‘द ग्रेट सायलन्स’: सत्तेच्या निर्घृण दमनतंत्राची कहाणी

‘द ग्रेट सायलन्स’: सत्तेच्या निर्घृण दमनतंत्राची कहाणी

एकदा का समुहाचं खलनायकीकरण झालं की त्याला कसंही दडपणं सोपं जातं. त्यांच्यावर झालेली हिंसा अन्याय ठरत नाही तर तिला सत्तेच्या पाठिंब्याने नैतिकता प्राप्त होते. मग सत्ताधारी वर्ग जो करील तोच त्यांच्यासाठी न्याय. 'द ग्रेट सायलन्स' मधील लुटारूंचं चित्रण अशाप्रकारे पारधी ते मुस्लिम, दलित, आदिवासींच्या स्थितिबद्दल विचार करायला भाग पाडतं.

जीडीपी ८ नव्हे तर ७.५ टक्के राहीलः जागतिक बँकेचा अंदाज
पिगॅससः सरकारला नोटीस देण्याचा निर्णय १६ ऑगस्टला ठरणार
पिगॅससचा फास

“मला माहितेय तुम्ही मला मारण्यासाठी आला आहात. खुशाल मारा. तुम्ही फक्त माणूस मारू शकता (विचार नाही.!)”,

क्युबाच्या क्रांतीचा अग्रणी नेता अर्नेस्टो चे गव्हेरा याचे हे शेवटचे शब्द होते असं म्हणतात. १९६७ साली बोलव्हियाच्या जंगलात अमेरिकन सीआयएच्या तावडीत चे गव्हेरा सापडला. याचा परिणाम केवळ मृत्यूच असणार आहे हे त्याला ठाऊक होतं. पण, क्रांतीचा संगर एका चे च्या मरणाने थांबणार नाही हेही त्याला ठाऊक होतं. आणि झालंही तसंच. चे मारला गेला, पण त्यानंतरची दोन तीन दशके चे नावाच्या गारुडानं जगभरातील तरुणाई झपाटून गेली. विषमता, भेदाभेद, अन्यायाच्या विरोधात त्वेषानं पेटून उठली.

“जगाच्या पाठीवर कुठेही होणाऱ्या अन्यायानं तुम्ही संतापून उठत असाल, तर तुम्ही माझे कॉम्रेड आहात”, चे गव्हेराचं हे वाक्य तरुणाईसाठी मंत्र ठरलं. चे चा कॉम्रेड होण्यासाठी तरुण आतूर झाले होते. आज दशकं उलटून गेली पण चे गव्हेराची जादू ओसरली नाही. अन्यायाविरुद्धच्या बंडाचं प्रतिक होऊन तो जिवंत आहे. चे चा शेवट रुढार्थाने शोकांतिका आहे. पण, ती शोकांतिका नव्हती, हे त्याच्या शेवटच्या शब्दातून त्यानं सांगितलं आणि मागच्या अनेक वर्षात ते सिद्धही झालं. माणसातल्या विद्रोहाची ती कथा आहे.

चे च्या मृत्यूनंतर एक वर्षांनी म्हणजे १९६८मध्ये अशीच एक विद्रोहाची कथा रुपेरी पडद्यावर साकारली गेली जी चे गव्हेराच्या कार्यावर प्रेरित होती. तत्कालीन राजकारणाची त्याला पार्श्वभूमी तर होतीच पण माणसाची स्वार्थी प्रवृत्ती त्याला कितपत अमानवी बनवू शकते याचं क्रूर चित्रण त्या सिनेमात होतं. तत्कालीन जगतातील घडामोडींचा बुद्धीला भिडणारा पट इस्टमन कलरच्या पडद्यावर बघणं प्रेक्षकांसाठी आणि वितरकांसाठीही सोपं नव्हतं.त्यामुळेच ५० वर्ष हा चित्रपट अमेरिकेत प्रसिद्ध होऊ शकला नाही. २०११ नंतर जागतिकीकरणाच्या लाटेला संकुचित राष्ट्रवादी धोरणांनी शह देण्यास सुरुवात केल्यानंतर Democracy is a joke अशी परिस्थिती निर्माण झाली. अशावेळी १९६८च्या या चित्रपटाचं नाव न निघतं तर नवलच.

६०च्या दशकातील हे राजकीय आणि सामाजिक नाट्य आजदेखील तितकंच प्रासंगिक आहे. कारण भांडवली वर्चस्ववाद आणि जनतेतून निपजणारा विद्रोह अजूनही शिळा झालेला नाही. त्यामुळेच या चित्रपटाची चर्चा करणं महत्वाचं ठरतं. २०१८ मध्ये ‘फिल्म मूव्हव्हमेंट अमेरिका’ या संस्थेनं हा चित्रपट अमेरिकेत अधिकृतरित्या रिलीज केला आणि सिनेरसिकांच्या चर्चेचा विषय बनला. हा चित्रपट म्हणजे स्पघेटी वेस्टर्न पठडीतला सर्जिओ कार्बुची दिग्दर्शित ‘द ग्रेट सायलन्स.’

अमेरिकेच्या उटाह प्रांतातील स्नो हिल परिसरात चित्रपटाची कथा घडते. बर्फाचं वादळ आल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. लोकांचे रोजगार गेले आहेत. ज्यांच्याकडे जगण्याची साधनं नाहीत त्यांना जगण्यासाठी चोऱ्यामाऱ्या कराव्या लागल्यानं सरकारनं त्यांना आउट लॉ (लुटारू) ठरवून जिवंत वा मृत पकडून देण्यासाठी इनाम ठेवलं आहे. त्यामुळे हे व्यवस्थेचे बळी हद्दपार जीवन जगत आहेत. जिथं जगण्याचा संघर्ष अजूनच जीवघेणा आहे.
यांचा बंदोबस्त करण्यासाठी सरकार ‘बाऊंटी किलर्स’ची नेमणूक करतं. लुटारुंना मारण्यासाठी बक्षिसाची रक्कम ठेवली जाते. बाऊंटी किलर्स हे शासनमान्य हत्यारे आहेत. खुद्द सरकारनेच सरकारी सुरक्षा व्यवस्थेच्या समांतर ही व्यवस्था सुरू केली आहे. त्यामुळे बाऊंटी किलर्सना खुली सूट आहे. त्यांच्यावर कसलंही नियंत्रण नाही. बक्षिसाच्या रक्कमेसाठी लुटारूंच्या सरळसोट हत्या करण्यावर त्यांचा भर आहे. दुसऱ्या बाजूला ज्यांना लुटारू ठरवून बहिष्कृत केलं आहे, त्यातील सर्वजण गुन्हेगार आहेतच असं नाही. पण, संपूर्ण एका जमातीवर गुन्हेगारीचा शिक्का बसला की निर्दोषत्व सिद्ध करणं कठीण होऊन बसतं. तसं काहीसं या लुटारूंचं झालेलं आहे. उटाह शहरातील गुन्हेगारीचा शिक्का बसलेली ही जमात अशीच शासन पुरस्कृत हत्याऱ्यांपासून जीव वाचवत पळत आहे. बर्फाच्या वादळाचा कहर सुरू आहे. वातावरणात प्रचंड गारठा आणि पोटात भुकेचा आगडोंब उसळलेला. या कात्रीत सापडलेला स्त्री पुरुषांचा हा समुह जीव मुठीत धरून जगत आहे.

याच शहरात आणखी एक जण आहे. सायलेन्स (जीन लुईस ट्रिन्टीग्नंट) नावाने सगळे त्याला ओळखतात. कारण तो जिथं जातो तिथं सायलेन्स होतो अशी आख्यायिका आहे. जगण्यासाठी पैसे घेऊन दुसऱ्यांच्या हत्या करणं हा सायलेन्सचा व्यवसाय आहे. तो सुद्धा बाऊंटी किलर्स एवढेच पैसे घेतो, पण न्यायाच्या बाजूनं लढण्यासाठी. बाऊंटी किलर्स आणि त्याच्यात हा एक फरक आहे. तो केवळ पैशांचा लोभी नाही. हत्या करण्याच्या त्याच्या अनैतिक कृत्यालाही नैतिकेतेचं अधिष्ठान आहे. ज्याच्यावर अन्याय झालाय, त्याचा प्रतिशोध घेण्यासाठी तो काम करतो. दारिद्र्याने लुटारू व्हायला भाग पडलेल्या समुहाबद्दल त्याला सहानुभूती आहे. बाऊंटी किलर लोको (क्लॉज किन्स्की) आणि सायलन्स ही दोन विचारधारांची प्रतीकं आहेत. ‘द ग्रेट सायलन्स’ हा दोन विचारधारांतील संघर्ष दाखवतो. संघर्ष म्हटला की हार-जीत आलीच. पण, त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे संघर्षाच्या घुसळणीतून बाहेर पडणारी मूल्ये! या चित्रपटातून अशीच मूल्ये प्रेक्षकांच्या समोर येतात. विचार करायला भाग पाडतात.

एखाद्या समूहाला गुन्हेगार घोषित करणं आणि त्यांचं खलनायकी चित्र रंगवणं हे भारतीयांना तरी नवीन नाही. अगदी आर्य-अनार्य संघर्ष आपल्याकडे देव-दानव असा चितारला गेला. अगदी अलिकडच्या काळापर्यंत पारधी समुहासारख्या अनेक जमाती गुन्हेगार म्हणून जगत होत्या. नंतर सरकारनं त्यांच्यावरचा गुन्हेगारीचा शिक्का अधिकृतपणे काढला तरी, समाजाच्या मनात ते गुन्हेगारच राहिले.

पारधी जमातीविषयी अनेक रंजक कथा आपण ऐकल्यात. त्या इतक्या चमत्कारिक होत्या की विश्वास बसत नसायचा. पण सांगणारा पूर्ण सत्य माहीत असल्यासारखं सांगायचा. यावरून एक समजलं की एखाद्या जमातीविषयी समाजात पसरलेला अपसमज मुरत जातो. शंका, अविश्वासाची मुळं घट्ट पकड घेतात. कारण हा समज एखादी अफवा नसते. अफवा कदाचित विरुन जाऊ शकते. पण, सत्तेने हेतुपुरस्सर पसरवलेल्या गोष्टी सहजासहजी पुसल्या जात नाहीत.
एखाद्या विशिष्ट समुहाचे गुन्हेगारीकरण करण्याची प्रथा अजूनही थांबली नाही. हे काही महिन्यांपूर्वीच्या तबलिगी जमातीच्या बदनामीवरून लक्षात येतं. मागच्या काही वर्षांत सत्तेकडून हे काम वेगानं केलं जात आहे. ‘हे लोक असेच असतात’, ‘यांचे रक्तच असे आहे’, ‘हे कधीच सुधारणार नाहीत’; ही आणि अशाप्रकारची वाक्ये सतत मेंदूवर आदळली जातात. त्यामुळे मुस्लिम देशद्रोहीच असतात यावर विश्वास बसतो. दलित नक्षलवादी असतात हे खरं वाटायला लागतं. मग त्यांच्या हत्येमुळे मन व्यथित होत नाही. मुस्लिम मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा सत्ताधारी मंत्र्याकडून सत्कार होतो. (तेव्हा या कृत्याला समाजमान्यता मिळते.) गोमांस खाल्याच्या संशयावरून माणसं मारली जातात. तरीही समाजातील बहुसंख्य समूह गप्प राहतो. याचा अर्थ हाच असतो की मुस्लिमांना गुन्हेगार ठरवण्यात सत्ता यशस्वी ठरली आहे. एकदा का समुहाचं खलनायकीकरण झालं की त्याला कसंही दडपणं सोपं जातं. त्यांच्यावर झालेली हिंसा अन्याय ठरत नाही तर तिला सत्तेच्या पाठिंब्याने नैतिकता प्राप्त होते. मग असे समूह न्याय मागू शकत नाहीत. सत्ताधारी वर्ग जो करील तोच त्यांच्यासाठी न्याय. ‘द ग्रेट सायलन्स’ मधील लुटारूंचं चित्रण अशाप्रकारे पारधी ते मुस्लिम, दलित, आदिवासींच्या स्थितिबद्दल विचार करायला भाग पाडतं.

अशा वर्गाविषयी सत्ता काय विचार करते हे लोकोच्या शब्दातून स्पष्ट समजतं. लोको शेरिफला म्हणतो, “हे लोक देव, मनुष्य, नैतिकता आणि सार्वजनिक हिताच्या विरोधात आहेत. त्यांना मारणेच योग्य आहे. माझ्यावर विश्वास ठेवा.” दुराभिमान, गरिब लोकांविषयी घृणा बाळगणारा लोको फक्त युरोपियन आणि अमेरिकन समाजातच आहे असं नाही. यातल्या बाऊंटी किलर्सना पाहिल्यावर आपले गोरक्षक आठवले नाही तरच नवल. दोन्हीत तिळमात्र फरक नाही. मागच्या काही वर्षात फक्त संशयावरून गोरक्षकांनी किती खून पाडलेत. पण, ना दाद, ना फिर्याद! ज्या गोष्टीला प्रत्यक्ष सत्तेचं अभय असेल, सत्तेची मान्यता असेल, तिला कोण आव्हान देणार!

सत्ता दुर्बल घटकांचा हवा तसा वापर करते आणि हवं तेव्हा नष्ट करते. सत्ताधारी वर्गाची कृपा होण्याची वाट बघत हे समूह जगत असतात. कृपा तर होत नाहीच. पण, मरणाच्या छायेतलं जगणं देखील असह्य वेदना देत राहतं. कधी विद्रोहाची ठिणगी आत पेटलीच तरी बऱ्याचदा बर्फाच्या थंडगार डोंगराखाली ती निर्दयपणे विझवली जाते. जेव्हा या लुटारूंच्या टोळीतील तीन माणसं म्होरक्याला म्हणतात की, “आम्ही शरण जातो. किमान तुरुंगात ऊब तरी मिळेल”. तेव्हा म्होरक्याला त्यांची कीव येते. कारण त्याला खात्री असते की हे तिघे तुरुंगापर्यंत कधीच पोहचणार नाही, त्याआधीच सरकारी शिकाऱ्यांकडून त्यांची शिकार केली जाईल आणि होतही तसंच. या तीन लुटारुंपैकीच एक असतो पॉलिनचा पती, ज्याच्या मृत्यूचा शोध घेण्यासाठी पॉलिन सायलन्सला नेमते.

कार्ल मार्क्स म्हणतो, ज्या वर्गाच्या हातात भौतिक उत्पादनाची साधने असतात, तोच वर्ग राजकीय, सांस्कृतिक आणि बौद्धिक सत्ता सुद्धा हस्तगत करतो. ‘द ग्रेट सायलन्स’मधील पॉलिकट (लुईगी पिस्तीली) हा याच वर्गाचा प्रतिनिधी आहे. व्यापारी असणारा पॉलिकट शहराच्या राजकारणातील वजनदार व्यक्ती आहे. एवढच नव्हे तर ‘जस्टीस अॉफ पीस’ देखील आहे. ज्याच्या हाती भांडवल त्याच्याच हाती न्याय! पॉलिन (वेंदेता मॅक्गी) या तरुण स्त्रीचा पॉलिकटला मोह होतो. तिला अंकित करण्यासाठी तो नानाविध खटपटी करतो. तिच्या नवऱ्याचा रोजगार बंद पाडतो. त्यामुळे तो चोरी करण्यास विवश होतो. गुन्हेगार म्हणून शेवटी लोकोकडून त्याची हत्या घडवतो. एवढं करूनही पॉलिन त्याला शरण जात नाही तर सूडाच्या अग्निनं पेटून उठते. (तिच्या या बंडातून माणसाची स्वातंत्र्याची उपजत आस दिसते.)

पॉलिकटसारखे जस्टीस अॉफ पीस आपल्या समाजातही दिसतील. अगदी खेड्यापाड्यात गावातील सत्ताधारीच तंटामुक्ती अभियानाचा अध्यक्ष असल्याची उदाहरणे आहेतच की. ही गोष्ट म्हणजे शेळ्यांच्या कळपाला लांडगा राखण! यावर्षी खैरलांजी हत्याकांडाला १४ वर्षे पूर्ण झाली. ज्या गावात एका घरातील महिलांचे बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली, त्याच गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार मिळाला. पॉलिकट तरी दुसरे काय करतो. तो भांडवलशाहीचा लाभधारक आहे. आपत्ती सुद्धा त्याच्यासाठी संधी आहे. मात्र दरिद्री लोकांसाठी आपत्ती जगण्याचा संघर्ष आणखीन तीव्र करते. लुटारू प्रवाश्यांना पकडून त्यांचे घोडे अन्न म्हणून खाण्यासाठी लुटतात. यावरून आपत्ती प्रत्येकासाठी सारखं रूप घेऊन येत नाही हे लक्षात येतं. ( हजारो किलोमीटर पायी चालून जाणारे मजुरांचे लोंढे आपण पाहिले आहेतच, पण अनुभवले किती हा प्रश्न आहेच.)

