मुंबईः आपल्या एजन्सीचे काही खासगी व गोपनीय मजकूर दिशाभूल व आणि बदनामीकारकरित्या दाखवल्याचा आरोप टीव्ही प्रेक्षकांची रेटिंग एजन्सी बार्क इंडियाने रिपब्
मुंबईः आपल्या एजन्सीचे काही खासगी व गोपनीय मजकूर दिशाभूल व आणि बदनामीकारकरित्या दाखवल्याचा आरोप टीव्ही प्रेक्षकांची रेटिंग एजन्सी बार्क इंडियाने रिपब्लिक इंडिया या वृत्तवाहिनीवर केला आहे. सध्या रिपब्लिक इंडिया व अन्य दोन मराठी वाहिन्यांवर टीआरपी घोटाळा केल्याच्या प्रकरणाची पोलिस चौकशी सुरू असताना रिपब्लिक इंडियाने आपल्या रेटिंग एजन्सीची दिशाभूल करणारी माहिती प्रेक्षकांना दाखवली आहे, आम्ही पोलिसांना सर्व सहकार्य करत असताना रिपब्लिकचे असे वर्तन निराशजनक असल्याचे पत्रक बार्क इंडियाने प्रसिद्ध केले आहे.
बार्क इंडियाच्या या प्रतिक्रियेवर रिपब्लिक इंडियाचे संपादक अर्णव गोस्वामी यांनी बार्कच्या इमेलमुळे मुंबईचे पोलिस आयुक्त खोटे बोलतात हे सिद्ध झाले असून त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.
रिपब्लिक वृत्तवाहिनी कोणत्याही घोटाळ्यात सामील नाही असा बार्कचा एक इमेल रिपब्लिकने उघड केला, त्यानंतर बार्क इंडियाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. बार्क इंडियाचे सीईओ सुनील लुल्ला व रिपब्लिक मीडिया नेटवर्क सीईओ विकास खानचंदानी यांच्यातील हा एक मेल आहे. हा इमेल १६ ऑक्टोबरला खानचंदानी यांनी बार्कला पाठवला होता. या इमेलचे उत्तर १७ ऑक्टोबरला देण्यात आले होते. या उत्तरात रिपब्लिक नेटवर्कवरचे स्वामित्व हक्क सांगणारी कंपनी एआरजी आउटलायर मीडियाच्या विरोधात कोणताही दंडात्मक कारवाई सुरू झाल्यास बार्क इंडिया या संदर्भात आपले पुरावे सादर करेल, असे म्हटले आहे. बार्क इंडियाने आपल्यावर विश्वास ठेवल्याबद्दल रिपब्लिक नेटवर्कचे आभारही मानले आहेत.
या मजकुरावरून रिपब्लिक इंडियाने आपण कोणतेही गैरकृत्य केले नाही, असा दावा केला आहे.
‘अर्णवच्या हजेरीबाबत समन्स जारी करा’
दरम्यान अर्णव गोस्वामी यांना टीआरपी घोटाळ्याबाबत हजर करायचे असेल तर मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरोधात समन्स जारी करावे, असे मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात ८ जणांना समन्स पाठवले आहे पण अर्णव गोस्वामी यांना पाठवलेले नाही.
अर्णव यांना समन्स पाठवल्यास त्यांना न्यायालयात हजर राहावे लागेल व त्यांना पोलिस चौकशीला सहकार्य करावे लागेल असे न्यायालयाने म्हटले आहे.
मूळ बातमी
COMMENTS