तिवरे धरण दुर्घटना – जगण्याचा संघर्ष सुरूच

तिवरे धरण दुर्घटना – जगण्याचा संघर्ष सुरूच

२ जुलैला चिपळूण तालुक्यात तिवरे धरण फुटून त्यात २४ ग्रामस्थ वाहून गेले. त्यात अनेकांचा संसार उध्वस्त झाला. या दुर्घटनेत मृत्युमुखी ग्रामस्थांच्या कुटुंबियांनी ५ लाख रु.ची मदत सरकारने जाहीर केलेली आहे. पण त्याने जगण्याच्या संघर्षाची तीव्रता कमी केलेली नाही.

मुळशी धरणग्रस्तांचा सत्याग्रह
यवतमाळ, हिंगोली, नांदेड जिल्ह्यास अधिक पाणी मिळणार
महाराष्ट्र दिनापासून कोयना धरणग्रस्तांना जमीन वाटप

चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटण्याच्या दुर्घटनेला काही दिवस झाले आहेत. या धरण परिसरातील ओवळी, रिक्टोली, आकले, दादर, नांदिवसे, कळकवणे या गावांना या फटका बसला होता. या गावांत पाणी घुसून २३ ग्रामस्थ वाहून गेले होते. या दुर्घटनेची चौकशीही सुरू आहे. तिवरे धरण मातीचे असल्याने त्याचे बांधकाम सदोष असल्याचे बोलले जात आहे. सरकारने वेळीच पावले उचलून अशा धरणांचा अभ्यास केला असता तर एवढी मोठी दुर्घटना घडली नसती, असे येथील ग्रामस्थ म्हणतात.

सध्या येथील परिस्थिती पूर्वपदावर येत असली तरी ग्रामस्थांच्या मनातले भय कमी झालेले नाही. सर्वांचेच संसार विस्कटले असल्याने जीवनाश्यक वस्तूंसाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागत आहे. सरकारची मदत वेळेवर मिळत नसल्याने या परिसरातील ग्रामस्थांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.

तिवरे धरण दुर्घटनेत घरे वाहून गेली.

तिवरे धरण दुर्घटनेत घरे वाहून गेली.

घटना घडल्यानंतर सहाव्या दिवशी मी प्रत्यक्ष घटनास्थळी गेलो होतो व नंतर तेथील परिस्थितीची पाहिली. काही गावकऱ्यांशी चर्चा केली. त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

माजी सरपंच तानाजी चव्हाण मला भेटले. ते म्हणाले, “आम्ही धरणाच्या गळतीबाबत जलसंधारण विभागाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या. पण आमच्या तक्रारींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे आमचे आता होत्याचे नव्हते झाले आहे. आम्हा गावकऱ्यांचे अलोरे गावी सरकारने पुनर्वसन करावे.”

तानाजी चव्हाण यांच्या घरातील सर्वाधिक व्यक्ती या दुर्घटनेत मरण पावल्या आहेत. आपल्या घरावर एवढी आपत्ती कोसळूनही ते स्वत:ला सावरत अन्य पीडितांच्या पुनर्वसनासाठी अहोरात्र धडपडत आहेत.

तिवरे धरण दुर्घटनेत केवळ वासे शिल्लक राहिले.

तिवरे धरण दुर्घटनेत केवळ वासे शिल्लक राहिले.

२००५ साली तिवरे वाडीच्या उशाला हे धरण बांधले गेले होते. या धरण परिसरात १९ कुटुंबाची एक छोटी वाडी आहे. बहुतांश कुटुंबे शेतीवर अवलंबून असलेली. चिपळूण एमआयडीसीला या धरणातून पाणीपुरवठा केला जातो. या धरणाने १३ ते १४ वर्षे आपले काम चोखपणे पार पाडले आहे.

पण एवढा मोठा काळ गेल्यानंतर या धरणाच्या दुरुस्तीसाठी पावले उचलावीत म्हणून अनेक तक्रारी शासनाच्या संबंधित विभागाला केल्या होत्या. त्याची दखल घेऊन दीड वर्षांपूर्वी तात्पुरती मलमपट्‌टी करण्यात आली होती. पण ती मलमपट्‌टी आताची घटना पाहता किती तकलादू होती हे लक्षात येते.

सरकारच्या अशा बेजबाबदारपणाने निष्पापांचे प्राण तर गेलेच पण दुर्घटनेच्या त्या रात्री तिवरे धरण परिसरात जे काही घडलं ते अंगावर शहारे आणणारे होते. मला दीपक चव्हाण हा साहसी तरुण भेटला. दीपक चव्हाणने १५ जणांचे प्राण वाचवले आहेत.

दीपक चव्हाणचे साहस

तिवरे धरण दुर्घटनेत ग्रामस्थांचे सर्वस्व हरवले.

तिवरे धरण दुर्घटनेत ग्रामस्थांचे सर्वस्व हरवले.

गावातील १५ जणांचे प्राण वाचवणाऱ्या दीपक चव्हाणने सांगितलेली घटना अंगावर शहारे आणणारी होती. तो सांगत होता. “ घटनेच्या दिवशी रात्री साडेनऊच्या दरम्यान मित्रांसह घरात जेवत असताना कानावर कुणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला म्हणून मी तातडीने दारात येऊन पाहतो तर काय दारात पाणीच पाणी झाले होते. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता पण दारात लाल पाणी दिसल्याने मनात शंकेची पाल चुकचुकली आणि क्षणाचाही विलंब न करता मी त्या मुसळधार पावसात धरणाजवळ पळत गेलो. त्यावेळी धरणाला मोठे भगदाड पडलेले दिसले. मला परिस्थितीचा अंदाज आल्याने त्यासरशी मी गावात ओरडतच पळत सुटलो. बहुतांश लोक झोपले होते. प्रत्येक घराचे दरवाजे वाजवत धोक्याचे इशारे देत मी सुटलो. ज्यांच्या घरातून प्रतिसाद मिळाला नाही, त्या घराचे दरवाजे तोडून त्या लोकांना कळायच्या आतच मी त्यांना बाहेर ओढून काढण्यास सुरवात केली. ग्रामस्थांनाही क्षणभर काय झाले याची कल्पना आलेली नव्हती. पण घराबाहेर आल्यावर घटनेचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी तेथून पळ काढला. जास्तीत जास्त ग्रामस्थांना मी सुरक्षितस्थळी हलविण्यास मदत केली; तोपर्यंत धरण पूर्णपणे फुटले होते. पाण्याच्या अजस्त्र प्रवाहात बघता बघता घरं, मंदिरे, शेती, माणसं सर्वकाही डोळ्यादेखत वाहून गेलं.”

“दुर्घटनेत वाचलेल्यांनी ती रात्र डोंगरावर जागूनच काढली. सगळेच भेदरलेले होते. कोणी रडत होतं, कुणाची शुद्ध हरपली होती, तर कोण हळहळ व्यक्त करीत इतरांना सावरत होतं. दुसऱ्या दिवशी शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचली आणि मदतकार्य सुरू झाले. प्रथम गावकऱ्यांना तेथील तिवरे हायस्कूलमध्ये हलविण्यात आले आणि तेथे त्यांची तात्पुरती राहण्याची सोय केली. तेथे त्यांच्या चहा, नाष्टा, जेवण-पाण्याची व्यवस्था राबविली. आपत्तीग्रस्त प्रत्येक कुटुंबाला शासनाकडून प्राथमिक स्वरूपात तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये व सानुग्रह मदत म्हणून प्रत्येक कुटुंबाला चार लाखांचा धनादेश देण्यात आला.”

“दरम्यान, एनडीआरएफचे ५० जवान घटनास्थळावरून तीन टीम करून मृतदेह शोधण्याचे कार्य युद्धपातळीवरून अहोरात्र करू लागले. जसे मृतदेह मिळतील तसे ते संबंधित यंत्रणेकडे पुढील सोपस्कारासाठी ते देत होते. यात तब्बल २४ जण वाहून गेल्याचे लक्षात आले. त्यातील २३ मृतदेह हाती सापडले. एका मृतदेहाचा शोध सुरू आहे. कोल्हापूरची व्हाईट आर्मी तसेच महाबळेश्‍वर ट्रेकर्स ह्या सामाजिक संस्थेने शोधकार्यात सहभाग घेतला.”

मंत्र्यांचे संवेदनशून्य विधान

२ जुलैला धरण फुटल्याच्या घटनेनंतर हाहाकार माजला. विधिमंडळात विरोधकांनी धरण कसे फुटले याची चौकशी करण्याची मागणी केली. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी या घटनेच्या उच्चस्तरिय चौकशीचे आदेश दिले पण मंत्रिमंडळातील तानाजी सावंत या मंत्र्याने हे धरण खेकड्यांमुळे फुटल्याचे विधान करून नव्या वादाला जन्म दिला. विरोधकांनी लगेचच ‘त्या’ खेकड्यांना पकडून तातडीने गुन्हा दाखल करा, अशी उपरोधिक मागणी पोलिसांकडे केली. मंत्र्यांना दुर्घटनेचे गांभीर्य नसल्याचे लक्षात आले. या परिसरातही या विधानामुळे ग्रामस्थांमध्ये संताप उसळला.

नेते, शासन

८ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भास्कर जाधव आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

८ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भास्कर जाधव आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.

गेल्या सोमवारी ८ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, रत्नागिरी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भास्कर जाधव आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी संबंधित अधिकारी व गावकऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. या बैठकीत गावकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. शासनाच्या अधिकाऱ्यांनी आपत्ती काळात पुरविलेल्या मदतीची माहिती दिली. गावकऱ्यांनी जवळील अलोरे या गावी आमचे पुनर्वसन करावे, अशी मागणी आग्रहाने व्यक्त केली.

मी या घटनेच्या संदर्भात शासनाने कोणती पावले उचलली यासाठी माहिती जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यापासून अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. अखेर चिपळूणचे तहसीलदार जीवन कदम यांच्याशी संपर्क झाला. ते म्हणाले, ‘या घटनेत जीवित व वित्तहानी मोठ्या प्रमाणावर झाली असून, आम्ही शक्य तितकी मदत देण्याचा प्रयत्न करीत आहोत. घरे, गोठे, शेती आदींचे पंचनामे सुरू आहेत. सार्वजनिक सोयीसुविधांचे जे नुकसान झाले आहे, त्यासंदर्भात विविध विभागांच्या वतीने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली काम सुरू केले आहे. गावकऱ्यांचे योग्य पुनर्वसन होईपर्यंत तात्पुरत्या शेड उभारणीचे काम सुरू आहे. सामाजिक संस्थांकडून तसेच इतरांकडून होणाऱ्या मदतीचे संकलन करण्यासाठी मदत संकलन केंद्र उभा केले आहे.’

एनडीआरएफच्या जवानांनी मदतीचे काम केले.

एनडीआरएफच्या जवानांनी मदतीचे काम केले.

दैनंदिन जीवन पूर्वपदावर, पण जगण्याचा संघर्ष बिकट

सध्या या परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. उध्वस्त संसार, घरे, गोठे, शेती, जनावरे यांचे पुनर्वसनाचे काम सुरू आहे. पंचनामे सुरू आहेत. याने परिस्थिती पूर्वपदावर येईल पण दुर्घटनेत घडलेले काही प्रसंग मन हेलावून टाकणारे आहेत.

या दुर्घटनेत एका कुटुंबातील केवळ पाच वर्षांचा मुलगाच बचावला आणि त्याचे सर्व कुटुंबीय पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले. दुसऱ्या दिवशी तो ‘माझी आई कुठाय…’ असे म्हणत आक्रोश करत होता. सध्या गावकऱ्यांनी त्याला आधार दिला आहे. त्याचा सांभाळ त्याचे नातेवाईक व गावकरीच करीत आहेत.

कष्टाची पै न् पै पाण्यात

मूळचे ठाण्यात राहणाऱ्या पुजारी कुटुंबियांनी मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या मुलाच्या निसर्गाच्या सानिध्यात राहण्याच्या हट्‌टापायी ठाण्यातले सर्वकाही विकून तिवरे वाडीत दोन तीन वर्षांपूर्वी दोन एकर जमीन विकत घेतली आणि तेथे शेती करण्यास सुरुवात केली. या कुटुंबाने तेथे छोटेखानी घरही बांधले आहे. पण स्वप्नातही न येणाऱ्या या आपत्तीनं त्यांचं सारं काही उद्ध्वस्त केलं. आयुष्यभराची पुंजीही वाहून नेली. त्यामुळे हवालदिल झालेल्या पुजारी कुटुंबीयांनी, ‘आम्ही इथे येऊन चूक केली का?’ असा प्रश्न उपस्थित केला.

तिवरे धरणाच्या अजस्त्र लाटेत काडीपासून माडीपर्यंत एकूण १९ पैकी १४ कुटुंबांचा संसार सोबत नेला. भाताच्या कणग्यांसह इतर धान्य, संसारोपयोगी साहित्य, जनावरे, कपडेलत्ते, गाड्या, दागदागिने, पैसे, रस्ता, मंदिर तसेच झाडेझुडपे, शेतवडी जे जे काही प्रवाहाच्या कवेत येईल ते ते सर्व वाहून गेले आहे. आता सरकारी  व काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने तिवरे परिसरातल्या ग्रामस्थांना दिलासा मिळाला असला तरी त्यांना त्यांचे जगणे पुन्हा पहिल्यापासून सुरू करावे लागणार आहे, हे वास्तव आहे.

अभिजित गुर्जर, कोल्हापूर ( फ्रीलान्स फोटोजर्नालिस्ट व पत्रकार आहेत.)

सर्व छायाचित्रे – अभिजित गुर्जर

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: