पीटर ब्रूकः जगाला महाभारताची ओळख करून देणारा अवलिया

पीटर ब्रूकः जगाला महाभारताची ओळख करून देणारा अवलिया

पीटर ब्रुक यांना पद्मश्री मिळणे योग्यच आहे, मात्र हा सन्मान त्यांना फारच उशीरा मिळाला.

हिपटायटीस ‘सी’चा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल
एसटी कर्मचाऱ्यांचे थकित वेतनः ५०० कोटी तातडीने वितरित
उत्तराखंडात हत्तींच्या वनावर विमानतळाचे अतिक्रमण

१९८४चा एप्रिल महिना होता. मी तीव्र काविळीने आजारी होते. वर्तमानपत्रांमध्ये मी वाचत होते, की एका आंतरराष्ट्रीय निर्मिती संस्थेचा पीटर ब्रूक यांच्या ‘द महाभारतमध्ये कृष्ण आणि द्रौपदीच्या भूमिकांसाठी अभिनेत्यांचा शोध चालू होता.

नाटकातील मित्रांच्या मार्फत मी त्यांना ओळखत होते. माझे मित्र नेहमी २० व्या शतकातील एक ज्येष्ठ रंगकर्मी म्हणून अत्यंत आदराने त्यांचा उल्लेख करत. ते भारतामध्ये या दोनपैकी एकाच पात्राच्या शोधार्थ आले होते आणि ते पात्र साकारणारी व्यक्ती त्यांच्या नाटकातील एकमेव भारतीय असणार आहे असाही उल्लेख वर्तमानपत्रांमध्ये होता. ते नेहमीच्या सर्व शहरांमध्ये म्हणजेच मुंबई, चेन्नई, दिल्ली, कोलकाता आणि बंगलोर येथे जाणार होते. त्या वेळी सांस्कृतिक क्षेत्राची झरीना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुपुल जयकर यांच्याकडे अभिनयक्षेत्रातील २०० योग्य व्यक्तींची यादी होती, ज्यांची ऑडिशन घेतली जाणार होती. आणि ती तशी घेतली गेली.

या बातमीनंतर साधारण १५ दिवसांनी सकाळी सकाळी मला दिल्लीतील फ्रेंच दूतावासातील सांस्कृतिक विभागाच्या एका अधिकाऱ्याची तार आली: “पीटर ब्रूक आणि त्यांचा ग्रुप उद्या आपल्याला भेटायला अहमदाबादला येत आहेत.” बस् इतकेच! कशासाठी येत असावेत हे, मला प्रश्न पडला.

मी नुकतीच आजारातून उठले होते, त्वचा पिवळी पडली होती, खूप बारीक झाले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्या अपार्टमेंटमध्ये मी या गटाला भेटले. निळ्या डोळ्यांच्या, टक्कल पडू लागलेल्या पीटर    यांच्याबरोबर पटकथालेखक जीन क्लॉद कॅरियर, कार्यक्रमाच्या डिझायनर क्लोई ओबेलान्स्की आणि पीटर यांच्या सहाय्यक मारी हेलेन होत्या. मी संकोचले होते आणि त्यांना मला का भेटायचे होते याची मला काहीच कल्पना नव्हती. कदाचित एखादी छोटी भूमिका? कसेही असले तरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला फ्रेंच येत नव्हते. साधारण १५ मिनिटे गप्पा झाल्यानंतर पीटर म्हणाले, “तू द्रौपदीसाठी ऑडिशन द्यावीस अशी माझी इच्छा आहे”. मी जवळजवळ खुर्चीतून पडतच होते. पुराणकथांमध्ये द्रौपदी ही एकमेव व्यक्तिरेखा नेहमीच माझ्या आवडीची होती.

पुढच्या काही आठवड्यांमध्ये, मी ऑडिशन दिली, मला भूमिका मिळाली आणि ऑक्टोबरमध्ये मी आणि माझा पाच आठवड्यांचा मुलगा पॅरिसच्या संपूर्ण शतकातल्या सर्वात कडक थंडीच्या हिवाळ्यात तिथे जाऊन पोहोचलो. एका आठव्या मजल्यावरच्या, लिफ्ट नसलेल्या, अत्यंत थंड, जुन्या इमारतीत आम्ही १४ तास रिहर्सल करत होतो, सराव, सुधारणा करत होतो. द्रौपदी विनोदी पात्र म्हणून साकारणे. दुर्योधन साकारणे. चित्रविचित्र अभिनय आणि आवाजाचे व्यायाम. आणि तेही जगभरातले अनेक व्यावसायिक अभिनयकर्मी तुमच्याकडे संशयाने पाहत असताना.

पीटर रशियन विचारवंत गुर्जीएफ यांचे अनुयायी होते. गुरूने शिष्याच्या स्वःचा पूर्णपणे नाश केला पाहिजे आणि तो पुन्हा निर्मिला पाहिजे असा विचार करणारे. माझे सर्व काम हे आनंददायी, समाधान देणारे असले पाहिजे या तत्त्वज्ञानावर विश्वास आहे. आमच्यामध्ये हा विचारांचा संघर्ष होता. मला ही प्रक्रिया आवडत नव्हती. प्रत्येक रिहर्सल माझ्यासाठी त्रासदायक असायची. रिहर्सल झाली रे झाली की मी माझ्या मुलाला घेऊन गायब व्हायची, वाईन आणि त्याचे ‘ग्यान’ ऐकण्यासाठी तिथे रेंगाळायची नाही हे पीटरला आवडायचे नाही.

पटकथेमध्ये स्त्री पात्रांचे चित्रण नीट झालेले नाही, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अँग्लो-सॅक्सन आहे असे मला वाटत होते. “आवाज जास्त वाढवू नको, तुझा आवाज एखाद्या कजाग स्त्रीसारखा वाटतोय,” असे मला सांगितले जात होते. माझे उत्तर होते, “भारतात कजाग स्त्रिया नसतात, त्यांना आम्ही शक्ती म्हणतो.” द्रौपदी दुःशासनाच्या रक्ताने केस धुते आणि अनेक वर्षांनंतर मोकळे केस बांधते हा प्रसंग त्यांना बीभत्स वाटत होता आणि तो समाविष्ट करू नये असे त्यांचे मत होते. तो समाविष्ट न करणे हा खोटेपणा होईल असे माझे मत होते. आम्ही आठ महिने त्यावर वाद घातला. भव्य उद्घाटनाच्या दिवशी तो समाविष्ट केला. बाकी सगळे पीटर यांच्याकडे गुरू म्हणूनच पाहत होते. मी नव्हते.

आमचे नाते म्हणजे गोंधळ होता. माझ्यामुळे या सादरीकरणामध्ये एक विशेष वेगळेपणा येतो आहे हे दिसू लागल्यानंतर ते नाते हळूहळू बदलू लागले. आम्ही मित्र झालो. पत्रकार परिषदांमध्ये मी त्याने मला किती त्रास दिला, आमचे मतभेद वगैरेंबद्दल बोलावे असा तो आग्रह धरे. आम्ही आमच्या मतभेदांबद्दल हसत असू.

पाच वर्षे चाललेले नाटकाचे प्रयोग आणि चित्रमुद्रण जेव्हा संपले तेव्हा मला जाणवले, माझ्या नव्या जन्मामध्ये त्यांनी उत्प्रेरक म्हणून भूमिका बजावली होती. एखाद्या पात्राला कांद्यासारखे सोलून कसे पहायचे, शून्यता गाठेपर्यंत त्याचे सत्त्व कसे शोधायचे हे त्यांनी मला शिकवले. पात्राच्या प्रत्येक पैलूबद्दल, आणि महाभारताबद्दल मला शांतपणे वाद घालू देऊन, माझा प्रत्येक विचार आणि टिप्पणीचे समर्थन करायला लावून त्यांनी माझ्या कुठल्याही समस्येबद्दलच्या भूमिकेचे समर्थन करण्याची क्षमता सुधारली होती. द्रौपदी करताना मला जे कौतुक मिळाले, त्यामुळे मला मी स्त्रीवादी आणि मानवतावादी दृष्टिकोनातून पुराणांचा नवा अर्थ लावू शकते, तो लोकांपर्यंत पोहोचवू शकते असा विश्वास वाटू लागला. या पाच वर्षांनी मला प्रसारमाध्यमे किंवा लोकांकडून ज्याचा उपहास केला जाईल, चेष्टा केली जाईल असे कामही त्यांच्या समोर आणण्याचा आत्मविश्वास मिळाला.

मागे वळून पाहताना जाणवते, एक सर्जनशील कलाकार म्हणून आज मी जी काही आहे ते त्या पाच वर्षांनी घडवले आहे.

आणि मी त्या गुरूला सलाम करते. कदाचित महाभारतासाठी आणि त्यातल्या तत्त्वज्ञानाचा खरा अर्थ लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्याइतके कुणाचेच योगदान नसेल. कारण त्यांनी ते सगळे जगासमोर आणले. भारत म्हणजे दोरीवरचे खेळ आणि उपाशी गायी असे समजणाऱ्यांच्या समोर आणले. हे लोक भारताच्या प्रेमात पडून घरी गेले आणि आपल्या मिश्र संस्कृतींचा अभ्यास करू लागले, ती समजून घेऊ लागले. हा पद्मश्रीचा सन्मान त्यांना मिळणे योग्यच आहे, किंबहुना फार आधीच, ३० वर्षांपूर्वीच त्यांना तो मिळायला हवा होता.

मल्लिका साराभाई, या नर्तिका, अभिनेत्री आणि कार्यकर्ता आहेत.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0