‘बॅटल ऑफ मदर्स’

‘बॅटल ऑफ मदर्स’

टोकियो ऑलिम्पिकमध्ये गुरुवारी चार मुलांची आई भारताची मेरी कोम आणि तीन मुलांची आई ब्रिटनची चार्ली डेव्हिसन यांच्यात उपउपांत्यपूर्व फेरीची लढत होत आहे. ही “बॅटल ऑफ मदर्स” उत्कंठतेची असेल.

चार मुलांची आई भारताची मेरी कोम आणि तीन मुलांची आई ब्रिटनची चार्ली डेव्हिसन यांच्यातील उपउपांत्यपूर्व फेरीची गुरुवारी होणारी लढत म्हणजे “बॅटल ऑफ मदर्स” असेल. किमान टोकियो ऑलिम्पिक आयोजकांनी तरी त्या लढतीला तसा रंग दिला आहे, डेव्हिसन म्हणते तसं असेल तर चांगलंच आहे. मात्र मी मेरी कॉमचा आदर करते. तिला आदर्श मानते. तिच्याकडूनच मला प्रेरणा मिळाली आहे; की आई झाल्यानंतरही ऑलिम्पिकमध्ये सहभागी होती, येतं, पदक जिंकता येते.

चार्ली डेव्हिसन

चार्ली डेव्हिसन

डेव्हिसनचे वय अवघे २७ आहे. मेरी कोमपेक्षा ती ११ वर्षांनी लहान आहे. पण वयाच्या १९ व्या वर्षीच संसारात पडली. पाहता पाहता ७ वर्षात तीन मुलांची आई झाली. त्यानंतर बॉक्सिंग रिंगमध्ये परतणे अवघड होते. वयाच्या ८व्या वर्षी घरातच वडिलांसोबत ती बॉक्सिंगचा सराव करायची. वडिलांसोबतच टेलिव्हिजनवर बॉक्सिंग पाहायची. तीन मुले झाल्यानंतर वजन कमी करण्यासाठी म्हणून जिममध्ये जायला लागली. त्यावेळी ती थट्टेचा विषय बनली. त्यामुळे खचून न जाता किंवा पळून न जाता, तिचा बॉक्सिंग करण्याचा विचार अधिक पक्का झाला. कठोर मेहनत करायची. स्वत:लाच पदकासाठी प्रेरित करायचे आणि प्रशिक्षकांनी जे जे सांगितले आहे, ते सारं करायचे. ही त्रिसूत्री जपत टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून ती आली आहे. आई झाल्यानंतर क्रीडाक्षेत्रात काहीच करता येत नाही, असा गैरसमज असणाऱ्यांना खोटं पाडण्यासाठी ती पुन्हा बॉक्सिंग रिंगमध्ये आली आहे.

चार्ली डेव्हिसन

चार्ली डेव्हिसन

डेव्हिसनची प्रतिस्पर्धा आहे “मॅग्निफिसंट मेरी”. भारताची मेरी कोम. वय आहे अवघे ३८ वर्षे. लंडन ऑलिम्पिकला मिळविलेल्या कांस्य पदकावर ती समाधानी नाही. तिच्याकडे ६ वेळा मिळविलेली विश्व अजिंक्यपदे आहेत. एशियन चॅम्पियनशीप आहे. अन्य जागतिक टायटल्स आहेत. फक्त ऑलिम्पिक गोल्ड नाही. त्यासाठी ती लढत आहे. इम्फाळला स्वत:ची मेरी कोम बॉक्सिंग अॅकॅडमी आहे. राज्यसभेची सदस्य आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची महिला राजदूतही आहे. तिच्या आत्मचरित्रावर ‘‘मेरी कॉम’’ हा चित्रपटही निघाला. प्रियांका चोप्राने तिची भूमिका बजावली होती.

मेरी कोम

मेरी कोम

“अनब्रेकेबल” हे तिचे आत्मचरित्रही गाजले होते. भूमीहिन शेतकऱ्याच्या घरात ती जन्मली. लहानपणापासूनच काम करण्याची सवय जडल्याने ती काटक बनली. तिला बॉक्सिंग खूप आवडायचे. पण आई वडिलांचा विरोध होता. बॉक्सिंग लढतींमध्ये होणारा रक्तपात पाहून त्यांच्या काळजाचा थरकाप उडायचा. आपल्या मुलीने हा खेळ सोडून काहीही करावे असे त्यांना वाटायचे. अखेर स्पर्धेचे नियम व अन्य गोष्टी समजावून सांगितल्यावर तिच्या आई वडिलांनी तिला परवानगी दिली. त्यानंतर तब्बल दोन दशकांचा तिचा प्रवास सुरू झाला. २०१८ मध्ये वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये सहा सुवर्णपदके पटकाविणारी ती पहिली महिला ठरली. एशियाड सुवर्णपदक भारताला देणारी ती पहिली महिला होती. बॉक्सिंगमध्ये महिलांसाठी ज्या काही पराक्रमाच्या परिसीमा आहेत, त्या सध्यातरी मेरी कोमने आखून दिल्या आहेत. गुरुवारी नवा अध्याय लिहिण्यासाठी ती टोकियोला बॉक्सिंग रिंगमध्ये उतरेल. तिची प्रतिस्पर्धीही एक माताच असेल. ज्या लढतीकडे जगातील सर्व मातांचे लक्ष अधिक असेल.

विनायक दळवी, हे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार असून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे त्यांनी वार्तांकन केले आहे.

COMMENTS