लेफ्टिस्ट सुफी सईद मिर्झा

लेफ्टिस्ट सुफी सईद मिर्झा

पुण्यात १७ ते ३१ जानेवारी दरम्यान ‘आयसीए’ चित्रपट महोत्सव होत आहे. सामान्य माणसांचे जगण्याचे आयाम दाखवणारे दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झा यांना या महोत्सवामध्ये जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या कारकीर्दीवर टाकलेला प्रकाश.

पत्रकार खशोगींची हत्या सलमान यांच्या आदेशानुसार  
मान्सून केरळमध्ये, राज्यात आठवडाभरात पावसाची शक्यता
जात प्रमाणपत्र, जातपडताळणीची प्रक्रिया एकत्रितपणे होणार

“आम इन्सान को फिल्मो मे नजर आना चाहिए था, लेकिन वो अखबार के हादसो में नजर आता है. यही बडा हादसा है.’’

प्रख्यात दिग्दर्शक सईद अख्तर मिर्झांची ही तक्रार आहे. पण, केवळ तक्रार करून ते थांबले नाहीत. आपल्या सिनेमात त्यांनी आम आदमीची गोष्ट सांगितली. स्वप्नाळू प्रेमकहाण्या, काळ्या पांढऱ्या रंगातले नायक-खलनायक, मसालेदार चित्रपटांची रेलचेल, हा बॉक्स ऑफीसच्या गल्ल्यावर हमखास यश मिळवून देणारा हिंदी सिनेसृष्टीतला हमरस्ता होता. त्याचवेळी माणसाच्या रोजच्या गोष्टी सांगणाऱ्या, ठोस राजकीय – सामाजिक विधान करणाऱ्या सिनेमांची पाऊलवाटसुद्धा होती. सईद मिर्झांनी हमरस्त्याऐवजी पाऊलवाट निवडली.

वर्तमानपत्राच्या कागदावर केवळ एका नावापुरतं अस्तित्व असणाऱ्या सामान्य माणसाला सईद मिर्झांनी पडद्यावर आणलं. त्याच्या अभिव्यक्तीला आवाज दिला. भौतिक परिस्थितीत जखडलेल्या व्यक्तीची जगण्यातील अपरिहार्यता दाखवली. त्यातील द्वंद्व दाखवलं. माणसाच्या आत्मशोधाची प्रक्रिया सांगितली.

सईद मिर्झांचा जगाकडे पाहण्याचा एक स्वतंत्र दृष्टीकोन आहे. त्या आधारे ते समाजाचं विश्लेषण करत आले. त्यामुळे त्यांची कलाकृती ही त्यांच्या स्वतःच्या आत्मशोधाची प्रक्रिया सुद्धा आहे. त्यामुळे तिच्यात ब्रह्मसत्य सांगितल्याचा आव नाही. पण, स्पष्टता नक्कीच आहे.

माणसाच्या आयुष्याला सभोवतालची परिस्थिती नियंत्रित करत असते. कार्ल मार्क्स म्हणतो, तसं इतिहास घडवणारा माणूसच असतो. पण, परिस्थितीच्या चौकटीत राहूनच त्याला तो घडवावा लागतो. आयुष्याबद्दल आपण काही ठरवण्याआधी परिस्थितीने आपल्यासाठी आधीच बरंच काही ठरवलेलं असतं. पण, बाजारू व्यवस्थेचे पालनकर्ते या गोष्टीकडे आपल्याला दुर्लक्ष करायला लावतात. व्यक्तीचं कर्तृत्व अवास्तव फुगवून सांगतात. स्काय इज द लिमीट वगैरे थोतांड सुविचार माथी मारतात. त्यामुळे परिस्थितीला लक्षात न घेता, बऱ्याचदा श्रम आणि वेळ वाया जातो. मनातल्या भ्रमाला आपण चिकटून बसतो आणि मग फसगत होते. जात, वर्ग माणसाच्या जगण्याला नियंत्रित करतात. हे सईद मिर्झांनी आपल्या सिनेमातून दाखवलं.

‘अरविंद देसाई की अजीब दास्तान’ आणि‘ अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है’, हे मिर्झांचे दोन लागोपाठचे क्लासीक सिनेमे. यातील अरविंद आणि अल्बर्ट हे दोघे वेगवेगळ्या जात, वर्गातील तरुण आहेत. जात, वर्ग अरविंद आणि अल्बर्टच्या आयुष्यावर काय परिणाम करतात, हे मिर्झांनी सांगितलं आहे. अरविंद आणि अल्बर्टच्या आत्मशोधाच्या या कथा आहेत.

अरविंद देसाई एका श्रीमंत कुटुंबातला मुलगा आहे. वडिलांचं हँडीक्राफ्टचं दुकान चालवतो. ही त्याची आवड आहे म्हणून तो करतोय असं नाही. तर वडिलांचा व्यवसाय मुलानेच चालवायचा असतो, ही रीत आहे म्हणून तो दुकान बघतोय. यात त्याचं मन रमत नाही. पण, नेमकं काय करायचं हेही माहित नाही. अरविंद स्वतःच्या शोधात आहे. पण, व्यवस्थेने बहाल केलेलं व्यक्तीमत्व घेऊनही तो जगतोय. ते टाकून देण्याइतकी त्याची तयारी नाही. उच्चशिक्षीत, संवेदनशील अरविंदवर बुर्झ्वा वर्गातील अरविंद देसाई सतत मात करत राहतो. कला, राजकारणाच्या गप्पा त्याला खुणावतात. पण, धंद्याच्या गोष्टी स्वस्थ बसू देत नाहीत. अरविंद द्विधा मनस्थितीत अडकून पडला आहे. विसंगती हा त्याच्या आयुष्याचा स्वभाव बनलाय. वडिलांच्या व्यक्तीत्वातून जाणवणारा सत्तेचा प्रभाव त्याला काचतो, पण सोडवतही नाही. सेक्रेटरी एलिससोबत हळवे निवांत क्षण घालवणं त्याला आवडतं. पण, तिचं मत तो ग्राह्य धरत नाही. त्याला तिच्या मताशिवाय ती पाहिजे. दुकानातील नोकर महेश आणि गोपाल आर्थिक घोटाळा करत आहेत हे त्याला समजतं. तेव्हा तो गोपालला नोकरीवरुन काढून टाकतो. महेश नातेवाईक असल्याने त्याच्यावर कुठलीही कारवाई होत नाही. हाच प्रश्न एलिस त्याला विचारते, की भ्रष्टाचार तर दोघांनीही केलाय. मग नोकरीवरुन फक्त गोपाललाच का काढलं? तेव्हा अतिशय अपमानस्पदरीत्या अरविंद एलिसला गाडीतून खाली उतरवतो. जिच्यासोबत वेळ घालवणं चांगलं वाटत होतं, तिचा एक प्रश्नही त्याला सहन होत नाही.

या सगळ्या प्रवासात मार्क्सवादी मित्र राजनसोबत त्याचा संवाद होत राहतो. राजनच्या जगण्याशी स्वतःच्या जगण्याची तो नकळत तुलना करत राहतो. राजनलाही परिस्थितीच्या चौकटी आहेत. पण, तो सगळ्या परिस्थितीबद्दल जागृत आहे. जगण्याबद्दल त्याचा विशिष्ट दृष्टीकोन आहे. परिस्थितीत जखडलेला असला तरी तिच्यात तो वाहवत जात नाही. प्रश्न विचारत राहतो. या गोष्टींची अरविंदला त्याच्यासोबतच्या संवादातून जाणीव होते. पाण्याच्या प्रवाहात अडकलेल्या गवताच्या काडीसारखा अरविंद दिशाहीन, सैरभैर आहे. हातात पिस्तूल घेऊन तो स्वतःला संपविण्याचा प्रयत्न करतो. पण, स्वतःचा शेवटही तो निश्चित करू शकत नाही. तेव्हा अरविंदची कीव येते.

आपण मेहनत घेतली की यशस्वी होऊ. आपण भले नी आपले काम भले. भोवतालच्या परिस्थितीशी, संघर्षाशी आपलं देणं घेणं नाही. अशी भाबडी समज घेऊन जगणारे अनेक जण असतात. भांडवलशाहीने तयार केलेला निखळ स्पर्धेचा आभास त्यांना लुभावतो. प्रतिष्ठेच्या मृगजळात ते तरंगत राहतात. अशीच भाबडी समज घेऊन जगणारा तरुण म्हणजे अल्बर्ट पिंटो. निम्नवर्गीय ख्रिश्चन समुहातून येणारा अल्बर्ट स्वतःला वस्तुस्थितीपासून वेगळं करतो. पण, भोवतालच्या घटना त्याला त्याचं समाजातील स्थान दाखवून देतात आणि सरतेशेवटी अल्बर्ट आपल्या सामाजिक ओळखीपाशी (identity) पोहोचतो. समाजातील वर्गीय स्थानानुसार आपली जगण्याची आव्हानं वेगवेगळी असतात. त्यामुळे त्यांना द्यावं लागणारं उत्तरही वेगळंच असतं. अल्बर्टला ही गोष्ट उमगते.

मोटर मॅकेनिक असणारा अल्बर्ट त्याच्या वर्गीय जाणीवेपासून अनभिज्ञ असतो. दुरुस्तीसाठी आलेली महागडी गाडी फिरवून आणली. श्रीमंत घरातील पोरांना आरेतुरे केलं, म्हणजे आपण त्यांच्या रांगेत जाऊन बसलो या भ्रमात तो राहतो. त्यामुळे युनियनच्या (त्याच्यामते) नसत्या उद्योगात पडलेल्या वडिलांचं मत त्याला पटत नाही. युनियनमुळे आजपर्यंत कुणाचंही भलं झालं नाही. हा त्याच्या श्रीमंत ग्राहकांनी सांगितलेला विचार त्याला पटतो. त्याचं सामाजिक स्थान तो नाकारत राहतो. पण, त्याच्या आजूबाजुच्या लोकांना ते पक्कं माहीत असतं. ते यात कधीच गल्लत करत नाहीत. अशाच एका श्रीमंत घरात गाडी सोडायला गेल्यानंतर अल्बर्टला याची जाणीव होते. कदाचित पहिल्यांदाच. त्या घरातील बाईच्या अदबीने वागण्यातही एक प्रकारचा दर्प आहे. ती आपल्याला ‘त्यांच्यातला’ समजत नाही. हे त्याला लख्ख दिसतं. सरतेशेवटी संप करणं, आंदोलन करणं हे गुंडांचं काम आहे हे त्याचं मत गळून पडतं. आपल्यासारख्या लोकांना समाजात मानाने जगायचं असेल, हक्क अधिकार मिळवायचे असतील, तर याशिवाय पर्याय नाही याबद्दल त्याला खात्री पटते. अल्बर्टमधल्या वर्गीय जाणीवांचा हा प्रवास सईद मिर्झांनी अतिशय परिणामकारकरीत्या दाखवला आहे.

श्रमीकांच्या जीवनाविषयी प्रचंड आदर आणि माणसाच्या समूह जीवनाबद्दलचा विश्वास या सईद मिर्झांच्या दोन अढळ निष्ठा आहेत. आपल्या प्रत्येक चित्रपटात ते याला अधोरेखीत करतात. एखादी छोटी फ्रेम, संवाद, एखाद्या प्रसंगातून ही गोष्ट ते सारखं सारखं सांगत राहतात. अरविंद देसाईतील सुरुवातच याबद्दल खूप काही सांगून जाते. पहिल्याच दृष्यात एक दुर्गम खेडं दिसतं. तिथं राहणाऱ्या लोकांचे रोजचे व्यवहार. मग, धागे विणणाऱ्या कामगार महिला. हे दृश्य संपतं एका चकचकीत दुकानात टांगलेल्या नक्षीदार गालीच्यावर. कामगारांच्या श्रमातून तयार झालेली वस्तू अलिशान दुकानात विक्रीला ठेवली जाते. त्या वस्तूंनी श्रीमंतांचे दिवानखाने सजतात. पण, कामगारांच्या घरात मातीच्या चूली, तुटलेली बाज आणि विटक्या भांड्याशिवाय काही दिसत नाही. त्यांनीच बनवलेल्या वस्तूंवर त्यांचा अधिकार राहत नाहीत. त्या वस्तू त्यांच्यासाठी उपयोगी असत नाहीत. ही वस्तुस्थिती सईद मिर्झा ठळकपणे दाखवतात. ज्या वस्तूंचा तुम्ही उपभोग घेता त्यामागे कुणाचे तरी श्रम आहेत हे सांगतात.

‘अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यो आता है’ या सिनेमातही हा धागा दिसतो. श्रमिकांचे श्रम वापरून घेणारी, पण त्यांचे अधिकार नाकारणाऱ्या भांडवलदारी मुल्यव्यवस्थेला यात सईद मिर्झांनी उघडं पाडलं. संप करणं हे गुंडांचं काम आहे, हे पद्धतशीरपणे ठसवण्यात ही मुल्यव्यवस्था यशस्वी होते. इतकी की ज्याची पिळवणूक होते तोही हे मान्य करतो. वेतनवाढीसाठी अल्बर्टचे वडील संपात सहभागी होतात. पण, अल्बर्टला ही गोष्ट पटत नाही. युनियन करणं हे गुंडांचं काम असतं, या त्याच्या बुर्झ्वा मित्रांच्या सांगण्यावर त्याचा विश्वास असतो. पण, स्वतःच्या वडिलांवर मालकाकडून गुंडांकरवी हल्ला होतो. तेव्हा अल्बर्ट विचार करायला लागतो. फक्त वेतन वाढवून मागणाऱ्या वडिलांवर का हल्ला व्हावा? त्यांनी तर आजवर कुणाचही वाईट केलेलं नाही. तेव्हा त्याला भांडवली व्यवस्थेची लबाडी कळून येते. आजही शेतकरी, कामगार आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरतात. तेव्हा माध्यमांच्या बातम्यात त्यांची मागणी नंतर येते. आधी येतात मोठमोठे मथळे, ‘शेतकऱ्यांच्या संपामुळे वाहतूक कोंडी’, ‘आंदोलनामुळे सामान्यांचे हाल’,’संपामुळे सरकारचे अमुक कोटींचे नुकसान’… श्रम करणाऱ्यांनी फक्त श्रम करत राहावे. त्याचा मोबदला मागू नये. तो मागितला तर ते विघ्नसंतोषी ठरतात. इतर वर्गापासून त्यांना तोडलं जातं. खलनायक ठरवलं जातं. शासन व्यवस्था जर कामाचा मोबदलाही देत नसेल तर श्रमिकांना संघटना आणि आंदोलनाशिवाय पर्याय उरतोच कुठे?  आजकाल तथाकथीत तटस्थ राहण्याची किंवा समतोल भूमिका घेण्याची फार वकिली केली जाते. अशा परिस्थितीत सईद मिर्झा निखालस पक्षपाती आहेत. ते श्रमिकांची बाजू ठामपणे घेतात आणि त्याबद्दल कुठलाही संकोच बाळगत नाहीत.

समूह भावना ही मानवाची मूळ भावना आहे. माणसाला आयुष्य जगण्यासाठी सहवास, सहकार्याची गरज असते. माणसाचं अस्तित्व सहअस्तित्वावर अवलंबून असतं. या गोष्टीवर सईद मिर्झांचा विश्वास आहे. डाव्या मार्क्सवादी विचारांवर त्यांची निष्ठा आहे. डाव्या विचारांना त्यांनी जीवनमूल्य बनवलं आहे. एका मुलाखतीत ते डावं असणं म्हणजे काय हे सांगताना म्हणतात, “’एखादा माणूस खाली पडत असेल, तर त्याला हात देऊन उभा करणं म्हणजे डावं असणं.’’  त्यामुळे या सहअस्तित्वाची गरज ते वारंवार व्यक्त करतात.

आपल्या बायकोसोबत चाळीच्या दुरुस्तीसाठी लढणारा मोहन जोशी हतबल होऊन रस्त्याच्या कडेला बसतो. तेव्हा समोरून कामगारांचा मोर्चा जात असतो. तो मोर्चा पाहून मोहन जोशी म्हणतो, “किती चांगलं आहे की हे सगळे मिळून आपल्या हक्कांसाठी लढत आहेत.’’ सगळ्यांच्या हीतासाठी लढणाऱ्या जोशीला बायकोशिवाय कुणाचीच साथ मिळत नाही. कातडी बचावण्याची ही सुद्धा मानवी प्रवृत्तीच आहे,. जोपर्यंत बदलाची शक्यता दिसत नाही तोवर माणूस जोखीम पत्करत नाही. धोका पत्करून पुढाकार घेणारा कुणी मिळाला, तर मात्र माणसं लढायला तयार होतात. समूहाच्या शक्तीची जेव्हा त्यांना जाणीव होते तेव्हा बलिदानासाठीही तयार होतात. ‘मोहन जोशी हाजीर हो’मध्ये शेवटी हे दिसतं. मोहन जोशीला वेड्यात काढणारे सर्व लोक त्याच्या नावाचा जयघोष करतात. माणूस कातडीबचाऊपणा, स्वार्थ आणि सहकार्याचं अजब मिश्रण आहे. सईद मिर्झांना माणसाचे गुणावगुण बरोबर कळले आहेत.  ‘नुक्कड’ या दूरदर्शनच्या मालिकेत सुद्धा हेच सहअस्तित्व दिसतं. वेगवेगळ्या जात, धर्म, भाषा, प्रांताचे लोक सोबत राहतात. एकमेकांच्या सुख-दुःखात साथ देतात. एकमेकांना समजून घेतात. माणसाचं माणसाशी असणारं हे विशुद्ध नातं आहे. पण, कदाचित असं निर्मळ नातं बांधण्याची आपली क्षमताच काळाने हिरावून घेतलीय. या काळाने माणसाला सुटं सुटं करून टाकलय. जिथं माणूस उजाडलेल्या बेटासारखा एकटाच राहतो. सामुहीक अविश्वासाचा हा काळ आहे. जेव्हा दुसऱ्याचं मन जाणून घेण्याची आणि देण्याची प्रक्रिया थांबत असेल, तेव्हा मनाच्या वाटा अरुंद होत जात असाव्यात. ‘नुक्कड’सारख्या मालिका पाहिल्या की मनाच्या नात्यांवर विश्वास ठेवावा वाटतो. ‘नुक्कड’मधील पात्रं एकमेकांना साथ देतात. एकमेकांना पुढे जाण्यासाठी प्रेरीत करतात. एवढंच नाही तर सामाजिक,राजकीय परिस्थितीवर व्यक्त होतात. आपल्या स्थितीचं विश्लेषण करतात. त्यामुळे बौद्धीक समज फक्त उच्चशिक्षीत वर्गामध्येच असते असं नाही. तर, या फाटक्या तुटक्या सामान्य माणसांमध्येही असते. सामान्य माणसाच्या विवेकबुद्धीविषयी सईद मिर्झा अशाप्रकारे विश्वास व्यक्त करतात आणि माणसातील अंगभूत सामूहीक प्रेरणेलाही अधोरेखीत करतात.

सईद मिर्झांच्या आणखी दोन कलाकृती आजच्या तारखेला अतिशय महत्वाच्या आहेत. ‘नसीम’ आणि ‘सलीम लंगडे पे मत रो’. स्वतंत्र झाल्यावर भारताने लोकशाही, समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष संविधानाचा स्वीकार केला. समाजवादी मुल्यांना मागे सोडून आपल्याला बराच काळ लोटलाय. आता लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेला नष्ट करण्याकडे आपली वेगाने वाटचाल सुरू आहे. राम मंदिर आंदोलनाने याची सुरूवात झाली. बाबरी विध्वंसानंतर तिला पहिला जोरदार धक्का बसला आणि आज राम मंदिराच्या शिलान्यासाने तिच्या ऱ्हासाचाच शिलान्यास झालाय. सलीम लंगडा आणि नसीम या प्रक्रियेच्या महत्वाच्या दोन टप्प्यांना रेखांकीत करणाऱ्या कलाकृती आहेत. अल्पसंख्यकांना बहुसंख्यकांचे आश्रित म्हणून राहावं लागेल, हे सत्ताधिशांनी आता निश्चित केलंय. अल्पसंख्यक विशेषतः मुस्लिमांच्या राजकीय, सांस्कृतिक प्रतिकांवर जबरदस्त हल्ले चढवले जात आहेत. एका मोठ्या समुहाच्या आकांक्षा ठेचून काढण्याचं काम सुरू आहे. दिवसाढवळ्या मशीद पाडली जाते. एखाद्या शहराचं नाव बदलणं तर सहज झालंय. ‘लव्ह जिहाद’च्या नावाने मुस्लिमांना घाबरवण्यासाठी कायदे बनवले जात आहेत. मुस्लिमांच्या राष्ट्रीयतेला आव्हान देणारे कायदे बनवले जात आहेत. पण, प्रतिकार होत नाही. नफेबाज भांडवलाने माध्यमांना (चित्रपटही यात आले) गिळंकृत केलय. लेखक, कवी आपल्या जातीच्या, गटाच्या गोतावळ्यात मश्गूल आहेत. स्वतः मुस्लिम समूहाने सर्व आशा सोडून दिल्या आहेत. बहुसंख्य हिंदूंना या गोष्टी सध्यातरी सुखावह वाटत आहेत. त्यामुळे सलीम आणि नसीमची आजची स्थिती नेमकी काय हे दिसत नाहीये.

पण, हा काळ सुरू होण्याच्या सुरुवातीला सईद मिर्झांनी ‘सलीम लंगडे पे मत रो’ बनवला. परिघाबाहेर फेकल्या गेलेल्या मुस्लिम समूहाची ही कथा आहे. सतत संशयाच्या भोवऱ्यात असणाऱ्या नागरिकत्वाला सिद्ध करता करता मुस्लिमांची अर्धी शक्ती खर्ची होते. त्यात किमान माणूस म्हणून जगण्याच्याही सर्व संधी हिरावल्या जातात. शिक्षण, रोजगार अप्राप्य वस्तू बनतात. मग दिशाहीन मुस्लिम तरुण जगण्याच्या तडजोडी करत राहतो. जगणं सुधारेल या आशेने गुन्हेगारीच्या काळ्या दुनियेत खोल बुडत राहतो. ‘सलीम लंगडे पे मत रो’ मुस्लिमांना आत्मपरिक्षण करायलाही लावतो. एकीकडे गुन्हेगारी दुनियेत स्वतःचा उत्कर्ष बघणारा सलीम आहे. पण, दुसरीकडे शिक्षण घेऊन आधुनिकतेची वाट धरणारा अस्लम सुद्धा आहे. बहुसंख्यकांनी अल्पसंख्यकांना सामावून घेणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे अल्पसंख्यकांनीही आपल्यातील कट्टरतेशी, अंधश्रद्धांशी लढणं गरजेचं आहे. घेट्टो बनवून जगण्याची सवय सोडून देणं गरजेचं आहे. कुठलाही बंदिस्तपणा विचारांची वाढ खुरटून टाकतो. ‘लोगो को अंधेरे मे जिने की आदत लगी है’, असं अस्लम सलीमला म्हणतो. परिस्थिती तुम्हाला अंधारात ढकलायला टपलेली आहे. पण, जोर लावून तुम्ही बाहेर पडू शकता, असं सलीमला समजावून सांगतो. त्याच्या म्हणण्यानुसार सलीम उजेडात येण्याची तयारी दाखवतो. पण, त्याची भूतकाळातली भूतं हे होऊ देत नाहीत. सलीम लंगडा किंवा अल्बर्ट पिंटोचा भाऊ डॉमनिक परिस्थितीला बळी पडून दिशाहीन झालेल्या व्यक्ती आहेत. तर अल्बर्ट आणि अस्लम, जगण्यावर निष्ठा असणाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत.

बाबरी विध्वंसानंतर सईद मिर्झांनी नसीम बनवली. देशाच्या फाळणीनंतर अनेक मुस्लिम कुटुंबं विश्वासाने भारतातच राहिली. बाबरीच्या विध्वंसाने त्या विश्वासाला सुरुंग लागला. आज केवळ मुस्लिमांच्या मनातच असुरक्षितता आहे असं नाही. तर संपूर्ण भारतच स्वतःच्या मनातला विश्वास गमावून बसला आहे असं म्हणावं लागेल. परस्पर सौहार्द, परस्पर संबंध, एकमेकांच्या जगण्याचा आदर सर्वच गोष्टी संपत चालल्या आहेत. सईद मिर्झांसारख्या संवेदनशील कलाकाराला ही गोष्ट पेलवणारी नव्हती. ज्या निष्ठा आणि मुल्य घेऊन ते जगत आले. त्यांचीच मांडणी चित्रपटातही करत आले. पण, त्या सगळ्याच गोष्टी अशा निरर्थक झाल्याचं डोळ्यासमोर दिसलं. तेव्हा, स्वतःच्याच निष्ठा पुन्हा एकदा तपासण्याची गरज असल्याचं त्यांना जाणवलं. ते संपूर्ण भारतभर फिरले. तेव्हा त्यांना जाणवलं की बहुसंख्य लोकांना शांती हवीय. पण, काहीतरी बिनसलय. खरा कलाकार, साहित्यिक वस्तुस्थितीचं चित्रण तर करतोच. पण, तिचं विश्लेषणही करतो. समाजातीलच चांगल्या गोष्टी गोळा करून त्या परत परत समाजाला सांगण्याचं कामही करतो. सईद मिर्झांनी त्यांच्या चित्रपट, मालिक, माहितीपटातून हे काम केलं. सध्या ते लिखाणातून हेच करत आहेत. सईद मिर्झा स्वतःला लेफ्टिस्ट सुफी म्हणवतात. परंपरेतील उदात्तता आणि आधुनिकतेतील उदारता यांचा मिलाफ साधणारी संज्ञा त्यांनी हुडकून काढलीय. निष्ठा आणि श्रद्धा हरवून बसलेला हा काळ आहे. अशा काळात परत एकदा आपल्या श्रद्धा शोधण्याची गरज आहे. सईद मिर्झा स्वतः ते करत आहेत. पण, त्यांच्यासारखा कलाकार समाजालाही आपल्या श्रद्धांपर्यंत पोहोचण्यास मदत  करत असतो. सईद मिर्झा ते काम नेहमी करत राहतील यात शंका नाही.

(आयसीए चित्रपट महोत्सव सर्वांसाठी विनाशुल्क आहे.)

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0