स्पर्धा हे भांडवलशाहीचं वैशिष्ट्य आहे. सरंजामदारी व्यवस्थेतून माणसाला मुक्त करण्यासाठी व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणं गरजेचं होतं. पण भांडवलशाहीनं व्यक्तीस्वातंत्र्याचा अर्थ पराकोटीचा अप्पलपोटेपणा, स्वार्थ असा घेतला. बळी तो कानपिळी हा भांडवलशाहीचा नियम. याला स्पर्धेचं नाव देत दुबळ्यांना नेहमीच दडपण्याचं काम भांडवलशाही करत आली आहे. बाऊंटी किलर लोको या भांडवली समाजाचा प्रतिनिधी आहे. उघडा नागडा स्वार्थी व्हायला तो अजिबात कचरत नाही. तो शासनाच्या अपराध्याला छळ करून मारतो. एका तरुणाला अतिशय निर्दयपणे त्याच्या आईसमोर गोळ्या घालतो. “ही आमची रोजी रोटी आहे, प्लीज समजून घ्या.” अशी निर्लज्ज कबुली त्या म्हाताऱ्या महिलेला देतो. रोजगार नसल्याने चोऱ्यामाऱ्या करायला भाग पडलेले लोक आणि अमाप पैसा कमावण्यासाठी थंड डोक्यानं खून करणारा लोको ही भांडवलशाहीची दोन अपरिहार्य रुपं आहेत. ‘लोकतंत्र लाना नहीं है पर दिखाना पडता हैं।’ ही भांडवलशाहीतील लोकशाहीची अवस्था दाखवताना कार्बुची कुठलीच दया दाखवत नाहीत. ‘जिथं माणसाच्या जीवाची किंमत शून्य असते, तिथं त्यांच्या मरण्यानं काही लोकांना फायदा होतो’, या स्पघेटी वेस्टर्न विचारधारेचं निष्ठुर रक्तरंजित तांडव कार्बुचीने पडद्यावर चितारतांना मध्यमवर्गीय पांढरपेशा प्रेक्षकांचं मन लक्षात घेतलेलं नाही. उलट त्यांच्या व्हाईट कॉलरमुळे होत असलेली अन्यायाची घाण उघड्या डोळ्यांनी त्यांना पहायला मजबूर केलं. साहजिकच कार्बुचीची ही मनीषा अमेरिकेतील सवंग डिस्ट्रिब्युटर्सना माहीत असणार. त्यामुळेच कुणीही हा चित्रपट अमेरिकेत रिलीज करण्यास तयार नव्हतं. कारण अमेरिकेला जर भांडवलशाहीचा उत्तम नमुना मानलं तर ‘द ग्रेट सायलेन्स’ हा चित्रपट म्हणजे अमेरिकेला तिचा अमानवी चेहरा दाखवणारा आरसा होता. आणि आपलं विद्रुप रुप पाहायला कुणाला आवडेल!

महान फ्रेंच फिलॉसॉफर रुसो म्हणतो, “माणूस जन्मतः स्वतंत्र असतो आणि त्याला बंदिस्त करण्याचे प्रयत्न सतत सुरू असतात, पण सत्तेला आव्हान देण्याची प्रक्रिया सुरूच राहते. कारण मनुष्य जन्मतः च स्वतंत्र असतो.” सायलेन्स हे पात्र देखील अन्यायी व्यवस्थेला आव्हान देतं.
विपरीत परिस्थितीत नीतीमूल्यांचे पालन करणं कठीण गोष्ट असते. पण तरीही जे लोक नितीने जगू पाहतात त्यांच्या खांद्यावर माणुसकी तगून आहे. सायलन्सची नितीची कल्पना आणि नैतिकता बाळगण्याचा आग्रह हेच या व्यवस्थेला दिलेलं आव्हान आहे. ज्याचा खून करायचा त्याने पहिली गोळी झाडण्याची वाट बघणारा आणि स्वसंरक्षणार्थ गोळी चालवणारा सायलन्स कुठल्या परिमाणात बसेल? सायलन्सची रोजी रोटी सुद्धा हत्येवर अवलंबून आहे. पण, तरीही एका म्हाताऱ्या महिलेला तिच्या मुलाचा बदला तो विनामूल्य मिळवून देतो. पॉलिनमध्ये गुंततो. कारण सायलन्स मशीन नाही. तो माणूस आहे. त्याला सर्व प्रकारच्या भावना आहेत. त्याचं माणूस असणच जगणं यांत्रिक करणाऱ्या व्यवस्थेला उत्तर आहे.

“जे आपल्या अधिकारासाठी झगडतात तू त्यांना मदत करतोस. तू अन्यायाचा प्रतिशोध घेतोस आणि निष्पापांचं रक्षण करतोस ” म्हाताऱ्या बाईचे हे शब्द सायलन्सची ओळख आहेत. सायलेन्स हे नाव सुद्धा फार सूचक आहे. प्रचार करून लोकशाही भक्कम असल्याचा आभास निर्माण करणाऱ्यांपेक्षा न बोलता तिच्या रक्षणार्थ मरण पत्करणारे अनेक लोक आजही आपल्या समाजात पहायला मिळतात. म्हणूनच जस्टीस ऑफ पीसपेक्षा सेमी आटोमॅटिक पिस्तुल चालवणाऱ्या मूक सायलेन्सवर लोकांचा विश्वास वाढत जातो. पण, लोकांच्या विश्वासाबरोबर येणाऱ्या जबाबदारीची त्याला जाणीव आहे. त्यासाठी पडेल ती किंमत देण्याची त्याची तयारी आहे. वेळ येते तेव्हा तो ही जबाबदारी निभावतो.

तडजोडीसाठी आलेल्या लुटारूना वेठीस धरून लोको सायलेन्सला शरण येण्यास भाग पाडतो आणि त्याला दिसता क्षणी गोळ्या घालून ठार मारतो. मग वेठीस धरलेल्या लोकांचं काय होतं?? ही सत्ता आहे! आणि कोर्बुचीने स्वप्नाळू आशावाद दाखवण्यापेक्षा वास्तव दाखवण्याचं ठरवलं होतं. त्यामुळेच ज्याप्रमाणे सत्ता तिच्या पापाचे पुरावे मागे सोडत नाही त्याचप्रमाणे लोको वेठीस धरलेल्यांना जिवंत सोडत नाही. प्रत्येकाची निर्घृण हत्त्या करतो. (According to law!) आणि चित्रपट संपतो. बस्स!

जॉर्ज ऑरवेलची ‘ऍनिमल फार्म’ आणि ‘1984’ सतत नवीन वाटते कारण जगात कुठं ना कुठं या कादंबरीप्रमाणे घटनाक्रम घडत असतात. या कादंबऱ्या ‘टाईमलेस पोलिटिकल स्टेटमेंट’ आहेत. त्याचप्रमाणे ‘द ग्रेट सायलेन्स’ हा चित्रपट सुद्धा टाईमलेस आहे. पण हा चित्रपट पोलिटिकल स्टेटमेंट नसून पूर्णतः पोलिटिकल आहे. कारण कोर्बुची साठी ‘everything is political’. त्यामुळेच स्पघेटी वेस्टर्न प्रकार निर्माण करून,त्याला वाढवून नंतर त्यालाच उध्वस्त करून एक नवा प्रकार कोर्बुचीने उदयास आणला ज्याचं नाव आहे ‘द ग्रेट सायलेन्स’. प्रत्येक प्रसंग, प्रत्येक डायलॉग पोलिटिकल ! या चित्रपटातील हवासुद्धा पोलिटिकल आहे! आणि एन्जो मोरोकोनीचं संगीत या चित्रपटाचा पोलिटिकल टोन नेमकेपणाने उभं देखील करतं.

कोर्बुचीने या चित्रपटाचा शेवट शोकांतिकेत केला आहे असं वाटू शकतं, पण हा शेवट बरंच काही सांगून जातो-
शेवट तो असतो जिथे सर्व आशा मावळतात. जिथून नव्या प्रेरणा उगम पावतात तो शेवट खरा शेवट नाहीच. सायलन्स हा मसिहा नाही. लोकांना वाचवणं, त्यांचं पालन करणं त्याचं काम नाही. तो त्यांच्यातीलच एक आहे. त्यांच्यासारखा आहे. एवढच की त्याच्यात जास्त संवेदनशीलता आहे. चे गव्हेरा म्हणतो, “मी मुक्तिदाता नाही. मुक्तीदाते अस्तित्वातच नाहीत. लोक स्वतःच स्वतःला मुक्त करतात”. अगदी याच प्रमाणे सायलन्सची हार फक्त त्याची व्यक्तिगत हार नाही. तर ज्यांना मुक्त व्हायचय त्यांची शक्ती अद्याप कमी पडतेय एवढाच याचा अर्थ. हेच कदाचित कोर्बुचीला या पोलिटिकल क्लासिक मधून सांगायचं असेल.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0