कथा लॉकडाऊनमधील किरकसाल गावाची…!

कथा लॉकडाऊनमधील किरकसाल गावाची…!

सातारा जिल्ह्यातलं किरकसाल हे छोटंस गाव. लॉकडाउनच्या काळात सगळं ठप्प असताना या गावातल्या काही तरुणांनी निसर्गाची संवाद साधण्याचे ठरवलं. आणि बघता बघता गावातील आबालवृद्ध त्यात सामील झाले. या मोहिमेतून गावच्या आसपासच्या पर्यावरणाची नोंद होत गेली. त्या गावाविषयी..

कमलनाथ सरकारची आज परीक्षा
असामान्य व अतिसामान्य
आगीनंतर तयारी वणव्याची…

कोविड-१९ या महामारीने संपूर्ण जग लॉकडाऊनमध्ये गेले. या टाळेबंदीमुळे अनेक जण घरी होते पण लॉकडाऊनचा फायदा मला चांगलाच घेता आला, मी निसर्गाच्या खूप जवळ गेलो त्यामुळे या महामारीत मानसिक आरोग्य सुधारण्याचा छंद जोपासायला चांगलीच संधी मिळाली. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पक्षीनिरीक्षण छंद व निसर्गनिरीक्षण जोपासल्यामुळे मानसिक आरोग्य बहरल्याचा मला अनुभव आला.

पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्हा हा समृद्ध असा प्रदेश पश्चिम घाटांचे वरदहस्त लाभलेला महाबळेश्वर, कोयना, पाटण हा जैवविविधतेच्या दृष्टीने परिपूर्ण भाग. पण पश्चिमेकडील भाग हा  निमसदाहरित जंगलांनी व्यापलेला आहे. त्यामुळे या भागात ३००० मि.मी इतका पाऊस होतो. पण याच जिल्हाच्या पूर्वेकडील प्रदेशात पर्जन्यमान सरासरी ३०० ते ५०० मि.मी असते. विस्तीर्ण असे गवताळ प्रदेश, शुष्क काटेरी वनांनी वेढलेला परिसर व काही अंशतः दुष्काळ असा हा भूभाग वन्यजीव व जैवविविधतेच्या दृष्टीने कमी अभ्यास झालेला परिसर. अशा या विलोभनीय भागात तिन्ही बाजूने डोंगर दर्यांमध्ये पायथ्याशी वसलेले किरकसाल हे टुमदार गाव आहे.

मार्च महिन्यात गावाला आल्यानंतर मी पक्षी निरीक्षणाला सुरुवात केली. अन् तेव्हाच लॉकडाऊन झाले. आधीपासून निरीक्षणाचा छंद असल्यामुळे इथल्या अधिवासात असलेले पक्षी यांचे नोंदी व निरीक्षणाचे कार्य सुरू केले. अशातच आमच्या गावचे सरपंच अमोल काटकर यांनी सांगितले की आपल्याला पीबीआर म्हणजे “लोकजैविकविविधता नोंदवही” बनवायची आहे. त्यामुळे मी ती नोंदवही कशी बनवायची व नोंदी कशा भरायच्या या कार्यात रमलो.

नोंदवहीत पक्ष्यांची माहिती, विविध वनस्पती, प्राण्यांची माहिती, गावची माहिती इ. गावाविषयी संपूर्ण नोंद, जैवविविधेची माहिती त्यात भरायची. लॉकडाऊन तर होते पण गावाला तसा कोरोनाचा प्रसार झाला नव्हता. ग्रामस्थ काळजी घेत होते. सुरवातीला मी एकटा पक्षीनिरीक्षण करत फिरायचो. नंतर काही मुलांना तरुणांना अप्रूप होते, कुतुहल होते की दुर्बिणून काय दिसते त्याचे! त्यामुळे त्यांच्यात देखील पक्षीनिरीक्षणाची आवड निर्माण झाली. मग असे करत करत आमची एक लहानशी टीम तयार झाली. मग पक्षीनिरीक्षणासोबत कुणाला निसर्गाविषयी अधिक आवड निर्माण झाली. मग कुणी झाडांविषयी नोंदी करायला सुरूवात केली, कुणाला फुलपाखरु निरीक्षणात रस होता, काहींना रानभाजी-रानफुले! असे विविधरंगी निसर्गातील घटकांचे निरीक्षण ही मुले करत असत. प्रामुख्याने शेतकरी कुटुंबातील मुले  निसर्गाच्या अधिक जवळ गेली. आधीच लॉकडाउन मग शेती होणार का नाही ? शेतीला हमीभाव ? रोजगार अशा विविध विवंचनेत असलेली तरुण मुले निसर्गाजवळ गेल्यामुळे त्यांचे मानसिक आरोग्य बळकट होत होते. बरोबर त्यांच्या पालकांमध्ये देखील हेच घडले. मुले काहीतरी निरीक्षण करत डोंगरदऱ्याने फिरत आहे, याचे कुतुहल त्यांनाही होते. कधीही पक्षी, फुलपाखरू याचा संबंधच नसलेल्यांना रोज एक नवी माहिती, नवी दिशा मिळाली. कारण पूर्वी बारमाही दुष्काळाने त्रासलेले गांव त्यामुळे पाणी हीच अविभाज्य गोष्ट त्यांच्या मनात असायची, मग बाकीकहा हा निसर्ग-पक्षी तर दूरच. पण गेल्या दोन वर्षापासून जलसंधारण व मनसंधारणाची कामे गावात व परिसरात झाल्यामुळे पावसाचे प्रमाण वाढले आहे. तसंच गावात उरमोडी धरणाचा कालवा गेला आहे. त्यामुळे आजूबाजूचा परिसर हिरवाईने नटलेला आहे.

पक्षीनिरीक्षण करताना अनेक पक्ष्यांची नवनवीन माहिती मिळत होती. ग्रामस्थांना, तरुणांना निसर्गाप्रती आवड निर्माण होत होती. गावच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीचा सदस्य असल्यामुळे गावात ग्रामपंचायत व वनविभागाच्या मदतीने जनजागृती व निसर्गविषयक कार्यक्रम राबिवले जात असत. त्यात सापांविषयी जनजागृतेचे सत्र असोत किंवा पक्षीसप्ताह, वन्यजीव सप्ताह, पक्षी निरीक्षण मोहीम इ.विविध उपक्रम आम्ही समितीच्या मार्फत गावात राबवत होतो. त्यामुळे आपसूकच किरकसालकरांची नाळ निसर्गाशी बांधली केली. त्यामुळे कधी निरीक्षण कार्यक्रमात वृद्ध, जेष्ठ व्यक्ती आवडीने भाग घ्यायची, त्यामुळे त्यांचे मानसिक व शारीरिक आरोग्य मजबूत व्हायला मदत झाली. शाळकरी विद्यार्थी देखील या पक्षीनिरीक्षण मोहिमेत सहभागी होत असत. त्यांना विविध पक्ष्यांची प्राण्यांची माहिती मिळत गेली. पक्षीसप्ताह दरम्यान प्रभात फेरी काढत ते डोंगरापर्यंत पक्षीनिरीक्षणासाठी त्यांची वेगळीच मजा असायची. खरंच  लॉकडाऊन असे काही वाटलेच नाही. एक व्यक्ती व एका टीममुळे सर्व गाव पक्षीविषयक निसर्गरूपी बनत होते. गावातल्या प्रत्येकाला वाटते की.. “नाही”! आपण वृक्षतोड केली नाही पाहिजे, शिकार केली नाही पाहिजे, त्यामुळे इथे असलेल्या पक्ष्यांना वन्यजीवांना त्रास होणार नाही त्यांचा अधिवास सुरक्षित राहील.

किरकसाल गावाला ६१६ हेक्टर एवढे  वनक्षेत्र लाभले आहे. शुष्क काटेरी वनांनी वेढलेला प्रदेश इथे. करवंद, लिंब, बाभळ, भुत्या अमोनी, अरणी अशा काटेरी औषधी झाडीचा हा प्रदेश पूर्वीपार दुष्काळ असल्यामुळे अवैध वृक्षतोड, शिकारीचे प्रमाण या भागात अधिक होते.

पण जनजागृती, पक्षीनिरीक्षण मोहीम इ. अनेक निसर्गरूपी कार्य उपक्रमामुळे इथले वनक्षेत्र आज बहरले आहे. लांडगे, कोल्हे, तरस, रानमांजर इ. विविध वन्यजीवांचे हक्काचे अधिवास या भागात आढळते. संपूर्ण गावात तीन सूत्रीचा वापर करण्यात आला. शिकारबंदी, कुर्हाडबंदी आणि चराईबंदी या त्रिसूत्रीचा वापर करून इथले वनक्षेत्र वाचले आहे. तुम्ही नावातच बघा ना “किरकसाल” म्हणजे किरss दाट झाडांचे प्रदेश. म्हणजे इथला भूभाग हा घनदाट काटेरी झाडांनी वेढलेला आहे. यांची व्याप्ती  आपल्याला किरकसाल गावात आल्यानंतर दिसेल. निसर्गाचे विविध रंग, रूप, त्यांचे नोंदी, तपशील जनजागृती या गोष्टीवर लक्ष केंद्रित केले तर प्रत्येक गाव हिरवेगार होईल आपल्याला आपल्या गावाचे रक्षण केले पाहिजे. इथल्या जैवविविधेचे रक्षण केले पाहिजे असे जर प्रत्येक गावातील व्यक्तीने ठरवले तर कित्येक गावं दुष्काळमुक्त होतील. जैवविविधेने परिपूर्ण होतील, तिथल्या लोकांचे, ग्रामस्थांचे आरोग्य मानसिक व आरोग्य शारीरिक आरोग्य सुधारण्यात मदत होईल.

लॉकडाऊनमध्ये किरकसाल गाव हे महाराष्ट्रासाठी एक उदाहरण आहे की, विविध पर्यावरणविषयक उपक्रम राबवून माणूस निसर्गाच्या अगदी जवळ  येतो. पक्षीनिरीक्षणामुळे मानवी प्रवृत्तीत हळुहळू अध्यात्मिक रुजू लागते. मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. हे या गावाला बघून वाटेल. इथले प्रत्येक व्यक्ती आपलेगाव निसर्ग संरक्षणासाठी कसे योगदान देईल याकडे लक्ष केंद्रित करत आहे. पक्ष्यांची मैत्री करावी आणि जगावं त्यांच्यासारखे .. संगतीनं.. मस्त गात गाणं  गुणगुणत..! जगावं अशी शिकवण पक्षी समाजाला देत असतात. असो, तर ही गोष्ट होती आदर्शगांव किरकसालची लॉकडाउनमध्ये मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी निसर्गाने दिशा दिली व गाव निसर्गरूपी झाले त्याचा हा आढावा..

चिन्मय प्रकाश सावंत, हे पक्षीमित्र असून, भारतीय युवा जैवविविधता नेटवर्क- महाराष्ट्र राज्याचे  समन्वयक आहेत. NatureNotes

ही मालिका ‘नेचर कजर्वेशन फाउंडेशन‘ द्वारे राबवलेल्या ‘नेचर कम्युनिकेशन्स‘ या कार्यक्रमाचा भाग आहे. सर्व भारतीय भाषांतून निसर्गविषयक लेखनास प्रोत्साहन मिळावे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. पक्षी आणि निसर्गाविषयी लिहण्याची तुमची इच्छा असल्यास हा फॉर्म भरा.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0