प्रचारपटांचा पोत आणि काश्मीर फाइल्स

प्रचारपटांचा पोत आणि काश्मीर फाइल्स

दिग्दर्शक चित्रपट का बनवतो? चांगल्या दिग्दर्शकाला चित्रपटातून एक जीवनानुभव द्यायचा असतो. काही दिग्दर्शकांना एक गोष्ट प्रभावीपणे सांगायची असते. काही चित्रपटातून दिग्दर्शकाला आपली बाजू मांडायची असते. तर काही मोजक्या चित्रपटातून कुणाची तरी अधिकृत मते प्रस्थापित करायची असतात. अशा चित्रपटाना प्रचारपट म्हणता येतं, आणि दिग्दर्शकाच्या हेतुबद्दल शंका घ्यायला वाव असतो.

आसाममध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत ईव्हीएम
भारतीय जीवनाशी सतत व्यवहार
६० हजार रुग्ण ऑक्सिजनवर

प्रचारपट, प्रचारपट म्हणून वाईट नसतो. कधी कधी तो असामान्य दर्जाचा असतो. उदाहरण द्यायचं तर ग्रिफिथच्या ‘बर्थ ऑफ अ नेशन’चं देता येईल. चित्रपटाच्या इतिहासात या चित्रपटाला तोड नाही. १९१५ साली बनवलेल्या या मूक चित्रपटाने अनेक अर्थाने इतिहास घडवला. चित्रपटाची भाषा घडवली. पूर्ण लांबीची ही पहिली फीचर फिल्म होती. ती पहिली बॉक्स ऑफिस हिट फिल्म होती. तूफान चालली! पण आजही ती सार्वकालिन वादग्रस्त प्रचार फिल्म मानली जाते. असं काय होतं या फिल्ममध्ये? थॉमस डिक्सन लेखकाच्या ‘क्लॅनस्मॅन’ या कादंबरीवर हा चित्रपट बेतला होता. या लेखकाचे गोऱ्यांचे वर्चस्व सांगणाऱ्या कु कुक्स क्लान ( kkk ) या जहाल उजव्या संघटनेशी जवळचे संबंध होते. अब्राहम लिंकन यांनी गुलामगिरीची प्रथा रद्द केली, त्यावेळेस उसळलेल्या यादवी नागरी युद्धाचे पडसाद यात पाहायला मिळतात. सर्व चित्रपटातून गुलामगिरीची प्रथा नष्ट झाली आणि ‘काळे’ माजले असा परिणाम साधला जातो. समस्त निग्रो अमानवी, संवेदनशून्य, क्रूर आणि नीतीभ्रष्ट आहेत असा संदेश जातो. निग्रो गोऱ्या लोकांच्या घरात घुसून लूटमार, बलात्कार करतात अशी दृश्ये आहेत. अशाने अब्राहम लिंकन यांच्या हत्येला आणि ‘केकेके’ने नंतर केलेल्या निग्रो लोकांच्या नरसंहाराचं समर्थन होतं.

या चित्रपटाने प्रत्यक्षात देखील काळ्या-गोऱ्यात उभी फुट पाडली. दंगे उसळले, केकेके पुन्हा जोमाने सक्रिय झाली. चित्रपटातील क्रॉस आणि पेहराव केकेके प्रत्यक्षात वापरू लागली. निग्रो संघटनेने चित्रपट बंदीची मागणी केली. काही ठिकाणी ती मान्य देखील झाली. शेवटी ग्रिफिथने अनेक दृश्यात काटछाट करण्याची तयारी दाखवली आणि तसे केले देखील. (थोडक्यात काय तर दोन वंशाच्या नागरिकात उभी फुट पाडण्याचे काम देखील एखादा चित्रपट करू शकतो, आणि बदल्याच्या भावनेतून ‘उलट नरसंहार’ घडवून आणू शकतो.)

लेनी रीफएनस्टाल (खरा उच्चार हिटलरच जाणे) हिचा ‘ट्रायम्फ ऑफ विल’ हा असाच एक प्रचारपटाचा मास्टरपिस. यात लेनिने हिटलरच्या १९३४ च्या न्यूरेंबर्गच्या चार सभा चित्रित केल्या आणि ६० तासांचे चित्रीकरण संकलित करून मांडणी केली आहे. यात वंशीय वर्चस्व किवा देशभक्ती याचा कुठेही उल्लेख नाही, हिटलरचे खालच्या कोनातून घेतलेले शॉट्स, जोश, प्रचंड गर्दी आणि भरून राहिलेली ऊर्जा यातून प्रसन्न आशादायी, आश्वासक वातावरण निर्माण होतं. (हिटलरच्या यशात प्रचारपटांचा सिंहाचा वाटा होता.) या चित्रपटातील चित्रीकरण वापरून नाझी विरोधी चित्रपट करण्याच्या प्रयत्न नंतर अनेक दिग्गज दिग्दर्शकांनी केला, कुणालाही त्यात यश आलं नाही! थोडक्यात काय तर प्रचारपट इतका विपरीत परिणाम करू शकतो. त्यामुळे एक चित्रपट म्हणून त्याचं मूल्यमापन फक्त चित्रपटांतर्गत गोष्टीतूनच करता येत नाही.

तसा प्रयत्न विवेक अग्निहोत्री यांच्या ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटच्या वाबतीत करता येतो का पाहू. असं मूल्यमापन करताना दिग्दर्शकाची हाताळणी, तांत्रिक कसब, कथनशैली, अभिनय काढून घेण्याची ताकद, विषयाची निवड, साधलेला परिणाम (जो बऱ्याच वेळा वैयक्तिक असतो, पण काही वेळा, ‘बर्थ ऑफ अ नेशन’ प्रमाणे रौद्र सामूहिक रूप देखील घेऊ शकतो.)

इथे प्रथमच नमूद करायला हवं, की तांत्रिक कौशल्यात दिग्दर्शक कुठेही कमी पडलेला नाही. (पण तो दिग्दर्शनाची उंची गाठतो असंही नाही.) कथनशैली देखील एकस्तरीय नाही. छोटे छोटे फ्लॅशबॅक आणि ते फ्लॅशबॅक ‘सोडवत’ चित्रपट पुढे सरकतो.

चित्रपट साधारणपणे १९९० च्या सुमारास झालेले काश्मिरी पंडितांचे स्थलांतर ते अगदी अलीकडच्या कळात काश्मीरला विशेष दर्जा देणारं ३७० कलम बाद केलं इतका कालावधी आवाक्यात घेतो. खरं तर काश्मिरी पंडितांची कथा शेख अब्दुल्ला याच्या १९५० च्या भूमी कायद्यापर्यंत जाते. जम्मू काश्मीरमध्ये हिंदू जरी ५ टक्के असतील तरी ३० टक्क्यांहून अधिक जमीन ही काश्मिरी पंडित आणि डोग्रा लोकांकडे होती. अब्दुल्ला यांनी ‘कसेल त्याची जमीन’ म्हणून त्यावर प्रतिबंध आणला आणि २२ एकरचे सीलिंग आणलं, उरलेली जमीन सहकारी क्षेत्राला दिली. हे सीलिंग १९७५ पर्यंत अधिकाधिक आक्रसत गेलं. काश्मिरी पंडितांना जमिनीचा कुठलाही मोबदला मिळाला नाही हे देखील तितकंच खरं. (आजही काश्मिरी पंडितांच्या संघटनेचं म्हणणं आहे की त्यांना तो मोबदला मिळावा किंवा काश्मीर खोऱ्यात एक स्वतंत्र ‘आपला काश्मीर’ असा केंद्रशासित प्रदेश काश्मिरी पंडितासाठी तयार करावा. काश्मिरी पंडितांच्या नावे गळे काढणाऱ्यांत ही राजकीय इच्छाशक्ती आहे का हा एक वेगळाच मुद्दा आहे.) जमीन कायद्याला एक ‘डावी’ बाजू देखील आहे असं काही मानतात. जमीनदार आणि मजूर असं स्वरूप देखील काही लोक देतात. पण हा सर्व तपशील अनुल्लेखाने मारला आहे. काश्मिरी पंडितांवर अन्याय झाला हे तर खरंच, फक्त तो पूर्व नियोजित, केंद्र आणि राज्य सरकारच्या (१९९० मधल्या ) संगमताने झाला हे चित्रपटाचं गृहीत तपासून पहावसं वाटतं. (एखादा चित्रपट ‘कट सिद्धांत’ मांडतो तेव्हा त्याची दुसरी बाजू देखील तर्कसिद्ध हवी, कॉमन सेन्सला देखील पटणारी हवी. निव्वळ भावनेला चेतावणारी नसावी अशी अपेक्षा असते. जितका चित्रपटात तो ‘कटसिद्धांत’ तर्कावर मान्य होतो.)

काश्मीर फाइल्सच्या बाबतीत तसं होत नाही.

चित्रपटाला सुरवात, मध्य आणि शेवट असतो असं मानलं जातं, (प्रत्यक्ष गोदार्द सारखा दिग्दर्शक देखील ते मान्य करतो फक्त तो त्याच क्रमाने असलाच पाहिजे असं नाही, असं देखील मिश्किलपणे म्हणून जातो.) सुरवात, मध्य शेवट हा ढाचा आपल्या चित्रपटाने स्वीकारलाय. सुरवात, मध्य, शेवट हा प्रवास चित्रपट कसा करतो यावर त्याचा पोत ठरतो.

