भारतीय राष्ट्रवादाची ओळख : भारत अमुचि माता

भारतीय राष्ट्रवादाची ओळख : भारत अमुचि माता

‘नेशन अॅज मदर, अदर व्हिजन्स ऑफ नेशनहूड; या मूळ इंग्रजी पुस्तकाचा ‘भारत अमुचि माता’ हा अनुवाद सुनिधी पब्लिशर्स’ने नुकताच प्रकाशित केला. त्यानिमित्ताने प्रस्तुत पुस्तकाच्या अनुवादिकेने अनुभव, आकलन आणि पुस्तकाविषयी केलेली चर्चा.

सनातन जीवनलीला
मुस्लीम जगाचा शोध
वंशवाद आणि वंशद्वेष

‘नेशन अॅज मदर, अदर व्हिजन्स ऑफ नेशनहूड’, या सुगत बॉस यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा अनुवाद करताना वासाहतिक कालखंडापासून ते आजपर्यंत समकालीन घटनाक्रमाच्या आधारे राष्ट्रवादाचे अनेक पदर उलगडत गेले. राष्ट्रवाद या ‘संवेदने’मध्ये एक राष्ट्र जन्माला घालण्याची, त्या राष्ट्राची एकात्मता आणि अस्मिता अबाधित ठेवण्याची ताकद असते. राष्ट्रवाद ही केवळ राजकीय ‘संकल्पना’ आहे, असा समज करून घेतल्याने त्याचे आकलन परिपूर्ण ठरत नाही, तर ते समाजाशी आणि अधिक सूक्ष्मतः आणि मूलतः व्यक्तीशी निगडित आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने अशी काही आकलने स्पष्ट झाली.

आता प्रस्तुत पुस्तकातील युक्तिवादाकडे वळूयात. लेखकाने वासाहतिक कालखंडापासून ते आजपर्यंत राष्ट्रवाद या विचारव्यवहाराचा ऐतिहासिक अंगाने लेखाजोखा मांडला असून, या वाटचालीची परखड आणि पारदर्शी समीक्षा केली आहे. विशेषतः वसाहतवादी सत्ता मूळ धरू लागल्यावर आणि येथील चाणाक्ष आणि धोरणी मंडळींमध्ये स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवर वसाहतवादी राजवटीचे स्वरूप आणि परिणामांविषयी जागरुकता निर्माण होऊ लागल्यावर राष्ट्रवाद या संकल्पनेला अंकुर फुटले. भारताने या प्रदीर्घ कालखंडामध्ये राष्ट्रवादाची अनेक रूपे अनुभवली. एकीकडे जहालांचा राष्ट्रवाद, तर दुसरीकडे नेमस्तांचा, विवेकानंदांचा ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ आणि याचेच टोकाचे रूप सावरकरांनी मांडले; तसेच अरविंदांचा ‘आध्यात्मिक राष्ट्रवाद’, रवींद्रनाथ टागोरांचा ‘मूल्याधारित मानवतावाद’, सुभाषचंद्र बोस यांचा ‘क्रांतिकारी राष्ट्रवाद’, गांधींचा ‘परंपरागत भारतीय विचारातून आलेला मूल्यलक्ष्यी तरीही कृतिशील राष्ट्रवाद’, नेहरूंचा ‘सेक्युलर राष्ट्रवाद’, तर अली बंधूंचे राष्ट्रप्रेम अशी राष्ट्रवादाची अनेक प्रारूपे आणि तिचे पुरस्कर्ते भारताने मूर्तिमंत पाहिले.

लेखकाने भारतीय राष्ट्रवादाची मांडणी दोन कालखंडांमध्ये केली आहे, पहिला स्वातंत्र्यपूर्व आणि दुसरा स्वातंत्र्योत्तर. राष्ट्रवाद या विषयवस्तूला धरून भारताचा हा दोन टप्प्यांतील इतिहास सांधत, या दोन राष्ट्रवादांचा तौलनिक अभ्यास करत आज स्वतंत्र भारताच्या कोणत्याही राजकीय व्यवहाराचा पाया राष्ट्रवादच असला पाहिजे, हे लेखकाने पटवून दिले आहे. भारताने स्वीकारलेली लोकशाही हे राष्ट्रवादाचे मूर्त रूप असले, तरी तिची संरचना आणि आकृतिबंध यावर वसाहतवादी राजवटीचा आणि पाश्चात्त्य संरचनांचा प्रभाव खोलवर आहे, हे लेखकाने दाखवून दिले आहे. जसे की, ब्रिटिशांनी आपल्यावर केंद्रीभूत राज्यव्यवस्था थोपवली आणि तिच्याशी बांधिलकी ठेवताना आपण मूळ भारतीय संरचना टाकून दिल्या, हा खर्‍या राष्ट्रवादाचा बिमोड आहे. त्याही बरोबरीने भारतीय राष्ट्रवादाचे अभिजात स्वरूप उलगडून दाखवण्याचे बोस यांचे योगदान पायाभूत म्हणावे लागेल.

लेखकाने उभा केलेला राष्ट्रवादाचा पट हा विशेषकरून बंगालकेंद्री असला, तरी त्याचे वैश्विक रूपदेखील दाखवून दिले आहे. लेखक आणि इतिहासकार सुगत बोस इतिहासाचा धागा पकडूनच राष्ट्रवाद या संकल्पना आणि व्यवहाराचे विविध कंगोरे आपल्याला उलगडून दाखवतात. भारतामध्ये धर्म हे घटित भारतीय समाजजीवन आणि राजकारणाचे अविभाज्य अंग आहे. तरीदेखील त्याचा एक ठरावीक साचा दिसत नाही. वसाहतवादी कालखंडादरम्यान धर्म आणि राजकारण यातील नाते तर्कबुद्धीने समजावून घेण्याची तीव्र गरज होती याची जाणीव लेखक करून देतो.

बोस यांनी एका प्रांतामध्ये जन्माला आलेल्या राष्ट्रवादाला तत्कालीन ब्रिटिश वसाहतींशी जोडत एक व्यापक चित्र चितारले आहे. तत्कालीन नेत्यांपुढे एक समान आव्हान होते आणि ते म्हणजे, स्वातंत्र्यप्राप्ती आणि त्याबरोबरीने राष्ट्राचा विकास आणि त्यासाठी त्या त्या राष्ट्रांना भेडसावणारे सामाजिक, आर्थिक प्रश्न सोडवणे. अशाप्रकारे उत्तरवसाहतवादी स्वतंत्र राष्ट्रांमधील तत्कालीन वास्तवाची सैद्धान्तिक मांडणी करणारे हे पुस्तक आहे. स्वतंत्र भारताच्या एकेका पैलूचा विचार करताना त्याचे मूळ वसाहतकालीन इतिहासात आहे का याची कठोर समीक्षा या पुस्तकात सापडते. भारताने निवडलेले आर्थिक प्रारूप, विकासाचा नमुना यांवर वासाहतिक चौकटींचा प्रभाव इतका आहे की आपण भारताचे असे खास आर्थिक प्रारूप आणि परिभाषा तयार केली का हा मूलभूत प्रश्नच लेखक उपस्थित करतो.

राजकीय व्यवस्थेतील नैतिकतेचा विचार मांडताना बोस श्री. अरविंदांच्या विचारांवर प्रकट चिंतन करतात. राष्ट्रवाद आणि सार्वत्रिकतावाद, विश्वबंधुत्ववाद हे परस्परविरोधी नसून, परस्परपूरक आहेत हे कोणतीही वैचारिक ओढाताण न करता सिद्ध केले आहे. यानंतर आजही प्रत्येक भारतीयाला पडणारा प्रश्न लेखक मांडतो, तो म्हणजे १९४७ सालची फाळणी. याबाबत अनेक मतमतांतरे आहेत आणि ती चालूच राहतील. मग त्यामध्ये फाळणी व्हायला हवी होती की नाही, मग त्याला कोण जबाबदार आहे, गांधी आणि जिना हे दोघे याला जबाबदार होते का, मग एखाद्या चित्रपटाच्या पटकथेप्रमाणे आपण एकाला नायक आणि दुसर्‍याला खलनायक असे ठरवून सोपीकरणाकडे जाऊ पाहतो. असे कोणतेही मत तयार करण्यापूर्वी लेखकाने मांडलेली ऐतिहासिक तथ्ये आपण जरूर वाचली पाहिजेत.

भारतीय राष्ट्रवाद: एक आगळेवेगळे प्रारूप

राष्ट्राला मातेचा दर्जा देऊन तिच्याशी नाळ जोडून घेणारे भारतीय राष्ट्रवादाचे हे प्रारूप आगळेवेगळे आणि तिची मातेची गुणवैशिष्ट्ये ग्रहण करणारेदेखील आहे. स्वदेशी चळवळीतील बिपीन चंद्र पाल, अरविंद घोष, अबनिंद्रनाथ टागोर आणि रवींद्रनाथ टागोर यांसारख्या विचारवंत आणि नेत्यांनी राष्ट्राला ‘माते’चे स्थान देऊन स्वातंत्र्यलढ्यातील सामान्य भारतीयांमध्ये राष्ट्रवाद जागृत करण्याचा विडा उचलला. हे आजही लागू आहे. आई आणि तिच्या अपत्यातील नात्यामध्ये अलोट प्रेम, वात्सल्य असते, त्याहूनही या नात्यातला दोहोंचा एकमेकांप्रती असणारा समर्पण भाव आणि त्याग हा एक अजोड बंध असतो. हे नाते म्हणजे केवळ भावनांचा खेळ नसून ते निभावण्यासाठी दोन्हीकडून तीव्र ओढ आणि निष्ठा असावी लागते. राष्ट्रवाद सिद्ध करण्यासाठी सतत युद्धजन्य परिस्थिती असणे अपरिहार्य नाही. प्रत्येक व्यक्तीने नागरिक या नात्याने आपले विहित कार्य चोख आणि प्रामाणिकपणे बजावणे एवढा राष्ट्रवादाचा अन्वयार्थ आपण लावला तरी पुरेसे आहे. आजच्या भारतीय परिस्थितीविषयी बोलायचे तर, या राष्ट्रवादाला बहुसंख्याकवादाचा आणि भावनांच्या निसरड्या खेळाचा शाप लागला आहे. आमच्यातील वैविध्यता आम्हाला जोडणारे दृढ बंध होण्याऐवजी आम्हाला जोडणारे कच्चे दुवे ठरत आहेत. राष्ट्रवाद ही कोणा एका गटाची मक्तेदारी कशी होईल? राष्ट्राला एकसंध ठेवणारी भावना जर व्यक्तीच्या अस्मितांचे रण माजवणार असेल तर आपण खूप मोठी चूक करत आहोत. असा राष्ट्रवाद राष्ट्राची अस्मिता धुळीस मिळवणारा आणि सपाटीकरण करणारा, वास्तविक पाहता राष्ट्रद्रोह आहे.

आजचा भारत आणि आपण

राजकरणाला वैचारिक बैठक देणारे राजकारणी, ही भारताची परंपरा असली तरी आज ती दुर्लभ झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये बोस यांनी भारत म्हणजे काय?, आर्थिक संघराज्यवाद, भारत-बांगलादेश सीमा, काश्मिर प्रश्न, भारतीयांमधील सांस्कृतिक जिव्हाळा आणि असहिष्णुतेचे बोचरे वातावरण, विद्यापीठांमध्ये घुसलेले राजकारण आणि विद्यार्थ्यांवर विद्यमान सरकारने लादलेले राष्ट्रद्रोहाचे आरोप आणि त्यातून आपण राजकीय संस्कृती संपवून टाकत आहोत यावर प्रकाश टाकत याच्या दूरगामी परिणामांचे सूतोवाच केले आहे. आपल्या भाषणांतून वेळोवेळी लेखक राष्ट्रवाद नव्या संदर्भात मांडतो आहे.

अनुवादिकेची आकलने

मूलतः, राष्ट्रवाद हा एक राष्ट्रीयत्वाचा निरंतर स्रोत असून, राष्ट्र या अस्तित्वाचे अविभाज्य अंग आहे आणि त्या संदर्भात घडणारी ऐतिहासिक घटना ही त्याची केवळ अभिव्यक्ती असते. परिणामी, स्वातंत्र्यलढा आणि स्वातंत्र्यप्राप्ती या राष्ट्रवादाच्या अभिव्यक्ती आहेत. राष्ट्रवाद ही औचित्याने उफाळून येणारी भावना नसून, ती जाणीव प्रत्येक व्यक्तीमध्ये समईच्या मंद ज्योतीप्रमाणे तेवत राहिली पाहिजे. आज आपण स्वातंत्र्याची सत्तरी पार केलेल्या भारताचे नागरिक आहोत. या पार्श्वभूमीवर ‘राष्ट्रवादा’चे नवे संदर्भ लावणे यातच आपले हित आहे. एकदा ही समज पक्की झाल्यावर राष्ट्रवाद या संकल्पनेसाठी इतिहासाची पाने चाळण्याबरोबरीने तो आपला वर्तमान आहे याचे भान आल्याशिवाय राहणार नाही. हे कसे घडेल हा प्रश्न ओघाने येतोच. प्रथमतः आता आपल्यावर परकीय आक्रमणे व्हायला हवीत किंवा सतत तशी काल्पनिक भीती बाळगण्याचे कारण नाही. आपण व्यक्ती म्हणून आपल्या राष्ट्राशी कोणत्या ना कोणत्या भूमिकेतून जोडलेलो आहोत, तिच्या जबाबदारी आणि कर्तव्यासह. मग तो किंवा ती विद्यार्थी असेल, शिक्षक, प्रशासक, राजकारणी, कलावंत, व्यावसायिक असेल नाहीतर शेतकरी किंवा नोकरदार! या जोडलेपणाचे भान आज प्रत्येकाने ठेवण्याची नितांत गरज आहे. विशुद्ध राष्ट्रवाद हा सर्वसमावेशक आहे. समाजव्यवस्थेचा भाग म्हणून जगत असताना आपण आपला धर्म, पंथ, जात, वंश, वर्ण, लिंगभाव अशा विविध अस्मिता घेऊन वावरत असतो. खरा राष्ट्रवाद या वैविध्यतेची आब राखत आपण सर्वजण एक आहोत, एका राष्ट्राचे आहोत याचेच स्मरण करून देतो. आपल्या आईला जशी तिची सर्व मुले एकसारखी असतात, आणि सहोदरांनीदेखील एकमेकांशी आपल्या मातेचे स्मरण ठेवूनच वर्तन करावे आणि त्याचा आविष्कार हाच राष्ट्रवाद. हा धागा पकडून लेखकाने राष्ट्रवादाचा युक्तिवाद विस्तारला आहे, जो प्रस्तुत पुस्तकरूपी मांडणीचा गाभा आहे.

अनुवाद एक समुद्ध अनुभव

राष्ट्रवादाच्या या वैचारिक, सैद्धान्तिक आणि ऐतिहासिक अधिष्ठान असलेल्या आणि तरीही सर्जनशील आणि बहुतांशी पूर्णतः नवीन मांडणीचा अनुवाद करणे, ही माझ्यासाठी अस्सल संधी होती. विषयाचा एवढा प्रचंड आवाका लक्षात घेणे एवढेच नव्हे, तर लेखकाची वैचारिक झेप समजून घेणे हे एक आव्हान होते. अनुवाद करताना आशय शोषून घ्यावा लागतो. त्यासाठी स्वतःची वैचारिक समज आणि कल्पनाशक्ती त्याच उंचीला आणून ठेवणे ही खरी कसोटी असते. हे सर्व करत हा सर्व ऐवज मातृभाषेत उतरवताना अनुवादकाला नतमस्तक व्हावे लागते, तेही सजग राहून!

अनुवाद: एक जबाबदारी

सहसा आपल्याकडे अनुवाद म्हणजे फावल्या वेळेतील उद्योग असा समज रूढ आहे. मात्र, आता तो गळून पडण्यास सुरुवात झाली आहे, याची खात्री वाटते. वैचारिक विषयांवरील पुस्तकांचा अनुवाद करणे हे अतिशय रंजक आणि तितकेच आव्हानात्मक आहे. या प्रकारचा आशय मराठीमध्ये आणताना केवळ इंग्रजी शब्दांचा नाही तर आशयाचा अनुवाद केला जातो. शिवाय त्या आशयाला योग्य तो न्याय देण्यासाठी मराठी भाषेवरील पकडही साहजिकच महत्त्वाची ठरते. या बरोबरीने मूळ इंग्रजी भाषेतील आशय मराठीत आणताना मूळ लेखकाची शैली जपणे ही जबाबदारी अनुवादकावर असते, याची स्पष्टता या प्रवासादरम्यान येत गेली. अनुवाद परिपक्व व्हावा हे कौशल्य जसे आहे, तशी ती जबाबदारीदेखील आहे.

भारत अमुचि माता
अनुवाद: श्वेता देशमुख
सुनिधी पब्लिशर्स, पुणे.
पृष्ठसंख्या: १८६
किंमत- ३४९ रु. 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: