‘तिहेरी तलाक विधेयक म्हणजे केवळ फार्स’

‘तिहेरी तलाक विधेयक म्हणजे केवळ फार्स’

नवी दिल्ली : राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक संमत करून मुस्लिम पुरुषांना गुन्हेगार ठरवण्याच्या सरकारच्या धोरणावर देशभरातील अनेक महिला संघटना, महिला कार्यकर्त्यां व नागरी चळवळींकडून टीका केली जात आहे. या सर्वांनी एक पत्रक बुधवारी प्रसिध्द केले. या पत्रकात सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहेत.

या पत्रकात मुस्लिम महिला (विवाह हक्क संरक्षक) विधेयक २०१९, संसदीय समितीच्या पुनर्विचारासाठी न पाठवता ते घाईघाईत संमत केल्याचा आरोप करण्यात आला असून, राष्ट्रपतींनी या विधेयकावर स्वाक्षरी करू नये अशी विनंती करण्यात आली आहे.

सध्या देशभर झुंडशाही मुस्लिम अल्पसंख्याकांना लक्ष्य करत असताना आणि दोषी उजळ माथ्याने फिरत असताना मुस्लिम महिलांच्या हक्काचे आपण संरक्षक असल्याचा सरकारचा दावा एक फार्स असून, मुस्लिम समाजाला गुडखे टेकायला लावणारा, हा कायदा असल्याची टीका या पत्रकात करण्यात आली आहे.

मुस्लिम महिलांच्या हक्काचा दावा करणाऱ्या तिहेरी तलाक विधेयकामुळे मुस्लिम पुरुषांना तुरुंगवास होणार असला तरी पीडित महिलेला तिच्या माहेर व सासर कुटुंबाकडूनच मानसिक, शारीरिक त्रास होण्याची भीती अधिक आहे. त्यात या विधेयकात पीडित मुस्लिम महिलेची व तिच्या मुलांच्या आर्थिक सुरक्षिततेची तरतूद नसल्याच्या बाबीकडे पत्रकात लक्ष वेधले आहे.

या पत्रकात विरोधी पक्षांच्या कचकाऊ भूमिकेवरही टीका करण्यात आली आहे. विरोधी पक्षाचे नेते आपल्या जाहीर भाषणात या विधेयकाच्या विरोधात बोलतात पण प्रत्यक्षात त्यांच्या मदतीने हे विधेयक मंजूर झाले आहे. या देशाने विरोधक यासाठी निवडलेले नाहीत. प्रत्येक विरोधी पक्षांनी घटनात्मक मूल्यांसाठी व कर्तव्यांसाठी अशा विधेयकांविरोधात उभे राहिले पाहिजे. लोकशाही वाचवली पाहिजे असे या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

या पत्रकावर स्वाक्षऱ्या करणाऱ्या संस्था व मान्यवरांची नावे पुढील प्रमाणे : बेबाक कलेक्टिव्ह, युनायटेड अगेंस्ट हेट, उमा चक्रवर्ती (इतिहासकार व स्त्रीवादी कार्यकर्त्या), फराह नक्वी (लेखक व कार्यकर्त्या) हर्ष मंदर (अमन बिरादरीचे समन्वयक), कल्याणी मेनन सेन (कार्यकर्त्या व संशोधक), ब्रिनेल डिसुझा (टीस), गीता सेशू (पत्रकार), अरुंधती धुरु (मानवीहक्क कार्यकर्त्या), माधवी कुकरेजा (महिला हक्क कार्यकर्त्या), रितू दिवाण (अर्थतज्ज्ञ), मुनीझा खान, हमीदा खातून, देवी देसाई (सामाजिक कार्यकर्त्या), जोहन्ना लोखंडे, नंदिता नरेन, सोफिया खान (वकील व महिला हक्क कार्यकर्त्या), नसीरुद्दीन हैदर (पत्रकार व कार्यकर्ता), संगीता मालशे, मनीषा गुप्ते (महिला हक्क कार्यकर्त्या), बिराज मेहता, पर्सिस गिनवाला, संध्या पानस्कर (महिला हक्क कार्यकर्त्या), पुर्निमा गुप्ता, अनिता रेगो, डिम्पल ओबेरॉय वहाली, ममता सिंग (महिला हक्क कार्यकर्त्या), सफदर जाफर, तलत अझिझ, मुमताज शेख, सुप्रिया सोनार, पद्मा (महिला हक्क कार्यकर्त्या), अनिता चेरिया, शिल्पा फडके (विचारवंत), सिल्विया कर्पागम (संशोधक), सौरव दत्ता (पत्रकार व कार्यकर्ता), सानोबर किश्वर (वकील), रेणू चक्रवर्ती, शीबा जॉर्ज (महिला हक्क कार्यकर्त्या), इंडियन ख्रिश्चन वुमन्स मुव्हमेंट, फोरम अगेंस्ट ऑप्रेशन फॉर वुमेन, आवाज ए निस्वान, परवाज, साहियार.

मूळ बातमी

COMMENTS