मुस्लिम स्त्रियांचा शिक्षण हक्क आणि हिजाबचे राजकारण 

मुस्लिम स्त्रियांचा शिक्षण हक्क आणि हिजाबचे राजकारण 

हिजाब प्रकरणावर धर्मिक ध्रुवीकरण होत असताना, मुस्लिम मुलींच्या शिक्षण हक्काच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होत असून, मुलींच्या आणि एकूण समाजाच्या प्रगतीसाठी ते हानिकारक आहे.

‘माझा आदर्श नथुराम गोडसे’ : गुजरातमध्ये वक्तृत्व स्पर्धा
स्वातंत्र्यलढ्यातले क्रिकेटपर्व !
काश्मीर – व्यापक कटाचा भाग

हिजाब प्रकरणावर धर्मिक ध्रुवीकरण होत असताना, मुस्लिम मुलींच्या शिक्षण हक्काच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होत असून, मुलींच्या आणि एकूण समाजाच्या प्रगतीसाठी ते हानिकारक आहे.

२०१६-१७  मध्ये मास्टर ऑफ सोशल वर्क करत असताना शेवटच्या वर्षीचा प्रॅक्टिकल संशोधनाचा विषय शिकण्यासाठी पुणे जिल्हा ग्रामीण व पुणे शहर येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या मुस्लिम मुलींना स्वतःच्या विकासाबाबत वाटणाऱ्या मतांचा अभ्यास केला होता. संशोधन करून शोध निबंधही लिहिला होता. त्यातून अनेक मुद्दे पुढे आले, जे समजून घेणे महत्त्वाचे आहे.

संशोधनासाठी प्रश्नावली भरून मुलींच्या मुलाखती घेतल्या होत्या. या अभ्यासात एकूण पन्नास मुलींकडून प्रश्नावली भरून घेण्यात आली होती. यामध्ये अर्ध्या मुली ग्रामीण भागातील आणि अर्ध्या शहरी भागातील घेतल्या होत्या. सर्व धर्माच्या महाविद्यालयांबरोबरच विशेष मुस्लिम मुलींना संधी असणारे महाविद्यालयही निवडले होते. ग्रामीण भागात बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर येथील दोन पदवी महाविद्यालये निवडली होती. पुणे शहरातील अबेदा इनामदार व एसनडीटी अशी दोन महाविद्यालये निवडली होती.  कला, वाणिज्य, विज्ञान व काही प्रोफेशनल कोर्स(इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर सायंन्स) पदवी शिक्षण करणाऱ्या मुलींची मते घेतली होती. ज्या मुलींनी संशोधनासाठी माहिती भरून देण्यास संमती दिली, अशाच मुलींची माहिती घेतली. काही जण अर्धवट माहिती देत असल्याने ठरवलेल्या पेक्षा जास्त मुलींची माहिती घेतली होती.

शहरी भागात तरी एका ठिकाणी महाविद्यालयामध्ये अनेक मुस्लिम मुली मिळतात पण गावात मुली शोधाव्या लागल्या, आमचाच ग्रामीण भाग निवडल्याने  ओळखीचे शिक्षक, मुस्लिम मित्र, शेजारी यांनी मदत केलेली. ओळखीच्या लोकांमार्फत मुलींपर्यंत पोचण्याची अडचण अशी असते की त्यात पालक किंवा मोठी माणसे त्यांची मते मुलींवर लादु शकण्याचा किंवा त्यांचा प्रभाव पडून अभ्यासात त्यांच्या मतांचा प्रभाव येऊ शकतो, यासाठी मुलींशी मी स्वतः बोलण्याचा व प्रश्नावली भरून घेण्याचा प्रयत्न केला. काही मुलींना प्रश्न विचारून मुलाखत द्यायला वेळ नसल्यामुळे त्यांना प्रत्यक्षात आधी सर्व गोष्टी समजावल्या. त्यांनी स्वतः प्रश्नावली भरून नंतर मला दिली. ज्यांना शंका आल्या त्यांच्याशी फोनवर बोलले. ही सगळी प्रक्रियाच शिकवणारी होती. हे करत असताना, हिला म्हणजे दुसऱ्या धर्मातील मुलीला आमच्या मुलींचं काय करायचं आहे, असंही गावातील एका पालकाने मुस्लिम मित्राला ऐकवले होते.

यात मुलींचा आत्मविश्वास, आत्मभान आणि करिअर, भावी जोडीदार निवडणे, नोकरी/ व्यवसाय करून आयुष्यात काहीतरी बनणे, अशा सर्व बाबीं जाणून घेतल्या होत्या. त्याबरोबर धार्मिक बाबींबद्दलही काय वाटतं, असं विचारलं होतं. बुरख्याबद्दल सुद्धा विचारले होते. बुरखा घालावा की नाही, हे स्त्रीसाठी ऐच्छिक असायला हवे असे म्हणणाऱ्या मुलींचे प्रमाण जास्त होते. त्यानंतर बुरखा गरजेचा वाटत नाही, म्हणाऱ्यांचे प्रमाण होते व त्याखालोल घरातल्यांमुळे बाहेर जाताना बुरखा घालावा लागतो असे मत होते. काही मत नाही किंवा बुरखा नसावा असे खूप कमी जणींनी सांगितले होते.

मुलींशी बोलायला गेले तेव्हा मी मुलींसाठी अनोळखी होते, त्या बोलायला बिचकत होत्या, पण तरी त्यांची मते नीट नोंदवण्याचा प्रयत्न केला. अबेदा इनामदार महाविद्यालयातील सर्वच मुली बुरख्यामध्ये होत्या. दोघी तिघीच जणी या बिनबुरख्याच्या होत्या. मुली डब्याच्या सुट्टीत मजा मस्ती करत होत्या, तेव्हाही त्यांच्या सोबत मी सामील झाले व तिथे काही वेळ थांबून तिथले वातावरण अनुभवले होते. या कॉलेजमधील अनेक जणींना बुरखा योग्य वाटत होता. याच कॉलेजमध्ये अनेकींना जेव्हा जोडीदार निवडीसाठी घरच्यांपुढे मत मांडू शकता का असे विचारले तेव्हा त्यातील पदवीच्या अनेक मुलींची पहिल्या-दुसऱ्या वर्षीच एंगेजमेंट झाल्याचे व लग्न ठरल्याचेही लक्षात आले. म्हणजे ज्या स्वतःच्या विकासासाठी ज्या भविष्याच्या निर्णयांबद्दल मी बोलत होते, त्याबद्दलचा निर्णय त्यांच्या पालकांनी आधीच घेऊन ठेवला होता. लग्नानंतर घरचे शिकू देतील असे जरी सांगितले असले तरी त्याची खात्री त्यांना वाटत नव्हती. मी दुसऱ्या धर्मातील मुलगी असे खोलात प्रश्न विचारतीये याबद्दल त्यांना शंकाही वाटलेली पण यात पूर्ण गोपनीयता पाळून ही फक्त संशोधनासाठी महिती वापरली जाणार असल्याचं सांगून पुरावा दाखवून याचा तुम्हाला कोणताही त्रास किंवा गैरवापर होणार नाही याची खात्री दिल्यानंतर त्यांनी ही माहिती भरून दिली.

‘एसनडीटी’ महाविद्यालयात एका मुलीशी दीर्घ मुलाखत झाली होती, त्यात त्या मुलीने असे सांगितले होते, की ती आधी ज्या महाविद्यालयात होती, तिथे मुलींचे स्वप्न फक्त लग्न करण्याचे होते व त्यासंबंधीची चर्चा त्या करायच्या, पण आता इथे आल्यावर अभ्यास व करिअरचे महत्त्व समजत आहे, या मुलीने बुरखा व हिजाब घातला होता व ती धार्मिक गोष्ट असल्याने घालायला हवी असे तिचे मत होते.

ग्रामीण भागातील निरीक्षण असे, की एकाही मुलीने बुरखा घातला नव्हता. ग्रामीण मुलींना मुस्लिम स्त्रियांचे प्रश्न जाणवण्याचे प्रमाण जास्त होते, याचे कारण असे दिसून येते की जेव्हा मुली सर्व धर्माच्या मुलींसोबत शिकतात वावरतात तेव्हा त्यांना दुसऱ्या धर्मातील मुलींचे स्त्रियांचे जगणे कसे आहे हे जास्त समजते. तसेच इतर ही अनेक अनुभव येत असल्याने त्यांचे विश्व जास्त समृध्द होते. त्यामुळे मुलींनी सर्व धर्म, जातीच्या एकत्रित वातावरणात शिकणे गरजेचे आहे. मुस्लिम मुलींना एकत्रित धार्मिक वातावरणात शिकण्यासाठी त्यांच्या पेहरवावरून भेदभाव होणे परवडणारे नाही.

अभ्यासातून अजून काही मुद्दे पुढे आले. ज्या मुली इंजिनिअरिंग किंवा बीबीए सारखे व्यावसायिक अभ्यासक्रम करत होत्या, त्यांना आत्मभान म्हणजे भविष्यात काय करायचे आहे हे माहीत होते. सामाजिक कौटुंबिक परिस्थितीमुळे जास्त संघर्ष व भेदभावाला सामोरे जावे लागते, अशा कौटुंबिक आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या मुलींना स्वतः बद्दल आणि समूहाबद्दल भान आलेले दिसले.

पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्रीला असलेल्या दुय्यम स्थानामुळे शिक्षण हे स्त्रियांच्या जगण्याचा दर्जा वाढवून त्यांना सक्षम करण्यास मदत करते. यामध्ये उच्च शिक्षण हे व्यक्तीच्या व देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडते. उच्च शिक्षण, स्त्रियांचा समाजात दर्जा वाढण्यास मदत करते. त्यांच्या व्यक्त होण्याच्या स्वतःच्या आवडी-निवडी ठरवण्याच्या व समाजात स्वतःचे स्थान निर्माण करण्यास सहकार्य करते आणि चांगलं आयुष्य जगण्याच्या मानवी क्षमतांना वाढवण्याचे कार्य करते. स्त्रियांचे उच्च शिक्षण हे वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक विकासात महत्त्वाची पायरी ठरते.

मुस्लीम मुलींना उच्च शिक्षणासाठी अनेक अडचणी असल्या, तरी पुणे शहर व पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात मुस्लीम मुलींचं उच्च शिक्षणाचं प्रमाण वाढत आहे. शिक्षणामुळे जरी व्यक्तीचा विकास होत असला तरी त्यासाठी कुटुंबाचे व समाजाचे सहकार्य लागते. बदलांना समाजाने स्वीकारणे महत्त्वाचे ठरते तर ते नेमके कोणते बदल समाजाने स्वीकारावेत असे मुलीना वाटते व स्वतःच्या शिक्षणासाठी विकासाठी त्यांच्या कुटुंबाकडून व समाजाकडून कोणत्या सहकार्याची अपेक्षा आहे. शिक्षणामुळे त्यांच्यात नेमके कोणते बदल झाले व पुढील आयुष्यासाठी स्वतःच्या कुटुंबाच्या व समाजाच्या विकासाठी त्या शिक्षणातून मिळणाऱ्या गोष्टींचा त्या कशा पद्धतीने वापर करणार आहेत, हा अभ्यासाचा विषय होता.

यात मुलींचा आत्मविश्वास, आत्मभान आणि करिअर, आयुष्याबद्दल, नातेवाईक समाज यांच्या सोबत स्वतःच्या प्रश्नासाठी बोलणे असे अनेक मुद्दे जाणून घेतले होते. त्याबरोबर, मुस्लिम समाजात स्त्रियांवरची बंधन, तोंडी तलाक धार्मिक बाबींबद्दलही काय वाटत असं विचारलं होतं.

यामुळेच कर्नाटकाच्या घटनेकडे आणि राजकारणाबरोबर, मी माझ्या संशोधन अभ्यासातून मुलींच्या आलेल्या मतांशी जोडून बघितलं. अभ्यास करताना असं दिसून आलं होतं की शहरात बुरखा घालणाऱ्या मुलींचं प्रमाण हे ग्रामीण भागापेक्षा जास्त होतं. गावात शक्यतो मुली शाळा कॉलेजमध्ये बुरखा वापरत नाहीत. मुलींनी हिजाब वापरण्याचे प्रमाण आता शाळा कॉलेजमध्ये दिसते. साधारण सात आठ वर्षांपूर्वी हिजाब दिसत नव्हता. आता त्याचं प्रमाण वाढलं आहे.

बुरखा-हिजाबचं प्रमाण वाढलं, कारण जागतिक व देशाचं राजकारण बघता धर्माची ओळख ठळक करणं वाढलं आहे. शहरात ओबीसी, भटके, दलित, मुस्लिम व इतर वंचित जातीतील लोक वस्तीत एकत्र राहतात. याचं कारण असुरक्षितता, भिती असते. कमी संसाधनं असतात. एकमेकांचा आधार मिळतो. मुस्लिम वस्तीत आजूबाजूच्या धार्मिक वातावरणात मुलं-मुली मोठी होतात. खरंतर बुरख्याचं प्रमाण नव्वद नंतर का वाढलं याच कारण बाबरी मशिद, व सर्वत्र झालेल्या, वाढलेल्या दंगली यावरून समजून घेता येतं बुरखाधारी महिलांचा वापर हिंदुत्ववादी पक्षांनी सुद्धा त्यांच्या राजकारणासाठी केलेला दिसतो.

मुस्लिम मुली व स्त्रियांचे बुरखा व हिजाब वापरण्याचे सर्मथन मुस्लिम पुरुष करताना दिसत आहेत, दोन्हीकडचे हिंदू मुस्लिम राजकीय पक्ष व नेते याचा फायदा करून घेत आहेत. बुरखा व हिजाब यांपलीकडे मुस्लिम स्त्रियांचे महत्वाचे प्रश्न आहेत. मुस्लिम समाजाचे त्यातही ओबीसी- एससी व भटक्या जमातीतील मुस्लिमांचे प्रश्न आहेत. शिक्षण आणि रोजगाराचे प्रश्न तीव्र आहेत.

हिजाब शाळा कॉलेजमध्ये घालू द्यावा की नाही याचा विचार केला तर काय समजते? मुलींना जर मिक्स धार्मिक स्पेस असणाऱ्या शाळा कॉलेजमध्ये सुरक्षित वातावरणात शिकू देणार नसाल तर त्या स्वतःचे निर्णय स्वतः कशा घेतील आणि पुढे जाऊन हिजाब व बुरखा वापरायचा की नाही हे स्वतःच स्वतः ठरवण्यासाठी कुवत तयार कशा करतील? कुटुंबाच्या धार्मिक वातावरणाच्या बाहेरचं जग या मुलींना बघता येणार नाही का?

सीएए-एनआरसी विरोधातील आंदोलनानंतर अनेक ठिकाणी मुस्लिम स्त्रिया त्यांच्या कुटुंबाच्या अवकाशातून बाहेर पडून राजकरणाच्या मुद्यांवर बोलत आहेत, ही एक सकारात्मक बाब आहे. आताही मुली त्यांच्या हिजाब घालण्याच्या मुद्यासाठी कोर्टात जात आहेत, त्यांच्या हक्कांबद्दल बोलत आहेत ही एक सकारात्मक बाब आहे, कारण आतापर्यंत मुस्लिम स्त्रिया राजकारण, नागरिकत्वाचे हक्क अधिकार यासाठी बाहेर पडताना तितक्या प्रमाणात दिसल्या नाहीत. आता त्या त्यांच्या शिक्षण हक्कांसाठी व काय घालावे, यासाठी बोलत आहेत. काहींना हिजाब परिधान करणं, हे पितृसत्ताक धार्मिक कट्टरतावाद्यांच लक्षण वाटत आहे.

बहुसंख्य लोकांच्या हिंदुत्ववादी कट्टरतेमुळे अल्पसंख्याक समाजात कट्टरतेला अजून प्रोत्साहन मिळते. महिलांवरची बंधनं वाढतात. मुस्लिम समाजातील महिलांनी प्रागतिक दिशेने वाटचाल करावी, असं वाटत असेल, तर त्याच धर्मातील व्यक्ती त्यासाठी काम करू शकतात. बाहेरचे नाही. त्यासाठी इतरांनी जास्तीत जास्त स्पेस देण्याची गरज आहे. शिक्षण, आरोग्य, रोजगार या विकासाच्या मुद्यांना पुढे आणल्याशिवाय धार्मिक पगडा कमी होऊ शकत नाही. मुस्लिम स्त्रियांच्या ओळखीला पुढे आणण्यासाठी, पितृसत्तेमधून मुक्ती मिळण्यासाठी हिजाबपेक्षा मुस्लिम मुलींच्या सुरक्षित वातावरणात शिकण्याच्या हक्काला महत्त्व दिलं गेलं पाहिजे.

(लेखाचे छायाचित्र केवळ प्रतिनिधीक)

प्रिया फरांदे, या लिंगभाव समता व वंचित समाज घटकांचे हक्क यासाठी प्रत्यक्ष हस्तक्षेप, संशोधन व अॅडव्होकसीच्या माध्यमातून कार्यरत आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0