त्रिपुरा हिंसाचार: पत्रकार, कार्यकर्ते यूएपीए विरोधात सर्वोच्च न्यायालयात

त्रिपुरा हिंसाचार: पत्रकार, कार्यकर्ते यूएपीए विरोधात सर्वोच्च न्यायालयात

त्रिपुराच्या उत्तरेकडील जिल्ह्यांमध्ये नुकत्याच झालेल्या धार्मिक हिंसाचाराचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केवळ उल्लेख केल्याने त्रिपुरा पोलिसांनी अनेक पत्रकारांसह १०२ जणांवर बेकायदेशीर कृती (यूएपीए) प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

जम्मू-काश्मीर राज्यपालांच्या सूर्य मंदिरातील पूजेवर पुरातत्व खाते नाराज
जेटलींचं मरण आणि राम सेतू
‘आंदोलनातील मृत शेतकऱ्यांची आकडेवारी नाही’

नवी दिल्ली: ‘न्यूजक्लिक’ या वेबसाइटचे पत्रकार श्याम मीरा सिंग यांच्यासह अनेक पत्रकार आणि कार्यकर्त्यांवर त्रिपुरा पोलिसांनी नुकतेच बेकायदेशीर कृती (यूएपीए)प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांच्या या कृती विरोधात पत्रकार आणि कार्यकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून, त्यांच्याविरुद्ध दाखल केलेले एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे.

वकील, पत्रकार आणि कार्यकर्त्यांसह १०२ जणांवर यूएपीएअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आल्याचे वृत्त नुकतेच ‘द वायर’ने दिले होते. या सर्वांवर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्टद्वारे त्रिपुरातील धार्मिक हिंसाचाराचा उल्लेख केल्याचा आरोप आहे.

या केसेस प्रथम पश्चिम आगरतळा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आल्या होत्या. परंतु नंतर त्या त्रिपुराच्या गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आल्या आहेत.

यातील पहिला गुन्हा दोन वकिलांवर, अन्सार इंदोरी आणि मुकेश यांच्यावर दाखल करण्यात आला होता. हे वकील त्रिपुरातील धार्मिक हिंसाचाराची चौकशी करणाऱ्या फॅक्ट-फाइंडिंग टीमचा भाग होते.

खरं तर, फॅक्ट-फाइंडिंग टीमचा ‘ह्युमॅनिटी अंडर अटॅक इन त्रिपुरा: मुस्लिम लाइव्हज मॅटर’, हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या धार्मिक हिंसाचारात १२ मशिदी, मुस्लिमांची ९ दुकाने आणि तीन घरे उद्ध्वस्त झाल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे.

४ नोव्हेंबर रोजी पोलिसांनी एकामागोमाग केलेल्या ट्विटच्या मालिकेत, सांगितले, “विविध गुन्ह्यांसाठी काही लोकांविरुद्ध या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. दोन धार्मिक गटांमध्ये द्वेष पसरवण्याचा प्रचार केल्याबद्दल चार लोकांना अटक करण्यात आली आहे.”

‘न्यूज नाइन’च्या वृत्तानुसार, यूएपीए अंतर्गत गुन्हा नोंदवण्याव्यतिरिक्त, या १०२ लोकांवर आयपीसी कलम १५३ (अ) (विविध गटांमधील शत्रुत्व आणि वैर वाढवणे), १५३ (बी), ४६९ (बनावटगिरी) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ४७१ (खोटे दस्तऐवज वापरून फसवणूक), ५०३ (धमकावणे) आणि ५०४ (सार्वजनिक शांततेचा भंग करण्यासाठी प्रवृत्त करणे) याअंतर्गत देखील केसेस दाखल केल्या आहेत.

‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ने रविवारी त्रिपुरा पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आणि म्हटले, की पोलिसांच्या कारवाई आश्चर्यचकीत करणारी आहे, कारण हिंसाचार नियंत्रित करण्यात त्रिपुरा सरकारच्या स्वतःच्या अपयशापासून लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार आहे.

‘गिल्ड’ने असेही म्हटले आहे, की श्याम मीरा सिंग यांचा असा आरोप आहे, की त्यांनी फक्त ‘त्रिपुरा जळत आहे’, असे ट्विट केल्यामुळे त्यांच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0