‘एन्काउंटर झालेले दहशतवादी नव्हेत; आमच्या घरातले सदस्य’

‘एन्काउंटर झालेले दहशतवादी नव्हेत; आमच्या घरातले सदस्य’

श्रीनगरः गेल्या १८ जुलै रोजी काश्मीर खोर्यात शोपियन जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांना लष्कराने ठार मारल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी या दहशतवाद्य

शोपियन एन्काउंटरः लष्करी अधिकाऱ्याविरोधात फिर्याद
एन्काउंटर, झुंडशाहीच्या ‘न्याया’ला ५० टक्के पोलिसांचे समर्थन
एन्काउंटर कायद्याप्रमाणेच : सायबराबाद पोलिस कमिशनर

श्रीनगरः गेल्या १८ जुलै रोजी काश्मीर खोर्यात शोपियन जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांना लष्कराने ठार मारल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यावेळी या दहशतवाद्यांची ओळख पटली नव्हती पण या तिघांची जी छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत, त्यावरून हे दहशतवादी नसून मजूर आहेत आणि ते आमच्या कुटुंबातले महिन्याभरापासून बेपत्ता झालेले तीन सदस्य असल्याचा आरोप राजौरीतील मोहम्मद युसूफ यांच्या कुटुंबाने केला आहे.

या कुटुंबियाचा हा आरोप जर खरा ठरला तर मार्च २०००मध्ये अनंतनाग जिल्ह्यात पाथरीबल येथे पाच निष्पाप नागरिकांना ते दहशतवादी असल्याच्या कारणावरून सुरक्षा दलाने ठार मारले होते. तसेच २०१०मध्ये मचिल येथे पोलिस एन्काउंटरमध्ये तीन नागरिकांना ठार मारण्यात आले होते, या दोन घटनांनंतरची ही तिसरी हृदयद्रावक घटना ठरू शकते.

बेपत्ता झाल्याची तक्रार

राजौरीतील या कुटुंबातील मोहम्मद युसुफ यांनी द वायरला सांगितले की, गेल्या गुरुवारी आमच्या घरातले तीन सदस्य बेपत्ता असल्याची तक्रार आम्ही राजौरी पोलिस ठाण्यात नोंद केली. बेपत्ता सदस्यांमधील इम्तियाज अहमद हा शोपियन येथे महिनाभर मजूर म्हणून काम करत होता. त्याने माझा मुलगा अब्रार व मेहुणीचा मुलगा त्याचेही नाव अब्रार, या दोघांना शोपियन येथे काम आहे, म्हणून बोलावले. इम्तियाजच्या बोलावण्यामुळे दोघेही १८ जुलैला शोपियनकडे रवाना झाले. पण त्यानंतर त्यांचा कोणताही ठावठिकाणा समजला नाही. १८ जुलैला माझा मुलगा अब्रारला दूरध्वनी केला पण त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्याचा फोन बंद असल्याचे लक्षात आले.

१८ जुलैला अमशीपोरा, शोपियन भागात सुरक्षा दलाने ठार मारलेल्यांचे फोटो कोणी दाखवल्यास अब्रार हा माझ्या मेहुणीचा मुलाला मी ओळखू शकतो, असा दावा मोहम्मद युसूफ यांनी केला आहे.

मोहम्मद युसूफ यांनी शोपियनला जाण्यासाठी राजौरी प्रशासनाची परवानगी मागितली आहे. आमच्या घरातले तिघेजण मजुरीसाठी शोपियनला गेले होते. आम्ही गरीब आहोत, दहशतवादाशी आमचा संबंध नाही असेही युसूफ म्हणाले.

राजौरीतील एक स्थानिक लाल हुसैन यांनी सांगितले की, १७ जुलैला इम्तियाजने शोपियनमध्ये दोन मुले आल्याचे फोनवरून सांगितले होते. या तिघांचा नंतर संपर्क झाला नाही. पण त्यावेळी असे वाटले की कोविड-१९मुळे यांना क्वारंटाइन व्हावे लागले असेल. पण नंतर काहीच संपर्क न झाल्याने अखेर पोलिसांमध्ये तक्रार नोंदवण्यात आली, असे लाल हुसैन सांगतात.

राजौरीतील एक राजकीय कार्यकर्ते गुफ्तार अहमद चौधरी यांनी या प्रकरणाची त्वरित चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. तर झफर चौधरी या पत्रकाराने मोहम्मद युसूफ यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी युसूफ यांनी मारले गेलेले तिघे आमच्या घरातलेच तिघे सदस्य असल्याचे ठामपणे सांगितल्याचे ट्विट केले आहे.

या संदर्भात लष्कराने एक प्रसिद्धी पत्रकाद्वारे या घटनेची चौकशी करू असे म्हटले आहे. सोशल मीडियात १८ जुलै २०२० रोजी शोपियन येथील चकमकीत ठार झालेल्या तीन दहशतवाद्यांची चर्चा सुरू आहे. या तिघांची ओळख न पटल्याने त्यांचे मृतदेह कायद्यानुसार पुरले गेले पण याची चौकशी केली जाईल, असे पत्रकात म्हटले आहे.

तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ जुलैला झालेले हे एन्काउंटर राष्ट्रीय रायफल्सच्या ६२ व्या बटालियनकडून झाले होते. या बटालियनला आमशीपोरा येथे काही दहशतवादी असल्याची खबर मिळाली त्यानुसार तेथे ऑपरेशन केले गेले. या ऑपरेशनमध्ये पोलिस व सीआरपीएफही सामील होती. या ऑपरेशनमध्ये तिघांना ठार मारल्यानंतर त्यांच्याकडे शस्त्रास्त्रे, दारुगोळा असे गुन्हेगारी स्वरुपाचे साहित्य आढळून आले. हे सर्व साहित्य जमा करून त्याचे रेकॉर्ड करण्यात आले आहे. तसेच तिघांच्या मृतदेहांचे डीएनए नमुने घेऊन अन्य वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रियेद्वारे माहिती घेऊन ते मृतदेह बारामुल्ला येथे अंत्यविधीसाठी पाठवण्यात आल्याचेही पोलिसांनी सांगितले. जर या संदर्भात कोणाला तक्रार असल्यास त्यांनी पुराव्यानिशी यावे. या संदर्भातील तक्रार हिरापोरा पोलिस ठाण्यात नोंद झाल्याचे प्रवक्त्याने स्पष्ट केले.

या संदर्भात राजौरीचे पोलिस अधिक्षक चंदन कोहली यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी युसूफ यांच्या कुटुंबाने आपल्या घरातील तीन बेपत्ता सदस्यांची तक्रार नोंदवल्याचे सांगितले. या संदर्भात अहवाल तयार केला जात आहे असेही ते म्हणाले.

पण द. काश्मीरमधील एका पोलिस अधिकार्याने युसूफ कुटुंब पोलिसांकडे आले नसल्याचे सांगितले.

दरम्यान भारतीय कम्युनिस्ट पार्टीने या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. तर पीडीपीच्या प्रमुख नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी हे ठरवून केलेले एन्काउंटर आहे असा आरोप केला आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: