काही काश्मीरी पंडितांची मानसिकता

काही काश्मीरी पंडितांची मानसिकता

मला असं आढळून आले की माझे काश्मीर पंडित बांधव मुस्लीमांचा प्रचंड प्रमाणात द्वेष, मत्सर करतात. त्या मत्सरापायी ते काश्मीरी मुस्लीमांवरील होणाऱ्या अत्याचाराकडे दुर्लक्ष करताना दिसतात.

जम्मू व काश्मीर आणि लडाखचे नवे (वादग्रस्त) नायब राज्यपाल
काश्मीरमध्ये नामांतराचे प्रयत्न सुरू
काश्मीरमध्ये न्यायव्यवस्था विस्कळित

काही दिवसांपूर्वी मी indicanews.com. या वेबसाइटसाठी An appeal to my Kashmiri brothers and sisters,’ या शीर्षकाखाली लेख लिहिला होता. या लेखात मी भारतीय राज्य घटनेच्या ३७० कलमाने जम्मू व काश्मीरला दिलेला विशेष दर्जा भारतीय संसदेने रद्द केल्यानंतर गेले ६० दिवस तेथील परिस्थिती चिंताजनक झाली असून सामान्य काश्मीरी नागरिकाचे जगणे कष्टप्रद झाल्याचे म्हटले होते. त्याचबरोबर काश्मीर खोऱ्याच्या बाहेर राहणाऱ्या या नागरिकांच्या नातेवाईकांनाही त्याची झळ बसत असल्याचा मुद्दा मांडला होता. सध्याच्या जमान्यात इंटरनेट व मोबाइल या काही चैनीच्या वस्तू राहिलेल्या नाहीत तर त्या जीवनाश्यक बाब असून त्यापासून दोन महिने एखाद्याला वंचित करणे हे त्याचे जीवन ध्वस्त करण्यासारखे आहे असे मुद्दे लेखात मांडले होते.

त्या लेखात मी काश्मीरी नागरिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घ्यावी असे आवाहन केले होते आणि त्यासाठी त्यांना काही मुद्दे सूचवले होते.

हे मुद्दे असे होते :

एक : सरकारच्या दडपशाहीचा निषेध म्हणून प्रत्येक काश्मीरी नागरिकाने त्याच्या डाव्या मनगटावर काळी फित बांधावी.

दोन : राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यावर सर्व नागरिकांनी बहिष्कार घालावा. कारण माझ्या मते ही व्यक्ती ‘मॉर्डन निरो’ असून श्रीनगरमध्ये बसून एका माफिया संघटनेची धोरणे (यांचा म्होरक्या व त्याचे समर्थक दिल्लीत आहेत) सत्यपाल मलिक राबवत आहेत.

तीन :  १० ऑक्टोबरला काश्मीर खोऱ्यात पर्यटकांना येण्यास परवानगी  देण्यात आली होती. या पर्यटकांना काश्मीरींनी कोणतीही सेवा देऊ नये. जो पर्यंत काश्मीरमधील परिस्थिती सुरळीत होत नाही. सामान्य काश्मीरी नागरिकाला माणसासारखे वागवले जात नाही व त्याच्यावरचे निर्बंध हटवले जात नाहीत तोपर्यंत पर्यटकांची कोणतीही सेवा करू नये.

चार : दिल्लीतल्या केंद्र सरकारला देशाची अर्थव्यवस्था व्यवस्थित सांभाळता येत नसल्याने व आर्थिक प्रश्न सोडवण्यात या सरकारला अपयश येत असल्याने लोकांचे लक्ष अन्य विषयांवर केंद्रीत व्हावे म्हणून ३७० कलम हटवल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. अशा या आशयाची, मुद्द्यांची पत्रक संपूर्ण काश्मीरमध्ये वाटण्यात यावी. तसा प्रचारही करावा.

माझ्या या आवाहनावर काही काश्मीरी पंडितांकडून मला इमेल आले.

एका इमेलमध्ये एक सद्गृहस्थ म्हणतात,

प्रिय सर, नेताजी सुभाषचंद्र यांनी जसे हद्दपार असताना देशाबाहेर एक सरकार स्थापन केले होते, तसे सरकार आपण स्थापन करावे. आणि माझी खात्री आहे की, तुमचे हे सर्व विचार इम्रान खान यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये वाचून दाखवले आहेत. आणि ते तुम्हाला असे सरकार स्थापन करण्यास मदत करून या सरकारचे राष्ट्रपतीपद देतील.

जय हिंद.

दुसरा इमेल असा होता :

ह्युस्टनमध्ये ज्या लोकांनी नरेंद्र मोदी यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले ते सर्व माझे मित्र आहेत. ते लोक मूर्ख नाहीत. माझ्या त्यांना पाठिंबा आहे. आपल्या श्रद्धा वेगवेगळ्या असतील पण आपण एकमेकांशी संवाद साधला पाहिजे, सुसंस्कृतता जपली पाहिजे.

हे दोन इमेल काश्मीर पंडितांची मानसिकता दर्शवतात.

मी स्वत: काश्मीर पंडित आहे आणि ९०च्या दशकात काश्मीर खोऱ्यात काश्मीरी पंडितांवर कसे अत्याचार झाले, दहशतीमुळे त्यांना खोरे सोडून कसे पलायन करावे लागले, याची मला पूर्ण कल्पना आहे.

काही वर्षांपूर्वी मी माझ्या ब्लॉगवर-सत्यम ब्रुयात-  हा काश्मीर पंडितांच्या हालअपेष्टांवर एक लेख लिहिला होता. मी त्यांच्या वेदना समजू शकतो.

पण मला असंही आढळून आले की माझे काश्मीर पंडित बांधव मुस्लीमांचा प्रचंड प्रमाणात द्वेष, मत्सर करतात. त्या मत्सरापायी ते काश्मीरी मुस्लीमांवरील होणाऱ्या अत्याचाराकडे दुर्लक्ष करतात.

एकूणात ‘two wrongs don’t make a right’ या उक्तीप्रमाणे काश्मीरी पंडितांच्या बाबतीत जे झाले ते चुकीचे झाले, ते निषेध करण्यासारखेच आहे पण त्याला आता अनेक वर्षे झाली आहेत. त्यामुळे काश्मीर मुस्लिमांवर सध्या जे अत्याचार होत आहे त्याचे समर्थन करता येत नाही.

काश्मीर पंडितांवरच्या अत्याचाराला आता २५ वर्षांपेक्षा अधिक काळ झाला आहे. आताची काश्मीरी तरुण पिढी त्या अत्याचाराच्या काळात जन्मास आलेली नव्हती. जे असतील ते त्यावेळी वयाने खूपच लहान होते. त्यांना काश्मीरी पंडितांवरच्या अत्याचाराला जबाबदार धरणे हे चुकीचे व गैर आहे. हे म्हणजे गेल्या शतकात १९३०-४०च्या दशकात नाझींनी ज्यूंवर जे अत्याचार केले त्याला आजचा जर्मनी जबाबदार धरण्यासारखे आहे.

मला आलेल्या पहिल्या इमेलमध्ये मत्सर-विखार तर आहेच पण माझ्यावर तो व्यक्तिगत स्वरुपाचा हल्लाही होता. हे विचार बहुसंख्य काश्मीरी पंडितांची मानसिकता दर्शवतात. ही मंडळी शांतपणाने, तर्कशुद्ध मते मांडत नाहीत. ते दुसऱ्याची हेटाळणी करण्यात स्वत:चे समाधान मानून घेतात. समजा या महाशयांना एक दिवस इंटरनेट व मोबाईलपासून दूर ठेवले तर ते पराचा कावळा करतील. शिव्याशाप देतील. पण यांना काश्मीरमध्ये दळणवळण यंत्रणा बंद केल्याने वैद्यकीय सेवेअभावी मरत असलेल्या लोकांविषयी आत्मीयता वाटणार नाही. या महाशयांना काश्मीरच्या बाहेर राहणाऱ्या नातेवाईकांच्या मन:स्थितीची कल्पना करता येत नाही. काश्मीरमध्ये समजा हिंदूंची अशी अवस्था झाली असती तर त्यांनी या निर्बंधाविरोधात आवाज केला असता. पण ते तसे करणार नाहीत कारण काश्मीरमध्ये झळ मुस्लीमांना बसते व तशी ती बसली पाहिजे अशी त्यांची मानसिकता आहे.

मला आलेल्या इमेलमध्ये या महाशयांनी असेही म्हटले आहे की, माझ्या पत्राने इम्रान खानला फायदा झाला आहे. मी त्यांना सांगू इच्छितो की, कोणत्याही अत्याचाराचा मी निषेध करतो. तो समाज हिंदूंचा असो वा मुस्लिमांचा वा अन्य धर्माचा. माझ्या सूचनांचा इम्रान खान यांना किंवा नरेंद्र मोदींना किती फायदा होईल याचा मी विचार करत नाही. त्यामुळे या महाशयांकडे मानवी संवेदना नसतील तर तो त्यांचा प्रश्न आहे माझा नाही.

आता दुसरा इमेल.

हा इमेल मला एका काश्मीरी पंडित महिलेने पाठवला होता. ही महिला नरेंद्र मोदींची कट्‌टर समर्थक आहे. (जसे अमेरिकेतले अनिवासी भारतीय, काश्मीरी पंडित मोदींचे कट्‌टर समर्थक असतात तसे) मी या महिलेचे माझ्या ‘All the perfumes of Arabiaया ‘द हिंदू’ या वर्तमानपत्रात आलेल्या लेखाकडे लक्ष वेधू इच्छितो. या लेखात मी सबळ पुराव्याआधारे दावा केला होता की सुमारे दोन हजार मुसलमानांची कत्तल झालेल्या २००२च्या गुजरात दंगलीत मोदींचा हात होता. माझ्या या दाव्याला पुरावा म्हणून मी लेफ्ट. जनरल झमीरुद्दीन शहा यांच्या एका विधानाचा आधार घेतला होता. ते म्हणतात, अहमदाबादेत दंगल पेटलेली असताना लष्कराच्या एका तुकडीला शहरामध्ये प्रवेश न देता तीन दिवस अहमदाबाद विमानतळावर रोखून धरले होते. शहा यांच्या या विधानाची पुष्टी म्हणून नीडर आयपीएस अधिकारी संजीव भट (जे सध्या तुरुंगात आहेत) यांनी सर्वोच्च न्यायालयात तसे एक अफेडेव्हिट दिले होते.

मी मुस्लिमांना या देशात जमाव कसा ठेचून मारतो याकडेही लक्ष वेधणार आहे. विशेषत: २०१४मध्ये मोदी सत्तेत आल्यानंतर झुंडबळीच्या घटना वाढत आहेत आणि त्याचे लक्ष प्रामुख्याने मुस्लीम आहेत. या झुंडबळीच्या घटनांकडे पाहून काश्मीर पंडितांचे मन द्रवत नाही.

ह्युस्टनमध्ये ‘हाउडी मोडी’ या कार्यक्रमाला ५० हजार एनआरआय जमले होते. त्यांना मी ‘मूर्ख’ म्हटले होते त्याचा राग या महिलेला आला असावा. पण मॅडम, मी त्यांना अन्य शब्दांत वेगळे काय म्हणू शकतो? जेव्हा मोदी आपल्या भाषणात भारतात सगळे व्यवस्थित चालले आहे असे म्हणतात, आणि त्यांच्या या वाक्याला टाळ्या पडतात त्यावर कसे व्यक्त व्हावे? या सर्वांना माहिती आहे की मोदी थापा मारत आहेत. तरीही हे मूर्ख त्यांचे समर्थन करतात.

भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकासदर ५ टक्क्याच्या खाली आला आहे. वाहन उद्योग, आयटी, ऊर्जा, बांधकाम व्यवसायात सगळीकडे मंदी आहे. ४५ वर्षांत नव्हती एवढी बेरोजगारी वाढली आहे. लाखो मुले कुपोषित आहेत, त्यांची संख्या वाढत चालल्याचा निर्देशांक युनिसेफने जाहीर केला आहे. देशातील आरोग्य व्यवस्था नीटप्रकारे चाललेली नाही, लाखो मुले मूलभूत शिक्षणापासून वंचित आहेत. कांद्याचे भाव गगनाला भिडले आहेत. दलित, अल्पसंख्याकांवरचे अत्याचार वाढले आहेत. अशा परिस्थितीत देशात सगळे आलबेल आहे असे मोदी कसे म्हणू शकतात?

मोदी जेव्हा असे मिथ्या पसरवतात तेव्हा जमलेल्या ५० हजार एनआरआयपैकी एकाही व्यक्तीची भरसभेत उभा राहून मोदींना प्रश्न विचारायची हिंमत का होत नाही? मोदी तुम्ही हे जे दावे करत आहात त्यापैकी एकही दावा खरा नाही, भारतात काहीच आलबेल नाही, असे म्हणण्याचे धाडस हे एनआरआय का दाखवू शकत नाहीत?

डिअर मॅडम तुम्ही व तुमचे एनआरआय मित्र लाजलज्जा गुंडाळून मोदी व भाजपचे समर्थन करता. मला खेद आहे की मी तुमच्या पातळीवर येऊ शकत नाही.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: