‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ : विवेक जागविणारी कादंबरी

‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ : विवेक जागविणारी कादंबरी

‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ ही कादंबरी आजच्या भारताच्या संदर्भात फार मौलिक भाष्य करणारी आहे. उन्मादी झुंडीच्या राक्षसी रोषाला बळी पडलेले मुहम्मद अखलाख, पेहलू खान, अलीमुद्दिन अन्सारी, हाफिज जुनैद हे आजच्या भारतातील टॉम रॉबिन्सन आहेत. ‘मेकाँब’मधील असंवेदनशील, अविचारी लोकांप्रमाणेच या निष्पाप लोकांच्या सामुहिक हत्येचे आपण साक्षीदार झालो आहोत.

रो विरुद्ध वेड
अमेरिकेतील भारतीय उच्चायुक्तांनी ट्विट मागे का घेतले
अमेरिकेचे असे का झाले ?

साहित्याने नेमके काय काम करायचे असते? वाचकाची साहित्याकडून काय अपेक्षा असते? साहित्याने केवळ साहित्यासाठी अथवा कलेसाठी म्हणून सौंदर्यदर्शन घडवायचे असते की, आपले वर्तुळ विस्तारून व्यक्ती, समाज, राष्ट्र, संस्कृती यांना स्पर्श करत समाजमनाचे दर्शन घडवायचे असते? साहित्याची मुख्य प्रेरणा कलेसाठी कला अशा धारणेतून निर्माण होते की, समष्टीप्रती असणाऱ्या लेखकाच्या आपपरभावाने निर्माण होते? या आणि यांसारख्या अशा अनेक प्रश्नांवर वर्षानुवर्षे साहित्यविश्वात मंथन झाले आहे. जगभरच्या थोर लेखक आणि विचारवंतांनी या विषयावर पुरेशा गांभीर्याने लिहिलेही आहे. या प्रश्नांच्या मागील तात्विक विचार बाजूला ठेऊन निकोप दृष्टीने श्रेष्ठ साहित्यकृतींचा डोळसपणे अभ्यास केल्यास या प्रश्नाची उत्तरे वाचकाने स्वत:च मिळविण्यात काही अडचण येऊ नये.

गेल्या शतकातील सर्वोत्कृष्ट साहित्यकृतींचे अवधानपूर्वक वाचन केल्यास हे सहज लक्षात येते की, साहित्य हे कुठल्याही अमूक एका गोष्टीपुरते मर्यादित असत नाही, तर वास्तवाच्या समृद्ध आकलनासाठी आणि तिच्या आकलनाची निकड अधिक परिणामकारकरीत्या ठसविण्यासाठी जाणीवपूर्वक केलेली ती एक कृती असते. अशा आकलनातूनच वाचक यावर स्वत:पुरते काही प्रश्न उभे करतो आणि त्याच्या डोक्यात विचारांची एक श्रुंखला तयार होते. विवेकवादी विचारांची अशी श्रृंखलाच भविष्यातील सर्जनशील कृतीची नांदी ठरत असते.

असे असले तरी, वर्षभरात लाखोंच्या संख्येने लिहिल्या जाणाऱ्या नव्या ग्रंथांत, कितीसे ग्रंथ अशी क्षमता राखून असतात? सवंग, तद्दन कादंबऱ्या एकापाठोपाठ एक पाडणाऱ्या लेखकाने कुठली नीतिमत्ता पाळून या ग्रंथांचे लेखन केलेले असते? याचे उत्तर फार निराश करणारे आहे. विश्वसाहित्यात दशकभरात एखादीच साहित्यकृती अशी निर्माण होते ज्यामध्ये त्या त्या काळच्या इतिहासाचा रोख आणि समाजमनाचे प्रतिबिंब गोठून राहिलेले असते. आपल्या अंगभूत तेजाने लख्ख उजळून निघालेल्या अशा कलाकृतीच्या वाचनाने मनुष्य स्वत:च्या सदसद्विवेकबुद्धीला प्रश्न करू लागतो. या प्रश्नांचा मागोवा घेण्याची आसच त्याला माणूसपण बहाल करत असते.

आजच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पडझडीच्या काळात अशा साहित्यकृतींची कधी नव्हे तेवढी आज अधिक गरज आहे. वाचकांच्या बधीर जाणिवांवर प्रहार करत त्याच्या विवेकाला आवाहन करणारी अशी एक सशक्त साहित्यकृती ६० वर्षांपूर्वी अमेरिकेत प्रकाशित झाली. ती कादंबरी म्हणजे, ‘हार्पर ली’ या लेखिकेची ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ ही कादंबरी. या कादंबरीच्या प्रकाशनानंतर संपूर्ण अमेरिका आपल्या सद्सद्विवेकबुद्धीला प्रश्न विचारू लागली होती. गोऱ्या लोकांच्या रोषाला कारण झालेल्या ‘टॉम रॉबिन्सन’ या कृष्णवर्णीयाची कथा सांगणाऱ्या कादंबरीने गेल्या अर्ध-शतकाहून अधिक काळात काय साध्य केले आहे, याचे नेमके उत्तर देणे कठीण आहे; मात्र केवळ गुलाम म्हणून कृष्णवर्णीयांकडे पाहणारा देश ते एका कृष्णवर्णीय नेत्याला देशातील सर्वोच्च पदावर विराजमान करणारा देश या अमेरिकेच्या विवेकी प्रवासात ‘टू किल अ मॉकिंगबर्ड’ या कादंबरीचे स्थान निर्विवादपणे महत्वाचे आहे.

कादंबरीविषयी :

अमेरिकेतील अलाबामा राज्यातील ‘मेकॉंब’ हे सुस्त आणि कंटाळवाणे गांव आहे. ‘स्काउट फिंच’ या सहा वर्षांच्या मुलीच्या निवेदनातून कादंबरी उलगडत जाते. मेकाँबमधील दिवस स्काउटला कमालीचे लांबलचक आणि कंटाळवाणे वाटतात. कारण गावांत मन रमविण्यासाठी विशेष असं काही नाही. लोक कुठे खरेदीलाही जात नाहीत. कारण खरेदीला जायचे तर पैसे लागतात आणि मंदीचा तडाखा बसलेल्या अमेरिकेत पैसा फारच दुर्मीळ होऊन बसला आहे. स्काउटला सोबत आहे ती फक्त ‘जेम’ आणि ‘डील’ची. जेम तिचा मोठा भाऊ आहे आणि तिच्याहून चार वर्षानी मोठा आहे. डील उन्हाळ्याची सुट्टी घालवण्यासाठी त्यांच्या शेजारच्या घरी आला आहे. स्काउट खेळकर आणि आनंदी वृत्तीची मुलगी आहे. तिचा खेळकरपणा आणि प्रसन्न निवेदनशैली कादंबरीच्या अर्ध्याहून अधिक भागावर पसरली आहे. एक निराळेच चैतन्य त्यामुळे कादंबरीला लाभले आहे. स्काउट, जेम आणि डील यांचं एक स्वतंत्र विश्व आहे. या जगात त्यांचे खेळ आहेत. झोपाळ्यावरच्या कसरती आहेत आणि चाकाच्या गाड्या आहेत. याच जगात त्यांची बालसुलभ अशी भयंसुद्धा आहेत. त्यांचे सर्वात मोठे भय आहे, त्यांच्या शेजारच्या घरात राहणारा पण त्यांना कधीच न दिसलेला ‘बू रॅडली’.

स्काउटच्या मते बू साडेसहा फुटांहून उंच आहे. तो मांजरी आणि खारी पकडून खातो. त्याच्या हातांवर कायम रक्ताचे डाग पडलेले दिसतात आणि दात पिवळे आणि सडलेले आहेत. त्याने एकदा त्याच्या वडिलांना चाकूने भोसकले सुद्धा आहे. स्काउट आणि जेमच्या मनात बूची एवढी भीती आहे की, त्यांच्या घरासमोरून जायचं म्हटलं तरी दोघांना धडकी भरते.

स्काउट आणि जेमच्या आनंदी विश्वात एका वरकरणी साध्या वाटणाऱ्या पण भयंकर घटनेचे वादळ येऊन ठेपले आहे. जेम आणि स्काउट दोघांनाही याची अजून कल्पना आलेली नाही. त्यांच्याच गावातील टॉम रॉबिन्सन या कृष्णवर्णीयावर रॉबर्ट एवेलने त्याच्या मुलीवर टॉमने बलात्कार केल्याचा आरोप करून खटला भरला आहे. आणि जजने टॉमची बाजू लढविण्यासाठी स्काउटच्या बाबांना विनंती केली आहे. ‘अॅटिकस’ने हा खटला टॉम रॉबिन्सनच्या बाजूने लढवायला होकार दिला आहे; कारण टॉमच्या निष्पाप असण्याची त्याला खात्री आहे.

एखाद्या खुनी अथवा बलात्काराचा आरोप असणाऱ्या व्यक्तीची बाजू न्यायालयात लढवणं ही आजच्या संदर्भात फारच सामान्य गोष्ट आहे; मात्र नव्वद वर्षापूर्वीच्या अमेरिकेत तसं अजिबात घडत नव्हतं. कृष्णवर्णीय लोक सरसकट खोटारडे, चोर आणि हिणकस असतात असा दृढ समज असणाऱ्या काळात त्यांची वकिली घेणं म्हणजे संकटाला आमंत्रण दिल्यासारखं आहे. अॅटिकसला ते पक्कं ठाऊक आहे. पण तो आपल्या निर्णयावर ठाम आहे. निष्पाप टॉम रॉबिन्सनची ही केस घेण्यास आपण नकार दिला तर, आपण आयुष्यात पुन्हा मान ताठ ठेवून चालू शकणार नाही; आणि आपल्या स्वत:च्या मुलांनाही अमुक एक गोष्ट करा अथवा करू नका असं सांगू शकणार नाही, असं त्याला वाटतं. त्याच्या विवेकबुद्धीच्या टोचणीने त्याला ही लढाई लढविण्यास भाग पाडले आहे; मात्र त्यामुळे कधीकाळी ज्या लोकांच्या आदरास तो पात्र झाला होता, त्यांच्याच तिरस्काराचा धनी झाला आहे. स्काउट आणि जेमला सुद्धा या तिरस्काराची झळ लागू लागलेली आहे.

टॉमचा खटला न्यायालयात उभा राहतो पण सारेच्या साऱ्या गोऱ्या ज्युरींना या खटल्यात निष्पाप टॉमच्या जिंकण्याची आशा फार कमी आहे. मात्र त्यामुळे अॅटिकस नाउमेद झालेला नाही. कारण ही खचून जायची वेळ नाही; तर सत्यासाठी पाय घट्ट रोवून उभं राहण्याची आहे, याची त्याला जाणीव आहे. शूर असणं याचा अर्थ हातात बंदूक घेऊन उभं असणं नव्हे.

जेव्हा एखाद्या लढाईला सुरवात करण्याआधीच तुम्हाला ठाऊक असतं की, तुम्ही ही लढाई हरलेला आहात आणि तरी तुम्ही सुरवात करता आणि काही झालं तरी अखेरपर्यंत झुंजत राहता, तेव्हा त्या लढाऊ वृत्तीला शौर्य म्हणतात, अशी अॅटिकसची धारणा आहे. या हरलेल्या लढाईत अॅटिकस जीव ओतून उतरला आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याने ज्युरींना टॉमच्या निष्पाप असण्याचे पुरावे दिले आहेत. पण पूर्वग्रहदूषित ज्युरी ढिम्म हलत नाहीत. टॉमला एकमताने ज्युरी दोषी घोषित करतात. टॉमला तुरूंगात नेत असताना तो पळून जायचा प्रयत्न करतो आणि पोलिसांच्या बंदुकीला बळी पडून मरण पावतो.

अॅटिकस न्यायालयात ही केस हरतो; मात्र त्याच्या गावातील लोकांच्या मनात आपल्या पूर्वग्रहांविषयी शंकांचे वादळ उठवतो. त्यांना आपल्या नैतिकतेची जमीन किती तकलादू आणि पोकळ आहे यांची जाणीव करून देतो. तत्वांचं पालन करत जगणं म्हणजे काय हे आपल्या कृतीतून दाखवून देतो. या साऱ्यांचा परिणाम म्हणजे टॉमवर खटला भरणारा एवेल चवताळून उठतो. अॅटिकस आणि जज या दोघांनी मिळून आपल्याला मूर्ख बनविले आहे असे त्याला वाटते. स्काउट आणि जेमवर तो प्राणघातक हल्ला करतो. त्या हल्ल्यातून बू रॅडली दोघानांही वाचवतो.

ज्या बू रॅडलीच्या भीतीने स्काउट आणि जेमचे बालपण व्यापले आहे, त्या बू रॅडलीचा खरा चेहरा पाहून स्काउट लज्जित होते. वेळोवेळी आपल्यासाठी झाडाच्या ढोलीत भेटवस्तू ठेवणारा दुसरा कुणी नसून बू आहे याची तिला जाणीव होते. आणि जोवर आपण दुसऱ्या व्यक्तीच्या नजरेतून जगाकडे पाहत नाही तोवर त्या व्यक्तीला आपण कदापि जाणू शकत नाही ही अॅटिकसची शिकवण तिला आठवते.

आपल्या सभोवतालचे सारे जग सामुहिक वेडाचाराने पेटून अंध झालेले असताना, विवेकाच्या क्षीण आवाजाला प्रतिसाद देणं म्हणजे काय? सत्यासाठी, न्यायासाठी पाय घट्ट रोवून उभं राहणं म्हणजे काय? नैतिकता म्हणजे काय? या मानवी मूल्यांची शिकवण देणारी ही कादंबरी खऱ्या अर्थाने मानवी जग उभारणीला हातभार लावणारी अशी आहे. या कादंबरीविषयी बोलताना अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा म्हणाले होते; हार्पर लीने अमेरिकेला अधिक चांगल्या मार्गावर आणून उभे केले आहे. केवळ अमेरिकेलाच नव्हे तर संपूर्ण जगाला अधिक चांगल्या मार्गावर आणून उभं करण्याची ताकद असणारी ही कादंबरी विश्वसाहित्यातील सर्वकालीन महान कादंबऱ्यांपैकी एक आहे.

आपल्यापासून हजारो मैल आणि अर्धशतकाहून अधिक काळाचं अंतरामध्ये असणारी ही कादंबरी आजच्या भारताच्या संदर्भात फार मौलिक भाष्य करणारी आहे. उन्मादी झुंडीच्या राक्षसी रोषाला बळी पडलेले मुहम्मद अखलाख, पेहलू खान, अलीमुद्दिन अन्सारी, हाफिज जुनैद हे आजच्या भारतातील टॉम रॉबिन्सन आहेत. ‘मेकॉंब’ मधील असंवेदनशील, अविचारी लोकांप्रमाणेच या निष्पाप लोकांच्या सामुहिक हत्येचे आपण साक्षीदार झालो आहोत. या कठीण काळात आपला विवेक जागवू पाहणाऱ्या अॅटिकस फिंचचा मार्ग आपण निवडतो की, मौन बाळगून उन्मादी झुंडीचे हात बळकट करतो, यावर येणाऱ्या काळात आपले माणूसपण ठरणार आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0