाती लागतो. गावपातळीवर कारसेवेत सामील होतो. एकोप्याने राहिलेल्या गावातल्या मुस्लिमांचीच दुकानं जाळतो. फसवणूक करून भेदरलेल्या मुस्लिमांना एका घरात आश्रय देतो आणि इतर धर्मांधांना हाताशी धरून बाहेरून ते घर जाळून टाकतो. सत्तेत सामील असलेले गावपातळीवरचे नेते, आमदार होण्याची स्वप्न पाहणाऱ्या डुंगरचा वापर करत राहतात. धर्मकेंद्री स्वयंसेवी संस्था त्याचा पुरेपूर गैरफायदा उठवत राहतात.

पुस्तकातली तिसरी व्यक्तिरेखा प्रणवची. सुरेश आणि डुंगरपेक्षा भिन्न. सामाजिक उतरंडीत वरच्या स्तरावरची. प्रणववर लहानपणापासून संस्कार सनातन धर्म, सत्संग आदींचे. तो वडिलांचा विरोध पत्करून समाजविज्ञानात पदवी घेण्याच्या इराद्याने गाव सोडून शहरात येतो. पण शहरात दंगल पेटली असताना, हॉस्टेलमधल्या इतर मित्रांसह एक थ्रील म्हणून मुस्लिमांची दुकानं लुटायला जातो. त्याचं शिक्षण पूर्ण होतं. तो भूजच्या भूकंपानंतर रा. स्व. संघाचा कार्यकर्ता म्हणून मदतकार्यात जातो. तो भारावून जातो. पण त्यानंतर त्याला एक आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या एनजीओसोबत काम करण्याची संधी मिळते. इथेच त्याला दंगलीत मुस्लिमांनी अनुभवलेल्या वेदनेची प्रथम जाणीव होतो. तो त्याच्यासाठी आत्मज्ञानाचा क्षण ठरतो. त्या अर्थाने प्रणव ही यातली पश्चाताप झालेली आणि स्वत:ला चांगल्या मार्गावर नेणारी व्यक्तिरेखा.

पण उरलेल्या दोघांनी हिंसेची दिलेली कबुली वाचक म्हणून सून्न करणारी. माणूस जनावराहून हिंस्र होऊ शकतो, याचा दाखला देणारी. पुस्तक वाचून संपतं तेव्हा सुरेश,  हिंसा सहन करत गेलेली त्याची कमालीची सोशिक बायको फरझाना, वाट चुकलेला डुंगर यांना भेटण्याची इच्छा अनावर होते. हे या पुस्तकाचं यश.

पुस्तकातल्या तिन्ही व्यक्तिरेखा हिंदुत्ववादी संघटनांकडून ‘ब्रेन वॉशिंग’ झालेल्या आहेत. तिघांनीही आडपडदा न ठेवता, दुष्कृत्यांची कबुली दिलेली आहे. विद्यमान सत्ताधाऱ्यांचे समर्थक म्हणतील, हा सरकारविरोधातला प्रोपागंडा आहे. तसा तो एका पातळीवर आहे सुद्धा, पण त्याहीपेक्षा माणसाच्या ठायी दडलेल्या हिंसक मानसाचा तो महत्त्वाचा दस्तऐवजही आहे.

गुजरात दंगलीत बजरंग दलाच्या बाबू बजरंगीची भूमिका जाहीर होती. प्रस्तुत पुस्तकातही तो अनेकदा आलेला आहे. या बजरंगीवर ९७ जणांच्या हत्येचा आरोप होता. कोर्टात त्याच्यावरचे आरोप सिद्ध होऊन त्याला २१ वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावली गेली होती. परंतु, काही महिन्यांपूर्वी सुप्रीम कोर्टाने मानवतेच्या दृष्टिकोनातून बाबू बजरंगीला जामीन मंजूर केला. कारण, तीव्र आजारपणामुळे त्याची दृष्टी गेलीय आणि तो बहिराही झालेला आहे. म्हणजे, ज्या बजरंगीने हिंदू धर्माचं नाव घेऊन हिंसा घडवून आणली आज तो आजाराने गलितगात्र झालेला आहे. पण, हा काव्यगत न्याय आहे, असं म्हणणंसुद्धा मनातल्या हिंसेकडे नेणाऱ्या विद्वेषाचं दर्शन घडवणारं आहे…

दी अॅनाटॉमी ऑफ हेट

रेवती लौल

वेस्टलँड बुक्स

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: