काश्मीरातील पर्यटन व्यवसाय ठप्प

काश्मीरातील पर्यटन व्यवसाय ठप्प

सोनमर्ग : गेल्या महिन्यात संसदेत जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमधील पर्यटन व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. या

उ.प्रदेशात हिंसाचारात ६ ठार, दिल्लीत निदर्शने सुरूच
‘तुकडे तुकडे गँग कोण आहे?’
सोहराबुद्दीन: आरोपीने खुनाची कबुली दिली, तरी न्याय नाहीच

सोनमर्ग : गेल्या महिन्यात संसदेत जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० कलम रद्द केल्यानंतर काश्मीरमधील पर्यटन व्यवसाय मोठ्या संकटात सापडला आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेले लाखो नागरिकांच्या उपजीविकेचाही प्रश्न उपस्थित झाला आहे.

५ ऑगस्टपासून काश्मीर बंद आहे. सरकारने खोऱ्यात गेलेल्या सर्व पर्यटकांना बाहेर पडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर तेथील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. राज्यातल्या सर्व बाजारपेठा बंद आहेत. परिवहन सेवाही विस्कळीत झाल्याने पर्यटकांना तिथे जायची इच्छा असूनही जाता येत नाही.

काश्मीरच्या पर्यटन विभागाच्या मते, ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने सर्व पर्यटकांना काश्मीर सोडण्याचे आदेश दिले होते. त्यावेळी खोऱ्यात सुमारे २० ते २५ हजार पर्यटक होते. आताच्या घडीला खोऱ्यात एकही पर्यटक नाही.

पर्यटन हा काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा मूलभूत पाया आहे. आणि त्यावर संकट आल्याने परिस्थिती बिकट झालेली दिसते.

श्रीनगरमधील प्रतिष्ठित हॉटेल व्यावसायिकही ३७० कलम रद्द झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीला तोंड देऊ शकले नाहीत. ते म्हणतात, पर्यटकांची खोऱ्यात पुन्हा येण्याची शक्यता मावळत चालली आहे. तेथील परिस्थिती लवकर पूर्वपदावर येईल असे वाटत नाही. त्यामुळे त्याचा परिणाम हॉटेल व्यवसायांवर होऊन मोठ्या प्रमाणावर कामगार कपात करावी लागेल. त्याशिवाय अन्य पर्याय आमच्या पुढे नाही.

केवळ हॉटेल व्यवसायिकच नव्हे तर ट्रॅव्हल एजंट, हाउसबोटचे मालक, शिकारावाला, टॅक्सीचालक, ऑपरेटर, टुरिस्ट गाईड यांचेही मोठे नुकसान झालेले आहे. या पर्यटन व्यवस्थेशी देशभरातील अनेक पर्यटक कंपन्या जोडल्या गेल्याने त्यांचेही मोठे नुकसान होत आहे. अनेक परदेशी टुरिस्ट कंपन्या काश्मीर पर्यटनाचे आयोजन करत असतात त्यांनाही त्याचा फटका बसला आहे. देशातील बहुतांश छोट्या मोठ्या सर्वच पर्यटन कंपन्या काश्मीरशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांची वेळापत्रकेही कोलमडली आहेत. हे संकट आल्याने ट्रॅव्हल एजन्सी काश्मीरमधले आपली कर्मचारी कमी करत आहेत. काही कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कमी करण्यापेक्षा त्यांच्या पगारात कपात केली आहे. एका ट्रॅव्हल एजन्सीने कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

मालिक अहमद हे हाऊस बोटचे मालक आहेत. ते म्हणतात, आम्ही व्यवसायासाठी बँकांकडून कर्ज घेतले होते, आम्हाला दरमहिना कर्ज हफ्ता असतो त्याची जुळवाजुळव आम्ही कशी करायची?

काश्मीरमध्ये हा मोसम पर्यटनासाठी अत्यंत योग्य आहे. हिवाळा जसा जवळ येत जाईल तसे पर्यटकांची संख्या कमी होत जाते. सध्याची परिस्थिती पाहता पुढील वर्षी मार्च पर्यंत पर्यटक व्यवसायाला या परिस्थितीतून जावे लागेल असे एका ट्रॅव्हल एजंटने सांगितले.

लडाखमध्ये प्रवेश देणारे सोनमार्ग हे वास्तविक पर्यटकांचे आवडते स्थळ. येथे हजारो पर्यटक या मोसमात आलेले असतात. पण मध्य काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील सर्व हॉटेल, रेस्तराँ व दुकाने बंद आहेत.

तर दुसरीकडे श्रीनगरमधील दल सरोवर, जे जगभरातल्या पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे तेथे सध्या शांतता आहे. या सरोवराच्या परिसरात राहणारे नागरिक आता मासेमारीकडे वळले आहेत.

एका हॉटेल व्यवसायिकाने सांगितले आमचा व्यवसाय आता स्थानिक नागरिकांच्या भरवशावर सुरू आहे. गेले अनेक दिवस आम्ही पर्यटक पाहिलेला नाही. सरकारचा आदेश दुर्लक्ष करून काही पर्यटक येथे काही दिवस राहिले होते ते पुन्हा गेले आहेत व खोऱ्यातून एक दोन दिवस कामानिमित्त जे व्यावसायिक श्रीनगरमध्ये येतात तेच आता आमचे ग्राहक आहेत.

गेल्या जूनमध्ये काश्मीरमध्ये १ लाख ७४ हजार पर्यटक आले होते. तर जुलैमध्ये १ लाख ५२ हजार (३,४०३ परदेशी पर्यटक) पर्यटक काश्मीरमध्ये आले होते. आता हे प्रमाण पाहता ऑगस्टमध्ये काय परिस्थिती आली असेल याची कल्पना करता येते.

एका ट्रॅव्हल एजंटने काश्मीरमध्ये ढासळत चाललेल्या पर्यटन व्यवसायाविषयी चिंता व्यक्त करत इंटरनेट बंद केल्याने हा व्यवसाय कसा धोक्यात आला आहे याची माहिती दिली. त्याच्या मते इंटरनेट बंद केल्याने आम्ही जगाशी संपर्क साधू शकत नाही. आम्हाला बुकिंगचे आकडे कळत नाहीत. त्यामुळे भविष्यात काय वाढून ठेवलेय त्याची कल्पना आम्हाला येऊ लागली आहे.

काश्मीरमध्ये तीन हजार ट्रॅव्हल एजंट अधिकृत आहेत. त्यातील एका एजंटने सांगितले, फेब्रुवारीत पुलवामामधील दहशतवादी हल्ला, बालाकोटचा हवाई दलाकडे हल्ला याने खोऱ्यातील पर्यटन व्यवसाय उशीरा सुरू झाला होता. तो वेग धरेल असे वाटत असताना कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. साधारण मे व जूनमध्ये व्यापार वाढत जातो. अमरनाथ यात्रा सुरू झाली तेव्हा हॉटेल बुकिंग वाढली होती. पण आता परिस्थिती पूर्ण आवाक्याबाहेर गेल्याने काश्मीरमध्ये पर्यटनाचे नवे दिवस लवकर येण्यास बराच वेळ जाईल.

पर्यटनाशी निगडित असलेले टॅक्सी मालक-चालक, टूर गाईड, हाऊस बोटचे मालक व तेथील कर्मचारी यांच्या उत्पन्नालाही मोठा धक्का बसला आहे.

काश्मीर पर्यटन विभागाने दिलेल्या माहितीनुसार गुलमर्ग, सोनमर्ग व पहलगाम येथे ११ हजार अधिकृत खेचर वाहक आहेत. त्याचबरोबर ५००० शिकारा चालक आहेत तर २१०० स्लेज मालक व १३०० हून अधिक टुरिस्ट गाईड आहेत. या सर्वांना आता काहीही काम नाही.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: