हिपटायटीस ‘सी’चा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल

हिपटायटीस ‘सी’चा शोध लावणाऱ्या शास्त्रज्ञांना नोबेल

हार्वे जे. ऑल्टर, मायकल हाउटन आणि चार्ल्स एम. राइस या शास्त्रज्ञांनी केलेल्या परिणामकारक संशोधनांमुळे हिपटायटीस सी या नवीन विषाणूची ओळख पटवणे शक्य झाले. त्यांनी केलेल्या कामाच्या पूर्वी हिपटायटीस ए आणि बी विषाणूंचा शोध हे या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे ठरले होते.

एअर इंडिया विकण्यास मंजुरी
धुमसता पंजाब
महुआ मोईत्रांवर हक्कभंग कारवाईचा विचार

जगभरातील आरोग्य क्षेत्रापुढे मोठे आव्हान निर्माण करणाऱ्या रक्तजन्य हिपटायटीस सी विषाणूचा शोध लावून लक्षावधींचे प्राण वाचवण्यात योगदान देणाऱ्या हार्वे जे. ऑल्टर, मायकल हॉटन आणि चार्ल्स एम. राइस या शास्त्रज्ञांना २०२० सालातील वैद्यकशास्त्र किंवा शरीरशास्त्र क्षेत्रातील नोबेल पारितोषिक विभागून जाहीर करण्यात आले आहे. कारोलिन्स्का इन्स्टिट्यूटमधील नोबेल असेम्ब्लीने ही घोषणा केली आहे. रक्तजन्य हिपटायटीस  विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना सोरायसिस आणि यकृताच्या कॅन्सरसारखे गंभीर आजार होऊ शकतात.

हार्वे जे. ऑल्टर, मायकल हाउटन आणि चार्ल्स एम. राइस या शास्त्रज्ञांनी केलेल्या परिणामकारक संशोधनांमुळे हिपटायटीस  सी या नवीन विषाणूची ओळख पटवणे शक्य झाले. त्यांनी केलेल्या कामाच्या पूर्वी हिपटायटीस ए आणि बी विषाणूंचा शोध हे या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे ठरले होते. मात्र, रक्तजन्य हिपटायटीसच्या केसेसमागील गूढ कायम होते. हिपटायटीस  सीच्या शोधामुळे या आजाराच्या क्रॉनिक केसेसमागील कारण स्पष्ट झाले आणि रक्ताच्या चाचण्या व औषधे उपलब्ध होऊन लक्षावधींचे प्राण वाचू लागले.

हिपटायटीस – मानवी आरोग्यापुढील जागतिक आव्हान

यकृताचा दाह किंवा हिपटायटीस  हा शब्द यकृत आणि दाह या अर्थाच्या ग्रीक शब्दांचा संयोगातून तयार झाला आहे. यकृतदाहामागे अतिरिक्त मद्यपान, पर्यावरणातील विषारी वायू व ऑटोइम्युन विकार ही कारणे असली यकृतदाह प्रामुख्याने विषाणू संसर्गामुळेच होतो.

संसर्गजन्य हिपटायटीसचे दोन प्रमुख प्रकार आहेत, हे १९४०च्या दशकात स्पष्ट झाले होते. पहिल्या विषाणूला हिपटायटीस  ए असे नाव देण्यात आले. हा विषाणू प्रदूषित पाणी किंवा अन्नातून संक्रमित होतो आणि रुग्णावर त्याचा परिणाम दीर्घकाळ राहतो. हिपटायटीसचा दुसरा प्रकार रक्त आणि शरीरातील द्रवांमार्फत संक्रमित होतो आणि त्याचे परिणाम अधिक गंभीर असतात. या विषाणूमुळे अनेक क्रॉनिक आजार होऊ शकतात. त्याची परिणती सोरायसिस व यकृताच्या कॅन्सरमध्येही होऊ शकते. हिपटायटीस चा हा प्रकार फसवा असतो. एरवी निरोगी वाटणाऱ्या व्यक्तींना याचा संसर्ग होऊ शकतो आणि गंभीर गुंतागुंत निर्माण होण्यापूर्वी अनेक वर्षे विषाणू शरीरात असू शकतो. रक्तजन्य हिपटायटीसमुळे गंभीर स्वरूपाच्या विकलांगता निर्माण होऊ शकतात तसेच रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. या आजारामुळे जगभरात दरवर्षी लक्षावधी लोकांना प्राण गमावावे लागतात त्यामुळे हा आजार एचआयव्ही संसर्ग व ट्युबरक्युलॉसिसच्या तोडीची जागतिक आरोग्य समस्या समजला जातो.

अज्ञात संसर्गजन्य घटक

संसर्गजन्य आजारांवर नियंत्रण मिळवण्याची गुरूकिल्ली म्हणजे त्या मागील प्रयोजक (कॉजेटिव) घटक शोधून काढणे. रक्तजन्य हिपटायटीसचा एक प्रकार  १९६०च्या दशकात बारुश ब्लुमबर्ग यांनी शोधून काढला. आज तो हिपटायटीस  बी म्हणून ओळखला जातो. या शोधामुळे पुढे निदानात्मक चाचण्या व प्रभावी लस विकसित करणे शक्य झाले. ब्लुमबर्ग यांना १९७६ मध्ये वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले होते. १९७६ सालीच हार्वे जे. ऑल्टर, रक्तसंक्रमण करण्यात आलेल्या रुग्णांमधील हिपटायटीसच्या संसर्गावर, यूएस नॅशनल इन्स्टिट्यूट्स ऑफ हेल्थमध्ये अभ्यास करत होते. नव्याने शोध लागलेल्या हिपटायटीस  बी विषाणूचे निदान करणारी रक्त चाचणी आल्यामुळे संक्रमणामुळे होणाऱ्या हिपटायटीसचे प्रमाण कमी झाल्यासारखे वाटत असले तरीही अनेक रुग्णांना हिपटायटीस  बीचा प्रादुर्भाव होत होता, हे अल्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिले होते. हिपटायटीस ए विषाणूचे निदान करणारी चाचणीही याच दरम्यान विकसित झाली होती आणि हिपटायटीस ए हे या गूढ आजारामागील कारण नाही हे स्पष्ट झाले होते. ज्यांना संक्रमित रक्त दिले गेले आहे अशा रुग्णांपैकी अनेकांमध्ये अज्ञात प्रादुर्भावजन्य घटकामुळे क्रॉनिक हिपटायटीस होत होता आणि ही मोठी चिंतेची बाब होती. या हिपटायटीस  रुग्णांचे रक्त संक्रमित झाल्यामुळे चिंपाझींनाही हा आजार होऊ शकतो, हे ऑल्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवून दिले. या अज्ञात घटकाचे गुणधर्म विषाणूसारखेच आहेत हे नंतरच्या अभ्यासांतून स्पष्ट झाले. ऑल्टर यांनी या दिशेने केलेल्या पद्धतशीर अन्वेषणामुळे क्रॉनिक विषाणूजन्य हिपटायटीस चा एक वेगळा प्रकार निश्चित झाला. या गूढ आजाराला “नॉन-ए, नॉन-बी” हिपटायटीस असे म्हटले जाऊ लागले.

हिपटायटीस सी विषाणूची ओळख

या नवीन विषाणूची ओळख पटवण्याला आता सर्वोच्च प्राधान्य दिले गेले. विषाणूचा शोध घेण्यासाठी सर्व पारंपरिक तंत्रे वापरात आणली गेली. तरीही १० वर्षांहून अधिक काळ हा विषाणू शास्त्रज्ञांना हुलकावण्या देत राहिला. शिरॉन या फार्मास्युटिकल फर्मसाठी काम करणारे मायकल हाउटन यांनी या विषाणूची जनुकीय संगती विलग करण्यासाठी अविरत काम केले. प्रादुर्भाव झालेल्या चिंपाझीच्या रक्तात सापडणाऱ्या न्युक्ली आम्लांमधील डीएनएचे कण हाउटन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जमवले. यातील बहुसंख्य कण चिंपाझीच्या जिनोममधूनच आलेले होते पण त्यातील काही अज्ञात विषाणूतून आलेले असावेत असा कयास संशोधकांनी बांधला. हिपटायटीस  रुग्णांच्या शरीरातून घेतलेल्या रक्तात या विषाणूशी लढा देण्यासाठी प्रतिपिंडे (अँटिबॉडीज) तयार झाल्या असतील असे गृहीत धरून संशोधकांनी रुग्णाचा सिरा क्लोन केलेल्या विषाणूजन्य डीएनएची ओळख पटवण्यासाठी वापरला आणि त्याद्वारे विषाणूजन्य प्रथिनांचे कोडे उकलण्याचा प्रयत्न केला. या सर्व संशोधनात एक पॉझिटिव क्लोन आढळला. पुढील संशोधनात असे लक्षात आले की, हा क्लोन नवीन आरएनए विषाणूपासून उगम पावलेला आहे. हा विषाणू फ्लेविव्हायरस समूहातील होता आणि त्याला हिपटायटीस  सी असे नाव देण्यात आले. याच संशोधनासाठी ऑल्टर, हाउटन आणि राइस यांना नोबेल पारितोषिक जाहीर झाले आहे.

शास्त्रज्ञांचा थोडक्यात परिचय

पारितोषिक विजेत्या शास्त्रज्ञांपैकी १९३५ साली न्यूयॉर्कमध्ये जन्मलेले ऑल्टर यांनी रोचेस्टर मेडिकल स्कूलमधून वैद्यकीय पदवी प्राप्त केली. स्ट्राँग मेमोरियल हॉस्पिटल आणि सिअॅटल येथील युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतले. १९६१ मध्ये ते नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थमध्ये (एनआयएच) क्लिनिकल असोसिएट म्हणून रुजू झाले. त्यानंतर १९६९ सालापासून ते एनआयएचमध्येच ट्रान्सफ्युजन मेडिसिन विभागात वरिष्ठ संशोधक म्हणून काम करत होते.

मायकल हाउटन यांचा जन्म ग्रेट ब्रिटनमध्ये झाला. त्यांनी लंडन येथील किंग्ज कॉलेजमधून १९७७ मध्ये पीएचडी संपादन केली. १९८२ मध्ये ते कॅलिफोर्नियात वास्तव्यासाठी आले. सध्या ते व्हायरोलॉजीमध्ये कॅनडा एक्सलन्स रिसर्च चेअर म्हणून कार्यरत आहेत. तसेच लि का शिंगमध्ये व्हायरोलॉजीचे प्राध्यापक आहेत.

चार्ल्स एम. राइस यांचा जन्म १९५२ मध्ये सॅक्रामेंटो येथे झाला. १९८१ मध्ये त्यांनी कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून पीएचडी संपादन केली आणि १९८५ सालापर्यंत तेथेच पोस्टडॉक्टरल फेलो म्हणून काम केले. १९८६ मध्ये त्यांनी स्वत:चा संशोधन समूह स्थापन केला. २००१ सालापासून ते रॉकफेलर विद्यापीठात पूर्णवेळ प्राध्यापक म्हणून करत आहेत.  २००१ ते २००८ या काळात राइस सेंटर फॉर द स्टडी ऑफ हिपटायटीस चे वैज्ञानिक व कार्यकारी संचालक होते. या विभागात ते अजूनही काम करत आहेत.

लेखाचे छायाचित्र – डावीकडून हार्वे जे. ऑल्टर, मायकल हॉटन आणि चार्ल्स एम. राइस सौजन्य nobelprize.org 

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0