‘काश्मीर फाइल्स’ची सुरवात होते ती एका सुनसान जागी क्रिकेट खेळणाऱ्ऱ्या दोन लहान मुलांवर. त्यातील एक शिवा नावाचा हिंदु आहे आणि एक अब्दुल नावाचा मुसलमान, हे पुढील काही दृश्यांवरून कळतं. अचानक दोन बंदूकधारी काश्मिरी मुसलमान तिथे येतात आणि नेमक्या हिंदू मुलाला रायफलच्या दस्त्याने मारून पाकिस्तान झिंदाबाद म्हणायला सांगतात. इथेच शंकेची पाल चुकचुकते. यातून दिग्दर्शकाने काय साधले? त्याला एक प्रचारपट तर करायचा नाही ना अशी शंका येते आणि जसा जसा चित्रपट पुढे सरकत जातो तशी ती बळावत जाते आणि चित्रपटाचा प्रचारकी पोत उलगडत जातो. एका लहान हिंदू मुलाला हेरून, एका निर्जन जागी त्याला पाकिस्तान झिंदाबाद म्हणायला सांगून अतिरेक्यांनी काय साधले? दहशत निर्माण करायची असेल तर त्यासाठी प्रेक्षक समुदाय आवश्यक आहे. ज्याच्याकडून जबरदस्तीने “पाकिस्तान झिंदाबाद” म्हणून घ्यायचं त्याला एक सामाजिक स्थान असायला हवं. नाहीतर दहशत कुणावर आणि कशी बसणार? मुळात काश्मीर पाकिस्तानात जावं अशी जम्मू –काश्मीर लिबरेशन फ्रंटची देखील मागणी नव्हती. त्यांना भारत आणि पाकिस्तान या दोन्हींपासून स्वतंत्र असा ‘आझाद’ काश्मीर हवा असतो आणि त्या प्रश्नावर सार्वत्रिक जनमत कौल घ्यावा अशी त्यांची मागणी असते. मात्र सत्याचा विपर्यास चित्रपटात जागोजागी दिसून येतो.

पुढच्या दृश्यातून हा मुलगा एका काश्मिरी पंडित कुटुंबातला आहे हे कळतं आणि एक काश्मिरी पंडित कुटुंब पडद्यावर साकार होतं. या काश्मिरी पंडित कुटुंबाभोवती कथानकाची गुंफण होणार हे देखील जाणवतं. कुटुंब प्रमुख पुष्कर पंडित (अनुपम खेर) हा एक प्राध्यापक आहे. (हा नेमका कुठल्या विषयाचा प्राध्यापक आहे हे शेवट पर्यंत कळत नाही, या उलट चित्रपटाच्या पुढील भागात येणारी, ‘आझाद काश्मीर’साठी विद्यार्थ्याना ब्रेनवॉश करणारी राधिका मेनन ही राज्यशास्त्राची प्राध्यापक आहे हा तपशील मात्र आपल्याला पुरवला जातो. जेणेकरून राजकारण हातात घेणं या पात्राला शक्य होतं. ) का कुणास ठावूक पण प्राध्यापक पुष्कर पंडित दर शिवरात्रीला अंगाला रंग फासून शंकराचं सोंग घेतो. यातून हा प्राध्यापक धार्मिक हिंदू आहे हेच ठसतं. पुष्कर पंडित, त्याचा मुलगा ज्याला अतिरेकी पिंपात गोळ्या घालून मारतो, सून शारदा पंडित, हिच्यावर हाच अतिरेक्यांचा म्होरक्या अत्याचार करून स्वयंचलित करवतीने कापतो. त्याच्या नातवाला, शिवाला देखील त्याच वेळी हा म्होरक्या (चिन्मय मांडलेकर) गोळ्या घालतो. दुसरा नातू कृष्णा पंडित वाचतो आणि चित्रपटाचा ‘हीरो’ होतो. पंडित कुटुंबाची प्रतिनिधिक स्वरूपाची निवड कळून चुकते आणि या कुटुंबाभोवती कथानकाची गुंफण होणार हा बाज देखील कळून चुकतो. प्राध्यापक पुष्कर पंडितांचा मित्रपरिवार देखील ‘प्रतिनिधिक’ स्वरूपाचा आहे. किती प्रतिनिधिक तर प्रा. पुष्कर पंडित यांनी आपले मित्र दिग्दर्शकाला सोयीस्कर अशा सामाजिक-राजकीय स्तरातून त्यांचे हुद्दे बघून खड्यासारखे निवडले आहेत असं वाटतं. एक कार्यरत सनदी अधिकारी (मिथुन चक्रवर्ती), एक पोलिस आयुक्त (पुनीत इस्सर), एक टीव्ही वार्ताहर, इत्यादी निवडक पात्र निवडून दिग्दर्शक त्यांच्या तोंडून काय वदवून घेणार याचं कुतूहल वाटत आणि चित्रपटात वेळ येईल तेव्हा ही पात्रं दिग्दर्शकाला हवी असलेली वाक्यं बोलतात देखील! सनदी अधिकारी वेळोवेळी काश्मिरी पंडितांची हत्या हा एक इतिहासाने लपवलेला वंश संहार होता (जेनोसाईड) हे वेळोवेळी असं पुन्हा पुन्हा ठसवतो. वंश संहार म्हणजे एखाद्या जमातीचा समूळ नायनाट, जसा ज्यूंच्या बाबतीत झाला तसा. काश्मिरी पंडितांच्या बाबतीत तसं घडलं असेल तर आजही काश्मीर खोऱ्यात सुमारे तीन हजार काश्मिरी पंडित इतर हिंदूसह रहात आहेत हे कसं? पंडितांच्या हत्येचा सरकारने दिलेला अधिकृत आकडा ३९९ आहे, काश्मिरी संघटना देखील हा आकडा ७०० च्यावर नसेल असं मानतात. (माणसं म्हणजे आकडे नव्हेत हे तर सर्वांनाच मान्य आहे, पण हे आगरी, कोळी, गुजराथच्या मिठागारात विस्थापित झालेल्या जमाती, धारणांमुळे विस्थापित झालेली गावं, गोध्रा हत्याकांडात मारले गेलेले मुसलमान, यानाही लागू होतं.) साधारण दीड लाख पंडितानी स्थलांतर केलं असं मानलं जातं, चित्रपटात सर्वच आकडे फुगवून सांगितले आहेत. हे लपवणं हा सरकारी षडयंत्राचा भाग आहे असं पुन्हा पुन्हा ठसवलं जातं.

टीव्ही वार्ताहर काश्मिरी पंडितानी स्वतःहून स्थलांतर केलं अशी खोटी बातमी देतो. पोलिस आयुक्त त्याला एका संवादात पुढे सूनवतो, “अतिरेकी हुडकायचा असेल तर आम्ही आधी त्याची रखेल शोधतो. मीडिया ही सरकारची रखेल आहे, बाजारात विकायला तयार आहे.” ( हे आताच्या केंद्र सरकार बद्दल आहे का? १९९० साली फक्त दूरदर्शन हे एकच टीव्ही चॅनेल होतं आणि त्यातले वार्ताहर इतक्या नीच, हीन पातळीवर गेल्याचं आठवत नाही. सॅटेलाइट चॅनेल्स/तंत्रज्ञान १९९१ पासून उपलब्ध झालं. टीआरपी वगैरे तर अलीकडच्या गोष्टी. मीडियाला रखेल, वार्ताहराला प्रेस्टिट्यूट म्हणणं. विचारवंतांची खिल्ली उडवून त्यांना पढतमूर्ख ठरवणं, धर्मनिरपेक्ष व्यक्तींना भोंदू ठरवणं, समस्त मुसलमान जमातीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं, हे सर्व सरकार पुरस्कृत सोशल मीडिया आणि आयटी सेल्स करताना आज आपण पाहतोच आहोत.) पण चित्रपटात पुष्कर पंडितांचं मित्रमंडळ त्यावेळचं सरकार कसं बदमाश होतं हे वेळोवेळी सांगत आहेत. ( याला म्हणतात ‘आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं पहावं वाकून’) त्यामुळे प्रा. पंडितांचं मित्रमंडळ ही सर्व पात्रं ‘बेतल्या सारखी’ वाटतात. चांगला चित्रपट आणि विशेषकरून चांगला प्रचारपट असं होणं कटाक्षाने टाळतो. प्रचार हा प्रचार वाटू न देणं हेच दिग्दर्शकाचं खरं कसब असतं.

हे सर्व मित्रमंडळ अभिनय मात्र चांगला करतं. मिथुन चक्रवर्तीने अत्यंत संयत अभिनय केला आहे. अपवाद अनुपम खेर यांचा अनुपम खेर एक चांगला अभिनेता आहे यात दुमत नाही. पण तो सर्वश्रेष्ठ अभिनेता आहे असं (तो सोडून) कुणीच मनात नाही. अभिनयाच्या काही उत्तम ‘जागा’ त्याने फुकट घालवल्या आहेत. पुष्कर पंडितना स्मृतिभ्रंश आहे हे त्याच्या अभिनयातून कुठेही जाणवत नाही. एका प्रसंगात भीती, दडपण यामुळे प्रा. पंडिताना हुडहुडी भरते असं दाखवलं आहे. प्रचंड दडपण, भीती, असहाय्यपणा आणि त्यामुळे येणारी शारीरिक हुडहुडी हा मानस-शारीरिक ( सायको-सोमॅटिक) प्रकार खरंतर अंगावर शहारे आणणारा ठरला असता. अनुपम खेरनी तो फुकट घालवलाय. त्या प्रसंगी तो हुडहुडी भरल्याचा अभिनय करतोय असं वाटतं.

हा चित्रपट परिश्रमपूर्वक संशोधन, रिसर्च करून इतिहासाने आणि त्यावेळेच्या सरकारने दडवलेलं काश्मिरी पंडितांच्या जेनोसाईडचं/वंश संहाराचं सत्य पुढे आणलं असल्याचा आव आणत असला तरी तो काही तपासात्मक शोध चित्रपट (investigative) नाही हे उघडपणे जाणवतं. अशा चित्रपटाचा घाट आणि पोत वेगळा असतो. एखादा चित्रपट कट-सिद्धांत (conspiracy theory) मांडू पाहत असेल तर त्यातील प्रति युक्तिवाद तर्कसंगत हवा. ज्यानी वॉटरगेट प्रकरणावरील ‘ऑल द प्रेसिडेन्टस मेन’ किंवा प्रेसिडेंट केनेडीच्या हत्येवर जितके हे चित्रपट पहिले आहेत त्यांना हा फरक प्रकर्षाने जाणवेल. ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचा पोत खऱ्या घटनांवर आधारित कल्पित गोष्ट (fiction) असाच उलगडत जातो.

