‘त्रिज्या’ युरोपातल्या ‘ब्लॅक नाइटस्’मध्ये

‘त्रिज्या’ युरोपातल्या ‘ब्लॅक नाइटस्’मध्ये

इस्टोनिया, टॅलिन येथे होणाऱ्या ‘ब्लॅक नाइटस्’ या महत्त्वाच्या चित्रपट महोत्सवामध्ये अक्षय इंडीकर दिग्दर्शित ‘त्रिज्या’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

‘पॅरासाईट’ – नवउदारमतवादी जगाचा भेसूर चेहरा
चित्रीकरण परवानगीः एक खिडकी योजना राज्यात लागू
जनतेचा शत्रू (‘गणशत्रू’)

इस्टोनिया, टॅलिन येथे १५ नोव्हेंबर २०१९ ते १ डिसेंबर २०१९ या कालावधीत होणाऱ्या ‘ब्लॅक नाइटस्’ या चित्रपट महोत्सवामध्ये ‘त्रिज्या’ची निवड करण्यात आली आहे. जगामध्ये हा महत्त्वाचा चित्रपट महोत्सव मानला जातो. यावेळी जगभरातल्या ७८ देशांमधून येणाऱ्या विविध चित्रपटांपैकी २५० चित्रपट या महोत्सवामध्ये दाखविले जाणार आहेत. दरवर्षी सुमारे ८०,००० चित्रपटरसिक जगभरातून या महोत्सवाला हजेरी लावतात.

या महोत्सवामध्ये झळकणारा ‘त्रिज्या’ हा पहिला मराठी चित्रपट असल्याचे अक्षय इंडीकर यांनी सांगितले. या आधी चीनमध्ये झालेल्या ‘एशियन न्यू टॅलेंट अवॉर्ड’ या महोत्सवामध्ये ‘त्रिज्या’ प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावेळी ‘द हॉलीवूड रिपोर्टर’ आणि ‘स्क्रीन इंटरनॅशनल’ या महत्त्वाच्या मासिकात ‘त्रिज्या’बद्दल परिक्षणात्मक लेख आले होते. कान्स येथे झालेल्या चित्रपट महोत्सवामध्ये त्रिज्याचा ट्रेलर दाखविण्यात आला होता.

यापूर्वी ज्येष्ठ मराठी साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या जीवनावर आधारलेल्या मराठीतल्या पहिल्या डॉक्यु फिक्शन (Docu-Fiction) चित्रपटामुळे अक्षय इंडीकर यांचे नाव चर्चेत आले होते. तसेच या चित्रपटाचा  वेगळा बाज अनेकांच्या पसंतीसही उतरला होता.

‘द वायर मराठी’शी बोलताना अक्षय इंडीकर म्हणाले, की या चित्रपटात अभय महाजन यांनी प्रमुख भूमिका केली आहे. त्यांच्यासोबत श्रीकांत यादव, गजानन परांजपे, चंदू धुमाळ, सोमनाथ लिंबरकर, वर्षा मालवडकर आणि गिरीष कुलकर्णी यांच्या भूमिका आहेत. छायांकन स्वप्नील शेटे आणि त्यांनी एकत्रितपणे केले आहे. चित्रकथी निर्मितीचे अरविंद पाखले तसेच फिरता चित्रपट आणि बॉम्बे बर्लिन फिल्म प्रोडक्शन्सचे अर्फी लांबा व कॅथरीना झुकाले यांनी ‘त्रिज्या’ या चित्रपटच्या निर्मितीस हातभार लावला आहे. भारत आणि जर्मनी यांच्या सहयोगातून तयार होत असलेला हा पहिला मराठी चित्रपट आहे.

इंडीकर म्हणाले, “माझा जन्म सोलापूर येथील लोककलावंताच्या घरात झाला. लहानपणापासून कुटुंबाच्या एकसारख्या होणाऱ्या स्थलांतरामुळे, स्थलांतरांचा दीर्घ परिणाम माझ्या मनावर उमटत गेला. त्रिज्याचं बीज तिथेच रुजले. चित्रपटाची आवड निर्माण झाल्यानंतर पुण्यात स्थलांतरित झालेल्या तरुणांच्या मनातील कोलाहल रेखाटणारा चित्रपट करण्याचे मी ठरविले. फिल्म इंन्स्टीट्युटमध्ये शिक्षण घेत असताना डोक्यात अनेक विषय होते. जगाविषयी काही बोलण्यापेक्षा स्वत:विषयी काही वेगळं देता येईल का? हा विचार डोक्यात घोळत होता. जगाला संदेश देण्याएवढे आपण मोठे नसतो आणि होतही नाही. आयुष्यभर आपण स्वत:लाच समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तसेच आपल्या अवती-भोवती घडणाऱ्या गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. चित्रपटचं कथानक लिहित असतांना आपण स्वत:च्याच आयुष्याची गोष्ट मांडावी का? असा विचार डोक्यात आला. त्यातूनच या चित्रपटाची  निर्मिती झाली.”

“हा चित्रपट म्हणजे माझ्या आयुष्यावरील बायोग्राफी नाही. तर हा सिनेऑटोबायोग्राफी म्हणायला हरकत नाही. कोणतीही चांगली कलाकृती आत दडलेल्या भावना. इच्छा, आकांशा, आठवणी किंवा स्वप्नांमधूनच बाहेर येते. त्रिज्याचाही प्रवास तसाच सुरू झाला, ” असे अक्षय यांनी नमुद केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0