‘द वायर’ हवामानबदल जागृती मोहिमेत सामील

‘द वायर’ हवामानबदल जागृती मोहिमेत सामील

जगाला भेडसावणाऱ्या हवामान बदल समस्येची माहिती जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी सुरू असलेल्या ‘कव्हरिंग क्लायमेंट नाऊ’ मोहिमेत ‘द वायर’ सामील होत आहे. सप्टेंबरमध्ये न्यू यॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांत हवामान बदलाविषयी एक परिषद होत असून या परिषदेच्या निमित्ताने प्रसिद्ध होणारे हवामान विषयक अहवाल, वृत्ते ‘द वायर’कडूनही प्रसिद्ध केले जातील.

‘कव्हरिंग क्लायमेंट नाऊ’  ही मोहीम “कोलंबिया जर्नालिझम रिव्ह्यू’ व द ‘नेशन’कडून चालवली जात असून जगभरात हवामान बदलांविषयी जनजागृती व प्रबोधन व्हावे व त्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याने त्यांच्या मार्फत ही मोहीम पुढे नेली जाणार आहे. हवामान बदलाविषयीची विविध वृत्ते, अहवाल हे जगभरातील १७० वर्तमानपत्रे, वायर सर्विस, मासिके, रेडिओ, वृत्तवाहिन्या यांच्या मार्फत प्रसिद्ध केले जाणार आहे.

यामध्ये जगातील प्रमुख द गार्डियन, ब्लूमबर्ग, रोलिंग स्टोन मॅगझिन, व्हॅनिटी फेअर, स्लेट, द कॉन्व्हर्सेशन, नेचर अशी प्रसारमाध्यमे असून भारतातर्फे द वायर, द पीपल्स अर्काइव्ह ऑफ रुरल इंडिया, द हिंदुस्तान टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया व न्यूज १८ अशा संस्था आहेत.

गेल्या वर्षी आयपीसीसीने, हरितगृह वायूंचे प्रमाण कमी न केल्यास जगाला तापमानवाढीच्या समस्येला तोंड द्यावे लागेल असा इशारा दिला होता. मोठ्या प्रमाणावरील औद्योगिकीकरणामुळे जगाचे तापमान २ अंश सेल्सियसने वाढले असल्याचे या संस्थेने सांगितले होते तरीही विकसित व विकसनशील देशांमध्ये कोणी हरितगृहवायूचे उत्सर्जन कमी करायचे यावर वाद सुरू आहेत. २०३० पर्यंत आपण हरितगृह वायूंच्या उत्सर्जनावर नियंत्रण आणू शकलो नाही तर आपल्याला पुन्हा मागे येता येणार नाही असेही आयपीसीसी समितीने सांगितले होते.

हा सगळा तिढा पाहून ‘कव्हरिंग क्लायमेंट नाऊ’ ही मोहीम गेल्या मे महिन्यापासून सुरू करण्यात आली होती. अशा मोहिमेद्वारे सामाजिक चळवळी उभ्या करणे, व्यावसायिक, बड्या उद्योजकांचे हवामान बदलाविषयी प्रबोधन करणे, त्यांची पृथ्वीच्या संरक्षणासाठी मदत घेणे असे उपक्रम हाती घेतले जात आहे.

काही महिन्यांपूर्वी स्वीडनमधील १६ वर्षांची विद्यार्थीनी ग्रेटा थुनबर्ग हिने हवामान बदलाचे भीषण परिणाम जगाला सांगण्यासाठी स्वीडनच्या संसदेपुढे उपोषण करून स्वत:च जागृती मोहीम हाती घेतली होती. त्यानंतर जगभरातील मुले फ्रायडे फॉर फ्युचर या मोहिमेत सामील झाली होती. गेल्या मार्चमध्ये या मोहिमेत १३५ देशांतील २० लाखाहून अधिक मुले सामील झाली आहेत. त्यात भारतातीलही मुले आहेत.

भारताला अवेळी पाऊस, महापूर, दुष्काळ  असे हवामान बदलाचे तडाखे बसू लागले आहेत. त्यामुळे ६० कोटीहून अधिक नागरिकांना त्याची झळ बसली आहे. एका अहवालानुसार १९९० ते २००६ या काळात भारताची ३३ टक्के किनारपट्‌टी नष्ट झाली आहे. याचा परिणाम स्थलांतर, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा यांच्यावर झाला आहे.

मूळ बातमी

COMMENTS