फिक्शन चित्रपट प्रभावी व्हावा म्हणून दिग्दर्शकाला सर्जनशील स्वातंत्र्य घ्यावं लागतं. कुठल्या प्रसंगाला महत्त्व द्यावं आणि कुठला प्रसंग गळावा हे ठरवावं लागतं. दोन व्यक्तिमत्वांतील काही विशेष निवडून तिसरीच व्यक्तिरेखा तयार करणं, परिणाम तीव्र व्हावा म्हणून दोन वेगळ्या कालखंडातील घटना एकाच कालखंडात घेऊन येणं, वेगवेगळ्या कथावस्तूंचे एकाच कथनात  नरेटीव्हमध्ये रूपांतर करणं, अशा प्रकारचं सर्जनशील कला स्वातंत्र्य दिग्दर्शक घेऊ शकतो. रचित चित्रपटात हे चालून जातं कारण दिग्दर्शक एक गोष्ट सांगत असतो, तपास करत नसतो, किवा खऱ्या खोट्याचा लेखाजोखा मांडत नसतो. त्याला चित्रपटाचा मानवी परिणाम अपेक्षित असतो, राजकीय परिणाम त्याला अपेक्षित नसतात. ‘काश्मीर फाइल्स’ चित्रपटात तो अपेक्षित असल्याचं सतत जाणवत राहतं. रचित चित्रपटात घेण्यात येणारे सर्व स्वातंत्र्य (liberties) दिग्दर्शकाने घेतले आहे. रचित चित्रपटात बऱ्याच वेळा सत्य घटनांची पार्श्वभूमी असते. रोजा, बॉम्बे, तमस, अर्थ अशा चित्रपटातील दंगलीची पार्श्वभूमी ही पार्श्वभूमीच राहून कथा अधिक संपृक्त करते. या पार्श्वभूमीचा कधी मूळ विषय होत नाही. ‘घाशीराम कोतवाल’ नाटकाला किंवा ‘पद्मावत’ चित्रपटाला कोणी इतिहास समजत नाही. ‘काश्मीर फाइल्स’मध्ये अशा सत्य घटना मूळ विषय होतो. मुळात चित्रपटाचा उद्देशच ‘खरा इतिहास सांगण्याचा आहे, अशा वेळेस कालखंडांची, व्यक्तींची सरमिसळ, काही तपशील दडवणे तर काही घोटून घोटून सांगणं, काही खोटे तपशील घुसवणं याला सर्जनशील स्वतंत्र्य म्हणता येत नाही, तर सत्याचा विपर्यास म्हणावं लागतं.

उदाहरणं द्यायची तर तेवीस-चोवीस काश्मिरी पंडीतांची हत्या ही घटना २००३ मध्ये नंदिग्राम येथे घडली होती. (त्या वेळेस बीजेपी प्रणित सरकार होतं) चित्रपटात तो प्रसंग १९९० मध्ये घडल्याचं दाखवलं आहे. शारदा पंडित ही व्यक्तिरेखा ज्या व्यक्तिवरून घेतली आहे, त्या लॅब असिस्टंट गिरिजा टिक्कू या तरुणीची हत्या झाली होती, बलात्कार झालेली व्यक्ति वेगळीच होती. ही हत्या करणारा व पुढे त्याची कबुली देणार बिट्टा कराटे आणि चार हवाईदल अधिकाऱ्यांची हत्या करणारा यासीन मालिक या दोन वेगळ्या व्यक्ती आहेत. चित्रपटात त्यांची सरमिसळ करून फारूख मालिक हा अतिरेक्यांचा म्होरक्या (चिन्मय मांडलेकर) तयार केलेला आहे. ही हत्या एका अतिरेक्याने केलेली हत्या आहे. चित्रपटात यात पोलिस सहभागी होते असं सूचित केलं आहे. काश्मिरी पंडितांचं रेशन आणि आरोग्यसेवा बंद केली, सामान्य मुस्लिम किंवा दुकानदार त्यांना धान्य देईनासा झाला हे धादांत खोटं आहे, हे ही सर्व परिस्थिती पाहिलेल्या श्रीनगर-स्थित डॉक्टरने शपथपूर्वक लिहून ठेवले आहे. अनेक काश्मिरी पंडितांनी आपली आत्मचरित्रं लिहून ठेवलीत, त्यात सामान्य मुसलमानांच्या माणुसकीचे अनेक किस्से आहेत असं जाणकार म्हणतात. तसा एखादा जरी किस्सा चित्रपटात आला असता तर तमाम मुस्लिम जनतेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केल्यासारखं वाटलं नसतं. एखादी जमात सर्वच्या सर्व क्रूर, संवेदनाशून्य, मानवतारहीत  आहे; त्यातील एकाही माणसात माणुसकी नाही, हे भारतातच काय जगातल्या कुठल्याही जमातीत अशक्य आहे.

या चित्रपटात नेमकं उलट होताना दिसतं. मुस्लिम शेजारी पंडितांचं घर बळकावण्याचा उद्देश ठेवतो, मुस्लिम शिक्षक/उलेमा पाल्याच्या आईशी (शारदा पंडितशी) निकाह करू मागतो आणि विटंबना प्रसंगी तिच्यावर थुंकतो. प्रा. पुष्कर पंडितांचा विद्यार्थी तर अतिरेकी संघटनेचा म्होरक्या  बनतो. हे कमी म्हणून की काय लहानपणी गोळ्या घालून मारलेल्या नातू शिवा पंडितचा लहानपणीचा मित्र अब्दुल इतकंच काय त्याचा लहान मुलगा याचे थेट अतिरेक्यांशी लागेबांधे असतात.

चित्रपटात अनेक अतर्क्य, खटकणाऱ्या गोष्टी आहेत. पुष्कर पंडित भाजी घ्यायला जातो तेव्हा कोपऱ्यावरचा सामान्य भाजीवाला त्यांना सुट्टे परत करताना पाकिस्तानी नोट देतो. या नोटा त्याला कुणी दिल्या? एका रात्रीत अशा नोटा वाटणं शक्य तरी आहे का? या नोटा फुकटात वाटल्या का? का भारतीय चलनाच्या बदल्यात दिल्या? ज्या संघटनेनं अशी अदलाबदल केली ती नक्कीच घाट्यात गेली असणार. “पाकिस्तानात राहायचं असेल तर पाकिस्तानी नोटा घ्याव्या लागतील.” ही भाषा भाजीवाल्याच्या तोंडात कुठून आली? मुळात आता आपण पाकिस्तान झालो अशी मागणी घोषणा, कुणीही केली नव्हती. काश्मीरचं एका रात्रीत पाकिस्तानात रूपांतर होणं, तसा जनमानस तयार होऊन सामान्य भाजीवाला तशी भाषा बोलणं संभवत नाही.

एका प्रादेशिक सनदी अधिकाऱ्याला खुद्द पंतप्रधानानी “मी कारवाई केली तर आमचे मित्र काश्मीरचे मुख्यमंत्री दुखावतील,” असं सांगणं असंभव आहे. मुळात कारवाई टाळायची असेल तर पंतप्रधान फोन घेणारच नाहीत त्याचा स्वीय सचिव घेईल. किंवा पंतप्रधान “मी लक्ष घालतो” अशी मोघम उत्तरं देतील.(ज्या नेहरू कुटुंबावर दिग्दर्शकाचा रोख आहे, त्यातील कुटुंब प्रमुखाने (काश्मिरी) पंडित नेहरूनी आपले ‘मित्र’ शेख अब्दुल्ला यांना तुरुंगात टाकलं होतं. या चित्रपटात राजीव गांधीवर ठपका आहे.) सनदी अधिकाऱ्याला काश्मीरचे मुख्यमंत्री भारताचा हेर म्हणून तडकाफडकी बडतर्फ करतील हे देखील पटत नाही.

चित्रपटात मोठ्या प्रमाणावर अत्याधुनिक शस्त्रे, एके ४७, ( ही सर्व अतिरेक्यांकडे चित्रपटात मुबलक प्रमाणात आहेत.) स्वयंचलित ग्लॉक रिवॉल्वर्स (अतिरेकी म्होरक्या एका रिवॉल्वर मधून एकाच वेळी २३ गोळ्या घालतो.) गलील  ग्रेनेड/ रॉकेट लॉञ्चर (पोलिस व्हॅन उडवतात तो प्रसंग). ही सर्व लष्करी ग्रेडची शस्त्रे आहेत. त्यामुळे हे अतिरेकी सामान्य जनतेतून असंतोषामुळे निर्माण झालेले वाटत नाहीत तर पाकिस्तानी लष्कराने पाठवलेले एजंट वाटतात. मग हिंसाचाराला खरं जबाबदार कोण? चित्रपट जसा जसा पुढे सरकतो तशी भाषा अधिकाधिक टोकदार, घोटीव, आक्रमक होत जाते.

एका  फ्लॅशबॅकच्या सुरवातीस आपली ओळख कृष्णा पंडित याचा वाचलेला नातू कृष्णा पंडितशी (दर्शन कुमार) होते. आपल्या वडिलांच्या अस्थी घेऊन तो ब्रह्म दत्त (मिथुन चक्रवर्ती ) या (बडतर्फ) सनदी अधिकाऱ्याच्या घरी आला आहे. आपल्या कुटुंबाची हत्या झाली हे त्याला अजून कळलेलं नाही, तो समजतोय की ते एका अपघातात गेले. त्याला कधी तरी सत्य समजणार आणि तो पलटणार हे हिन्दी चित्रपटांच्या प्रेक्षकाला नव्याने सांगायला नको. वडिलांच्या अस्थी त्याला स्वगृही म्हणजे काश्मीरच्या घरी पसरायच्या आहेत. हा एका एका अर्थाने चित्रपटाचा ‘हीरो’ आणि दिग्दर्शकाचा आवाज!

फ्लॅशबॅक सोडवताना अत्याचार, कत्तली, वगैरे सर्व गोष्टी येऊन जातात. असे दोन तीन फ्लॅशबॅकस् दिग्दर्शकाने मोठ्या खुबीने वापरलेले आहेत. त्याचे मार्क्स त्याला द्यायलच हवेत.

कृष्णा पंडित आपल्याला नजीकच्या वर्तमानकाळात घेऊन येतो. सरकार बदलले आहे. काश्मीरला विशेष दर्जा देणारं ३७० कलम रद्द झालं आहे. संचारबंदी लागू आहे. इंटरनेट बंद आहे. बुऱ्हाण वाणी मारला गेलाय. कृष्णा पंडित कॉलेजच्या निवडणुकीत उभा राहणार आहे. त्याची प्राध्यापिका राधिका मेनन (पल्लवी जोशी) त्याचं आणि तमाम विद्यार्थ्यांचं आझाद काश्मीर साठी ब्रेनवॉश करतेय. त्या साठी ती वारंवार फैझ अहमद फैझ ची ‘हम देखेंगे’ ही कविता म्हणून घेतेय. ही खरी तर ‘ हम होंगे कामयाब’ किंवा ‘अच्छे दिन आएंगे’ टाइप कविता आहे.  पण ती ज्याप्रकारे म्हटली जाते त्यातून ‘हम देखेंगे’ पेक्षा ‘हम देख लेंगे’ अशी धमकी देणारी कविता वाटते. ही गाणाऱ्या कोरस मधील दोन पात्रं ती (दिग्दर्शकाने सांगितल्या प्रमाणे) बायकी हावभावात म्हणतात.

प्रा. राधिका मेनन कृष्णाला कॉलेजच्या निवडणुकीसाठी तयार करतेय. आपल्याला एक नरेटीव्ह तयार करायचं आहे, आशेचा आभास निर्माण करायचाय, लोकाना एक मसीहा हवा असतो. तुला मसीहा असल्याचं वातावरण तयार करायचंय, अशी कूटनीती दिग्दर्शक राधिका मेननच्या तोंडून वदवून घेतो.

आता चित्रपट हळूहळू शेवटाकडे येतोय. कृष्णा पंडितला त्याच्या कॉलेजच्या निवडणुकीसाठी कास्मिरचं नॅरेटीव्ह तयार करायचं आहे. काश्मीर पाहायचं आहे, तिथल्या माणसांचं म्हणणं रेकॉर्ड करायचंय. आता योगायोग बघा तो ज्या माणसाशी होडीत बोलतो, तो त्याच्या लहानपणी मारल्या गेलेल्या भावाचा, शिवाचा लहानपणीचा मित्र अब्दुल निघतो. आत्तापर्यंत तो कट्टर मुसलमान झालेला आहे. मग शिवा पंडित थेट अतिरेक्यांच्या म्होरक्याला भेटतो, (यानेच त्याच्या आईची हत्या केलीय) प्रा. राधिका मेननचा त्याच्याशी थेट संपर्क असतो. तो त्याचं एक नॅरेटीव्ह कृष्णाला सांगतो. जेनोसाईड वगैरे कसा बनाव आहे, वस्तुस्थिती नाही वैगेरे. हे सर्व कृष्णाला पटतं. (आश्चर्य आहे.) तो परत आल्यावर ब्रह्म दत्त म्हणजे मिथुन चक्रवर्तीला हे सुनावतो. मिथुन चक्रवर्ती त्याच्यासमोर कात्रण असलेल्या फाइल्स ठेवतो. त्यामुळे अर्थातच कृष्णा पंडितचा गैरसमज दूर होतो आणि तो कॉलेजच्या निवडणुकीच्या भाषणास तयार होतो.

अशी समारोपाची भाषणं आपण हिंदी चित्रपटात शेवटच्या कोर्ट सीनमध्ये पाहिलेली आहेत. गुन्हेगार झालेला हीरो कायदा कशी बेकार वस्तू आहे, हे कोर्टाला घसा फोडून सांगत असतो. खरं तर आपल्याला काय सांगायचं आहे ते पात्राकरवी भाषण ठोकून सांगावं लागणं म्हणजे आपण दृक-भाषेत कच्चे आहोत, अशी कबुलीच दिग्दर्शकाने दिल्यासारखे आहे. पण तरीही कट-सिद्धांत चित्रपटात ती प्रभावी ठरू शकतात. अशा वेळी दिग्दर्शक आपला युक्तिवाद आपली थिअरी ‘रेस्ट’ करत असतो. या चित्रपटातील शेवटच्या भाषणात हे घडतं. काही समारोपाची भाषणं तर चित्रपटाच्या इतिहासात अजरामर झालेली आहेत. ‘ग्रेट डिक्टेटर’ चित्रपटात चार्ली चॅपलिन आयुष्यात पहिल्यांदा बोलतो. ते शेवटचं भाषण म्हणजे माणसा माणसात दुफळी माजवणाऱ्या लोकांना एक सणसणीत मानवतावादी चपराक आहे. ‘काश्मिर फाइल्स’च्या समारोपाच्या भाषणात दिग्दर्शक सपशेल उताणा पडतो आणि आपण एक प्रचारपट केलाय यावर शिक्कामोर्तब करतो.

त्यानं काश्मीरला काय पहिलं हे या कॉलेजच्या निवडणुकीच्या भाषणात सांगायला कृष्णा पंडित तोंड उघडतो आणि त्याने जे पहिले आहे ते आपल्याला पडद्यावर कसं दिसलं नाही, असा प्रश्न आपल्याला पडतो. कारण चित्रपटात तो काश्मीरमध्ये दोन दृश्यात दिसतो. एकदा होडीत (दैवी योगायोगाने) भेटलेल्या आपल्या भावाच्या लहानपणीच्या मित्राशी बोलताना आणि एकदा अतिरेकी म्होरक्याच्या, फरूख मालिकच्या घरी.

कृष्णा पंडितला एक सुंदर निसर्गरम्य काश्मीर दिसतं. इथपर्यंत ठीक आहे. पण यानंतर जो युक्तिवाद येतो तो म्हणजे केवळ साधर्म्य दाखवून केलेल्या युक्तिवाद ( Argument by analogy ) ठरतो. तर कृष्णाला तप करणारे कश्यपमुनी दिसतात, यांच्या नावावरून काश्मिरला काश्मीर असं नाव पडलं म्हणे. काश्मीर हा एकेकाळी प्रचंड ज्ञान एकवटलेला प्रदेश होता.(आपण नालंदा ऐकलं आहे.) कश्यपमुनि, आदिशंकराचार्य,अभिनवगुप्त, भरतमुनी, आर्यभट्ट वगैरे दिग्गज लोकांनी चिंतन करून (म्हणजे दिग्दर्शकाच्या म्हणण्याप्रमाणे रिसर्च करून) आपापले ग्रंथ लिहिले. लोकं त्याकाळी काश्मीरला येऊन चिंतन करून पंडित ही पदवी म्हणजे पीएचडी मिळवत.( चिंतन करून पीएचडी मिळत असेल तर प्रत्येक पालकाने आपापल्या अंगणात एक वडाचं झाड लावावं म्हणजे त्याखाली बसून चिंतन करून पीएचडी मिळवता येईल.) ज्ञान युद्ध त्याकाळी देखील होतं. जो ज्ञान कंट्रोल करतो तो जिंकतो, हे इतिहासाने लपवलेल्या अति क्रूर मुसलमान राजास माहिती होतं. त्याने सर्व हिंदू लोकांची हत्या केली, नदी-तलाव प्रेतांनी भरले. थोडक्यात काय तर आमच्याकडे उज्ज्वल इतिहास होता जो मुसलमान आक्रमकांनी नष्ट केला आणि तो आजपर्यंत लपवला गेला. खरा तर असा इतिहास दुफळी माजवण्यासाठी ब्रिटिशांना उपयुक्त होता. त्यांनी तो का नाही सांगितला? किंवा त्याकाळी बाहेरून आलेल्या पर्यटकाने तो का नाही लिहून ठेवला?

वर उल्लेख केलेल्या विद्वानापैकी अभिनव गुप्त काश्मिरी. पण अभिनवगुप्त, भरतमुनी यांनी चिंतन करून नाट्यशास्त्रं लिहिली यात एक बेसिक राडा आहे. नाट्यशास्त्र ही एक प्रयोगजन्य निरीक्षणजन्य शाखा आहे. त्यासाठी नाटकं पहावी लागली असणार, संहिता वाचाव्या लागलेल्या असणार, अभिनवगुप्त तर भरतमुनीच्या विधानांचा उल्लेख पदोपदी करतो. म्हणजे किमान ते तरी त्यानं वाचलंय. केवळ चिंतनातून असे ग्रंथ लिहिणे शक्य नाही. दक्षिणेकडे कोची येथील एका गावात जन्मलेले आदिशंकराचार्य चिंतन करायला काश्मीरला गेले, तिथे चिंतानातून त्यांना अद्वैत तत्व्ज्ञान प्राप्त झालं, मग ते पुनः दक्षिणेकडे आले, दक्षिणेकडे श्रृंगेरीचा पहिला मठ स्थापन करून ते इतर मठ स्थापन करत आणि इतरांना युक्तिवाद वाद-विवादात खोडून काढत पुन्हा उत्तरेकडे बद्रिनाथपर्यंत आले असं समजायचं का? आर्यभट्ट गणितज्ज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ होता. त्याला सिद्धांत मांडताना गणिती आकडेमोड करावीच लागणार. त्यामुळे चिंतन करून पंडित होणं हा प्रकारच हास्यास्पद आहे. काश्मिरी पंडितांवर ‘प्रचंड संशोधन’ करणाऱ्या  दिग्दर्शकाचा ‘बेसिक मध्येच राडा’ आहे. आपल्या युक्तिवादासाठी पुराणकालीन कश्यपमुनी ते गुप्तकालीन भरतमुनी अशा सर्वानाच दावणीला बांधलं आहे. आणि सिद्ध काय केलय तर पंडितांचं (ब्राह्मणांचं) ज्ञान-वर्चस्व!

हा प्रकारही आपल्याला नवा  नाही.

हे सर्व समारोपाचं भाषण ऐकून कृष्णाला खाली बस सांगणारे गप्प होतात. प्रा. राधिका मेनन काढता पाय घेते. आणि आपण इतिहासाने दडवलेलं सत्य समोर आणलंय अशी समजूत करून देत दिग्दर्शक गल्ला गोळा करू लागतो.

मेघनाद कुळकर्णी, हे चित्रपट अभ्यासक आणि लघुपट व जाहिरातपट दिग्दर्शक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0