जयंत गेल्यानंतर ‘अधांतरा’त ‘काय डेंजर वारा सुटलाय’

जयंत गेल्यानंतर ‘अधांतरा’त ‘काय डेंजर वारा सुटलाय’

‘अधांतर’ हे नाटक वास्तववादी फॉर्ममध्ये लिहीलं आहे, तर ‘काय डेंजर वारा सुटलाय’ हे नाटक वास्तववादी आणि अतिवास्तववादी अशा संमिश्र फॉर्ममध्ये लिहीलं आहे.

दिल्लीत ट्रॅक्टर परेड होणार; मुंबईत हजारो शेतकरी दाखल
दिल्ली दंगलीतले अस्वस्थ करणारे प्रश्न
जिल्हा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मेहबुबा नजरकैदेत

”लेखक  हा चिरडल्या गेलेल्या जगातल्या चिरफाळलेल्या माणसाचा प्रतिनिधी आणि अशा वंचिताचाच वंशज असतो” असं जयंत पवार यांनी साहित्य अकादमीचा पुरस्कार स्वीकारतांना केलेल्या भाषणात म्हटलं होतं. प्रतिभावान, प्रगल्भ भारतीय नाटककार जयंत पवार यांची ही अशी एक्झीट मनाला अस्वस्थ करून गेली.

गेले काही दिवस जयंत पवार कर्करोगाशी चिवटपणानं लढत होते. या लढ्याबरोबरच ते अविरतपणे कथा लेखन सुद्धा करत होते. आपल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी त्यांना आयुष्यभर खूप संघर्ष करावा लागला. नाट्य दिग्दर्शक या नात्याने, जयंत पवार यांच्या बरोबर माझी मैत्री ही सुरवातीला नाट्य समिक्षा आणि त्यानंतर नाट्य लेखन अशा दोन्ही पातळ्यांवर वृद्धिंगत होत गेली.

या वर्षीच्या सुरवातीला राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या रंगमंडळ (NSD Repertory Company) तर्फे वास्तववादी नाटकाचे दिग्दर्शन करण्यासाठी मला निमंत्रित केले होते. रंगमंडळचे प्रमुख सुरेश शर्मा यांनी मला नाटक निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य दिलं. रंगमंडळ कलाकारांसमोर मी तीन वेगवेगळ्या मराठी वास्तववादी नाटकांचे वाचन केले. त्यातून सर्व कलाकारांना ‘अधांतर’ हे नाटक जास्त आवडलं. मला सुद्धा हे नाटक पुन्हा एकदा आजच्या परिस्थितीचं भान ठेवून करून पाहावं असं मनापासून वाटत होतं.

कोव्हिड संक्रमण आणि लॉकडाऊनची सर्वात जास्त झळ, ही विस्थापित कष्टकरी, कामगार वर्ग, शेतकरी मजूर वर्ग, असंघटित क्षेत्रातील स्वयंपाक, धुणीभांडी, केरफरशी करणार्‍या महिला वर्ग, बेरोजगार तरुण तरुणी, निम्न आर्थिक वर्गातली तळागाळातील लोकांपर्यंत पोहचली. या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचे आणि ‘अधांतर’ या नाटकातील संघर्षाचे साधर्म्य जाणवणारे समकालीन महत्व आतून जाणवत होतं, खूप अस्वस्थ व्हायला होत होतं. तसेच दरम्यानच्या काळात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, तमीळनाडू इत्यादी राज्यातील शेतकऱ्यांनी भरभरून दिलेला प्रतिसाद पाहून १९८०-९० च्या दशकात घडलेल्या मुंबईतील कामगार आंदोलनाच्या चळवळीचे महत्व सातत्याने जाणवत होते. अशा वेळी नवी दिल्ली येथे ‘अधांतर’ या नाटकाचे प्रयोग व्हायला हवेत, असं मला मनापासून वाटत होतं. या प्रेरणेतूनच मी राष्ट्रीय नाट्य विद्यालय रंगमंडळतर्फे ‘अंधातर’ हे नाटक करायचं ठरवलं. जयंत पवार यांना जेव्हा मी हा विचार सांगितला आणि परवानगी साठी विचारलं तेव्हा जयंत पवार यांनी या विचाराचं अगदी मनापासून स्वागत केलं. १९९७ दरम्यान लिहिलेल्या या नाटकाचे समकालीन महत्व आजही कायम आहे हे लक्षात घेऊन, जयंत पवार यांनी मला नाटक करण्यासाठी पुन्हा एकदा परवानगी दिली. जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात रंगमंडळ मधील सर्व कलाकार आणि रंगतंत्र टीमने नाटकाच्या उभारणीत खूप कष्ट घेतले. या नाटकाच्या तालमीच्या दरम्यान मी आठवड्यातून जवळपास दोन चार वेळा तरी जयंत पवार यांच्या बरोबर मेसेजद्वारे चर्चा करत होतो. हा संवाद सुरू असताना जयंतला कर्करोग या दूर्धर आजारानं ग्रासलं होतं. तरीही नाटकाच्या तालमी बद्दल, नाटकाच्या जडण घडणी बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता त्यांच्या मेसेजमधून दिसून येत होती.

फेब्रुवारी महिन्यात जवळपास दिड वर्षांनंतर नवी दिल्ली येथे नाट्यगृह सुरू झाले आणि ‘अधांतर’चे चार प्रयोग ठरले. कोरोनाचे सर्व नियम पाळून आम्ही नाट्य प्रयोगांचं सादरीकरण केलं. दिल्लीतील हिंदी प्रेक्षक खूप उत्साहात होते कारण ऑनलाईन थिएटरला कंटाळून पुन्हा एकदा प्रत्यक्ष रंगमंचावर सादर होणाऱ्या नाट्य प्रयोग पाहण्याची त्यांची इच्छा होती. चारही प्रयोगांना भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांना अंधातर नाटकाचं प्रासंगिक महत्व  जाणवत होतं. प्रयोगांनंतर बर्‍याच प्रेक्षकांनी भेटायला येऊन मनापासून प्रतिक्रिया दिल्या. दूर्धर आजारपणामुळे जयंत पवार स्वतः या प्रयोगांना इच्छा असूनही उपस्थित राहू शकले नाहीत पण मी त्यांना प्रत्येक प्रयोगाच्या प्रतिक्रिया कळवत होतो. जयंत पवार यांना आपलं नाटक नवी दिल्ली इथं योग्य वेळी सादर होत आहे याचा मनापासून आनंद झाला होता.

या निमित्ताने माझी जयंत पवार यांच्या बरोबरची, लेखक आणि दिग्दर्शक या नात्यातील मैत्रीची वीण घट्ट कशी होत गेली आणि ‘अधांतर’ तसेच ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या दोन्ही नाटकांच्या प्रवासाबद्दल काही आठवणी आहेत.

जयंत पवार यांनी लिहीलेले ‘अधांतर’ हे नाटक, जेव्हा मी १९९९ दरम्यान पुण्यात पहील्यांदा पाहिलं, तेव्हा हा नाट्यानुभव खूप अस्वस्थ करून गेला. या निमित्ताने लालबाग परळ येथील गिरणी कामगारांच्या संपाबद्दल, त्यांनी जवळपास वीस वर्षं सातत्यानं दिलेल्या, भांडवलशाही आणि राजकीय सतत्ताकारणा विरोधातील लढ्याबद्दल जाणीव झाली आणि एकूणच गिरणी कामगारांच्या संघर्षमय आयुष्याबद्दल जाणून घेण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. जयंत पवार यांनी ‘अधांतर’ हे नाटक खूप आतून, थेटपणानं लिहिलं आहे. खरं तर हे नाटक इतर मराठी व्यावसायिक नाटकांच्या (Well made play) पठडीतील अजिबात नाही. जयंत पवार यांनी जाणीवपूर्वक, व्यावसायिक नाटकांमध्ये ज्या पद्धतीनं प्रसंग रचले जातात आणि क्लृप्त्यांचा (Theatrical Gimmicks) वापर केला जातो अशा सर्व जागा टाळून, जसं मनापासून लिहावंस वाटलं तसं ओबडधोबड रितीने लिहिलं आहे. तरीही विषयाचं गांभीर्य कुठेही सुटू न देता थेट भिडणारा असा नाट्यानुभव या नाटकातून मिळतो. अशा सामाजिक नाटकाला व्यावसायिक रंगभूमीवर सुद्धा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि नाटयलेखनासह अनेक पुरस्कार मिळाले.  विजय तेंडुलकर, महेश एलकुंचवार, दत्ता भगत यांच्या प्रमाणेच जयंत पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकानं मराठी वास्तववादी नाटकांच्या जडणघडणीत खूप महत्त्वाचं योगदान दिलं आहे. मराठी नाटय लेखन चळवळीला नवी भाषा आणि दिशा देणारं हे नाटक आहे. जयंत पवार यांच्याच शब्दांत सांगायचं झालं, तर सर्व सामान्य माणसाने जगण्यासाठी, टिकून राहण्यासाठी दिलेल्या झुंजीचं, चिवट धडपडीचं हे नाटक आहे. असं अस्सल वास्तववादी नाटक आपण सुद्धा आपल्या दृष्टीकोनातून करायला हवं अशी माझ्या मनात इच्छा निर्माण झाली. अधांतर या नाटकाचे दिग्दर्शन करण्याची ही संधी मला मिळाली ती २००९ मध्ये. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांसाठी हे नाटक मी दिग्दर्शित केले. हा प्रयोग पाहण्यासाठी जयंत पवार स्वतः पुण्याला आले होते. या आधी त्यांची एक लेखक, नाटककार आणि नाट्य समिक्षक म्हणून अशीच ओळख होती. तसेच या आधी जयंत पवार यांनी मी दिग्दर्शित केलेले ‘महापूर’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘एक रिकामी बाजू’, ‘मिस्टर बेहराम’ या नाटकांचे प्रयोग पाहीले होते आणि नाट्य समिक्षा सुद्धा केली होती. २००९ मध्ये ललित कला केंद्रात या नाटकाचे प्रयोग पाहण्यासाठी स्वत: लेखक जयंत पवार तसेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष आणि ‘राणे’ची भूमिका करणारे अभिनेते अनिल गवस आवर्जून पुण्यात आले होते. जयंत पवार यांना माझ्या दिग्दर्शकीय दृष्टिकोनातून सादर केलेला अधांतर या नाटकाचा हा प्रयोग अतिशय मनापासून आवडला. सतीश आळेकर, ज्योती सुभाष आणि अनिल गवस यांनी सुद्धा नाट्य प्रयोगाचे कौतुक केले. अधांतरच्या या नाट्य प्रयोगांना पुणे विद्यापीठामधील प्राध्यापक, विद्यार्थी आणि प्रेक्षकांनी सुद्धा दाद दिली होती.

‘अधांतर’ या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने जयंत पवार यांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीमध्ये झाले. जयंत पवार यांनी ‘अधांतर’चा हा प्रयोग पाहिल्यानंतर, त्यांनी लिहिलेल्या ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकाचे दिग्दर्शन करण्यासाठी मला विचारले. मराठी व्यावसायिक नाट्य क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी ही खूप मोठी संधी मला जयंत पवार यांनी दिली, या बद्दल त्यांचा मी ऋणी आहे.

‘अधांतर’ हे नाटक वास्तववादी फॉर्ममध्ये लिहीलं आहे, तर ‘काय डेंजर वारा सुटलाय’ हे नाटक वास्तववादी आणि अतिवास्तववादी अशा संमिश्र फॉर्ममध्ये लिहीलं आहे. ‘काय डेंजर वारा सुटलाय’, या नाटकात भांडवलशाही व्यवस्था आणि बिल्डर माफिया हे सत्यविजय नरहरी दाभाडे या मराठी मध्यमवर्गीय माणसाच्या आयुष्यात अतिक्रमण करून कसं त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करतात, या विषयावर लिहीलं आहे. तसंच बबन येलमामे या बार्शीहून मुंबईत विस्थापित झालेल्या कामगाराची विदारक कहाणी मन हेलावून टाकणारा अनुभव देते. याच बरोबर मुन्ना या उत्तर प्रदेश मधून मुंबईत विस्थापित झालेल्या आणि गॅगवॉरच्या सापळ्यात अडकलेल्या, परिस्थितीशी झगडणार्‍या अमराठी माणसाची गोष्ट आहे. अशा तर्‍हेनं अतिक्रमण आणि विस्थापन या विषयांवर तीन वेगवेगळ्या घटनांभोवती हे नाटक संमिश्र शैलीमध्ये अस्वस्थ करणारी अनुभुती देतं. आयुष्यातील अतिक्रमणामुळे सत्यविजय नरहरी दाभाडे चं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यावर त्याच्यावर मानसिक परिणाम होऊन त्यांच्या मनात ज्या पद्धतीने अतिवास्तव विचार येतात आणि तो जसा व्यक्त होतो, ते त्याचे विचार प्रेक्षक म्हणून आपल्याला अस्वस्थ व्हायला आणि विचार प्रवृत्त करायला लावतात, त्यापैकी काही संवाद,

” सत्यविजय नरहरी दाभाडे, not working in any reputed and ordinary concerns, A helpless sitting person.”

“Encroachment, पांडवांनी खांडववन जाळलं ही आदीम encroachment. कृष्णार्जुनांनी आग लावली वंशाला. नागवंशाचे लोक जळून मेले. उरलेले विस्थापित झाले. इंद्रप्रस्थ नगरी नावाच्या मोठ्या टाऊनशिपसाठी झालेलं सामूहिक हत्याकांड. धर्मग्रंथात याची गौरवपूर्ण नोंद आहे.”

“दुबळ्या विस्थापितांनी बंड करून उठणं शास्त्र संमत नाही. तसं झालंच तर सर्पसत्र आरंभून तक्षकयागात त्यांना भस्मसात करण्याचा उपायही त्याच धर्मग्रंथात आहे.”

‘महाराष्ट्र रंगभूमी’तर्फे या नाटकाचं दिग्दर्शन करण्यासाठी जयंत पवार यांनी जशी मला संधी दिली, तशीच संधी तसेच या नाटकाच्या निर्मिती प्रक्रियेत उदय कुलकर्णी यांच्या बरोबर स्वतः सुद्धा निर्माता म्हणून जयंत पवार यांनी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. या नाटकातील सत्यविजय नरहरी दाभाडे या मराठी मध्यमवर्गीय सामान्य माणसाची प्रमुख भूमिका अनिल गवस यांनी खूप मनापासून, पोटतिडकीने आणि प्रगल्भपणे केली होती. आभा वेलणकर आणि मृणाल चेंबूरकर यांनी सुद्धा खूप मनापासून भूमिका केल्या. संजय देशपांडे यांनी चार वेगवेगळ्या भूमिका वैविध्यपूर्ण रितीने साकारत भांडवलशाही, राजकीय व्यवस्थेचा खरा चेहरा दाखवला. तसेच ‘ललित कला केंद्र सावित्रीबाई फुले विद्यापीठ’, ‘अॅकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्स’, मुंबई विद्यापीठ आणि ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालय’ नवी दिल्ली या नाट्य शिक्षण संस्थांमधून नाट्यशिक्षण घेतलेल्या अक्षय शिंपी, निशांत, पूर्णानंद वांढेकर, नितीन भजन, अमृता मापुस्कर, सिद्धेश शेलार, राजहंस शिंदे, वैखरी भजन या तरुण कलाकारांना संधी मिळाली आणि या सर्व तरुण कलाकारांनी अगदी सच्चेपणानं अभिनय करत स्वतः ला सिध्द केले.  २०१०-११ दरम्यान ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकाचे व्यावसायिक धर्तीवर जवळपास पन्नास प्रयोगांचे मुंबई, ठाणे, बोरिवली, डोंबिवली आणि कल्याण येथील नाट्य गृहात सादरीकरण केले. या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्या वर्षीचा मिफ्टा (MIFTA)चा सर्वोत्कृष्ट सामाजिक नाटक पुरस्कार, ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकाला मिळाला आणि जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट नाटककार हा पुरस्कार मिळाला होता.

‘ललित कला केंद्रा’त केलेल्या ‘अधांतर’ या नाटकाच्या मराठी भाषेतील प्रयोगानंतर, २०१२ मध्ये ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे’तर्फे हिंदी भाषेत, तर २०१४ मध्ये ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली’तर्फे हिंदी भाषेत ‘अधांतर’ या नाटकाचे दिग्दर्शन केले आणि अगदी अलीकडे म्हणजे याच वर्षी, २०२१ मध्ये ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालय रंगमंडळ’, नवी दिल्ली या संस्थेतर्फे दिग्दर्शित केले. अशा तर्‍हेने अधांतर या नाटकाशी दिग्दर्शक या नात्याने माझी नाळ जोडली गेली.

गिरणी कामगारांच्या एका प्रातिनिधिक आणि काल्पनिक स्वरूपातल्या एका धुरी या कामगार कुटुंबाच्या व्यथेचे वास्तववादी चित्रण अधांतर या नाटकात केलेले आहे. ‘अधांतर’मध्ये जयंत पवार यांनी प्रत्येक भूमिका आपल्या लेखनातून जिवंत केली आहे. नाटकाबरोबरच या भूमिकांच्या व्यक्तिरेखांचा अभ्यास करणं हा माझ्यासह नाटकात काम करणाऱ्या सर्व कलाकार विद्यार्थ्यांसाठीसुद्धा खूप विचारप्रवृत्त करणारा आणि आनंद देणारा अनुभव होता. या नाटकातील सर्व पात्रं ही तळागाळातील श्रमजीवी लोकांचं प्रतिनिधित्व करतात. या नाटकातील प्रत्येक पात्रं जगण्यासाठी, आपल्या अस्तित्वासाठी, प्राप्त आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि कौटुंबिक परीस्थितीशी झगडत आहे, म्हणूनच यातील कोणत्याच पात्रांना नायक किंवा खलनायक अशा ‘ब्लॅक अँड व्हाइट’ नजरेतून बघता येत नाही.

‘अधांतर’ या नाटकाचे दिग्दर्शन करताना एक गोष्ट मी कटाक्षाने पाळली. ती म्हणजे नाटकातील प्रत्येक पात्राची भूमिका प्रसंगानुरूप संयतपणे (sublte) आणि साधेपणाने (simplicity) येईल. प्रक्षोभक होणार नाही याची जाणीवपूर्वक खबरदारी घेतली.

कारण ‘अधांतर’ सारख्या वास्तववादी नाटकात कोणत्याही भूमिकेची इतर भूमिकांबरोबर वैयक्तिक चुरस किंवा जुगलबंदी असूच शकत नाही. ‘अधांतर’ हे नाटक मेलोड्रामा या पठडीतील तर अजिबातच नाही.

मराठी भाषेत ‘अधांतर’ हे नाटक दिग्दर्शित केल्यानंतर, पुढं मला ‘फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे (FTII)’ या संस्थेच्या अभिनय विभागासाठी हिंदी भाषेत पुन्हा हे नाटक करण्याची संधी मिळाली. दरम्यान ‘अधांतर’ या नाटकाचे हिंदी भाषेतील अनुवादित ‘अभी रात बाकी है’ हे ‘नाटक वाणी प्रकाशन’तर्फे प्रकाशित झाले होते. हिंदी अनुवाद कैलाश सेंगर यांनी केला होता. अनुवाद करताना त्यांनी नाटकातील प्रत्येक पात्राची बोलीभाषा आणि लहेजा यांची निवड खूप काळजीपूर्वकरित्या केली आहे, असं मला जाणवलं. गिरणगाव चाळीतल्या तळागाळातील श्रमजीवी लोकांचं प्रतिनिधित्व करणारी ही हिंदी भाषा नाटकात समर्थपणे उतरली आहे. त्यामुळे फिल्म इन्स्टिट्यूट मधील अभिनय विभागातील विद्यार्थी कलाकारांना हे नाटक पहिल्या वाचनातच खूप आवडलं. विभाग प्रमुख चंद्रमोहन नायर यांनी हे नाटक व्यवस्थित होण्यासाठी खूप मनापासून पाठिंबा दिला आणि सहकार्य केले. या विद्यार्थ्यांमध्ये अमोल देशमुख हा मुंबईत राहणारा असल्याने त्याला गिरणी कामगार चळवळी संदर्भात माहिती होती. पण इतर सर्व कलाकार हे इतर वेगवेगळ्या राज्यातील असल्याने ते याबद्दल अनभिज्ञ होते. तरीही सर्वच कलाकारांनी हे नाटक आणि नाटकातून व्यक्त होणारा प्रश्न समजून घेत मनापासून नाटकात काम केले. हा प्रयोग पाहण्यासाठी जयंत पवार आणि कैलाश सेंगर हे दोघंही आले होते. त्यांना ‘अधांतर’चा हिंदी आविष्कार खूप आवडला. ‘फिल्म इन्स्टिट्यूट (FTII)’मधील प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी आणि पुण्यातील प्रेक्षकांनी खूप भरभरून प्रतिसाद दिला.

हिंदी भाषेत ‘अधांतर’ हे नाटक दिग्दर्शित करण्यापूर्वी जयंत पवार आणि कैलाश सेंगर यांच्या परवानगीने, संहितेत महत्त्वाचे काही बदल करून घेतले. त्यातला एक महत्त्वाचा बदल म्हणजे, या नाटकाचे हिंदी भाषेतील नाव ‘अभी रात बाकी है’ असं होतं परंतु मला ‘अधांतर’ हेच नाव जास्त योग्य आहे असं वाटलं. म्हणून मूळ मराठी नाटकाचं अधांतर हे नावच पुन्हा हिंदी नाटकासाठी कायम ठेवलं. कारण गिरणी कामगारांची चळवळ आणि त्यांच्या कुटुंबीयांचं संघर्षमय आयुष्य जसं इतकी वर्षं अधांतरी लटकत राहिलं, त्याची व्यथा ही ‘अधांतर’ या एका शब्दातून व्यक्त होते असं मला मनापासून वाटलं. भारतीय प्रादेशिक रंगभूमीवरील काही नाटकांचे जेव्हा हिंदी भाषेत अनुवाद केले गेले आहेत, तेव्हा त्या नाटकांची नावं मूळ प्रादेशिक भाषेतील नावं कायम ठेवली असल्याची माहिती मला मिळाली होती. (जसं हयवदन हे मूळ कन्नड नाटकाचं नाव आहे) ‘अधांतर’ या नावाचा सुद्धा, फिल्म इन्स्टिट्यूट पुणे आणि राष्ट्रीय नाट्य विद्यालय नवी दिल्ली येथील प्रेक्षकांनी मनापासून स्विकार केल्याचं दिसून आलं.

संहितेतील दुसरा महत्त्वाचा बदल म्हणजे, कैलाश सेंगर यांनी हिंदी अनुवाद करताना मूळ मराठी नाटकातील मराठी साहित्यिक आणि कवींची नावं बदलून हिंदी साहित्यिक आणि कवींची नावं दिली होती. परंतु मला प्रकर्षाने असं वाटतं हे नाटक जरी हिंदी भाषेत करायचं ठरवलं तरीही नाटकाची एकूण पार्श्वभूमी ही महाराष्ट्रातील कापडगिरणी कामगारांच्या चळवळीवर आधारित असल्यामुळे, तसेच या चाळीत राहणाऱ्या बाबाचं मराठी भाषा या विषयात पदव्युत्तर शिक्षण झालेलं असताना, बाबाच्या विचारांवर ज्या मराठी साहित्यिक आणि कवींच्या लेखनाचा विचारांचा प्रभाव दिसून येतो, तो त्याच्या वैचारीक जडणघडणीत खूप महत्त्वाचा आहे. म्हणूनच केवळ हिंदी भाषक प्रेक्षकांना कळायला सोईचं जावं म्हणून हिंदी भाषेतील साहित्यिक आणि कवींची नावं असावीत ही गोष्ट मला पटत नव्हती. म्हणूनच हिंदी भाषेतील अनुवादित नाटकातसुद्धा मूळ नाटकातील मराठी साहित्यिक आणि कवींची नावंच असायला हवीत या साठी मी कैलाश सेंगर आणि जयंत पवार यांच्याकडे आग्रहपूर्वक विनंती केली. या माझ्या विनंतीचा दोघांनी मनापासून स्विकार केला. या महत्त्वाच्या निर्णयाचा मला राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे या दोन्ही ठिकाणी ज्या प्रेक्षकांनी हिंदी भाषेतील नाटक पाहीले, त्यांच्याकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या निमित्ताने मराठी भाषेतील काही प्रस्थापित कवी, साहित्यिकांपासून विद्रोही कवी आणि साहित्यिकांची नावं कळाली, अशा खूप प्रतिक्रिया मिळाल्या.

त्यानंतर, ‘राष्ट्रीय नाट्य विद्यालय, नवी दिल्ली’ (NSD) येथील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांबरोबर नोव्हेंबर २०१४ मध्ये ‘अधांतर’ हे नाटक पुन्हा एकदा दिग्दर्शित करण्याचा अनुभव मिळाला.

‘अधांतर’ नाटकाच्या दिग्दर्शन प्रक्रीयेत कॉन्स्टन्टिन स्तानिस्लावस्की प्रणित वास्तवाभासी अभिनय पध्दतीनुसार भूमिकेची तयारी करण्यासाठी प्रत्येक व्यक्तिरेखांचा सखोल अभ्यास (character study) करण्यासाठी मी विद्यार्थ्यांना प्रवृत्त केलं. काही प्रसंगांवर आधारित उस्फुर्त प्रसंग सुद्धा करून पाहिले. खास करून मी अभिनेत्यांबरोबर काम करताना, लालबाग परळ येथील गिरणगाव चाळीतल्या मराठी बाजाच्या या तळागाळातील श्रमजीवी लोकांचं वागणं, बोलीभाषा, देहबोली या गोष्टींवर जास्त लक्ष केंद्रित केलं. आईच्या भूमिकेपासून ते बटरची भूमिका करणार्‍या, प्रत्येक अभिनेत्यानं आपल्या भूमिकेचं वागणं बोलणं, सुख- दुःख, जगण्यासाठी करावा लागणारा संघर्ष समजून घेत अभिनय करण्यासाठी खूप कष्ट घेतले.

‘अधांतर’ हे नाटक बसवताना, माझ्या या दिग्दर्शन प्रक्रीयेत मला प्रत्येक प्रसंगांमधून पुन्हा एकदा नव्याने जिवंत नाट्यअनुभव मिळत गेला. उदाहरणार्थ पहिल्या अंकातील मंजू आणि राणे यांच्यातील नातेसंबंधावर प्रश्न निर्माण करणारा संवेदनशील प्रसंग, मंजू वैतागून जेव्हा आपल्या घरी परत जाण्याची तयारी करते, तेव्हा आई तिला माहेरी राहावं म्हणून विनवणी करते, तो आई आणि मुलीच्या नात्याची वीण घट्ट करणारा नाजूक प्रसंग, दुसऱ्या अंकातील  मोहन कडून नैराश्यातून आणि आसक्तीमधून सावर्डेकर मामीच्या बाबतीत घडलेलं विनयभंग सदृश वर्तन, पुरोगामी साहित्यिक म्हणून आपली ओळख सुद्धा निर्माण करू शकलो नाही, या निराशेतून व्यक्त होणारं बाबाचं आर्त स्वगत आणि त्यातून सच्चेपणानं व्यक्त होणारे अस्तित्ववादी विचार, तसेच बाबा जेव्हा आईला, आपल्या वडिलांच्या अर्धांगवायूच्या आजारपणाच्या काळात घरातील वातावरण कसं गढूळ झालं होतं याचा उद्विग्न होऊन पाढा वाचून दाखवतो, तेव्हा हे ऐकून उद्रेकातून आईचं आक्रंदन ज्या पद्धतीनं व्यक्त होतं, तो प्रसंग. त्यानंतर कामगार चळवळ  पूर्णपणे उध्वस्त झाल्यावर राणे विमनस्क अवस्थेत घरी येऊन ज्या पद्धतीनं पोटतिडकीने, “अरे आरया हो गया रे आरया” असा आक्रोश व्यक्त करतो असे अनेक प्रसंग, नाटक बसवताना दिग्दर्शक म्हणून माझ्या मनात खूप खोलवर परिणाम करून गेले. माझ्या दिग्दर्शन पध्दतीवर विश्वास ठेवून अभिनेत्यांनी सुद्धा स्वत:ला भूमिकेसाठी समर्पित होऊन अगदी तन्मयतेनं अभिनय केला होता. याचा परिणाम म्हणजे, जेव्हा आम्ही सलग सहा दिवस प्रयोग केले, तेव्हा दिवसागणिक अभिनेते नाटकातील वास्तवाचे भान ठेवून खूप संयतपणे आणि स्वाभाविकपणानं अभिनय करत होते, असा नाट्यअनुभव मिळाला.

शेवटच्या प्रसंगाचे दिग्दर्शन करताना एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे, आपल्या कुटुंबाची वाताहत झालेली आईला आपल्या डोळ्यासमोर बघावी लागते, हा प्रसंग सुन्न करून टाकणारा अनुभव आहे. कामगार चळवळीच्या उत्तरार्धात झालेल्या पडझडीतून ज्या पद्धतीने कामगारांची कुटुंब व्यवस्थासुद्धा कोलमडून पडली, याचं वास्तववादी आणि विदारक चित्रण या प्रसंगातून व्यक्त होतं. हा इतक्या गुंतागुंतीचा सलग प्रसंग दिग्दर्शित करणं हे माझ्या समोर मोठं आव्हानच होतं. हा पूर्ण प्रसंग मी एका वेगवान आणि आर्त पार्श्वसंगीताचा आधार घेऊन बसवला.  ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनावर या प्रसंगाचा खूप खोल आणि विचार प्रवृत्त करायला लावेल असा परिणाम झाला. रंगसूचनेनुसार अखेरीस  ‘मंजू जोराचा हंबरडा फोडते, आई नरूचा रक्ताने माखलेला शर्ट माचिसची काडी पेटवून जाळते, आई त्या ज्वाळांकडे एकटक बघत असतानाच पडदा’ असा नाटकाचा शेवट होतो. १९९७ साली झालेल्या मूळ मराठी नाटकाचा हा शेवट निर्णायक असला तरीही धुरी कुटुंबापुरता मर्यादित वाटत होता. कारण मी जेव्हा हे नाटक दिग्दर्शित करायला घेतलं तेव्हा म्हणजेच २०१४ दरम्यान एव्हाना गिरणगावची परिस्थिती बदलली होती. त्यामुळे नाटकात दिसून येत असलेल्या वाताहात झालेल्या धुरी कुटुंबाबरोबरच गिरणगाव चाळीतल्या असंख्य कामगार कुटुंबांची ही गंभीर समस्या आहे, हे कसं व्यक्त करावं या विचारात असतानाच, माझ्या मनात, १९६६ पासून सुरू झालेल्या कामगार चळवळीच्या सुरवातीच्या काळात संप पुकारून कामगारांनी दिलेला लढा, मधल्या काळातील कामगार आंदोलनाची स्थित्यंतरे आणि उत्तरार्धात झालेली कामगार चळवळीची पडझड, ते आजच्या एकविसाव्या शतकात गिरणी बंद पाडल्या जाऊन त्या जागांवर कोट्यवधी रुपयांच्या भावात व्यवहार करत उच्चभ्रू वर्गातील सोसायटी आणि मॉल संस्कृती कशी आक्रमक स्वरूपात उभारण्यात आली, या संक्रमणाचं चित्र दृकश्राव्य स्वरुपात दाखवायला हवं असा विचार आला. नारायण सुर्वे यांच्या जीवनावर आधारीत, अरुण खोपकर दिग्दर्शित ‘नारायण गंगाराम सुर्वे’ या शॉर्ट फिल्ममध्ये स्वत: नारायण सुर्वे यांनी स्वत: ‘गिरणीची लावणी’ ही कविता गायली आहे, ही कविता ऐकून मन सुन्न होऊन जाते. माझ्या मनात आलं, की या कवितेच्या पार्श्वभूमीवर स्थिरचित्रफीत (slideshow) तयार करून नाटकाच्या शेवटच्या प्रसंगाला जोडूनच सलग दाखवायला हवी. यासाठी मी अरुण खोपकर आणि शांता गोखले यांच्याकडे नारायण सुर्वे यांच्या आवाजातील ‘गिरणीची लावणी’ कवितेचा अंतर्भाव माझ्या नाटकात करण्यासाठी परवानगी मागितली आणि त्यांनी सुद्धा यासाठी प्रोत्साहन दिले. नारायण सुर्वे यांच्या खर्जातील गहीर्‍या आवाजातील गिरणीची लावणी, कापड गिरणीचा भोंगा, मशीनींचा आवाज, आरयाचा आवाज या ध्वनींचं कोलाज तयार केलं आणि १९६६ मध्ये सुरू झालेल्या या कामगारांच्या आंदोलनापासून ते आजच्या काळात गिरणगावावर अतिक्रमण करून उभी राहिलेली उच्चभ्रू वर्गातील सोसायटी आणि मॉल संस्कृती असा दृश्यपट तयार करून, ही अडीच तीन मिनीटांची ही स्थिरचित्रफित (montage of still images) नाटकाच्या शेवटी प्रदर्शित केली. या मोंताजचे प्रक्षेपण रंगमंचावरील नेपथ्यातील धुरी कुटुंबाच्या घरातील भिंतीवरच केले. याचा दृकश्राव्य परीणाम खूप प्रभावी ठरणारा असाच झाला आणि नाटकाचा शेवट सुद्धा एका कुटुंबा पुरता मर्यादित न राहता नकळत त्याला सार्वत्रिक (Universality) असं परिमाण लाभलं. ‘अधांतर’ नाटकाचा असा हा शेवट, जयंत पवार यांना खूप आवडला आणि अस्सल (authentic) असा वाटला.

जयंत पवार आणि संध्या नरे-पवार हे दोघेही नाट्यप्रयोग पाहण्यासाठी खास दिल्लीला आले होते. प्रयोग पाहण्यासाठी नाटकाचे लेखक येणार याचा आनंद विद्यार्थ्यांबरोबरच मला सुद्धा झाला होता. प्रयोगानंतर जयंत पवार यांनी सर्व विद्यार्थी कलाकारांसोबत नाटकाच्या प्रयोगाबद्दल सखोल चर्चा केली. या चर्चेत त्यांनी ‘अधांतर’ या नाटकाची प्रेरणा आणि लेखन प्रक्रियेबद्दल सांगितले.

दिल्लीतील नाट्य समिक्षक सौरभकुमार शाही यांनी सखोलपणे समिक्षा लिहिली.एम. के. रैना, किर्ती जैन, रॉबिन दास, अनुराधा कपूर हे आणि यांच्या सारखे दिल्लीतील अनेक नामवंत दिग्दर्शक आणि कलाकार हे नाटक पाहायला आले होते.‌ प्रेक्षकवर्गाचा सुद्धा खूप चांगला आणि भरभरून प्रतिसाद मिळाला.

सर्वसामान्य माणसाच्या जगण्यासाठी चाललेल्या चिवट धडपडीचं ‘अधांतर’ हे नाटक, समकालीन भारतीय रंगभूमीवरील वास्तववादी नाट्य शैलीतील नाटकांमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. जयंत पवार लिखित ‘अधांतर’ आणि ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या दोन्ही नाटकांच्या दिग्दर्शन प्रक्रियेत मला दिग्दर्शक म्हणून वैचारिक आणि संवेदनशीलदृष्ट्या अतिशय समृद्ध करणारा असा अनुभव मिळाला असं मला वाटतं. जयंत पवार यांनी मला या दोन्ही नाटकांच्या दिग्दर्शन प्रक्रियेत नेहमीच प्रोत्साहन दिले. या दोन्ही नाटकांचे दिग्दर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल  मी जयंत पवार यांचा नेहमीच ऋणी आहे.

अनिरुध्द खुटवड, नाट्य दिग्दर्शक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0