डिसायपलमध्ये सद्यस्थितीचे चित्रण – अनीश प्रधान

डिसायपलमध्ये सद्यस्थितीचे चित्रण – अनीश प्रधान

' द डिसायपल' हा सिनेमा नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील कलाकाराची ही कथा, दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांनी चित्रीत केली आहे. चित्रपट रसिक आणि जाणकारांमध्ये या चित्रपटाची चर्चा सध्या सुरू आहे. चैतन्य ताम्हाणे यांनी यापूर्वी दिग्दर्शित केलेल्या कोर्ट या चित्रपटाचीही चर्चा झाली होती. 'द डिसायपल' या चित्रपटाची संगीत रचना तबलावादक आणि संगीतकार डॉ. अनीश प्रधान यांनी केली आहे. या चित्रपटाच्या संदर्भात त्यांच्याशी केलेली ही चर्चा.  

दरदिवशी २ महाविद्यालये स्थापनेचा भाजपचा दावा खोटा
पँथर राजा ढाले यांचे निधन
‘केंद्राने पूरग्रस्तांना विम्याची ५० टक्के रक्कम तातडीने द्यावी’
  • तुम्ही या चित्रपटाची ‘संगीत रचना’ (म्युझिक डिझाईन) केलेली आहे. त्याबद्दल काही सांगा.
डॉ. अनीश प्रधान

डॉ. अनीश प्रधान

संगीत रचना’ या क्रेडिटबद्दल बोलणे गरजेचे आहे. चित्रपटाच्या श्रेय नामावलीमध्ये मला संगीत दिग्दर्शकाचे क्रेडिट न देता म्युझिक डिझाईनचे क्रेडिट दिले जावे यासाठी मी आग्रही होतो. कारण सिनेमातील बहुतेक संगीत हे पारंपरिक आहे, ते मी रचलेले नाही. अनेकदा चित्रपटांमधून असे संगीत वापरले गेल्यास सर्रास ‘संगीत दिग्दर्शक’ असे श्रेय देण्यात येते. बराच विचारविनिमय केल्यानंतर सर्वांनुमते ‘साऊंड डिझाईन’ या क्रेडिटच्या धर्तीवर ‘म्युझिक डिझाईन’ हे क्रेडिट असावे यावर एकमत झाले. या सिनेमाचे साऊंड डिझायनिंग नरेन चंदावरकर आणि अनिता कुशवाहा यांनी केले आहे.

यामध्ये मी नेमके काय केले? तर पहिले म्हणजे चित्रपटात वापरल्या जाणाऱ्या विविध संगीतप्रकारांची निवड. सिनेमातील वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये नेमके कुठले राग, बंदिशी, आणि गाणी चपखल बसतील याचा बारकाईने विचार केला गेला. उदाहरणार्थ चित्रपटात एका प्रसंगात सकाळची मैफल असल्याकारणाने सकाळचा राग घेणे आवश्यक होते. आता हे ठरवायचे झाल्यास आपल्या हिंदुस्थानी संगीतपद्धतीत पुष्कळ सकाळचे राग आहेत- त्यातून सुयोग्य राग निवडणे, त्या रागातील विशिष्ट बंदिश निवडणे आणि चित्रपटात ती सादर कशी केली जाईल या अनुषंगाने विचार करणे हे माझे काम होते. या सगळ्या प्रक्रियेत चित्रपटाचे दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे हे सक्रिय सहभागी होते. मी म्युझिक डिझायनर असलो तरी माझ्यावरच संपूर्ण जबाबदारी होती असे नव्हते, तर दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे यांचाही दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा होता. इथे मला या दिग्दर्शकीय दृष्टिकोनाबद्दल बोलायला अधिक आवडेल. चैतन्य ताम्हाणे हे परफेक्शनिस्ट आहेत. सिनेमातील प्रत्येक प्रसंगावर सखोल विचार आणि संशोधन करण्यावर त्यांचा भर असतो. जेव्हा जेव्हा मी त्यांना वेगवेगळे राग व बंदिशी सुचवत असे तेव्हा तेव्हा ते न केवळ लक्षपूर्वक ऐकत असत, तर त्यांनी नोंदवलेली निरीक्षणे व त्यांची मते मला सांगत असत. अनेकदा ते मला अधिकाधिक पर्याय देण्यास सांगत असत. जेणेकरून सर्वाधिक चपखल संगीत जे असेल ते चित्रपटात घेतले जाईल. ताम्हाणे यांची या सिनेमाआधी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताशी जुजबी ओळख होती. परंतु या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी दीर्घकाळ केलेले संशोधन वाखाणण्याजोगे आहे. चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिण्याच्या प्रक्रियेत त्यांनी अनेक लोकांशी चर्चा केल्या, अनेक मैफिलींमध्ये ते हजेरी लावत. जेणेकरून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा एकूण माहौल आणि पद्धती यांच्याशी त्यांची ओळख झाली.

चित्रपटात २००६ पासून आत्तापर्यंतचा कालखंड आहे. चित्रपटाचा नायक शरद (आदित्य मोडक) लहान असतानाचीही दृश्ये आहेत. त्यामुळे मैफिलींमध्ये  त्या त्या काळातील साधनसामुग्री वापरण्याकडे कटाक्ष ठेवला गेला.

चित्रपटातील संगीत कसे ‘ऐकू’ येते आहे याबद्दलही विचार केला गेला. उदाहरणार्थ दोन सलग प्रसंगांमध्ये जर संगीत असेल, तर एका प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात जाताना संगीताबाबाबतही सलगता राखणे आवश्यक होते. उदाहरणच द्यायचे झाले तर चित्रपटाच्या सुरुवातीलाच गुरुजी मैफिलीमध्ये राग जौनपुरी गाताना दाखवले आहेत. त्यानंतरचा प्रसंग शिष्यांसोबतच्या तालमीचा आहे, तिथेही राग जौनपुरी घेतला आहे. या प्रसंगांचा परिणाम कायम ठेवण्याकरिता ही संगीताची सलगता महत्वाची होती.

अजून एक प्रसंग जिथे शरद मैफिल सोडून जातो, तोही नमूद करण्यासारखा आहे. यामध्ये शरदच्या मनातली घालमेल त्याच्या गाण्यात प्रतिबिंबित होणे अपेक्षित होते. आम्ही इथे राग मियांमल्हारची निवड केली, आणि आदित्यला एका विशिष्टप्रकारे आलापी करायला सांगितली. एरवी आलापांमध्ये चढत्या क्रमाने असलेला ठेहराव यात अजिबात नाही. तो विस्कळीत गातो, ज्यामुळे त्याची चलबिचल श्रोत्यांपर्यंत पोहोचते. यासाठी आदित्य मोडकला आधी सराव करावा लागला.

  • चित्रपटात खऱ्याखुऱ्या गायक कलाकारांनी अभिनय केला आहे. या अभिनेत्यांच्या निवडीबाबत तुमची भूमिका काय होती?

चित्रपटासाठी गायक कलाकार कोण निवडावेत हा एक मोठा प्रश्न होता. या प्रक्रियेत चैतन्य ताम्हाणे सातत्याने माझ्याशी सल्लामसलत करत होते. अनेक युवा कलाकारांच्या ऑडिशन घेण्यात आल्या. अनेक सांगीतिक बाबींचा विचार करावा लागला.

यात माझा दृष्टिकोन असा होता की चित्रपटातील गुरु आणि शिष्य हे समान घराण्यातील असावेत, जेणेकरून त्या दोघांची गाण्याची पद्धती मिळतीजुळती असेल. त्यामुळे सिनेमात गुरूंची भूमिका निभावणारे  डॉ. अरुण द्रविड हे जयपूर अत्रौली घराण्याचे आहेत तर त्यांच्या शिष्यांच्या भूमिकेत असणारे आदित्य मोडक, दीपिका भिडे आणि अभिषेक काळे यांची गायकी या घराण्याशी साधर्म्य साधणारी आहे. त्याच अनुषंगाने संगीताचा विचार केला गेला. म्हणजे एखादा राग या सगळ्या शिष्यांना  माहिती आहे कि नाही याचीही खातरजमा करून घ्यावी लागली. तसे नसल्यास त्याची तालीम करवून घेतली गेली. राग जरी माहिती असेल तरी गाण्याच्या विशिष्ट पद्धतीची ओळख करून घ्यायलाही ही शिष्यमंडळी द्रविडांसोबत तालीम करत होती.  यामुळे जो गुरु-शिष्य संवाद निर्माण झाला त्याचे प्रतिबिंब आपसूक सिनेमात पडले. कलाकारांसोबत रवींद्र नाट्यमंदिर (मुंबई) येथे काही वर्कशॉप्सचे आयोजन केले गेले. तेव्हा मीही तिथे उपस्थित होतो.

सिनेमातील गुरु पौर्णिमेच्या प्रसंगात आदित्य राग शुद्ध सारंग गायला आहे त्यासाठीसुद्धा द्रविडांकडून त्याने विशेष तालीम घेतली आहे. परंतु त्यातील बंदिशींची निवड मात्र मी केली आहे.

  • सिनेमात संगीतातील वैविध्य राखले जावे, यासाठी कशा प्रकारची मेहनत घेण्यात आली? उदाहरणार्थ,चित्रपटात जसे रागसंगीत आहे, तसेच शेवटच्या प्रसंगात एक मुलगा लोकल ट्रेनमध्ये गाणे गाताना दाखवला आहे.. या सगळ्यामागे काय विचार होता?

सिनेमात सांगीतिक वैविध्य असावे यावर दिग्दर्शक आणि माझे एकमत होते. अर्थात सिनेमातील मर्यादित वेळेमुळे सगळी विविधता समाविष्ट करणे शक्य नव्हते. परंतु जिथे शक्य आहे तिथे आम्ही वैविध्यपूर्ण संगीताचा वापर केला. रागांमध्ये यमन , भूप, भीमपलास, शुद्ध सारंग, संपूर्ण मालकंस, जौनपुरी अशा वेगवेगळ्या रागांचा समावेश केला. त्याचबरोबर एका सुफियाना बंदिशीचाही समावेश केला. तालांमध्येही वैविध्य ठेवले.

चित्रपटातील शेवटचा प्रसंग महत्वाचा आहे. त्यासाठी खास राजस्थानात जाऊन अनेक कलाकारांच्या ऑडिशन्स घेतल्या गेल्या. यात मीही सातत्याने वेगवेगळ्या कलाकारांना ऐकत होतो. त्यातून मोती खान याची निवड झाली. आधी असे ठरले की त्याचे गाणे मीच बसवावे. परंतु आमच्या लक्षात आले की त्याच्या सोबत आलेल्या अन्वर खान यांच्याशी त्या गायकाचा संवाद चांगला आहे. त्यामुळे गाण्याच्या ओळी  आम्ही दिल्या, परंतु त्या त्यांनी त्यांच्या हिशोबाने बसवल्या. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्याने वाजवलेला तंबोरा, जो खास त्याच्यासाठी तयार करून घेतला होता. त्याला तो वाजवण्याची सवय  नव्हती, ती करावी लागली. या सगळ्या गोष्टी सांभाळून चित्रपटातील हा शेवटचा प्रसंग चित्रित करण्यात आला.

त्यातील शब्दांनाही विशिष्ट अर्थ आहे. हे ‘उलटबांसी’ प्रकारातील काव्य ताम्हाणे यांनीच निवडले होते. त्यात ‘सरियल’ जगाचे वर्णन असते- असे जग जे आपल्या दृष्टीच्या पलीकडे, प्रसंगी वैचित्र्यपूर्ण आहे. शरदही साधारण तशाच मनस्थितीत दाखवला आहे. त्याच्या आवाक्याबाहेरच्या जगाची त्याला आस होती का? किंवा आपल्या जगापलीकडे एक जग आहे, याचे त्याला भान होते का? अशा अनेक प्रश्नांचे प्रतीक म्हणजे हे गाणे आहे.

  • चित्रपटाची ही सांगीतिक बाजू सांभाळताना काय आव्हाने होती?

या साऱ्या प्रक्रियेमध्ये हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा दर्जा कमी होऊ द्यायचा नव्हता किंवा कुठलेही पात्र ‘कॅरीकेचरिश’ होऊ द्यायचे नव्हते. सिनेमातील अनेक गोष्टी संभाळताना याचेही भान राखणे ही एक तारेवरची कसरत होती. उदाहरणार्थ, प्रत्यक्ष गाण्याच्या मैफिली कितीतरी तास चालतात. पण सिनेमात मात्र त्याची फक्त झलक अपेक्षित होती. अनेक ज्येष्ठ गायकांनी पूर्वीच्या काळी करून ठेवलेल्या ७८ आरपीएम रेकॉर्डस् कडून मी प्रेरणा घेतली. या रेकॉर्डस् मध्ये रागांची मांडणी केवळ तीन-चार मिनिटांमध्ये केलेली असते. या धर्तीवर सिनेमासाठी रेकॉर्डिंग केले गेले. ते करताना मी गायकांसोबत स्टॉपवॉच घेऊन बसत असे, जेणेकरून मर्यादित वेळेत रागाचे अधिकाधिक सार गायकांना मांडता येईल. हे करणे तितकेसे सोपे नव्हते, कारण हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत प्रवाही असते आणि उत्स्फूर्तपणे सादर केले जाते. तिथे मला प्रत्येक गायकाला काही विशिष्ट सूचना करत मर्यादित वेळेत राग ‘बसवावा’ लागला. त्यासाठी कित्येक री-टेक्स झाले. सगळ्या कलाकारांची साथ आणि दिग्दर्शकाचा असलेला विश्वास यांमुळेच हे सर्व सहज शक्य झाले.

ताम्हाणे यांनी सुरुवातीलाच कलाकारांना सांगितले होते, की मुद्दामहून अभिनय करू नका. ऑडिओ-स्टुडिओमध्ये सुद्धा कॅमेरा सेटअप ठेवलेला असे, जेणेकरून गायकांचे गाताना जे नैसर्गिक भाव असतात, ते टिपले जावेत. त्याचे रेकॉर्डिंग गायकांना दिले जात असे. तो त्यांच्यासाठी प्रत्यक्ष शूटिंगआधीचा एकप्रकारचा गृहपाठ असे. काही प्रसंगांमध्ये गायनासोबत विशिष्ट प्रकारच्या अभिनयाचीही अपेक्षा होती. उदाहरणार्थ एका प्रसंगात गुरुजी गाता गाता खोकताना दाखवले आहेत. आता हे नेमके कसे, किती वेळ खोकायचे याचीही तालीम केली गेली. मूळचे अभिनेते नसलेल्या गायकांना हे सारे करणे निश्चितच आव्हानात्मक होते. पण सगळ्याच गायकांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेलले.

गायक नसलेल्या अभिनेत्यांनाही गाण्याच्या तालमीची गरज होती. चित्रपटात किरण यज्ञोपवित यांनी शरदच्या वडिलांची भूमिका बजावलेली आहे. एका प्रसंगात शरदला शिकवताना त्यांना एक बंदिश आणि तराणा असे गायचे होते. ते पुण्याचे आहेत, तर त्यांना आम्ही संवादिनीवादक चैतन्य कुंटे यांच्याकडे मार्गदर्शनासाठी जायला सांगितले. त्या प्रसंगात तराणा घेतला गेला, कारण चित्रपटात इतर ठिकाणी तराण्याचा समावेश नाही. लहान मुलाला शिकवत असल्याच्या या प्रसंगात तराणा चपखल बसेल असे वाटले.

अजून एक सांगायची गोष्ट अशी की हा तराणा जोहराबाई आगरेवाली यांनी १९११ साली रेकॉर्ड केलेला आहे. यानिमित्ताने त्यांना एकप्रकारे आदरांजली वाहिली गेली, असे मला वाटते.

 – या चित्रपटात माईंच्या (सुमित्रा भावे) आवाजाला आणखी भारदस्तपणा आणि खोली देण्याचे काम तानपुऱ्याच्या आवाजाने केले आहे. त्याचा विचार कसा केला गेला?

यामध्ये पुन्हा साउंड डिझायनर्स नरेन चंदावरकर आणि अनिता कुशवाहा यांना श्रेय द्यावे लागेल. तानपुऱ्यांचा आवाज कसा रेकॉर्ड करायचा याचा त्या दोघांनी बारकाईने विचार केला. आणि नंतर मग ते डिझाईनमध्ये कसे वापरायचे याचा विचार केला गेला. त्यासाठी स्क्रिप्टमध्ये माई नेमक्या कुठल्या प्रसंगात काय बोलत आहेत हेही ध्यानात घेतले गेले. तानपुऱ्याचे ट्युनिंग त्याप्रमाणे बदलले आहे जेणेकरून अपेक्षित परिणाम साधला जावा. त्यामुळे काही प्रसंगांत तानपुरा ऐकणाऱ्याला प्रसन्न करतो, तर काही प्रसंगांत अस्वस्थ करतो. ही कमाल तानपुरा ज्या पद्धतीने छेडला गेला आणि रेकॉर्ड केला गेला याची आहे. रेकॉर्डिंगमध्ये काही तानपुरा वादकांनी तर तानपुरा छेडलाच, पण त्याचबरोबर मी आणि आदित्य मोडकनेही छेडला. त्यामधल्या विरामाच्या (पॉजेस) जागाही निश्चित केल्या गेल्या. या सगळ्याचा एकूण परिणाम चांगला साधला गेला असे आम्हाला वाटते.

  • हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्राशी फारशी ओळख नसलेल्या प्रेक्षकांकडून तुम्हाला कशा प्रतिक्रिया मिळाल्या?

खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. चित्रपटात कथेचा हात धरून, लहान लहान प्रसंगांत संगीत असल्याने ते कुठेही हावी होत नाही. मी आधी नमूद केल्याप्रमाणे काही प्रसंगांत तानपुऱ्यांचा जो वापर झाला, त्याबाबतही लोकांनी विशेष उल्लेख केले आहेत. ज्या प्रसंगात शरद मैफिलीतून उठून जातो, तो प्रसंगही अनेकांना भावला. त्यात संगीत आहे, पण शांतताही आहे. दोन्हीही प्रेक्षकांपर्यंत पोहोचले.

  • आणि या क्षेत्रातील कलाकारांच्या कशा प्रतिक्रिया होत्या ?

मला आश्चर्य याचे वाटले, की चित्रपटाचे जे संगीताच्या दृष्टिकोनातून परीक्षण अपेक्षित होते, ते त्यांनी फारसे केलेले नाही. काहींना या चित्रपटाचा शेवट ‘नकारात्मक’ आहे असेही वाटले. परंतु माझ्या मते चित्रपटात सद्यस्थिती दाखवलेली आहे. हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातील कलाकारांपुढे असणारी आव्हाने समोर आली आहेत. त्यावर चर्चा व्हायला हवी. काही लोकांनी ‘असा चित्रपट पाहून हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताकडे वळायला लोक घाबरतील’ अशीही प्रतिक्रिया दिली, जी मला फारशी पटत नाही. कारण ही कला या चित्रपटाइतकीच सीमित नाही आणि कोणत्याही चित्रपटामुळे ‘नकारात्मक’ परिणाम होईल इतके तकलादू हे क्षेत्र नाही. खरे चित्र दाखवले गेले, तरच पुढच्या सुधारणांसाठी अवकाश निर्माण होऊ शकतो. शास्त्रीय संगीतातील कलाकारांनी या परंपरेला समग्रपणे पाहायचा प्रयत्न करायला हवा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: