चिनी विकासाचे तैवान मॉडेल

चिनी विकासाचे तैवान मॉडेल

आज उत्पादन क्षेत्रात चीनने जी महाकाय प्रगती केली आहे. यामागे तैवान आहे. उत्पादनाच्या तैवान मॉडेलमुळेच चीन उत्पादनात वरचढ झाला आहे.

अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहाच्या सभापती नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीनंतर अमेरिका आणि चीन यांच्यात वाद निर्माण झाला आहे. गेल्या २५ वर्षात तैवानला भेट देणाऱ्या पेलोसी या अमेरिकी प्रतिनिधिगृहाच्या पहिल्या सभापती आहेत. चीनने या दौऱ्याला विरोध दर्शवला होता. पेलोसी यांच्या दौऱ्यांनंतर चीनने तैवानच्या समुद्र हद्दीमध्ये हवाई आणि युद्ध नौकांसह कवायती सुरु केल्या आहेत. इतकंच नाही तर चीनने तैवानमधून आयात होणाऱ्या ३५ खाद्य पदार्थांवर बंदी घातली आहे. चीन जगातील एक मोठा उत्पादक देश झाल्याने तैवानमधून होणाऱ्या आयातीवर बंदी घालणं सहज शक्य झालं. आहे. मात्र हे लक्षात घेतलं पाहिजे, की चीनच्या या प्रगतीमागचं एक कारण तैवान हा देश आहे.

एकेकाळी एकाकी आणि रहस्यमय असलेला चीन आज जगातील सर्वात मोठा उत्पादक देश झाला आहे. ‘फॅक्टरी ऑफ द वर्ल्ड’, ‘ग्लोबल मॅनुफॅक्चरर’ अशी चीनची ओळख निर्माण झाली आहे. यावर्षी पहिल्या सहा महिन्यात चीनच्या व्यापारात ९ टक्क्यांनी वाढ झाली असून,  तो १९ खर्व युआन म्हणजेच २.९४ खर्व अमेरिकी डॉलरवर पोहोचला आहे. २०२२ च्या पहिल्या सहा महिन्यात सर्व आसियान देश, युरोप आणि अमेरिका यांच्याबरोबर चीनने आयात आणि निर्यात केली आहे. आसियान देशांबरोबरची आयात १० टक्क्यांनी वाढली आहे, तर युरोप आणि अमेरिकेबरोबरचा व्यापार अनुक्रमे ७ आणि ११ टक्क्यांनी वाढला आहे. ‘बेल्ट अँड रोड’ प्रकल्पातील देशांशी पण १७ टक्क्यांनी व्यापार वाढला आहे. हे व्यापाराचे आकडे बघता, एकाकी देश आज जागतिक उत्पादक कसा झाला असा प्रश्न पडतो. या प्रश्नाचं उत्तर शैली रिगर यांच्या ‘द टायगर लिडिंग द ड्रॅगन’ या पुस्तकात मिळतं. चीनच्या प्रगतीवर तैवानचा किती प्रभाव आहे याची चर्चा या पुस्तकात केली आहे.

‘माओ त्से तुंग’ यांच्या कम्युन शेती, पोलाद निर्मिती या योजना फसल्या. या प्रयोगांमध्ये चीनमध्ये लाखो मृत्यू झाले. त्यानंतर सांस्कृतिक क्रांती घडवून आणली गेली, यामुळे चीन अजून मागे गेला. सांस्कृतिक क्रांती नंतर ८० च्या दशकात जेव्हा ‘तंग शिआओ फिंग’ यांनी परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली, तेंव्हा त्याचा फायदा तैवानी गुंतवणूकदारांनी घेतला आणि चीनमध्ये गुंतवणूक केली. तेव्हापासून चीनच्या जागतिक उत्पादक या प्रवासाला सुरुवात झाली. चीनमध्ये गुंतवणूक करून कमी खर्चात उत्पादन शक्य होतं याचा फायदा घेत तैवानमधील अनेक पारंपरिक उद्योग चीनमध्ये हलवण्यात आले. चीनला जागतिक स्तरावर उत्पादक देश बनवण्यामध्ये ‘थाई शांग’ यांचा मोठा वाटा आहे. थाई शांग म्हणजे कोण तर, तैवानमधील व्यावसायिकांनी चीनमध्ये कारखाने  सुरु केले,  या व्यावसायिकांना थाई शांग संबोधलं जातं.

तैवानमधील व्यवसाय चीनमध्ये कसे गेले याची गोष्ट  ‘द टायगर लेंडिंग द ड्रॅगन’, या पुस्तकात आहे. १८९५ ते १९४५  दरम्यान तैवान ही जपानची वसाहत होती. दुसऱ्या महायुद्धानंतर जपानने तैवानमधून माघार घेतली होती. दुसऱ्या महायुद्धानंतर तैवानमध्ये रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. शेती तर सुरु होतीच पण इतरही व्यवसाय सुरु करावेत असं तैवानी नागरिक विचार करत होते. याच काळात तैवानमधील ‘छन थिअन फु’, या व्यापाऱ्याने केळ्यांचा व्यवसाय सुरु केला. तो तैवानमधून जपानला केळी निर्यात करत असे. केळी निर्यात करता करता, त्याने छत्र्यांचा व्यवसाय सुरु केला. कारण तैवानमध्ये पाऊस जरा जास्तच असतो, त्यामुळे छत्र्यांसाठी ती मोठी बाजारपेठ होती. याच काळात तंत्रज्ञान पण विकसित होत होत, जपानमध्ये चांगल्या दर्जाच्या छत्र्या तयार होत होत्या. या छत्र्या  ‘छन’ ने तैवानमध्ये विकण्यास सुरुवात केली. छत्र्यांची विक्री करता करता, जपानी छत्र्या बनवण्याचं तंत्रज्ञान त्याने आत्मसात केलं आणि तैवानमध्ये छत्र्यांच्या उत्पादनाला सुरुवात केली. छत्र्या बनवण्याचा छोटा कारखाना तैवनामध्ये सुरु झाला. ‘फुथाई’ अशी छत्र्या उत्पादन करणारी कंपनी तैवानमध्ये सुरु झाली. या छत्र्या सुरुवातीला जपानमध्ये विकल्या जात होत्या. काही काळानंतर ‘फुथाई’ या कंपनीला अमेरिकी कंपनीने छत्र्या उत्पादनाचं कंत्राट दिलं. तैवानमध्ये तयार झालेल्या छत्र्या अमेरिकेत विकल्या जाऊ लागल्या. छत्र्यांच्या व्यवसायाबरोबर इतर व्यवसाय पण तैवनामध्ये हळू हळू सुरु झाले.

चीन प्रमाणे तैवानमध्ये पण कृषी कायद्यात बदल झाले. जो कसेल त्याची जमीन या नियमानुसार जमीन धारणा कायदा तयार करण्यात आला. पण तैवानमध्ये प्रत्येक कुटुंब शेतीच करायला लागल्याने, शेतीपासून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे दरडोई उत्पन्न वाढलं. प्रत्येक घरात व्यवसायासाठी भांडवल जमा होऊ लागलं. या भांडवलातून नवीन व्यवसाय सुरु करावा या कल्पनेतून प्रत्येक घरात छोटे मोठे उत्पादन व्यवसाय सुरु झाले. मुबलक भांडवल असल्याने, एकाच घरात अनेक व्यवसाय सुरु झाले. एका कुटुंबातील एका व्यक्तीचा जर पोलादाचा व्यवसाय असेल, तर दुसरी व्यक्ती सायकलचे सुटे भाग तयार करायची, तिसरी व्यक्ती सायकलचे टायर तयार करायची. प्रत्येक कुटुंब शेती आणि स्वतंत्र व्यवसाय करू लागले. अशा प्रकारे तैवानमध्ये घरोघरी लघु उद्योग सुरु झाले आणि प्रत्येकालाच मालक व्हायचं होतं, कामगार व्हायला कोणीच तयार नव्हतं. त्यामुळे मनुष्यबळाची कमतरता भासू लागली. तैवान सरकारने औद्योगिकरणाला प्राधान्य द्यायला सुरुवात केली. लघु उद्योगांचं रूपांतर मोठ्या उद्योगात करण्याचा विचार सुरु झाला.

याच काळात सांस्कृतिक क्रांतीचे चटके सोसलेल्या चीनने परदेशी गुंतवणुकीला परवानगी दिली होती. मोठ्या लोकसंख्येच्या या देशांत लोकांना रोजगाराची पण आवश्यकता होती. कमी खर्चात उत्पादन करून निर्यात करता येईल, असा देश चीन होता. त्यामुळे तैवानमधील छत्र्या उत्पादना बरोबर इतरही उत्पादन व्यवसाय चीनमध्ये सुरु झाले. अशा पद्धतीने तैवनामध्ये सुरु असलेले इतर उत्पादन व्यवसाय हे चीनमध्ये हलण्यात आले आणि चीन हे अनेक छोट्या मोठ्या वस्तूंचं उत्पादन केंद्र बनलं. जसे तैवानमध्ये घरोघरी लघु उद्योग सुरु होते, तेच उद्योग चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर सुरु झाले. एका वस्तूचे अनेक सुटे भाग वेगवेगळ्या ठिकाणी तयार होऊ लागले. असे अनेक उत्पादन उद्योग तैवानी व्यावसायिकांनी चीनमध्ये सुरु केले.  पण त्याकाळी असे किती उद्योग तैवानमधून चीनमध्ये स्थलांतरित झाले, याची काही आकडेवारी उपलब्ध नाही किंवा किती थाई शांग चीनमध्ये स्थलांतरित झाले याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. दोन्ही देशांनी तशी माहिती ठेवलेली नाही. पण यामधील कुतूहलाची गोष्ट म्हणजे चीनमध्ये थेट परकीय गुंतवणूक झाली ती ब्रिटिश वर्जिन बेटं, केमेन  बेटं आणि पनामा इथून. ही गुंतवणूक तैवान आणि हॉंगकॉंगच्या माध्यमातून झाली. तैवानमधील लघु उद्योगांच्या मॉडेलने चीनमध्ये मोठे स्वरूप धारण केले. त्यानंतर चीनने विशेष आर्थिक क्षेत्र विकसित करण्याचा निर्णय घेतला आणि ‘शनचन’ हे पाहिलं विशेष आर्थिक क्षेत्र म्ह्णून विकसित करण्यात आलं. अनेक परकीय कंपन्यांनी चीनमध्ये कारखाने सुरु केले. याचं मुख्य कारण कमी उत्पादन खर्च आणि मजूर उपल्बध होणं. परंपरावादी असलेल्या चीनने परदेशी गुंतवणुकीला चालना दिली. विशेष आर्थिक क्षेत्राच्या माध्यमातून देशभर कारखाने सुरु केले. सध्या चीनमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंबरोबरच इलेक्ट्रिक वाहन उद्योग, ड्रोन, पोलाद अशा अनेक वस्तूंचं उत्पादन केलं जातं. स्वस्तात उपलब्ध होणारं मनुष्यबळ यामुळेच चीनने उत्पादन क्षेत्रात प्रगती केली असं नाही. तर उद्योगांना लागणाऱ्या सोयी सुविधा, दळण वळणाची साधनं, चीनने विकसित केली आहेत. त्यामुळेच जागतिक बाजारपेठ काबीज करणं चीनला शक्य झालं.

आज जागतिक उत्पादनात चीनचा वाटा सुमारे २८ टक्के इतका आहे. आज लोकप्रिय असलेल्या अँपल ब्रॅण्डच्या वस्तूंची निर्मिती फॉक्सकॉन ही तैवानची कंपनी करते. फॉक्सकॉन ही चीनमधील एक मोठी खाजगी कंपनी आहे आणि या कंपनीने चीनमध्ये सुमारे दीड कोटी रोजगार निर्माण केले आहेत. जगभर वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंपैकी ४० टक्के वस्तूंची निर्मिती फॉक्सकॉन कंपनी करते. आज उत्पादन क्षेत्रात चीनने जी महाकाय प्रगती केली आहे. यामागे तैवान आहे. उत्पादनाच्या तैवान मॉडेलमुळेच चीन उत्पादनात वरचढ झाला आहे.

श्रद्धा वारडे, या चीनच्या अभ्यासक आहेत.

COMMENTS