बदलत्या भारतात प्रेमात पडणे धोकादायक

बदलत्या भारतात प्रेमात पडणे धोकादायक

अंजली आणि इब्राहिम यांचा फेब्रुवारी २०१८ मध्ये विवाह झाला. तीन महिन्यांनंतर, विवाह प्रमाणपत्र सार्वजनिक झाल्यानंतर भयंकर अत्याचारांना सुरुवात झाली.

रायपूर: ‘माझा देश बदलतोय’ असं थाटात सांगणारी ही कहाणी आहे. त्यात सगळ्या नव्या गोष्टींचा समावेश आहे, आणि ती काहीही लपवायचा प्रयत्नही करत नाही: जमातवादाचे ताणतणाव, आंतरधर्मीय लग्नांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन, ‘पाय घसरलेल्या’ महिलांवरील उजव्यांचे आक्रमण, बेटी बचाओ-संस्कारी बनाओ, पोलिस आणि माध्यमांचा पक्षपाती दृष्टिकोन, आणि असहाय्य न्यायव्यवस्था.

अंजली जैन (२२) आणि इब्राहिम (३४)महाविद्यालयाच्या एका कार्यक्रमात भेटले आणि प्रेमात पडले. फेब्रुवारी २०१८ मध्ये त्यांचे लग्न झाले. अंजलीला भेटला तेव्हा इब्राहिम अगोदरच विवाहित होता, मात्र पत्नीपासून वेगळा झाला होता आणि नंतर त्यांचा घटस्फोटही झाला. प्रेमावर शिक्कामोर्तब करण्यासाठी इब्राहिमने हिंदू धर्म स्वीकारण्याचे ठरवले, जेणे करून ‘लव्ह जिहाद’चे आरोप होऊ नाहीत.

‘लव्ह जिहाद’ ही हिंदुत्ववादी गटांनी रचलेली एक कपोलकल्पित कथा आहे, जी असा दावा करते की मुसलमान मुले पद्धतशीरपणे हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करून त्यांना मुसलमान धर्म स्वीकारायला भाग पाडतात. पोलिस तपास, आणि न्यायालयीन चौकशी होऊनही –  ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून राष्ट्रीय तपास संस्थेने केलेल्या चौकशीचाही समावेश होतो – या ‘कारस्थानाचा’ कोणताही पुरावा आजवर सापडलेला नाही.

त्यांचा विवाह आर्य समाज मंदिरात झाला, आणि इब्राहिम – आता आर्यन आर्य – त्याची नववधू अंजली आर्य हिला घेऊन घरी आला. अजून मुलीच्या कुटुंबाला काही माहित नव्हते. मार्चमध्ये त्या दोघांनी विवाह प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज केला आणि त्यांना आर्यन आर्य आणि अंजली जैन या नावांनी रायपूरमध्ये प्रमाणपत्र मिळाले. त्या दोघांच्या वडिलांची नावेही प्रमाणपत्रामध्ये नमूद केलेली होती. न्यायालयाच्या प्रक्रियेनुसार ही माहिती सार्वजनिक होणे आवश्यक होते. आणि अशा रितीने आर्य समाज मंदिरात गुप्तपणे झालेल्या विवाहानंतर तीन महिन्यांनी अंजलीच्या वडिलांना त्यांच्या नात्याबद्दल समजले. लगेचच त्यांना त्रास देण्यास सुरुवात झाली.

नवविवाहित युगुलाला वेगळे करण्यात आले आणि अंजलीला रोज वेगवेगळ्या अज्ञात स्थळी नेऊन मारहाण सुरू झाली, तिला औषधे देण्यात येत होती ज्यामुळे तिला अपस्माराचे झटके येत. अनेक आठवड्यांनंतर आर्यनने बिलासपूर उच्च न्यायालयामध्ये हेबियस कॉर्पस याचिका दाखल केली. पोलिसांनी अंजलीचा शोध घेऊन तिला न्यायालयात हजर केले. त्यावेळचे मुख्य न्यायाधीश यांनी तिची बारकाईने चौकशी केली तेव्हा तिने आपण सज्ञान असून आपल्या स्वतःच्या इच्छेने आर्यनशी लग्न केले आहे आणि आपल्याला त्याच्याबरोबर राहायचे आहे असे सांगितले. न्यायालयाने तिला एकतर पालकांबरोबर राहणे किंवा महिला वसतीगृहात राहून पोलिस संरक्षणात राहणे या दोनमध्ये निवड करण्यास सांगितले. तिला तिच्या पतीबरोबर राहायचे आहे असे तिने सांगूनही तिला गव्हर्नमेंट डिग्री कॉलेज गर्ल्स होस्टेल, बिलासपूर येथे राहावे लागले.

आर्यनने त्याला त्याचे वैवाहिक अधिकार मिळावेत यासाठी न्यायालयात पाठपुरावा केला. नवीन मुख्य न्यायाधीशांनी त्यांच्या कक्षामध्ये १.५ तास अंजलीची चौकशी केली आणि असा आदेश जारी केला, की एका महिलेला तिचा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि शासनाने तिला संरक्षण पुरवणे बंधनकारक आहे. पण तरीही मागचे सात महिने अंजली सखी सेंटर, रायपूर येथे राहत आहे, कारण तिला तिच्या पालकांच्या घरी जाण्याची इच्छा नाही. तिला तिच्या घरी जायचे आहे पण तिच्या वडिलांनी केलेल्या एफआयआरमुळे तिचा पती तुरुंगात आहे.

एफआयआरनुसार इब्राहिमने अंजलीला फसवले, तिला तो अविवाहित आहे असे सांगितले, प्रत्यक्षात तो विवाहित होता. आर्य समाज मंदिरात २५ पानी घोषणापत्रात त्याने एका चुकीच्या चौकटीवर खूण केली या एका गोष्टीवर हे आधारित आहे. अंजली म्हणते, तो विवाहित असल्याचे तिला माहित होते. तिने तिच्या कुटुंबियांनाही ते सांगितले होते पण त्याने घटस्फोट घेतला आहे आणि हिंदू धर्म स्वीकारला आहे यावर तिच्या कुटुंबियांचा विश्वास नाही.

हे सगळे केवळ दोन कुटुंबांच्या घरात चाललेले नाटक नव्हते –‘नवीन भारतात’ तसे नसते. जैन समाजाने त्यांच्या मते ‘लव्ह जिहाद’च असलेल्या या घटनेच्या विरोधात मोर्चे काढले, छत्तीसगड बंदचे आवाहन केले. मी जैन समुदायातल्या एका व्यक्तीला हा बंद कशासाठी असे विचारले. त्या व्यक्तीने सांगितले, “त्या मुलीने न्यायालयासमोर मला पालकांच्या घरी जायचे आहे असे सांगितले होते. ती एका गूढ शक्तीच्या प्रभावाखाली आहे.”ती मुलगी जेव्हा बिलासपूरमधील जीडीसी वसतीगृहात राहत होती तेव्हा उजव्या गटातील कार्यकर्ते सतत तिथे नजर ठेवून होते. आता रायपूरमध्येही अशीच पाळत ठेवणे चालू आहे.

मुलीचे वडील उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाशी सहमती दर्शवली आहे, परंतु निश्चित आदेश जारी केलेला नाही. पुढची सुनावणी १५ ऑक्टोबर रोजी आहे.

दरम्यान, रायपूर येथे या प्रसंगाचे नाट्य आणखी गंभीर झाले आहे. इब्राहिमच्या वकील प्रियांका शुक्ला शनिवारी अंजलीला भेटायला सखी सेंटर येथे गेल्या होत्या. परंतु डीएसपी ममता शर्मा आणि अतिरिक्त एसपी रिचा मिश्रा यांनी त्यांना तिथून हाकलून लावले. शुक्ला म्हणतात, “रिचा मिश्रा यांचे पोस्टिंग दुर्ग येथे असताना त्या तिथे काय करत होत्या माहित नाही. माझ्याबरोबर धक्काबुक्की करण्यात आली आणि त्या मुलीलाही धमक्या दिल्या जात आहेत. मी या पोलिस अधिकाऱ्यांच्या विरोधात शहर कोतवाली मध्ये तक्रार नोंदवली आहे आणि बिलासपूरच्या बार कौन्सिलमध्येही मी हा मुद्दा उठवणार आहे.”

डीजीपी, डी. एम. अवस्थी यांना या घटनेची माहिती दिली असता ते म्हणाले, “न्यायालयाचा आदेश आमच्याकरिता बंधनकारक आहे. त्या महिलेला संरक्षण देणे व तिच्यासाठी सुरक्षित जागेची सोय करणे हे आम्ही करत राहू.” ते असेही म्हणाले, की त्या महिलेकडून काही महिन्यांपूर्वी त्यांना एसएमएस मिळाला होता, ज्यावरून त्यांनी धमतरी येथून तिच्या वडिलांच्या घरून तिची सुटका केली आणि तिला रायपूर येथे आणले. “आम्ही तिला संरक्षण देत राहू आणि परिस्थिती आणखी चिघळणार नाही याची काळजी घेऊ,”असेही ते म्हणाले.

दरम्यान, ती महिला सतत काकुळतीला येऊन फेसबुक पोस्ट लिहिते आहे आणि समाजानेतिला व आर्यनला ते जसे आहेत तसे स्वीकारावे अशी विनवणी करत आहे. तिची अकाऊंट तीन वेळा हॅक झाली आहेत आणि प्रत्येक वेळी तिला नवीन अकाऊंट तयार करावे लागले आहे.

इब्राहिमला तीन पत्नी आहेत आणि अंजली गूढ शक्तीच्य प्रभावाखाली आहेत अशा प्रकारच्या बदनामीकारक अफवा इंटरनेटवर पसरवल्या जात आहेत.

अंजलीचे पालक धमतरीमधील सधन कुटुंबातील आहेत, आणि जैनांमध्ये या घटनेबाबत एकजूट आहे. उदारमतवादी लोकांनी केलेल्या आवाहनांकडे ते पूर्ण काणाडोळा करत आहेत.

बदलत्या भारताचे चित्र ज्यांना स्पष्ट आहे त्यांना या कहाणीचा अंत काय होईल हे सहज लक्षात येईल. अंजली आणि इब्राहिमच्या प्रेमकहाणीचा अंत सुखद होईल अशी शक्यता फार कमी आहे.

मूळ लेख

COMMENTS