फटाक्यांचा धुरच धूर.. नियमांचा चक्काचूर

फटाक्यांचा धुरच धूर.. नियमांचा चक्काचूर

कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांच्या दणदणाट आवाजात आणि त्यातून निर्माण झालेल्या विषारी धुरांच्या थरात यंदाची दीपावली नियमांचा चक्काचूर करीत अत्यंत बेफिकीरपणे आणि उन्मादात साजरी करण्यात समस्तांनी धन्यता मानली.

पर्यावरण संवर्धन निर्देशांक यादीत भारत तळाला
देशातील वनक्षेत्र वाढले; डोंगराळ प्रदेशात मात्र घट
वसुंधरा दिवस आणि महाराष्ट्रातील किनारी पाणथळ क्षेत्र

गेल्या काही महिन्यात कोविड 19 च्या जागतिक महामारीत वायू प्रदूषण हे धोकादायक ठरू शकते यामुळे राष्ट्रीय हरित लवाद समितीने फटाक्यांच्या विक्रीवर आणि ते फोडण्यावर बंदी घालण्याची सूचना केंद्र आणि सर्व राज्य सरकार यांना केली होती. त्यानुसार दिल्ली, कर्नाटक, राजस्थान या राज्यांनी फटाके विक्रीवर संपूर्ण बंदी घातली. महाराष्ट्रमध्ये उद्धव ठाकरे यांनी अशी कोणतीही बंदी न घालता नागरिकांना आवाहन करून मर्यादित स्वरूपात कमी आवाजाचे आणि शक्यतो ग्रीन फटाके फोडण्यास विनंती केली होती. आणि त्यासाठी काही मार्गदर्शक नियमावली तयार करण्यात आली पण या नियमांचा चक्काचूर करून नागरिकांनी मनसोक्त फटाके उडविले.

एका सर्वेक्षनानुसार मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक , कोल्हापूर, औरंगाबाद आदी सर्वच शहरात कानठळ्या बसवणाऱ्या फटाक्यांची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. विशेषतः पुण्यात लक्ष्मी पूजनावेळी इतके फटाके फोडण्यात आले की त्यामुळे धुराचा एक थर जमा झाला होता. ठाणे मुंबईमध्ये पहिल्या दिवशी कमी प्रमाणात फटाके फोडण्यात आले पण पाडवा आणि भाऊबीज या शेवटच्या दिवशी नियम धाब्यावर बसवून रात्री २ पर्यंत कर्णकर्कश आवाजांचे फटाके फोडण्यात आले. हीच स्थिती कोल्हापूर, नाशिक, सांगली, जळगाव या अन्य शहरात पाहावयास मिळत होती.

जवळपास सर्व शहरात आवाज आणि वायू प्रदूषण याची चाचणी करण्यात आली असता अपवाद वगळता सर्वच ठिकाणी कमाल मर्यादा पार करण्यात आली होती. ठाणे, पुणे येथे ही मर्यादा दीपावलीच्या दोन्ही दिवशी कमाल मर्यादा पार करून गेली होती. तुलनेने मुंबईत हे प्रमाण ठीक होते.

दीपावलीत मोठ्या आवाजाची फटाके विक्री करू नका असे सांगत त्यावर बंदी घालण्यात आली होती. पण प्रत्येक शहरात गल्लोगल्ली अनेक छोटे विक्रेते होते ज्यांच्याकडे हा साठा होता. नागरिकांनी त्यांच्याकडून असे फटाके विकत घेतल्याचे फटाके विक्री संघटनेचे म्हणणे आहे. आम्ही नियमानुसार फटका विक्री केल्याचा दावा त्यांनी केला. तर प्रत्येक गल्ली बोळात कोण फटाके फोडतोय यावर लक्ष ठेवणे शक्य नव्हते, आणि त्यासाठी मनुष्यबळ नव्हते असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनीच स्वतः निर्णय घेऊन हा प्रकार रोखण्यासाठी स्वतः पासून सुरुवात करायला हवी होती, असेही हा अधिकारी म्हणाला.

मोठ्या आवाजांचे फटाके फोडताना कोणी आढळला तर त्यावर कारवाई करण्यात येईल असे शासन नियमात होते. पण प्राप्त माहितीनुसार अशी कोणावरही कारवाई झाली नसल्याचे समजते.

कोरोनाचा दुसरा फेरा दुप्पट ताकदीने येण्याच्या तयारीत असताना नागरिकांची ही बेपर्वाई त्याला आणखी पोषक वातावरण करत आहे.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: