श्रमिकांचे आद्य नेते – नारायण मेघाजी लोखंडे

श्रमिकांचे आद्य नेते – नारायण मेघाजी लोखंडे

"कामगारांना खूप वेळ काम करावे लागते. त्यांना आवश्यक ती विश्रांती मिळत नाही.सुटीचा दिवस असला तरीही त्यांना अर्धा दिवस गिरणीत येऊन मशिनरी साफ सफाई करावी

धार्मिक संस्थाने नवे उद्यम भांडवलदार?
राम मंदिर भागात नेते, अधिकाऱ्यांकडून लाखोंची जमीन खरेदी
यावत्चंद्रदिवाकरौ
“कामगारांना खूप वेळ काम करावे लागते. त्यांना आवश्यक ती विश्रांती मिळत नाही.सुटीचा दिवस असला तरीही त्यांना अर्धा दिवस गिरणीत येऊन मशिनरी साफ सफाई करावी लागते. त्या अर्ध्या दिवसाच्या कामाचा त्यांना कुठलाही मोबदला न देता त्यांना राबविले जाते. कोणत्याही चुकीसाठी नोकरीतून काढून टाकते, किंवा पगार गोठविणे, त्याप्रमाणे ठरवून दिलेले काम न झाल्यास दंड करणे अशा प्रकारच्या जाचक शिक्षा करून कामगारांना कायम भितीच्या छायेत वावरावे लागत असे. पगाराचे वाटप दोन दोन महिन्यांनी होते किंवा त्यापेक्षाही उशिरा केले जाते. गिरणीच्या मॅनेजर अथवा एजंटला एखादा कामगार नको असेल तर त्याला त्वरीत काढण्यात येते. याविरुद्ध जाब विचारता येईल अशी यंत्रणा गिरण्यांमध्ये नाही आणि कोर्टबाजी करणे कामगारांना परवडत नाही.”
     सुमारे १३० वर्षांपूर्वी मुंबईतील गिरण्यातील कामगारांना कशा प्रकारे अमानुष शोषणाला बळी पडावे लागत असे याची माहिती भारतातील कामगार चळवळीचे नेते असलेले नारायण मेघाजी लोखंडे यांनी, तत्कालीन ब्रिटिश सरकारने १८८१ च्या जुन्या ‘फॅक्टरी अँक्ट’मध्ये जी सुधारणा करण्यासाठी जी कमिटी नेमली होती,त्या कमिटी समोर साक्ष देताना वरील माहिती नोंदविली होती.
            नारायण मेघाजी लोखंडे यांचा १३ ऑगस्ट १८४८ ला मुंबई जवळील ठाणे येथे जन्म झाला होता. त्यांचे शिक्षण ठाण्यातील स्कॉटिश मिशनरी शाळेत झाले होते. ते जूनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले होते. सुरवातीला त्यांनी रेल्वे, पोस्ट खात्यात नोकरी केली व नंतर ते मांडवी मिलमध्ये स्टोअरकिपर म्हणून काम करु लागले. त्याच काळात त्यांना गिरणीतील कामगारांचे होणारे शोषण जवळून पाहता आले. त्याच दरम्यान त्यांचा मुंबईतील काही सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत महात्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीशी संबंध आला. नंतर मुंबईत सत्यशोधक समाजाची स्थापना करण्यासाठी त्यांनी १ डिसेंबर १८७३ ला ताडदेव येथे महात्मा फुले यांचे जाहीर व्याख्यान ठेवले होते. त्यानंतर जानेवारी १८७४ मध्ये म.फुले यांच्या मुंबईतील परळ,वरळी,माझगाव,मांडवी, भायखळा,लालबाग, चिंचपोकळी,शिवडी, नायगाव, कुर्ला या कामगार वस्त्यांमधे अनेक सभा लावल्या व कामगारांमध्ये सत्यशोधक समाजाचा विचार पसरविण्याचे प्रयत्न केले. डिसेंबर ते जानेवारी दोन महिने महात्मा फुले मुंबईत मुक्कामी होते. त्याच काळात मुंबईतील गिरण्यांत कामगारांचे,स्त्रियांचे कसे अमानुष शोषण होत आहे, ते नारायण लोखंडे यांनी फुल्यांना समजावून सांगितले. त्यानंतर फुल्यांनीच लोखंडेंना मुंबईतील गिरणी कामगारांमध्ये काम करण्याचा सल्ला दिला. नंतर लोखंडे कामगार, कष्टकऱ्यांच्या समस्या, प्रश्र्न समजावून घेऊ लागले,व कामगारांना संघटित करण्याचाही प्रयत्न सुरू केला.आणि त्यासाठीच त्यांनी २३ सप्टेंबर १८८४ ला ‘बॉम्बे मिल हॅण्डस असोसिएशन’ या भारतातील पहिल्या गिरणी कामगार युनियनची स्थापना मुंबईत सुपारीबाग परळ येथे जाहीर मेळावा घेऊन केली.
    या युनियनच्या वतीने त्यांनी कामगारांची मजूरी वाढविणे,कामाचे तास कमी करणे,कायम कामाची हमी, जेवणाची सुट्टी,स्त्री कामगारांना संध्याकाळी सहा नंतर काम करण्यास मनाई, १६ वर्षांखालील मुलांना कामावर ठेवू नये, मुलांच्या शिक्षणाची सोय करावी. कामगारांना भरपगारी हक्काची रजा मिळावी, कामावर काही कारणास्तव गैरहजर राहिल्यास डबल खाडा कापू नये, पगार वेळेवर मिळावा, कामगारांना तडकाफडकी कामावरून काढता कामा नये. रविवारी कामगारांना हक्काची रजा मिळावी. सुधारीत फॅक्टरी ॲक्टची कडक अंमलबजावणी करण्यात यावी,आदी.तत्कालिन कामगारांच्या महत्त्वाच्या मागण्यांचा पाठपुरावा नारायण मेघाजी लोखंडे यांनी आपल्या असोसिएशनतर्फे केला. याच काळात म्हणजे ११ मे १८८८ रोजी जोतीराव फुले जे समाज परिवर्तन व लोक जागृतीचे महान कार्य करीत होते, त्या कार्याचा गौरव व त्याची कृतज्ञतापूर्वक नोंद व्हावी म्हणून, नारायण लोखंडे यांनी मुंबईतील कष्टकरीवर्गातर्फे मुंबईत खास मेळावा घेऊन जोतीराव फुले यांना ‘महात्मा’ ही सुप्रसिद्ध उपाधी बहाल केली व त्यांचा जाहीर सत्कार घडवून आणला!
एकीकडे नारायण मेघाजी लोखंडे हे फॅक्टरी ॲक्टच्या अंमलबजावणीची, कामगार हीताची मागणी करीत असताना, त्याला बाळ गंगाधर टिळक मात्र आपल्या केसरी पत्रातून १२जानेवारी १८९२ ला विरोध करीत होते. त्यांनी त्यामध्ये लिहिले, “गिरणीतील मजुरांनी अमूक तास काम करावे वगैरे ठरविण्यासाठी जो कायदा गेल्या साली झाला आहे, तोही याच प्रकारचा आहे. या कायद्याचे तत्त्व संमती कायद्याप्रमाणे अगदी थेट विलायतेहून आले आहे. परंतु ते कोठूनही आले असले तरी त्यापासून आमचे झालेले व होणारे नुकसान कमी होत नाही.’, थोडक्यात  भगवद्गीते मधील श्लोकानुसार , कामगारांनी “कर्म करीत रहावे फळाची अपेक्षा धरु नये ” अशी कामगारांना शिकवण देत टिळक गिरणी मालकांचे भलं करीत होते. त्या उलट नारायण लोखंडे मात्र कामगारांना हक्कांसाठी लढायला शिकवत होते. कामगारांना आता मिळत असलेली रविवारची सुट्टी लोखंडे यांनी १०जून १८९० पासून लढून मिळवून दिली आहे. केवळ कामगार हितासाठीच लोखंडे झटले नाही तर त्यांनी ब्राह्मण विधवा स्त्रियांच्या जुन्या रुढीं प्रमाणे होणाऱ्या केशवपनालाही जाहीर विरोध केला, एवढेच नव्हे तर त्यासाठी त्यांनी न्हाव्यांचेही प्रबोधन करून केशवपन करू नये म्हणून न्हाव्यांचा संप घडवून आणला. लोखंडे यांनी गणेशोत्सवाच्या नावाखाली जी अंधश्रद्धा पसरवली जाते आणि कामगारांच्या पैशाची जी उधळपट्टी होते त्याविरोधातही आवाज उठवला व लोकजागृती करण्याचा प्रयत्न केला. कामगार हितासाठी, त्यांच्या दु:ख,शोषणाला वाचा फोडण्यासाठी व लोक प्रबोधन करण्यासाठी त्यांनी ९ मे १८८० ला स्वतः च्या संपादकत्वाखाली ‘दीनबंधू’ हे पत्र सुरु केले. तसेच ‘सत्यशोधक निबंधमाला’, ‘हिंदू धर्माचे खरे ज्ञान’ आदी पुस्तिकांचेही लेखन केले होते.
मुंबईत १८९३ साली कामगारांमध्ये फूट पाडण्यासाठी  हिंदू-मुस्लिम समुदायात मालकांनी व धर्मांधांनी जी पहीली मोठी दंगल घडवली होती त्यालाही नारायण लोखंडे यांनी जाहीर विरोध केला व दोन्ही समाजांमध्ये सामंजस्य निर्माण करण्यासाठी मुंबईत कामगार वस्त्यांत सभा, बैठका घेतल्या, हिंदू मुस्लिम मोहल्ला समित्या स्थापन केल्या. एवढेच नव्हे तर लोखंडे यांनी १ऑक्टोबर १८९३ रोजी गिरणी कामगारांच्या पुढाकाराने हिंदू मुस्लिम समुदायाचा दिवसभराचा ‘एकोपा मेळावा’ भायखळा, राणी बागेत भरविला व सांस्कृतिक कार्यक्रम करून एकजुटीचे दर्शन घडविले, ज्यात साठ हजार लोक उपस्थित होते. मात्र त्याच वेळी टिळकांनी लोखंडेंच्या हिंदू मुस्लिम ऐक्याच्या भुमिकेला विरोध केला आणि दंगलीला मुसलमानच जबाबदार आहे, असे केसरीत लिहून आगीत तेल ओतले व पुण्याला शनिवारवाडा येथे १० सप्टेंबर १८९३ ला फक्त हिंदूचीच सभा या ‘राष्ट्रीय’ नेत्याने घेतली. तेव्हा त्यांना फक्त हिंदूची सभा घेऊ नये असा सल्ला न्या.रानडे, गोपाळ कृष्ण गोखले, फिरोजशहा मेहता, वाच्छा यांनी दिला आणि पुणे, मुंबईतील २९  प्रतिष्ठित नागरिकांनी सह्या करुन फक्त हिंदूची सभा घेऊ नये असे विरोध करणारे पत्रही टिळकांना दिले, पण सनातनी टिळकांनी या मान्यवर नेत्यांचा सल्ला धुडकावून हिंदूचीच सभा घेतली व धार्मिक चिथावणी देऊन धार्मिक तणाव वाढविण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे नारायण लोखंडे मात्र जाती-धर्मापलिकडे जाऊन कामगार, कष्टकऱ्यांचे खरे ऐक्य स्थापन करीत होते व राष्ट्रीय(?)म्हणविणारे मात्र खोट्या धार्मिक अहंकारातून फूट पाडीत होते. नारायण मेघाजी लोखंडे यांनी केवळ कामगारांनाच नव्हे तर रत्नागिरी, कुलाबा, ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व खोतांकडे राबणाऱ्या कुळांनाही संघटित करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी खोती व सावकारशाही विरोधात, जातीव्यवस्थेविरोधातही आवाज उठविला होता. त्यांनी ९ डिसेंबर १८९४ ला बदलापुरात ‘शेतकरी हितचिंतक मंडळींची सभा’ या नावाने शेतकरी परिषदही घेतली होती. या परिषदेपुर्वी कर्जत, खोपोली, वांगणी,नेरळ परिसरात सत्यशोधक समाजाची स्थापनाही केली होती. महात्मा फुले हयात असताना त्यांच्या सभा, बैठकाही त्या परिसरात झालेल्या होत्या.अशा या आर्थिक, सामाजिक, समतावादी, खऱ्या कामगार,कष्टकरी, शेतकऱ्यांच्या नेत्याचे  प्लेगच्या साथीमध्ये सेवा करीत असताना ९ फेब्रुवारी १८९७ ला वयाच्या अवघ्या अठ्ठेचाळीसाव्या वर्षी अकाली दु:खद निधन झाले. या सच्च्या कष्टकरीवर्गाच्या नेत्याची वा त्यांच्या कार्याची ओळख कॉ. कार्ल मार्क्स वा कॉ. लेनिनला झाली नाही, ही  खरी शोकांतिका. ती ओळख झालीअसती,तर भारतातील कष्टकरीवर्गाच्या चळवळीचा इतिहासच बदलला असता. किमान आता उशिरा तरी कामगार संघटनांनी आपल्या कष्टकर्यांचे हीत सांभाळणारा, सर्व जाती धर्माच्या कष्टकऱ्यांच्या एकजुटीचे व सामाजिक आर्थिक समतेचे स्वप्न पहाणारा खरा नेता ओळखावा व त्याचेच स्मरण करावे. हीच सत्यशोधक नारायण मेघाजी लोखंडे यांना खरी आदरांजली ठरेल.!

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0