निसर्गपूजक आदिवासींची अमानवीय ‘कुरमाघर’ प्रथा

निसर्गपूजक आदिवासींची अमानवीय ‘कुरमाघर’ प्रथा

निसर्गपूजक गोंड-माडिया आदिवासी समाजातील मुलींना, स्त्रियांना मासिक पाळीच्या दिवसांत गावाबाहेरच्या १० बाय ८ आकाराच्या एवढ्याशा कुरमाघरात राहण्याची सक्ती केली जाते. ही जीवघेणी प्रथा आजही २१ व्या शतकात सुरू आहे. या बुरसटलेल्या प्रथेचा घेतलेला हा संशोधनात्मक आढावा...

बस्तरमध्ये तथाकथित नक्षली ‘आत्मसमर्पण’ करतात त्यानंतर काय घडते?
पायल तडवीचा सल
बस्तरचे आदिवासी आंदोलन आणि भाजपच्या वाटेवर काँग्रेस

स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न हे गंभीर असतात. परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जाते. दलित, आदिवासी किंवा भटक्या विमुक्त समाजातील समाजातील स्त्रियांची स्थिती तर फारच गंभीर असते. मासिक पाळीच्या संदर्भात अभिनेता अक्षयकुमार यांचा मागच्या काही वर्षापूर्वी ‘पॅडमॅन’ (Padman) हा चित्रपट येऊन गेला. अरुणाचलम मुरुगानंथम यांना भारतातील Menstrual Man म्हणून ओळखले जाते. त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी योग्य सॅनिटरी पॅड तयार करायचा होता. त्यामधून भारतातील अब्जावधी स्त्रियांचा प्रश्न सुटला. तर Mary Beatrice Davidson Kenner यांनी या विषयावरील पहिले पेटंट दाखल केले. ही कल्पना तिला ती १८ वर्षांची असताना सुचली. त्यावेळी असुरक्षित आणि आरामदायी नसलेल्या कपड्यांचा वापर केला जात असे. आता बाजारात वेगवेगळ्या कंपनीचे पॅड उपलब्ध आहेत. त्यात stayfree, Whisper, sofy everteen, anytime, Femiss Eco, petals, nine heyday, Wings, Naval girl Wonderize, DewGarden Activ Oxygen Negative Ion, be secure-be unstoppable, Dew garden, Freedom, Sanfe-reusable sanitary pads यांचा समावेश होतो.

मुलींशी बोलताना श्रद्धा बडवाईक.

मुलींशी बोलताना श्रद्धा बडवाईक.

डॉ. राणी बंग यांचे ‘कानोसा’ हे पुस्तक ग्रंथालीने १९९९ मधेच प्रकाशित केले होते. गडचिरोली हा महाराष्ट्रातला सर्वात मागासलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यात त्या ‘सर्च ‘नावाची एक स्वयंसेवी संघटना चालवितात. १९८६ साली या जिल्ह्यातल्या दोन खेड्यांमध्ये स्त्रियांना कोणते व किती प्रमाणात ‘स्त्री रोग’असतात याचे एक अध्ययन त्यांनी केले. गावपातळीवर ‘स्त्री रोग’ म्हणजे गरोदरपण, बाळंतपण वगळता स्त्रियांचे इतर आजार. म्हणजे माहवारीचे आजार, पदर जाणे, वंध्यत्व, पतीपत्नीच्या लैंगिक जीवनातल्या समस्या, कॅन्सर, प्रजनन इंद्रियांचे संक्रमण आजार इत्यादी. त्यावेळच्या सर्चच्या अध्ययनातून लक्षात आले होते की, ग्रामीण स्त्रियांपैकी ९२ टक्के स्त्रियांना स्त्रीरोग होता. यातल्या जवळपास ५० टक्के स्त्रियांना जननेन्द्रियाचे जंतूदोष यांचे आजार होते. मोठ्या प्रमाणात गुप्तरोगही होते. पण इतके असून ही केवळ ८ टक्के स्त्रियांनी त्याआधी आपल्या त्रासांसाठी वैद्यकीय उपचार घेतले होते. त्यामुळे स्त्रियांच्या आरोग्याचा नियमित आढावा घेणे जरुरी आहे. या विषयावर आमचे मित्र प्रवीण निकम, तथापि संस्था, मासूम संस्था हे सातत्याने या प्रश्नावर काम करीत आहेत.

“कानोसा” या पुस्तकात मासिक पाळीच्या संदर्भात सविस्तर लिखाण केले होते. तो अभ्यास आता जुना झाला त्यामुळे नवीन संशोधन करणे गरजेचे वाटले. त्या मधून हे संशोधन करण्यात आले आहे. मासिक पाळीला विटाळ मानणाऱ्या गोंड-माडिया आदिवासी समाजातील मुलींसाठी आजही या चार दिवसांत गावाबाहेरच्या कुरमाघरात राहण्याची सक्ती केली जाते. मासिक पाळीचे भोग आमच्याच नशिबी का? हे सर्व नैसर्गिक असतांना आमच्याच वाट्याला असे बहिष्कृताचे जीवन का? मासिक पाळी येतांना माझा काहीच दोष नसतांना दर महिन्यात घराबाहेर राहण्याचीही जीवघेणी शिक्षा आम्ही का भोगावी? मासिक पाळी हा निसर्गधर्म नव्या जीवाला जन्म देण्याच्या प्रक्रियेचा महत्त्वाचा भाग मात्र, गावात आल्या नंतर हीच मासिक पाळी आम्हाला कुरमा घराच्या कुबट वातावरणात पाच-सहा दिवस राहण्यास सक्तीचे करते. तसेच यामध्ये स्तनदा माता आणि गर्भवती महिला यांची नवजात बालकाची काळजी अथवा संरक्षणाची जबाबदारी असते. मात्र नवजात बालकासोबत जेव्हा ही स्त्री कुरमा घरात जाते तेव्हा तिची परिस्थिती काय असेल हे आपण विचार करू शकत नाही.

कुरमा घराचे आकार हे १० बाय ८ एवढेसे असते. यामध्ये कोपऱ्यालगत अंगाचे गाठोडे करून बसलेल्या या आदिवासी स्त्रियांचे प्रश्न आहेत की, आणखी किती काळ कुरमा घराच्या या अमानवीय प्रथेला आम्ही बोथट मनाने सांस्कृतिक अभिनिवेशाखाली गोंजारत बसायचं? कुरमा घर प्रथेच्या बळींनी कितीची संख्या गाठल्याशिवाय प्रशासन या संवेदनशील विषयाला गांभीर्याने घेणार नाही?

कुरमा घरात जाणे म्हणजे विटाळ या एवढ्याच समजेपोटी वेळेवर वैद्यकीय मदत न मिळाल्याने अनेक स्त्रीयांना आपले प्राण गमवावे लागले. जागतिक महासत्तेचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एकविसाव्या शतकातील भारताला विटाळ या कुप्रथेमुळे स्त्रियांचे बळी देणे कसे काय परवडू शकेल? कुरमा घरात बळी जाणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढत चाललेली आहे. ‘स्पर्श’ या संस्थेने केलेल्या कुरमा घर विषयक अभ्यास अहवालात अशा १३ स्त्रियांचे आजवर बळी गेल्याची नोंद आहे. आणि काही केसेस अशाही आहेत की अशा बळी गेलेल्या स्त्रियांची अजून नोंद देखील केलेली नाही. अशा घटना गाव पातळीवरच दाबून टाकल्या जातात. कारण स्वतःच्या संस्कृतीचा समाजावर वाईट प्रभाव नको पडायला. ही संस्कृती किती चांगली आहे की, मासिक पाळी आल्यानंतर आमच्या स्त्रियांना आम्ही आरामासाठी कुरमा घरात पाठवतो कारण त्या घरी असल्यावर काही ना काही काम करतात, म्हणून आम्ही त्यांना कुरमा घरात घराच्या बाहेर ठेवतो आहे तेथील लोकांचे मत असल्याचे दिसून येते. कुरमा घरामुळे बळींची संख्या वाढत असतांना सुद्धा शासन कुरमा घराचे वास्तव समजून घ्यायला तयार नाही, अद्याप जिल्हा प्रशासनाकडे कुरमा घराची कोणतीही सांख्यकीय माहिती किंवा अहवाल नाही. दर महिन्याला शेकडो आदिवासी स्त्रियांना काही दिवसासाठी का होईना बहिष्कृताचे जीवन जगायला भाग पाडणाऱ्या या कुरमा घराकडे केवळ शासनाकडून नाही तर सामाजिक स्तरावर प्रयत्न होणे आवश्यक आहे. या प्रथेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी तिथल्या ग्रामस्थांनी ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. गावातील मुख्य रस्त्यावरून जाण्यास विरोध, नियम तोडल्यास जात पंचायतीसमोर जाण्याची शिक्षा, इतकेच नव्हे तर गळके छप्पर, झोपण्यासाठी फाटक्या चटया आणि घोंगड्या, बऱ्याचदा विजेचा अभाव, भोवताली साचलेला चिखल आणि त्यात असलेली कुत्रे व डुकरांचा मुक्त संचार अशा छोट्याशा कुरमाघरात या स्त्रियांना राहावे लागते. विविध कारणामुळे १३ स्त्रियां मृत्युमुखी पडल्या आहेत, ही फक्त ज्याची माहिती मिळाली त्या स्त्रिया आहेत परंतु आज पर्यंत किती मृत्यु झाले हे कुणालाही माहिती नाही.

मासिक पाळीतील रक्तस्त्रावाला विविध प्रकारच्या पारंपरिक व सांस्कृतिक कारणाने माडिया गोंड समाजात निषिद्धतेचे स्वरूप आहे. कुरमा घराचे विधी निषेध पाहता ही निषिद्धता ‘विटाळा’च्या व्याप्तीपेक्षाही जास्त असल्याचे दिसते. मासिक पाळीच्या काळात संबधित स्त्री किंवा मुलीच्या घरातील कोणत्याही वस्तूला, कपड्यांना, भांड्याकुंड्याना, पूजा स्थानाला व उत्पादन वस्तूंना स्पर्श करणे नको असतो कारण त्या काळात तिला विटाळ असतो. इतर समाजात देखील मासिक पाळीमध्ये स्त्री वर अशी बंधने थोड्या फार फरकाने अनेक समुदायात आजही आढळतात, मात्र ती या कालावधीसाठी कुटुंबातच नको, तिने या संपूर्ण कालावधीत घराबाहेर राहावे यासाठी वस्तीच्या टोकावर एक झोपडीवजा तात्पुरती निवास व्यवस्था केली असते या झोपडीलाच ‘कुरमाघर’ म्हटले जाते. कोर, गावकोर, खोपडी असे अन्य पर्यायी शब्द देखील या झोपडीला दर्शवण्यासाठी वापरले जातात. प्रजोत्पादन प्रक्रियेचा एक भाग असलेली मासिक पाळी स्त्रियांच्या दैनंदिन जीवनातील अतिशय कष्टप्रद कालावधी असतो, या कालावधीत स्त्रियांची विशेष काळजी घेण्याची गरज असते विशेषतः किशोरवयीन मुलीकडे या काळात जाणीवपूर्वक लक्ष पुरवण्याची गरज आहे. परंतु अशा अवघड वेळीच किशोरवयीन मुली आणि स्त्रियांना गोवकोरात घराबाहेर एकट्याने राहावे लागत असेल तर याहून भयंकर कोणतीच परिस्थिती असू शकते?

गावांमध्ये महिलांशी बोलताना मुलींशी बोलताना श्रद्धा बडवाईक.

गावांमध्ये महिलांशी बोलताना मुलींशी बोलताना श्रद्धा बडवाईक.

सांस्कृतिकदृष्ट्या वैभवशाली वारसा असलेल्या निसर्गपूजक माडिया-गोंड समुदाय मुळात ‘मातृसत्ताक’ कुटुंबपद्धती असलेला समुदाय आहे. अर्थार्जनात स्त्रियांना मोठ्या प्रमाणात सहभाग हे या समुदायाचे वैशिष्ट्य आहे, या समुदायातील मुली व स्त्री सतत घरात अथवा शेताच्या कामात गुंतलेल्या असतात. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात त्या घरी असल्यातर या काळातील त्यांच्यासाठी योजलेली निषिद्धताभंग होण्याची शक्यता निर्माण होते. ती होऊ नये व सांस्कृतिक परंपरांना आणि श्रद्धांना तडा जाऊ नये म्हणून त्यांना त्या काळा पुरते घराबाहेर ठेवले जाते. पूर्वी गावातील वृद्ध स्त्री कुरमा घरात राहणाऱ्या स्त्रियांना सोबत असे. मात्र आता आधाराच्या या वृद्ध स्त्रिया बहुतेक गावात नाहीत, या स्त्रियांना जेवणाचा डबा उशीरा येतो, भुकेने जीव कासावीस झाला तरी गावात जायची सोय नसते. पिण्याच्या पाण्यासाठी छोटासा माठ नाहीतर छोटी चरवी, पडके न्हाणीघर, अपुरी झोपण्याची व्यवस्था, त्यात सरपडणारे कीटक किंवा प्राणी येत असतील तर विचारायलाच नको असे कुरमा घराचे सध्याचे स्वरूप आहे.

कुरमा घरातील प्रौढ स्त्रियांपेक्षा किशोरवयीन मुलींना अधिक अडचणी आहेत, मासिक पाळीच्या काळात मुलींना अधिक त्रास होतात. त्यावेळी त्यांच्याकडे कुणीही लक्ष देत नाही, त्यांना समुदायामध्ये मोकळेपणाने फिरता येत नाही कारण तिचा स्पर्श कुणाला झाला तर अद्याप तो विटाळ मानला जातो. या काळात गावातील रहदारीच्या रस्त्यावरून त्यांना जाता येत नाही त्यांच्यासाठी गावाबाहेरील रस्त्याचा अवलंब करावा लागतो, या काळात गावकोरात राहण्याची इच्छा नसल्यास त्यांना जातपंचायती समोर जावे लागते. उन्हापावसापासून, थंडीपासून संरक्षण होणे सुद्धा कठीण असते अनेक वेळेस एका कुरमा घरात बऱ्याच स्त्रिया एका वेळेला असतात, आणि त्या वेळेस, मोठ्या प्रमाणात जागेची अडचण आणि अंघोळीची अडचण येते आणि त्याला कोणतेही उपाय नसतो ते त्यांना कस तर सहन करून घ्यावे लागते. पाळी पाळी ने झोपावं लागत पाच झोपल्या की बाकीच्या जागी राहायच्या नंतर त्याना उठून आपण झोपायचं नंतर त्या जाग्या राहतील ही परिस्थिती किती भयानक आहे. की मासिक पाळीच्या वेळेस स्त्रियांना पुरेपूर झोप असावी परंतु त्यांना ते सुद्धा जागेच्या अभावी घेता येत नाही. आणि अशा वेळेस तेथील वातावरण आणखीनच बिघडत जात. एकूणच ही परिस्थिती आदिवासी स्त्रियांना व किशोरवयीन मुलींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करणारी असूनदेखील आरोग्य विभागाला या विषयी माहिती सुद्धा नाही. ही किती आश्चर्यकारक बाब आहे?

कुरमाघराच्या निर्माणामागे असलेली भूमिका या समाजातील अनेक जाणकार व्यक्तींशी बोलल्या नंतर मला समजला तो म्हणजे असा की, या समुदायातील स्त्रिया आणि किशोरवयीन मुली घरी असतील तर त्या काही ना काही काम करतीलच त्यामुळे त्यांच्यासाठी असलेली निषिद्धता भंग होते आणि त्यांना विश्रांती देखील मिळत नाही, त्यामुळे त्यांना सक्तीची विश्रांती घेता यावी यासाठी घराबाहेर एका स्वतंत्र झोपडी निर्माण करून त्यांच्या निवासाची तेथेच व्यवस्था करण्यात आली, मासिक पाळीच्या काळात त्यांनी कोणतेही काम करू नये. ते राहत असलेल्या कुरमाघरातच कुटुंबाकडून जेवण पुरवले जाते, त्यांनी केवळ विश्राम करावा, हा कुरमा घरांच्या निर्माण मागे दडलेले शास्त्रीय समुदायाचे वैशिष्ट्ये असल्याने कुरमा घराच्या निर्माणा मागील या सिद्धांताचे कौतुक करावेसे वाटले तरीही सध्या स्थितीतल्या कुरमा घरांची दयनीय दुरवस्था पहिली की, कुरमा घरात वास्तव्यास असणाऱ्या स्त्रियांना कोणकोणत्या अग्निदिव्यातून जावे लागत असेल याची कल्पना येते.

मासिक पाळीचे नैसर्गिक आणि सामाजिक धार्मिक पैलू:

मासिक पाळीला जसे एकीकडे नैसर्गिक शरीरधर्म म्हणून पहिले जाते तर दुसरीकडे त्याला धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक संदर्भही जोडलेली आहेत. भारताच्या संदर्भात मासिक पाळी या विषयाला सहज संवाद साधणे अवघड आहे, उलट तिला मंदिर प्रवेश करण्यास नाकारले जाते, स्वयंपाक करण्यास टाळाटाळ केली जाते, घरातील देवाची पूजा करण्यास सक्त मनाई असते, घरातील लोकांना स्पर्श करणे चालत नाही हे केवळ भारतीय किंवा हिंदू धर्मिक परंपरेमध्येच मासिक पाळीविषयी मूल्याधिष्ठित दृष्टीकोन आहे असे नाही. जगातील आधुनिक समजल्या जाणाऱ्या समाजातील चालीरीती देखील स्त्रियांना कनिष्ठतेचे माप देणाऱ्या आहेत या गोष्टीचे अरुणा देशपांडे यांनी आपल्या पुस्तकात वर्णन केलेले आहे. एकूणच विश्वामध्ये मानवाने स्वतःकडे आणि त्यांच्या वाट्याला आलेल्या मानवी आयुष्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहायचे याचा विज्ञाननिष्ठ विचार होणे आवश्यक आहे. एकूणच उतरंड ही संकल्पना मुलभूत आणि मध्यवर्ती मानून प्रस्थापित झालेल्या समाज रचनेमध्ये स्त्रीला कनिष्ठ स्थान मिळाले आहे. ही गोष्ट अन्यायकारक आणि निसर्गाविरुद्ध जाणारी आहे.

मासिक पाळीची सुरुवात हा मुलीच्या आयुष्यातला एक नैसर्गिक व महत्त्वपूर्ण अनुभव आहे. या अनुभवाभोवती व घटनेभोवती अनेक रूढी-परंपरा, बंधने, अंधश्रद्धा, गैरसमजुती जोडल्या गेलेल्या आहेत. शेकडो वर्षापासून आलेल्या रूढी-परंपराचा निषेधनियमांचा आणि धर्मबंधनांचा शास्त्रीय दृष्टीकोनातून विचार झालेला नाही, तसेच या विषयाची सामाजिक, सांस्कृतिक आणि मानसिक बाजू या संबंधीही फारसे लिखाण झालेले नाही, पिढ्यानपिढ्या स्त्रियांकडून विनातक्रार पाळण्यात येणाऱ्या धार्मिक बंधनांचा उगम आणि करणे शोधण्याचाही फारसा प्रयत्न झालेला नाही, परंतु वयात येणाऱ्या मुलींच्या पाळीबद्दल संशोधन होणे गरजेचे आहे, मुलगी वयात येतांना म्हणजे मासिक पाळीच्या चक्राला सुरवात होत असताना आणि कालांतराने हे चक्र नैसर्गिकरीत्या बंद होताना स्त्रीच्या शरीरात काही विशिष्ठ शारीरिक, मानसिक बदल घडत असतांना, काही मुलींना मासिक पाळी सुरू होण्याच्या काळात तर काही स्त्रियांना पाळी बंद होण्याच्या काळात अनेक शारीरिक,  मानसिक तणावांना तोंड द्यावे लागते. कौटुंबिक स्थान आणि मानसिक अवस्था अशा दोन्ही बाजूवर अत्यंत असुरक्षित तर काही वेळा शारीरिक विकार उद्भवतात. या सर्वांची कारणे शोधणे गरजेचे आहे. कारण स्त्रीचे कुटुंबामध्ये समाजामध्ये दुय्यम स्थान असणे आणि ते तसे स्वीकारले जाणे यामध्ये सामाजिक रूढी व प्रस्थापित समाजव्यवस्था यांचा फार मोठा वाटा आहे. परंतु त्याच बरोबर स्त्रीचे स्वतःच्या शरीराबद्दल असलेले अज्ञान, यामुळे टिकून राहिलेल्या अंधश्रद्धा, रूढी, बंधने यांनाही निश्चित असे स्थान आहे. मासिक पाळी या अनुभव संबंधीचे सामाजिक वास्तव काय आहे, आजच्या स्त्रीची या विषयासंबंधीची मानसिकता विचार अनुभव हे महत्त्वाचे आहे, पाळीला सुरुवात होतांना किंवा होण्याअगोदर बऱ्याच मुलींना त्याबद्दल फारशी माहिती नसते, आणि शास्त्रीय माहिती बऱ्याचदा आईलाही नसते तर मुलीला कशी मिळणार? तसेच असे लक्षात येते की, अनुभवासंबंधी सुरक्षित नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या मनावरही दडपण असते त्यामुळे संकोचाची भावना निर्माण होते. शाळेतून मासिक पाळी आणि लैंगिक शिक्षण याबद्दल शास्त्रीय माहिती मिळाली तर अधिक चांगले होईल, कारण त्यामुळे लहान मुलींचा गैरफायदा घेणार्यांविरोधात मुकाबला करण्याची मुलींची मानसिक तयारी होईल. शास्त्रीय माहितीने धोके टाळता येतील आणि त्याच बरोबर मुलींची स्वतःवरची जबाबदारी वाढेल.

मासिक पाळीचा उल्लेख करतांना गावाकडे पर्यायी शब्द वापरतात उदाहरण:- कावळा शिवला, अडचण आली, बाहेरची झाली, विटाळ सुरू झाला. या सर्व पर्यायी शब्दांचा अर्थ पहिला तर सर्व वाक्यप्रचारामागे शब्दांमागे सूक्ष्म असा नकार व तिरस्कार आहे असे जाणवते. मासिक पाळीत सर्वात जास्त वापरला जाणारा शब्द म्हणजे ‘विटाळा’ या शब्दाचा उगम व्यत्पत्ती कोशाप्रमाणे विष्ठा या शब्दापासून झालेला आहे. हा अर्थ लक्षात घेतला तर सांस्कृतिक परंपरेने पाळी आलेली स्त्री ही विष्ठे इतकीच तिरस्करणीय मानली होती, असे मानले जाते. तसेच प्राचीन वैद्यकीय शास्त्राच्या मासिक पाळी संबंधीच्या दृष्टिकोनावर, धर्म रूढी, धर्मवचने आणि त्या काळातील सामाजिक रीतीरिवाजांचा पगडा होता असे दिसते, म्हणूनच रजस्वलेने पालन करण्याचे आयुर्वेद प्रणालीत नियम आणि धर्मसिंधु याज्ञवल्क्य स्मृती या धार्मिक ग्रंथातील नियम यामध्ये काही साम्य आढळते. त्या काळात धर्मशास्त्राचे प्रवर्तकच बऱ्याच वेळा वैद्यकीय व्यवसायही करीत बहुधा यामुळे धर्मशास्त्रांचा आणि धार्मिक बंधनांचा प्रभाव तत्कालीन वैद्यक शास्त्रावर पडला असावा. मासिक पाळी सुरू असलेल्या स्त्रीने धार्मिक बंधने न पाळल्यास तिचे व तिच्या घरातील पुरुषाचे अशुभ होईल असा धाक धर्मशास्त्राचा होता. आयुर्वेदानुसार सांगितलेली बंधने मासिक पाळीच्या काळात न पाळल्यास स्त्रीचे स्वतःचे आणि होणाऱ्या मुलाचे आयुष्य धोक्यात येईल असा धाक आयुर्वेद शास्त्रकार घालतांना दिसतात.

मासिक पाळीच्या काळात स्त्रीच्या अंगात अतिमानवी शक्ती असतात. त्या चैतन्य नष्ट करतात, निरनिराळ्या आपत्तींना कारणीभूत ठरतात, ही कल्पना टोळी समाजात सर्वमान्य असलेली दिसून येते. म्हणून एखाद्या मुलीच्या प्रथम मासिक पाळीला सुरवात होणे म्हणजे त्या मुलीच्या आणि टोळीच्या दृष्टीने फार मोठी आपत्तीच मानली जात असे. अशा मुलीच्या अंगात असलेल्या भयानक दैवी शक्तीचा सर्वात जास्त परिणाम निसर्गाच्या सृजन शक्तीवर आणि सृजन क्षमतेवर होतो, असे मानले जात असे. म्हणून प्रथम मासिक पाळीला सुरुवात झालेल्या मुलीपासून निसर्गाच्या सृजन शक्तीचे (सूर्य, पाणी, जमीन, वनस्पती) यांचे रक्षण करणे त्या काळी मानवाला आवश्यक वाटत असे. त्या दृष्टीने शक्य तेवढी बंधने अशा मुलीवर घालून काळजी घेतली जात असे, वेगवेगळ्या टोळी समाजात वेगवेगळ्या पद्धतीने नुकतीच पाळी आलेल्या मुलींना इतरापासून वेगळे ठेवण्याची पद्धत होती.

काही जमातीत मुलीच्या पहिल्या मासिक पाळीला सुरुवात झाली की तिला शंभर दिवस एका वेगळ्या झोपडीमध्ये बंद करून ठेवण्यात येत असे. तिला कोणालाही भेटण्याची, बोलण्याची परवानगी दिली जात नव्हती. तसेच नुकतीच पाळी आलेल्या मुलीला काही जमातीत चार-पाच दिवस कडक उपवास करायला लावण्याची पद्धत होती. त्यानंतर तिचे खाणे-पिणे मर्यादित ठेवले जात होते. तिला त्या काळात शाकाहार देण्यात येई. तिला थंड पाणी पिण्याचीही बंदी होती. काही जमातींमध्ये अशा मुलीला अंधाऱ्या गुहेमध्ये, जमिनीपासून उंचावर बांधलेल्या पिंजऱ्यामध्ये किंवा दोन झाडांच्यामध्ये बांधलेल्या मचाणावर ठेवण्यात येई. काही ठिकाणी तिला अंधाऱ्या झोपडीमध्ये एका जागी स्तब्धपणे चार-पाच दिवस बसवून ठेवण्यात येत होते, निसर्ग विधीसाठी तिला बाहेर पडावे लागले, तरी तिची नजर सूर्य किरणांवर पडू नये म्हणून मस्तक पूर्णपणे झाकणारा बुरखा घेऊन तिला बाहेर पडावे लागे, तिच्या पायाचा स्पर्श जमिनीला होऊ नये म्हणून तिच्या पायांना लाकडी ठोकळे बांधले जात.

बहुतेक सर्व प्राचीन संस्कृती ह्या पुरुषप्रधान आहेत. या सर्वांमध्ये एक गोष्ट आवर्जून सांगण्यात आली आहे. “मासिक पाळी सुरू असलेल्या स्त्रीच्या संपर्कात आल्यास पुरुषाचे शौर्य, धैर्य आणि शक्ती नष्ट होते. उलट पाळीसंबंधीची सर्व बंधने आणि निषेध नियम पाळल्यास (म्हणजे अशा स्त्रीपासून दूर राहिल्यास) त्यांचे धैर्य आणि शक्ती दीर्घकाळ टिकून राहते. पुनर्जन्मावर विश्वास असलेल्या आपल्या भारतीय संस्कृतीत तर मासिक पाळी आलेल्या स्त्रीच्या संहारकशक्ती तिच्या मरणानंतरही नष्ट होत नाहीत, असे मानले जाते. पाळी चालू असतांना एखादी स्त्री मृत्युमुखी पडली तर, ती मरणानंतर भूत होते. अशी चूडैल अत्यंत सुंदर स्त्रीचे रूप धारण करून रात्रीच्या वेळेस फिरते. देखण्या तरुण पुरुषाला आकर्षित करते. तिच्या आकर्षणात सापडलेल्या तरुणाचे तारुण्य आणि सौदर्य नष्ट करून त्याला शक्तिहीन आणि म्हातारे करून सोडते. ही चूडैल तिच्या कुटुंबातील लोकांनाच जास्त धोकादायक असते, अशी समजूत प्रचलित होती.

आफ्रिकेच्या कांगो या भागात पाळी चालू असलेल्या स्त्रीने पुरुषांशी बिलकूल बोलायचे नाही, असे बंधन होते. चुकून एखादा पुरुष समोर आल्यास त्या स्त्रीने तंबाकू ओढण्याचा पाईप घालायचा अशी पद्धत होती. त्यावरून त्या पुरुषाला त्या स्त्रीची पाळी चालू आहे, तिच्याशी बोलायचे नाही, तिच्यापासून दूर राहायचे, अशी सूचना मिळत असे. अंगोलाच्या काही भागात पाळीच्या काळात स्त्रियांनी डोक्याभोवती विशिष्ट प्रकारचे कापड बांधण्याची सक्ती होती. त्यामुळे इतरांना-विशेषतः पुरुषांना अशा स्त्रियापासून दूर राहण्याचा आपोआप संकेत मिळत असे.

 इतर देशातील मासिक पाळी  संदर्भातील प्रथा :

ऑस्ट्रेलियातील काही जमातीमध्ये लहानपणापासून मुलांना असे सांगण्यात येत असे की, पाळीच्या वेळी होत असलेला रक्तस्त्राव जर त्यांनी पहिला तर त्यांचे सर्व केस पिकून पांढरे होतील. त्यांचा पूर्णपणे शक्तिपात होईल. तसेच पाळी चालू असलेल्या स्त्रीला पुरुषांच्या कोणत्याही वस्तूला हात लावण्याची परवानगी नव्हती. मासिक पाळीच्या काळात एखादी स्त्री पुरुषांच्या नेहमीच्या रहदारीच्या रस्त्यावरून गेल्यास तिला मृत्युदंडाची शिक्षा देण्यात येत असे. कंबोडियाच्या काही भागात प्रथम पाळीला सुरुवात झाल्यावर मुलीला शंभर दिवस मच्छरदाणीच्या आत बिछान्यात झोपवून ठेवण्याची पद्धत होती, काही भागात तिला तीन वर्ष (सूर्यदर्शनाशिवाय) घरामध्ये बंद ठेवण्यात येत असत. न्यू आयर्लंडमधील काही स्थानिक जमातीमध्ये पाळी सुरू झालेल्या मुलीला तीन-चार वर्ष घरातच परंतु विशिष्ट प्रकारच्या पिंजऱ्यामध्ये ठेवले जाई. मुलीचे वडील जेवढे श्रीमंत, तेवढा तिचा बंदिवासाचा काळ वाढत असे. काही ऑस्ट्रेलियन जमातीमध्ये त्याचप्रमाणे अमेरिकेतील मोहेव इंडियन या जमातीमध्ये प्रथम पाळी आलेल्या मुलीला गळयापर्यंत वाळूमध्ये पुरून ठेवत असत. अंगात निर्माण झालेल्या दुष्ट शक्तींचा परिणाम जमिनीवर होऊ नये म्हणून पुरतांना तिच्या पायात विशिष्ट प्रकारचे मोजे किंवा बूट घातले जात. प्राचीन पर्शियन संस्कृतीत पाळीचा रक्तस्त्राव चारच दिवस होणे योग्य, असे मानले जात असे. या काळात स्त्रीला वेगवेगळ्या झोपडीत ठेवले जात होते. चौथ्या दिवसानंतर तिचा रक्तस्त्राव थांबला नाही तर तिला शंभर फटके मारून परत त्याच झोपडीत पाच रात्रीपर्यंत बंद करण्यात येत होत, त्यानंतरही तिचा रक्तस्त्राव चालूच राहिला, तर तिच्यावर भयानक दृष्ट शक्तींचा पगडा आहे. असे मानले जात होते, तो नष्ट करण्यासाठी तिला चारशे फटके मारले जात. त्यानंतर तिला शुद्ध करण्याचा विधी केला जात होता.

नुकतीच पाळी येऊन गेलेल्या मुलीला असे सांगण्यात येई की, या काळात पाळाव्या लागणाऱ्या कोणत्याही नियमांचा, मर्यादांचा तिच्या कडून भंग झाल्यास किंवा मुद्दाम तिने नियमभंग करण्याचा प्रयत्न केल्यास तिचे स्वतःचेच भयंकर नुकसान होईल, तिच्यावर दैवी कोप होईल, या दैवी कोपाच्या भीतीमुळे नुकतीच पाळी सुरू झालेल्या छोट्या मुलीदेखील त्यांना घालून देण्यात आलेल्या सर्व बंधनांची आणि निषेध-नियमांचे पालन करण्याचा स्वतःहून प्रयत्न करीत.

मासिकपाळीची सुरुवात ही, तिच्या लैंगिक जीवनाची व पुनरुत्पादन क्षमतेची सुरुवात असे काही जमातीत मानले जात असल्यामुळे त्यासंबंधीही काही प्रथा प्राचीन संस्कृतीत अस्तित्वात होत्या. काही जमातीमध्ये मुलीच्या मासिक पाळीच्या सुरुवातीबरोबरच मुलीच्या वयात येण्याच्या विधीचा (puberty rite) एक आवश्यक भाग म्हणून तिचे योनीपटल दूर करण्याची पद्धत होत.

जगातील अनेक मानव समूहात सर्पाचा आणि रजस्त्रावाचा संबंध कल्पिलेला आढळतो. रजस्त्रावाला जसा चंद्राशी संबंध जोडलेला आढळतो, त्याचप्रमाणे सर्प हा रजस्त्रावाला कारणीभूत असल्याची समजूतही अनेक समाजात प्रचलित होती, पॅपुअन लोकांच्या समजुतीप्रमाणे स्त्रीच्या जननेंद्रियाला सर्पाने दंश केल्यामुळे रजस्त्राव होतो, असे मानले जाते. या कल्पनेचे चित्रण त्यांच्या लाकडावरील कोरीव चित्रात मोठ्या तपशिलाने केलेले आढळते. थायलंडमध्ये तसेच आफ्रिकेतील काही जमातीमध्ये दैवी शक्तींनी मुलीशी संभोग केल्यामुळे तिची मासिक पाळी सुरू झाली असा समाज रूढ होता. त्यामुळे नुकतीच पाळी आलेल्या मुलीला ‘वधू’ म्हणून संबोधण्याची पद्धत त्या ठिकाणी रूढ होती.

मध्य पूर्वेतील काही पुरुषप्रधान जातीमध्ये (semetic arab) प्रथम पाळी सुरू झाली की, मुलीची शिश्निका (clitoris) कापून टाकून तिच्या जननेंद्रियाच्या दोन्ही बाजू (lips of the vulva) एकत्र शिवून टाकण्यात येत. अशा प्रकारे वयात येणाऱ्या मुलीची लैंगिक इच्छा कमी करण्याची पद्धत होती. तसेच स्वातीजा मनोरमा म्हणतात त्या प्रमाणे एकत्रितपणे केलेल्या प्रक्रियेतून आणि कामातून एक नवा दृष्टिकोन मिळतो. ज्यामुळे स्त्रियांचे राहणीमान, आरोग्य आणि सामाजिक ओळख ह्याचाही विचार होत आहे. समाजामध्ये मासिक पाळी आणि मासिक चक्र यांच्याशी अनेक शुद्धता व अपवित्रतेचे घटक जोडलेले आहेत, त्यांना सामाजिक सांस्कृतिक आधार आहे, त्यामुळे मासिक पाळी हे शरीर आणि पुनरुत्पादन यांच्याशी जोडलेले आहे आणि यामुळे स्त्रियांवर नियंत्रणे आणि बंधने आणली जातात.

त्याचबरोबर मग Period positive movement मध्ये मासिक पाळीशी जोडलेली अशुद्धता आणि अपवित्रता यांच्याबरोबर त्याला जोडलेल्या पर्यावरणीय, सामाजिक, आर्थिक, धर्मिक, स्वच्छते विषयीच्या मुद्यांचा विचार होणे गरजेचे बनते. स्त्रियांच्या आरोग्याविषयी बोलतांना, मासिक पाळीचे चक्र स्त्रीच्या मेंदूपासून ते तिच्या गर्भाशयापर्यंत शरीरातील सर्व अवयव आणि नलिकाविरहित ग्रंथींचा सहभाग असलेले चक्र असते, पाळीच्या आधीही शारीरिक व मानसिकतेबद्दल जाणवू लागतात, ज्याला PMS(Pre-menstrual syndrome) म्हणतात. अशा प्रकारचा त्रास होणाऱ्या स्त्रियांना पाळी सुरू होण्याआधी  साधारणपणे आठ-दहा दिवस काही विशिष्ठ बदल जाणवतात, डोके दुखणे, स्तनांमध्ये जडपणा वाटणे, बद्धकोष्ठ व अतिसाराचा त्रास व अतिशय निरास वाटणे, कुठल्याही कामात लक्ष न घालणे, चिडचिड होणे, गोड पदार्थ अधिक खावेसे वाटणे अशा प्रकारची लक्षणे दिसून येतात.

मासिक पाळीविषयी जे एरवी ही  बोलले जाते की शहरामध्ये नाही पाळले जात पण ग्रामीण भागात पाळले जातात पण तसे नसून, आपण ग्रामीण व शहरी असा भौगोलिक दृष्ट्या फरक करता येणे अवघड कारण येथे ग्रामीण भागातून शहरामध्ये स्थलांतरीत झालेली लोकसंख्या आढळून येते. मासिक पाळी या विषयाबाबत अनिश्चितता व साशंकता असते, त्याचबरोबर धर्म आणि संस्कृती यांची आंतरछेदितता जी स्त्रियांच्या लैंगिकतेविषयी शरीराशी जोडलेली असते.

भारतामध्ये प्रथम मासिक पाळी येतांना बऱ्याच प्रमाणात मुलीना मासिक पाळी बद्दल जी माहिती दिली जाते ती, मिथके मासिक पाळीविषयी धार्मिक बंधने यावर आधारित असतात, त्यामुळे त्यांचा त्या किशोरवयीन मुलींच्या आत्मविश्वास, स्वविषयीची जाणीव यावर होत असतो. मात्र मासिक पाळीविषयीचा जो कलंक किंवा बंधने असतात, त्याच्या विषयीची जी अव्यवस्था असते, ती टीव्ही, वर्तमानपत्रे यासारख्या समाज माध्यमातून दिली जातात. परंतु भारतामध्ये ज्या स्त्री सुलभ असण्याच्या, मातृत्वाच्या ज्या धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक संकल्पना जोडलेल्या आहेत. त्या मग मासिक पाळीकडे सकारात्मकतेणे पाहण्याला प्रश्नांकित करतात. या विषयावर ‘सर्च’ या संस्थेने केलेल्या सर्व्हेत शंभर सुइणीसोबत झालेल्या चर्चेतून पहिली मासिक पाळी सुरू झाल्यावर काय करतात असे विचारल्यावर त्या सांगतात की –

  • त्या विटाळल्या म्हणून बांगड्या फोडतात.
  • देवधर्म असतो घरात म्हणून दूर बसवतात. अलग ठेवतात. छपरीत बसवतात. स्वयंपाक पाण्याला हात लावू देत नाहीत. पोरी खूप रडतात.
  • पाच दिवसानंतर डोक्यावर अंघोळ घालून नवीन चुडा (बांगड्या) भरतात. गहू,तांदूळ, डाळ अशा पाच दाण्यांचे मिश्रण करून पोरीची ओटी भरतात. पाच किंवा नऊ सवाष्णींना बोलून त्यांची ओटी भरतात.
  • पुढे बाळतपणानंतर मामा–भाचीचा दु:ख उठू नये म्हणून बाजेचा एचन चावायला लावतात व उकडलेले मुटाळू (एक प्रकारचे कंद) खायला देतात.
  • मासिक पाळीच्या पाच दिवसात गूळ टाकून सोजी किंवा साखर–भात किंवा पोळी –वरण किंवा चिवडा खायला देतात.
  • दही किंवा दही भात खायला देतात. त्यामुळे देहाला, बुद्धीला शांतता राहते. शीतल राहते. मुलगी रिवाजाला चांगली निघते. (लफूटपणा करत नाही ) शांत राहते!
  • विटाळ साफ झाला पाहिजे म्हणून तेल, गुळ, खोबरे पाच दिवस खायला देतात.
  • पाच दिवस तिखट, मच्छी –मासळ्या, वांगे, भेदरू, मतान देत नाहीत. वांगे दिले तर देहीला (मायांगाला) खाज येते. मतान दिले तर अंग वारत नाही. कोणतीच मतान देत नाही. मसाल्या देत नाहीत. कारण विटाळाचा वास येतो इसडा (घाण) वास येतो कपड्याचा.

या विषयावर माहिती विचारताना विटाळ किती दिवसात यायला पाहिजे ? साधारणपणे विटाळ किती दिवसात  जायला पाहिजे? एखाद्या बाईचा विटाळ कमी जातो असे तुम्ही कधी म्हणाल? कशामुळे कमी विटाळ जातो? काय कारणे असतात? विटाळ कमी गेल्याने तब्येतीवर काही परिणाम होतो काय?

असे विचारण्यात आले होते. शेवटच्या प्रश्नावर स्त्रियांनी परिणामांची जी लांब यादी सांगितली ती अशी –

अंगात शक्ती राहात नाही; चक्कर येते, अंग ढिले लागते; तब्बेत निष्फळ असल्यासारखी वाटते; हात, पाय, कंबर दुखते; पोटात दुखते; कोणत्याही कामावर, ‘धंद्यावर” (धंदा म्हणजे, त्याच्या मते शेतीकाम, घरकाम व स्त्री-पुरुष संबंध, सर्वच) लक्ष लागत नाही. संसार (संबंध) करावेसे वाटत नाही. इच्छा मरते; मुलबाळ होत नाही. कारण विटाळ साफ नसल्याने काळा विटाळ जातो व काळा विटाळ गेल्यामुळे महिना चुकत नाही; जडपणा येतो. जेवढा चांगला विटाळ जातो तेवढी हलकाई राहते !…… असे तेथील स्त्रिया बरेच काही त्यांच्या समजुतीनुसार सांगतात. यावर घरगुती उपाय करतात. काही स्त्रिया पाळी संपण्याला फार चांगल्या पद्धतीने घेतात. पण अनेक स्त्रिया अस्वस्थ होताना दिसतात. काहीतरी चिंता भीती त्यांच्या मनात आहे. या विषया संदर्भात ३०-३५ प्रश्न विचारले गेले होते.

भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात प्रत्येक नागरिकाला मग ती स्त्री असो वा पुरुष त्याला धर्माचे, श्रद्धेचे स्वातंत्र आहे. या मुलभूत हक्काचे उल्लंघन होणे हे चुकीचे आहे. सद्याच्या शबरीमाला मंदिरात नागरिक मासिक पाळीच्या अनुसार वयोगटातील स्त्रियांना तेथे प्रवेश नाही. कारण त्या अशुद्ध मानल्या जातात, मात्र ही फक्त हक्काची पायमल्ली करणारे नाही तर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचाही प्रश्न आहे. आणि पुन्हा एकदा हा मग हिंदू बहुसंख्याकवादाचा प्रश्न आहे, ज्या मध्ये कोणी काय करावे आणि काय नाही हे ठरवले जाते. जेथे या शक्ती राज्यसंस्थेवर देखील नियंत्रणे आणण्याचा प्रयत्न करतात, शब्दांनी नाही तर कृतीने. मग या सर्वांमध्ये धर्म शक्ती या जास्त बलशाली असतात की राज्यसंस्था हाच प्रश्न पडतो, त्यामुळे राज्य संस्थेने देखील या विरोधात कडक पाऊले उचलणे गरजेचे आहे. मासिकपाळी संदर्भात ज्या भ्रामक संकल्पना आहेत त्याच्याबद्दल विचार केला तर त्या समस्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि धार्मिक संदर्भासोबत जोडलेल्या आहेत. त्याच्यावर विचार होणे खूप गरजेचे आहे. मग त्याच्या मध्ये पितृसत्ताक संदर्भ ही जोडलेले दिसतात. याच्यावरही विचार करणे आवश्यक आहे.

कुरमा प्रथेबद्दल स्त्रियाना काय वाटते?

कुरमा प्रथेबद्दल स्त्रियांचे काय मत आहेत, त्या या प्रथेकडे कशा प्रकारे बघतात, स्त्रियांच्या मतांमध्ये काय सारखेपणा आढळतो, ह्या ज्या रूढी-परंपरा आहेत त्याचे पालन कसे केले जाते, कुरमा घरात गेल्यानंतर त्यांची परिस्थिती काय असते त्या प्रथेकडे बघण्याचे त्यांचे मत आणि तरुण मुलींचे मत काय आहेत, त्याही प्रथा पाळतात का? समाजामधील लोक त्यांच्या कडे कुरमा घरात असतांना कोणत्या नजरेने बघतात? स्त्रियांना व किशोरवयीन मुलीना पाळी आल्यानंतर स्वतःच्या घरातून बहिष्कृत केल्या सारखं बाहेर काढतात हे कितपत योग्य आहे, या प्रथेमुळे त्याच्या मानसिक, शारीरिक आणि सामाजिक जीवनावर परिणाम होतो का? या कुरमा घरात असताना आरोग्य अचानक बिघडले तर कोण लक्ष देतो? लहानपणापासून कुरमा घर ही प्रथा कशी मुलींना सांगितली जाते? गावात शाळेतील शिक्षिका आणि अंगणवाडीत येणारी सेविका याकडे मासिक पाळी आल्यानंतर कसे बघितले जाते? मासिक पाळीच्या बाबतीत काही कार्यक्रम गावात होतात का? ही प्रथा नष्ट व्हावी या साठी काही प्रयत्न केले आहेत का? कुरमा प्रथेबद्दल आदिवासी समुदायाचे काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी गडचिरोली जिल्हातील भामरागड या तालुक्यातील काही गावामध्ये जाऊन त्यांचे विचार मते त्यांचा दृष्टीकोन या प्रथेबद्दल त्यांना काय वाटते हे जाणून घेतले आहे

स्त्रियांची नावे पुढीप्रमाणे :-

  नाव                     गावचे नाव                                समुदाय

सोनी पुसली             झारेगुडा(भामरागड)                  गोंड

मैनीमूडवा                 झारेगुडा                                 गोंड

जुरी महाका              गुंडनूर( भामरागड)                   माडिया

कमलीतिंम्मा              गुंडनूर                                   माडिया

विजो मासली            कोयनगुडा   (भामरागड)            गोंड

जानो कुरसानी           बेजूर(भामरागड)                      गोंड

दसरी सयाम             टेकला(भामरागड)                    गोंड

तामसी वाचामी         कुमारगुडा (भामरागड)              माडिया

गीता कोनसाने          बेजूर                                      गोंड

रेखा पुनगंट्टीवार        झारेगुडा                                 माडिया

 १० पैकी ९ स्त्रियांचे मत हे कुरमाप्रथे बद्दल चांगले नव्हते  त्यांना ही प्रथा नाईलाजाने पाळावी लागत असल्याची त्यांनी स्पष्ट माहिती दिली. यामधील काही स्त्रियांना स्वतःचे घर सोडून पाळीच्या काळात कुरमा घरात जाणे हे खूप जीव घेणारी प्रथा वाटते. या काळात ज्या प्रकारे स्त्रियांच्या स्वातंत्राची पायमल्ली केली जाते, त्यांना गावातील मुख्य रस्त्यावरून जाण्यास मनाई, त्या काळात गावातील पुरुषावर सावली पडू नये म्हणून त्यांच्या पासून दूर राहणे, त्या काळात पुरुषांशी गप्पा मारायच्या नाही ही बंधने त्यांच्या वर लादलेली असतात. मासिक पाळी ही नैसर्गिक बाब आहे परंतु तिच्या बद्दल समाजात भ्रामक अशा अफवा पसरवून स्त्रियांना दुय्यमतेचे स्थान दिले गेले आहे. कुरमा प्रथा ही मासिक पाळी विषयी आदिवासी समुदायातील स्त्रियांनी या काळात कसे दूर राहावे आणि या काळात तिच्यात जी दैवी शक्ती येते ती एखाद्या पुरुषाला नष्ट करणारी असू शकते, म्हणून पुरुषला तिच्या पासून दूर ठेवले जाते. मासिकपाळीमुळे स्त्री एका नवीन जीवाला जन्म देऊ शकते एवढी शक्ती स्त्री मध्ये आहे परंतु अशा प्रथांमुळे त्यांना काही काळासाठी का होईना बहिष्कृताचे जीवन जगावे लागते. त्याच प्रमाणे भारतात आसाममध्ये कामाख्या देवीचे मंदिर आहे जिला Menstruating Goddess म्हटले जाते, तिची पूजा केली जाते त्यामुळे येथे मग एक प्रकारचा विरोधाभासही दिसतो.

काही स्त्रियांना असे  वाटते की, कुरमा घर ही प्रथा चांगली आहे, की त्यामुळे आपण आपल्याला वेळ देऊ शकतो आराम करू शकतो आणि घरून छान जेवणाचा डबा पण येतो मग आपल्याला काय पाहिजे त्रास मात्र एवढाच की कुरमा घरात योग्य वातावरण नाही. झोपण्यासाठी पुरेसी जागा नाही आणि प्राणी आणि कीटक याची भीती असल्यामुळे पावसाळ्याच्या वेळेस खूप जास्त भीती आम्हाला असते. काही स्त्रियांचे म्हणणे असे होते की, ही प्रथा आम्ही मानण्यास नकार दिला तर आम्हाला जात पंचायती समोर उभे केले जाते आणि कठोर शिक्षा करता किंवा या घटनेमुळे देवाचा कोप संपूर्ण गावावर होईल या भीतीमुळे आम्हाला ही प्रथा पाळावी लागते.

कुरमा प्रथेमुळे स्त्रियांना मानसिक, शारीरिक आणि सामाजिक जीवनावर परिणाम

सर्वच स्त्रियांचे असे म्हणणे होते की, कुरमा घरामुळे आमच्या एकंदरीत आयुष्यावर खूप परिणाम होतो. त्यामध्ये जेव्हा आम्ही कुरमा घराच्या दिशेने जाण्यास निघतो तर लोक काही काही प्रकारचे बोलण्यास सुरवात करत, किंवा आम्ही जेव्हा कुरमा घरातून परत गावात जातांना माहिती असून विचारतात की कुठे गेली होती गावात दिसत नाही, आणि त्याच बरोबर अशा बोलण्यामुळे आणि घरापासून एवढ्या दिवस वेगळे राहण्याच्या त्रासाने खूप जास्त चिडचिड होते परंतु सर्वच स्त्रिया याच त्रासातून जात असल्याने आपण कुणालाही कुरमा घरात बोलू शकत नाही. प्रत्येक स्त्री तिच्या त्रासाने ग्रस्त असते, काही स्त्री आनंदी पण असतात की त्यांना इथे आराम मिळतो पण त्यांचे वयोगट आता पाळी संपेल अशा असतात तरुण स्त्रिया आणि किशोरवयीन मुलींना ही प्रथा नको असते. त्यांना मी विचारले की तुम्हाला सॅनेटरी नॅपकीन बद्दल माहिती आहे का? त्यातील फक्त १ टक्के महिलांना या बद्दल माहिती आहे, काहींना हे काय आहे हे सुद्धा माहिती नाही. त्यामुळे त्यांनी जो अशुद्ध असा कापड वापरून त्यांना त्वचेचे रोग झाल्याचे दिसून आले त्यांच्या शरीरावर मोठा प्रभाव पडलेले दिसून येतो. त्याच प्रमाणे कुरमा घरात एखाद्या वेळेस अचानक तब्येत बिघडली आणि सोबत कुणी नसेल तर त्या स्त्रीला तशाच वेदना सहन करत तिथे राहावे लागते.  अशा वेळेस काही स्त्रियांचे मृत्यु पण झालेले दिसून येतात. आणि त्यांच्या मदतीला कुणीही येत नाही. कोलाम या जमातीत पण अगोदर सॅनेटरी नॅपकीन वापरले जात नव्हते पण आता मोठ्या गावाच्या संपर्कात आल्यानंतर त्या विकत घेतात पण पैसे देऊन  विकत घेतल्यामुळे वापरल्या नंतर टाकून दिले जात नाहीत.

कुरमा प्रथेबद्दल मुलींचे सामाजिकीकरण

कुरमा प्रथेबद्दल मुलींना त्या जेव्हा वयात यायला सुरवात होते तेव्हा त्यांना सांगितले जाते, आणि त्याच बरोबर त्या लहानपणापासून बघत आलेल्या असतात की त्यांची आई अशा वेळेस गावाच्या बाहेर असलेल्या एका झोपडीमध्ये असते. आणि त्या झोपडीत मासिक पाळी आल्यानंतरच जाता येते अशा मुलींना किंवा स्त्रियांना तेथे जाता येत नाही. त्यामुळे आपल्याला पण पाळी आली की आपण पण त्या घरात जाऊन राहू, अशी माहिती त्यांना घरात आई किंवा आजी असेल तर ती देते, काही मुली ऐकत नाही त्या आम्ही नाही पाळणार ही असली प्रथा, असे म्हणतात तेव्हा देवाचा कोप होईल सगळं नष्ट होईल अशी भीती दाखवली जाते आणि त्यामुळे त्यांना ही प्रथा पाळावी लागते. ज्या मुली बाहेर शाळा शिकण्यासाठी जातात त्या घरी आल्यानंतर ही प्रथा आम्ही नाही पाळणार असा हट्ट करतात त्यावेळी त्यांना धमकी दिली जाते की तू असे वागली नाहीस तर तुझे शिक्षण आम्ही बंद करू किंवा तुला गावाच्या बाहेर पण जाता येणार नाही. त्यामुळे किशोरवयीन मुलींना ही प्रथा पाळावी लागते. त्यांच्यावर खूप जबरदस्ती केली जाते. त्यांच्या विरोधाला घरातूनच दाबून टाकले जाते. परंतु ज्या मुली नोकरी करत आहेत आणि काही दिवसांसाठी त्या गावात येतात आणि अशा वेळेस त्यांना मासिक पाळी आली तर त्यांना कुरमा घरात पाठवले जाते आणि त्यांनी विरोध केला तर त्यांना सुद्धा काही गोष्टीनी थांबवण्यात येतात परंतु काही गावातील नोकरी करणाऱ्या मुली ही प्रथा मानत नाही हे दिसून आले. त्यांनी गावातील लोकांना स्वतःचे मत पटवून दिले परंतु काही गावात अजूनही त्यांना कुरमा घरात जावे लागते.

लैंगिकता आणि मासिक पाळी

मासिक पाळी (कुरमाघर) बद्दल काम करताना लैंगिकता हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. सर्वच आदिवासी मुलींना घरातून कुरमा प्रथेबद्दल सांगितले जाते आणि त्याच प्रमाणे त्यांना स्वतःहून पण माहिती होते की, आई घरातून काही दिवसासाठी गावाच्या बाहेरील झोपडीत जाऊन राहते. म्हणजे हे नेमके काय आहे, त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे घरातील लोकांना द्यावीच लागते आणि अशा प्रकारे त्यांना ह्या प्रथेबद्दल माहिती होते की, मासिक पाळी आल्यानंतर आपल्याला घराबाहेर जाऊन राहायचे आहे.

अरुणा देशपांडे यांनी त्यांच्या पुस्तकात म्हणतात की, मुलींना जर आईने मासिक पाळीविषयी माहिती दिली तर त्याचबरोबर मग पुनरुत्पादनाविषयी, शारीरिक संबंधांविषयी माहिती द्यावी लागेल, त्यामुळे त्यांना भीती असते की आपण नक्की त्यांना काय सांगणार आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची काय उत्तरे देणार? त्यामुळे टाळाटाळ होतांना दिसते. मग या मध्ये लिंगभाव हाही घटक महत्त्वाचा ठरतो. कारण मुले-मुली किशोरवयीन होण्याअगोदर त्यांच्यावर कोणतीही बंधने नसतात परंतु ते वयात येण्यास (मासिक पाळीला) सुरुवात झाल्यानंतर त्यांचे सोबत खेळणे, फिरणे, बसणे हे बंधनकारक आहे असे ठरवले जाते. त्यांना सोबत बसायला, बाहेर खेळायला, फिरायला जायला, एकांतात जायला बंधने घातली जातात.

 पुरुषांचा सहभाग आणि कुरमा प्रथेवर पडणारा परिणाम :

कुरमा प्रथेमध्ये पुरुषाने स्त्रीजवळ जाणे आणि तिला हात लावणे म्हणजे खूप मोठे पाप करण्यासारखे आहे की ज्यामुळे पुरुष हा अशुद्ध होतो. आणि त्याला गावातील सर्वच लोक त्याला खूप मोठे पाप केल्याप्रमाणे बघतात. आणि या सगळ्या स्थितीमुळे कोणताही पुरुष हा त्या कुरमा घराच्या जवळ सुद्धा जात नाही. आणि घरातील स्त्रीला पाळी आली की लगेच त्यांना घराच्या बाहेर जावे लागते त्यांना ही भीती असते की, घरातील पुरुषाने त्यांना हात लागले तर त्यालाही समुदाय काय म्हणेल, आणि भ्रामक संकल्पनामुळे मासिक पाळीच्या वेळेस पुरुष स्त्रियांच्या दूर असतात त्याच प्रमाणे एखाद्या वेळेस स्त्रियांची प्रकृती अजिबात ठीक नसेल आणि अशा वेळेस तिला पाळी आली तर तिला तरी सुद्धा कुरमा घरात जावे लागते आणि त्यांचा परिणाम म्हणजे त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागतो. आणि एखाद्या वेळेस स्त्री कुरमा घरात असेल आणि तिचे अचानक आरोग्य बिघडले तेव्हा काही स्त्रियांनी गावातील लोकांना आरडाओरडा करून बोलाव्या वर सुद्धा तिला हात लावायला कोणताही पुरुष तयार नसतो, त्यामध्ये तिचा पतीसुद्धा काही मदत करत नाही. आणि अशा स्थितीत जर तिचे आरोग्य आणखी बिघडले तर तिची मदत खूप विचार करून आणि स्वतःची जबाबदारी घेऊन केली जाते. म्हणजे यामध्ये विचार करण्याची बाब आहे की, जर एखाद्या स्त्रीचे जीवन धोक्यात आहे आणि आपण रूढी-परंपरा यांचा विचार करतो आहे म्हणजे कुठे असते त्या वेळेस माणुसकी? स्त्रियांना मासिक पाळी येते म्हणून ती अशुद्ध होते का? असे अनेक प्रश्न त्या स्त्रियांनी विचारले काही स्त्रिया या प्रथेमुळे एवढ्या त्रासलेल्या आहेत त्यांचे म्हणणे होते की आम्ही आमच्या मुलींना ही प्रथा पाळू देणार नाही. कारण या प्रथेमध्ये पुरुषांचा सहभाग हा नाहीच्या बरोबर असतो.

कुरमा प्रथेचा आदिवासी समाजावर असलेला प्रभाव

आदिवासी स्त्रियांच्या मुलाखती जेव्हा घेत असताना त्यांना विचारल्या वर की, कुरमा प्रथा तुम्हाला कितपत योग्य वाटते तेव्हा त्यांचे एकच वाक्य होत ते म्हणजे ‘कुरमा घर ही आमची संस्कृती आहे आणि ती आम्हाला पाळावीच लागेल’ त्या शिवाय आमची संस्कृती कशी टिकून राहील? काही स्त्रियांचं वाक्य होते की, आमच्या मुलींना ही प्रथा पाळायला लावू. आणि काही स्त्रियांचं म्हणणे होते की, आम्ही आमच्या मुलींना ही प्रथा अजिबात पाळू देणार नाही. आम्ही जे भोग भोगतोय ते त्यांना नाही भोगू देणार. गावातील बुजुर्ग लोकांचे मत आहे की, ही प्रथा आम्ही स्त्रियांना मासिक पाळीच्या वेळेस आराम मिळावा म्हणून सक्तीने ही प्रथा त्यांना पाळावी लागते, आणि ती प्रथा त्यांनी पाळली नाही तर त्यांना जात पंचायती कळून शिक्षा पण केलेली आहे.

माझा प्रश्न असा होता की, मग तुम्ही त्यांच्या आरामासाठी ही प्रथा सुरू केली असेल, परंतु एखाद्या स्त्रीला त्या कुरमा घरात जायचं नसेल तर तिच्यावर जबरदस्ती का? तिला का शिक्षा दिली जाते?

माडिया-गोंड या समाजामध्ये मासिक पाळीच्या रक्तस्त्रावाला विविध प्रकारच्या पारंपरिक व सांस्कृतिक कारणाने बघितले जाते. आणि त्यामुळे तिच्या आरामाची सुविधा म्हणणाऱ्या या प्रथेमध्ये तिला बहिष्कृत केल्या प्रमाणे घराच्या बाहेर या दिवसामध्ये काढले जाते. आणि तिला त्या कुरमा घरामध्ये जावेच लागते आणि ह्या प्रथेचा प्रभाव एवढा आहे की, या समाजातील स्त्री आणि पुरुष या प्रथेला खूप मानतात.

कुरमा प्रथेबद्दल समाजसेवक, शिक्षक आणि अंगणवाडी सेविकेचे मत

कुरमा प्रथे बद्दल बोलतांना मी जेष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांची भेट घेतली.

त्यांनी सांगितल्या प्रमाणे यांच्या प्रत्येक प्रथा परंपरा वेगळ्या आहेत त्यांच्यात पूर्वापार चालत आलेली कुरमा प्रथा ही एक आहे. आदिवासी स्त्रिया या खूप कष्टाचे काम करतात त्यामुळे त्यांना मासिक पाळीमध्ये आराम मिळावा म्हणून ही प्रथा सुरू झाल्याचे सगळे सांगतात. पण त्यांना तेवढा आराम मिळत नसतो. तेथील एक शिक्षक डी. एम. वाचामी यांनी सांगितले की, या गावातील स्त्रियांना आम्ही नेहमी सांगतो की, ही प्रथा तुम्हाला स्वतःच्या घरातून बहिष्कृत करणारी आहे. त्यानंतर त्यांच्या सोबत गावात आम्ही काही कार्यक्रम घेतो की, या माध्यमातून काही जागृती घडून येईल. तसेच गावात शिक्षिका शिकवायला येत असेल तर तिला त्या मासिक पाळीच्या काळात गावात प्रवेश नसतो तिला तेवढ्या दिवस शाळेला सुट्टी द्यावी लागते. त्याच प्रमाणे अंगणवाडी सेविका बबिता वाचामी यांचे म्हणणे होते की, मला जेव्हा पाळी येते तेव्हा आमचा प्रवेश बंद असतो कारण त्यांचे मत असे आहे की, तुम्ही अशुद्ध होऊन आमच्या मुलांना अन्न देऊ शकत नाही, आणि तुम्ही अशा परिस्थितीत गावातून जाऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना तेवढे दिवस गावात जाता येत नाही आणि त्यांना सुद्धा ही प्रथा पाळण्याची सक्ती केली जाते.

अशा प्रकारे आदिवासी स्त्रियांनी आणि तेथील शिक्षक, समाजसेवक, अंगणवाडी सेविका यांनी आपल्या अनुभवातून या प्रथेबद्दल सांगितले.

 निष्कर्ष

या विषयाचे संशोधन करतांना कुरमा प्रथेमुळे आदिवासी समाजातील समज आणि या परंपरेमुळे पाळत आलेल्या त्यांच्या रूढी-परंपरा यांचा मोठा पगडा तेथील स्त्रियांच्या जीवनावर पडलेला दिसून येतो. ही प्रथा त्यांच्या आयुष्यात कितपत योग्य आहे किंवा यामुळे त्यांच्यावर मानसिक, शारीरिक आणि सामाजिक या परिस्थितीचा जो परिणाम होतो त्यामुळे त्यांचे जीवन कशा प्रकारे घडले जाते यावर विचार करण्यासारखी बाब आहे. आपण विचार करतो की, आदिवासी समाजामध्ये मातृसत्ताक पद्धती अजूनही आहे, परंतु ही खरोखरच पाळली जाते का? किंवा स्त्रियांना अशा प्रकारे बहिष्कृत करून त्यांच्या आरोग्याचा विचार आम्ही करतो म्हणून त्यांना मासिक पाळीच्या वेळेस गावाच्या बाहेर आरामासाठी पाठवले जाते असे म्हटले जाते. या गोष्टीचा विचार करण्याची वेळ आली आहे. त्या झोपडीत त्यांना खरेच आराम मिळतो का? की कोणत्या ना कोणत्या समस्येला सामोरे जावे लागते, त्याचप्रमाणे त्यांना मासिक पाळीत होणाऱ्या रक्तस्त्रावाला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघितले जाते. यामध्ये लैंगिकता तेवढीच महत्त्वाची बाब आहे कारण स्त्रियांना अशुद्ध मानायचे आणि पुरुष शुद्ध असतो हे दाखवले जाते. सर्वच प्रथा परंपरा स्त्रियांनीच का पाळाव्यात याचेही प्रतिबिंब कुरमा प्रथेतून दिसून येते. या प्रथेच्या माध्यमातून स्त्रिया अशुद्ध आणि दुय्यम असल्याचे दाखवले जाते. त्यांना ज्या प्रकारे गावाच्या मुख्य रस्त्यावरून जाण्यास निर्बंध, घरातील वस्तूंना हात लावण्यास मनाई, गावाच्या वेशीत येण्यास मनाई या सर्वांमधून असे लक्षात येत आहे की, २१ व्या शतकामध्ये स्त्रियांना अशी परिस्थिती सोसावी लागत आहे याच्यापेक्षा कोणती दुर्दैवाची बाब असावी.

आपण डिजिटल इंडियाचे स्वप्न बघत आहोत पण त्याच वेळी देशातील बहुतेक राज्यातील आदिवासी भागामध्ये मासिक पाळीविषयी वेगवेगळ्या भ्रामक परंपरा असल्याचे दिसून येतात. स्त्रियांना आराम करण्यास सांगून बहिष्कृताचे जीवन जगण्यास भाग पाडले जाते. त्यांना समाजाच्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते आणि याचा परिमाण म्हणजे त्यांना स्वतःचा जीव गमवावा लागतो.

कुपोषण आणि रक्ताक्षय आजारामुळे स्त्रियांच्या आरोग्यावर फारच वाईट परिणाम होत असतो. तरी सुद्धा या प्रथेच्या विरोधात कुणी बोलायला तयार नाही किंवा कोणते कार्यक्रम त्यांच्यासाठी ठेवले तर तर फक्त बघून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. शाळा शिकणाऱ्या मुलींनी त्यांना जाब विचारला तर त्यांचे शिक्षण बंद केले जाते आणि लग्न लावून दिलेले दिसतात, त्यामुळे जात पंचायती समोर या भीतीने कुणी बोलायला तयारच नसतात.

आता कोरोनाच्या काळात कोणीच कोणाला मदत करायला तयार नसताना आणि जगण्याचे इतर प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत असताना आदिवासी स्त्रियांच्या आरोग्याचे प्रश्न कधी आणि कसे सुटणार, कोण सोडविणार हा आमच्या मनात पडलेला प्रश्न आहे.

श्रद्धा बडवाईक, या जन स्वास्थ्य सहयोग /NHM मध्यप्रदेश येथे प्रकल्प सहायक आहेत.

प्रा. संजयकुमार कांबळे,  हे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र ,सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत.

 मराठी भाषेतील संदर्भसूची:

१.देशपांडे, ए.,(२००४): “एका‘शापा’ची जन्मकथा, मासिक पाळी: एक सामाजिक-सांकृतिक शोध”, लोकवाङ्मय गृह, मुंबई,

२. बंग,आर., (१९९९): “कानोसा”, ग्रंथाली, इंडियन एज्युकेशन सोसायटी, मुंबई,

३. बारसागडे डी.(२०१८): “परंपरेचे बळी कुरमाघर”,(लोकसत्ता चतुरंग)पा .नं .१-६

४. नरे-पवार, संध्या (२०१९): “कुरमा घर संवादी व्हावे”, ( पुण्य-नागरी रविवार विशेष )पा.नं .३

५. मनोरमा, स्वातीजा (२०१६): “मासिक पाळी जननक्षमत आणि स्त्रिया”, परिवर्तनाचा वाटसरू,संपा .अभय कांता

६ . आवड, एस., ए., करंदीकर(२०१६): “ स्त्रीची मासिक पाळी, समतेची होळी” परिवर्तनाचा वाटसरू,संपा .अभय कांता

७ . क्षीरसागर, डी.,(२०१७): “विद्यापीठातील उच्चशिक्षण घेणाऱ्या मुलींच्या मासिक पाळीकडे बघण्याचा दृष्टीकोन व तडजोडी: लिंगभाव परिप्रेक्षातून”, (पुणे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले स्त्री अभ्यास केंद्र, संशोधन, पुणे विद्यापीठ)

  इंग्रजी भाषेतील  संदर्भ साहित्य :

  1. Clarke, A ., R., Diane(1978): “Adolescents beliefs concerning menstruation child development.
  2. Culpepper,E.,Ankori,G., King,k., Peck,S. And C. Highbaugh (2006): “positively Breaking Taboos: Why and How I Made the Film “Period Pice” [with Responses]”,Indiana University Press,22(2)PP 125 – 153
  • Harcourt, W (2009): “Body politics in development: critical debates in gender and development”, (zed book Ltd,7cythia street, London,new York)
  1. Manorama, S watijia (1996): “Towards a new perspective on women’s bodies, learning and unlearning together” (Economic & Political Weekly)
  2. Wikipedia, htt:://en. Wikipedia. Org/wiki/menstruation.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0