स्पघेटी वेस्टर्न सिनेमा

स्पघेटी वेस्टर्न सिनेमा

इटली, स्पेन, अमेरिकेतील समाजवादी आणि डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या लेखक, दिग्दर्शकांनी ६०च्या दशकात एक नवा सिनेमा प्रकार अस्तित्वात आणला जो आजवरचा सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रभावी ठरलेला सिनेमा प्रकार होता ज्याला ‘स्पघेटी वेस्टर्न’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.

उद्धवस्त मनांचे हुंदके
फादर
‘सुपर ३०’ : साचेबद्ध, ‘आहे रें’चा दृष्टिकोन

टेनिसपटू नाओमी ओसाका हिने अलिकडेच यूएस ओपन टेनिस स्पर्धा जिंकली. पण सर्वाधिक चर्चा झाली ती तिने सात दिवस लावलेल्या मास्कची. नाओमीने सात दिवस, सात नावं लिहिलेले मास्क लावले होते. अमेरिका आणि इतरत्र वंशवादाला बळी पडलेल्या लोकांची ही प्रतिनिधिक नावं होती.

आपल्या आजूबाजूच्या जगात बरं वाईट जे घडत असतं ते संवेदनशील माणसांच्या कलेत उतरत असतं. आपल्या कलेद्वारे अन्यायाला ते वाचा फोडत असतात. भूमिका घेत असतात. सभोवतालचा काळ हा क्रीडा, साहित्य, संगीतासोबतच त्या त्या काळात बनवलेल्या सिनेमात देखील उमटत असतो किंबहुना सर्वाधिक प्रभावीपणे मांडला जातो.

१९६०चं दशक हे गेल्या शतकातील सर्वाधिक घटनांनी गजबजलेलं दशक होतं. व्हिएतनाम युद्ध, अमेरिकेचा साम्राज्यवादी पैलू, हिप्पी चळवळ, निग्रो नागरी अधिकारांची चळवळ, मध्यमवर्गीय आणि कामगार वर्गात पसरलेले अस्तित्ववादाचे प्रश्न, चे ग्वेरा, मार्टिन ल्युथर किंग ज्युनिअर यांसारख्या लोकप्रिय क्रांतिकारकांची हत्या, साम्यवाद अशा विविध घटनांनी गजबजलेलं हे दशक सिनेमात न उतरत तर नवलच.

इटली, स्पेन, अमेरिकेतील समाजवादी आणि डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या लेखक, दिग्दर्शकांनी या काळात एक नवा सिनेमा प्रकार अस्तित्वात आणला जो आजवरचा सर्वाधिक लोकप्रिय आणि प्रभावी ठरलेला सिनेमा प्रकार होता ज्याला ‘स्पघेटी वेस्टर्न’ म्हणून ओळखलं जाऊ लागलं.. ही त्याची कथा.

डाकू, चोर, कायदा मोडणाऱ्या, कैदेतून पळून गेलेल्या गुन्हेगार लोकांना पकडण्यासाठी व मारण्यासाठी शेरीफ (पोलीस) आणि बाऊंटी किलर्स करत असलेले प्रयत्न हा वेस्टर्न सिनेमांचा मुख्य प्लॉट. १९०३ मध्ये एडविन पोर्टर यांच्या ‘द ग्रेट ट्रेन रॉबरी’ या मूक चित्रपटानं वेस्टर्न चित्रपटांची मुहूर्तमेढ अमेरिकेत रोवली. काऊ बॉय माणसं, घोडे, खडकाळ प्रदेश, गोळीबार, डाकू, शेरीफ अशा वैशिष्ट्यांनी भरलेला हा सिनेमा. नंतर जॉन फोर्ड या दिग्दर्शकाने ‘स्टेजकोच’ सारखे अनेक प्रभावी सिनेमे बनविले. द स्क्वा मॅन, हाय नून, शेन, द सरचर्स यांसारख्या अनेक सिनेमानी रसिकांच्या मनावर पकड घेतली. मात्र १९६० उगवेपर्यंत स्टुडिओत चित्रित केल्या जाणाऱ्या वेस्टर्न सिनेमांची लोकप्रियता कमी झाली आणि टीव्हीवरील बाऊंटी किलर्स मालिकांमधून वेस्टर्न सिनेमा कसा बसा तग धरून राहिला.

वेस्टर्न हे नाव वेस्टर्न अमेरिका प्रांतावरून पडलं असावं. कारण या चित्रपटांत प्रामुख्याने १८५० ते १९००चा पश्चिम अमेरिका दाखवण्यात येत होता. या प्रांतात ऍरिझोना, उटाह, नेवाडा, ओरिगॉन, न्यू मेक्सिको, कोलोरॅडो, कॅलिफोर्निया, इ प्रांतांचा समावेश होतो. मुख्य अमेरिका म्हणजे पूर्व अमेरिका आणि १९व्या शतकात पश्चिम दिशेनं अमेरिकेचा विस्तार झाला. या प्रांतांचे चित्रीकरण आणि तिथल्या लोकांचे प्रश्न हे वेस्टर्न सिनेमांचे मुख्य स्रोत होते. जॉन फोर्ड यांचे वेस्टर्न चित्रपट जपानमध्ये लोकप्रिय होते. या चित्रपटांच्या प्रभावातून जपानी वेस्टर्न चित्रपट (समुराई) तयार झाले. अकिरा कुरोसावा यांच्या सेवन समुराई आणि योजिम्बो सारख्या चित्रपटांचे हॉलिवूड रिमेक बनायला लागले आणि यातूनच जन्म झाला स्पघेटी वेस्टर्न चित्रपटांचा.

वेस्टर्न किंवा जपानी वेस्टर्न चित्रपट हे राष्ट्रीय भावना प्रसारित करणारे होते. त्यामुळे यातील हिरो हे नैतिकतेचे वहन करणारे होते. चांगला हिरो आणि वाईट व्हिलन अशी स्पष्ट विभागणी या चित्रपटांत केलेली दिसते. व्हिलनच्या भूमिकेत मुख्यतः मेक्सिकन बॅनडीटवर अमेरिकन मूल्य जपणाऱ्या शेरीफचा (पोलीस) विजय अशी एकसारखीच मांडणी या चित्रपटांतून दिसते. अर्थात काही सिनेमे या मांडणीला अपवाद होते. पण एकंदरीत एका विशिष्ट घटकाला नकारात्मक दाखविण्याचा प्रोपोगंडा देखील या चित्रपटांत होता. कारण मेक्सिको आणि लॅटिन अमेरिकेतील अमेरिकेचा हस्तक्षेप योग्य ठरवणारं हे चित्रीकरण होतं. अर्थात हे सर्वच रूपकात्मक होतं पण अमेरिका आणि युरोपातील प्रेक्षक वर्ग जाणकार असल्यानं असे रूपकात्मक चित्रपट ‘स्टेटमेंट’ म्हणून पाहिले जात.

१९६० पर्यंत टीव्ही आणि तंत्रज्ञानाच्या आगमनामुळे वेस्टर्न सिनेमा जवळपास संपला होता. मात्र जपानी समुराई सिनेमांची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली जात जोती. त्यातच १९६१ मध्ये अकिरा कुरोसावा यांचा ‘योजिम्बो’ हा चित्रपट रिलीज झाला. वेस्टर्न सिनेमाचा चाहता आणि स्पघेटी वेस्टर्न सिनेमांचा जनक सार्जीओ लिओनी यांनी योजिम्बोचा रिमेक १९६४मध्ये बनविला ज्याचं नाव होतं अ फिस्टफूल ऑफ डॉलर. परवानगी न घेता बनविलेल्या या चित्रपटाने जगभरातील सिनेमागृहांत धुमाकूळ घातला आणि कुरोसावा यांना मिळकतीतील १५ टक्के हिस्सा मिळाला.

त्यानंतर आलेल्या फॉर अ फ्यू डॉलर्स मोअर आणि द गुड, द बॅड अँड द अग्ली या चित्रपटांनी कमाईचे विक्रम रचले आणि स्पघेटी वेस्टर्न चित्रपटांचा काळ प्रभावी बनायला सुरुवात झाली. या काळातील सर्वात प्रभावी दिग्दर्शक म्हणजे सार्जीओ लिओनी, सार्जीओ कराबूची, दुसीओ तेसरी, डोमीयानो ङोमियानी, गुलियो पेट्रोनि इ. हे सर्व इटलीचे होते. त्यामुळेच या चित्रपटांना स्पघेटी वेस्टर्न किंवा मकॅरोनी वेस्टर्न म्हटलं जाई.

या लेखाच्या सुरुवातीला नोंदविल्याप्रमाणे संवेदनशील कलाकार त्याच्या काळाला त्याच्या कलाकृती आणू पाहत असतो. ६०चं दशक हे अनेक अर्थानं प्रस्थापित मूल्यांवर प्रश्न उपस्थित करणारं होतं. अल्बेर काम्यू आणि सार्त्र सारख्या लेखकांनी त्यांच्या लेखनातून निर्माण केलेल्या अस्तित्ववादाच्या संघर्षाची मुळे समाजात अधिक क्लीष्ट होत जाणारा हा काळ. त्यामुळेच चांगला म्हणजे नेमकं काय? आणि वाईट म्हणजे किती वाईट ? यासारखे प्रश्न या दिग्दर्शकांना पडले असावेत. त्यामुळेच अमेरिकेत निर्माण झालेल्या वेस्टर्न सिनेमाची मूल्य व्यवस्था बदलवून अत्यंत वेगळ्या धाटणीचा आणि क्रांतिकारी सिनेमा या काळात तयार झाला ज्याला आपण स्पघेटी वेस्टर्न म्हणतो.

स्पघेटी वेस्टर्न सिनेमातील सर्वधिक गाजलेले चित्रपट म्हणजे सार्जीओ लिओनीचे डॉलर ट्रायोलॉजी आणि वन्स अपॉन अ टाइम इन वेस्ट हे चार चित्रपट. या चित्रपटांचा अभ्यास केल्यास लक्षात येतं की अमेरिकन वेस्टर्न प्रमाणे चांगला आणि वाईट ही स्पष्ट रेषा या चित्रपटांत धूसर झालेली दिसते. कारण हिरो असो वा व्हिलन त्यांनी केलेल्या हत्या जवळपास सारख्याच असतात. त्यामुळे हत्येला चांगलं कसं म्हणावं? या नैतिक प्रश्नातून हिरोंची प्रतिमा या चित्रपटांत उभी केलेली दिसते. हिरोपेक्षा हे अँटी हिरो अधिक वाटतात कारण चांगल्या उद्देशाने प्रेरित असूनदेखील त्यांची साधनं ही अनैतिक, आणि स्वार्थानं बरबटलेली असतात तर व्हिलन हा सामाजिक अन्यायातून तयार झालेला असतो. अनेकदा यातील व्हिलनला भांडवलशहांचा पाठिंबा असतो. वेस्टर्नचे हिरो पैशांनी प्रेरित होते तर स्पघेटी वेस्टर्नचे वैयक्तिक अन्यायातून. त्यामुळे अनेकदा हे डाकूपट सूडपट सुद्धा ठरतात. पण वैशिष्ट्य असं की हे चित्रपट भूमिका घेतात.

व्हिएतनाम युद्धाचा काळ रूपकात्मकरित्या चित्रित झाला आहे ‘द गुड, द बॅड अँड द अग्ली’ या चित्रपटात. तीन अँटी हिरो असलेल्या या चित्रपटात युद्धाच्या निरर्थकतेवर भाष्य केलेलं आढळतं. तर वन्स अपॉन अ टाइम इन वेस्ट हा चित्रपट वेगाने पसरत जाणाऱ्या औद्योगिक संस्कृतीवर प्रश्न उपस्थित करतो. राष्ट्र निर्मितीसाठी ठरवलेली धोरणं वा तांत्रिक बदलांतून होणारा विकास हा अनेकदा असमतोल निर्माण करतो, भांडवली गुंडशाही विकसित करतो आणि विषमतेला जन्म देतो याप्रकारचा संदेश वाहण्याचे काम हे चित्रपट करतांना दिसतात.

मात्र सार्जीओ लिओनीने सौम्य रुपात दिलेले साम्राज्यवादाचे चित्रण सार्जीओ कोरबूची ने कुठलीही तमा न बाळगता ठळकपणे आपल्या चित्रपटांतून दाखविलेलं आहे.

कोरबूची हे प्रखर डाव्या विचारांचे दिग्दर्शक होते. त्यामुळे समाजातील भीषण विषमता, अराजकता, हिंसा, वंशवाद, भ्रष्टाचार त्यांनी प्रखरपणे मांडला. कोरबूचीचे झांगो, द ग्रेट सायलेन्स, द मरसेनरी हे चित्रपट ‘झपाटा वेस्टर्न’ म्हणून देखील ओळखले जातात कारण हे चित्रपट मुख्यत्वे मेक्सिकन अन्याय, चे ग्वेरा, मार्टिन ल्युथर किंग आणि अनेक साम्यवादी क्रांतिकारकांच्या हत्येपासून प्रेरित झाले होते. साम्राज्यवाद माणसाला किती हिंसक बनवू शकतो याचं अत्यंत क्रूर चित्रण या चित्रपटांत आढळून येत. सबाटा आणि अ बुलेट फॉर अ जनरल हे देखील झपाटा वेस्टर्न पठडीतीलच चित्रपट होय.

या चित्रपटात क्वचित दिसणारा घटक म्हणजे आशावाद. अनेक चित्रपटांत तर तो सापडतच नाही. अमेरिकन वेस्टर्न प्रमाणे स्पघेटी वेस्टर्नमध्ये शेवट गोड होईलच असं नाही. निराशावाद आणि शून्यता (नीहीलीजम) हा या चित्रपटांचा गाभा. १९७०पर्यंत अमेरिकेच्या साम्राज्यवादी वृत्तीने तिच्या बेलगाम सत्तेला आव्हान देणारी सर्व डोकी ठेचून टाकली होती. मग ती नागरी हक्कांची चळवळ असो वा हिप्पी. क्रांतिकारकांचे खून करण्यात आले होता. अत्यंत उमेद आणि आशेने रंगविलेली भविष्याची स्वप्न १९७० येता येता संपवली गेली होती आणि माणूस पुन्हा जगण्याच्या संघर्षावर स्थिरावला होता. त्यामुळे ही नाउमेद १९६७ नंतरच्या चित्रपटांत प्रामुख्यान दिसते. १९६८मध्ये आलेला द वाईल्ड बंच हा असाच एक अत्यंत निराशावादी रूपकात्मक चित्रपट. व्हिएतनाम युद्धावर आणि तांत्रिक प्रगतीवर अप्रत्यक्ष टीका करणारा. मनुष्याच्या अत्यंत स्वार्थी स्वभावातून निर्माण झालेलं विषमतेचं साम्राज्य कधीच संपू शकणार नाही या सत्यापर्यंत नेणारा हा निराशावाद. कारण जनतेच्या मुसक्या आवळण्याची सर्व साधनं याच स्वार्थी लोकांजवळ आहेत असा या डाव्या चित्रपटकर्त्यांचा समज होता जो त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडला.

फॉर अ फ्यु डॉलर्स मोर चित्रपटाच्या सुरुवातीलाच पडद्यावर एक वाक्य झळकत, “जिथं जगण्याची किंमत शून्य आहे तिथं मरण्यातून अनेकदा फायदा होतो आणि म्हणूनच बाऊंटी किलर्सचा उदय होतो” या वाक्यातून चित्रपटांचा टोन लक्षात येतो.

काही मोजके चित्रपट वगळता स्पघेटी वेस्टर्न सिनेमाचं बजेट कमीच होतं. त्यामुळे अधिकाधिक शुटिंग बाहेरच करण्यात आलं. यातून इटली आणि स्पेनच्या खडकाळ प्रदेशात स्पघेटी वेस्टर्न स्टुडिओज निर्माण झाले जे आजही वारसा म्हणून जतन केलेले आहेत. कोणताही मोठा संदेश देणारा चित्रपट असो त्याचा सेट अप हा जवळपास सर्व चित्रपटांत सारखाच होता. लालसर खडकाळ प्रदेशात वसलेलं गाव, आजूबाजूचे डाकू, त्यांना पकडून देण्यासाठी वा मारण्यासाठी सरकारने ठरवलेली रक्कम आणि त्यातून निर्माण झालेले बाऊंटी हंटर्स हेच मुख्य कथानक होते आणि तिच्या सभोवताल विविध विषयांची गुंफण केली जात होती. स्पघेटी वेस्टर्न चित्रपटांनी सिनेमाला दिलेली उत्तम देणगी म्हणजे सायलेंट सिनेमॅटोग्राफी. चित्रपटांमधे अनेकदा फक्त क्षितिजाचं चित्रण दिसतं. वाईड अँगल शॉट, एक्सट्रीम क्लोज्ड शॉटच्या माध्यमातून मेक्सिकन स्टॅण्डऑफ सारखा टेन्शन बिल्डिंग युद्धाचा प्रकार या सिनेमांनी लोकप्रिय केला. शिवाय काऊ बॉय पेहराव, पराकोटीची हिंसा, स्टायलाईसड शूटिंग, घोड्यांचा वापर, कॉमेडी, पात्रांची उपहासात्मक नावे (उदा. चुचो, टुको, एंजल आईज) सिगारेट कायम तोंडात ठेवणारे हिरो, इत्यादी या चित्रपटांची वैशिष्ट्य जी नंतर जगभरातील सिनेमांनी उचलली. पण सर्वांत महत्वाचं म्हणजे स्पघेटी वेस्टर्न सिनेमाला लाभलेलं एन्जो मोरिककोनीचं अजरामर संगीत. साऊंड इफेक्ट आणि पार्श्वसंगीताचा अभिजात नमुना त्यांनी सार्जीओ लिओनीच्या जवळपास सर्वच चित्रपटांतून प्रस्थापित केला. शिवाय क्लिंट इस्टवूडसारखा देखणा नट हॉलीवूडला मिळाला. स्पघेटी वेस्टर्न सिनेमांचा हिरो म्हणून क्लिंट इस्टवूडला अमाप लोकप्रियता मिळाली.

मूळ स्पघेटी वेस्टर्न सिनेमांचा प्रभाव १९७१ पर्यंत होता. त्यानंतर आलेल्या सिनेमांत हिंसा आणि हत्यांचं प्रमाण कमी झालेल दिसतं आणि कॉमेडीला वाट करून दिलेली दिसते. यातूनच स्पघेटी वेस्टर्नमध्ये स्लॅपस्टिक कॉमेडीचा उदय झाला. दे कॉल मी ट्रीनिटि, आय अँम स्टील ट्रिनिटी हे लोकप्रिय झालेले कॉमेडी स्पघेटी वेस्टर्न सिनेमे. त्यानंतर मात्र सायफाय आणि सुपर हिरो चित्रपटांची सुरुवात झाली आणि १९७८ पर्यंत मूळ स्पघेटी वेस्टर्न सिनेमा संपत आला.

मात्र या काळात स्पघेटी वेस्टर्न सिनेमांची लोकप्रियता विकसनशील देशांत वाढीस लागली होती. त्यामुळे अनेक स्पघेटी वेस्टर्न सिनेमांचे रिमेक बनायला लागले. बॉलिवूडने ही स्पघेटी वेस्टर्नपासून प्रभावित होऊन १९७५ साली एक चित्रपट बनवला ज्याने यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली. त्या चित्रपटाचं नाव आहे शोले. स्पघेटी वेस्टर्नचा काळ संपत असताना शोले बनवला गेला. यातील अनेक महत्वाचे प्रसंग हे स्पघेटी वेस्टर्न सिनेमातून जशेच्या तसे उचलले गेले आहेत. गब्बरचं विकृत हसणं, ठाकूरच्या कुटुंबाची हत्या, अमिताभची माऊथ ऑर्गन, ट्रेन, घोड्यांचे सीन असो वा साऊंड इफफेक्ट आणि पार्श्वसंगीत असो, त्यावर सार्जीओ लिओनीच्या चित्रपटांचा प्रभाव प्रामुख्याने जाणवतो.

तेव्हाचे स्पघेटी वेस्टर्न सिनेमे आजही तितकेच ताजे वाटतात. क्वान्टीन टेरेंटिनो सारखे दिग्दर्शक स्पघेटी वेस्टर्नपासून प्रभावित झालेले दिसतात. अलीकडेच आलेला टेरेंटिनोचा वन्स अपॉन अ टाइम इन हॉलिवूड हा चित्रपट म्हणजे स्पघेटी वेस्टर्न सिनेमांना दिलेली भेटच होती.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0