मुंबईत लाखभर नागरिकांचे मतदार यादीत फोटो नाहीत

मुंबईत लाखभर नागरिकांचे मतदार यादीत फोटो नाहीत

मुंबई: मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागाकडून आतापर्यंत फोटो नसलेले १ लाख १८ हजार मतदारांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले असून ज्या मतदारांचे छायाचित्र मतदार यादीमध्ये आढळून येत नाहीत अशा मतदारांनी आपले नाव असलेल्या संबंधित मतदारसंघात जाऊन आपले छायाचित्र ८ जुलै, २०२१ पूर्वी जमा करावीत अन्यथा त्यांची नावे मतदार यादीतून वगळण्यात येईल, असे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर यांनी केले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग मतदार याद्यांमध्ये छायचित्रे समाविष्ट करण्यासाठी आग्रही आहे. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यांत मतदार यादी शुद्धीकरणाचा कार्यक्रम सुरू आहे. दोषरहित व अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी मतदारसंघातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्या मार्फत ०१ जानेवारी २१ या दिनांकावर आधारीत मतदार यादीतील छायाचित्र नसलेल्या (Residual Voter) मतदारांच्या घरोघरी जावून भेटी देण्यात आल्या आहेत. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये वेळोवेळी छायाचित्रे गोळा करण्याच्या मोहिमा राबवूनही अनेक मतदार संघातील मतदारांचे फोटो समाविष्ट झालेले नाहीत. छायाचित्र नसलेल्या मतदारांची यादी त्यांच्या मतदार संघाचे कार्यालयात आणि मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.electionmumbaicity.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

जाहीर केलेल्या वेळेत छायाचित्र जमा न केल्यास आपण संबंधित मतदारसंघातून स्थलांतरित आहात अथवा आपण मतदारसंघात राहात नाही असे गृहीत धरण्यात येऊन आपले नाव मतदार यादीतून वगळण्यात येईल असेही जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. या विषयी नागरिकांना काही शंका असल्यास किंवा या संदर्भात आपल्या काही हरकती किंवा आक्षेप असल्यास आपल्या संबंधीत जवळच्या मतदार संघ कार्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन मुंबई शहर जिल्हा निवडणूक विभागामार्फत करण्यात आले आहे.

वृत्त छायाचित्र प्रतिनिधीक.

COMMENTS