बीएआरसीचे माजी सीईओ पार्थो दासगुप्तांना जामीन

बीएआरसीचे माजी सीईओ पार्थो दासगुप्तांना जामीन

टीआरपी घोटाळा प्रकरणातील आरोपी तसेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना मुंबई उच्च न्याय

‘टीआरपीसाठी अर्णबने ४० लाख रु. दिले’
आपले प्रजासत्ताक आणि त्यांचे रिपब्लिक
‘कुणालचे वर्तन उपद्रवी नव्हते’

टीआरपी घोटाळा प्रकरणातील आरोपी तसेच ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिलचे (बीएआरसी) माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थो दासगुप्ता यांना मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांनी दासगुप्ता (५५) यांना २ लाख रुपयांच्या वैयक्तिक मुचलक्यावर तसेच याच रकमेच्या दोन हमींवर जामीन मंजूर केला. त्याचप्रमाणे उच्च न्यायालयाने दासगुप्ता यांना त्यांचा पासपोर्ट पोलिस ठाण्याच्या स्वाधीन करण्याचे व सत्र न्यायालयाच्या परवानगीशिवाय भारत सोडून कोठेही न जाण्याचे निर्देशही दिले.

“पहिले सहा महिने अर्जदाराने दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी पोलिस ठाण्यात हजेरी लावावी आणि सहा महिन्यानंतर त्याने तीन महिन्यांतून एकदा हजेरी लावावी,” असे न्यायालयाने म्हटले आहे. त्याच प्रमाणे जेव्हा आवश्यक असेल तेव्हा न्यायालयात सुनावणीसाठी हजर राहण्याचे व पुरावे किंवा साक्षींमध्ये हस्तक्षेप न करण्याचे निर्देशही न्यायालयाने दासगुप्ता यांना दिले.

टीआरपी घोटाळ्यात दासगुप्ता यांचा मोठा वाटा आहे व ते या घोटाळ्याचे कथित “सूत्रधार” आहेत असे सांगत सत्र न्यायालयाने जामीन नामंजूर केल्यानंतर दासगुप्ता यांनी जानेवारीमध्ये उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. या प्रकरणात त्यांना गेल्या वर्षी २४ डिसेंबर रोजी अटक झाली होती आणि तेव्हापासून ते तुरुंगात होते.

दासगुप्ता यांनी आपल्या अधिकारी हुद्दयाचा गैरवापर करून एआरजी आउटलायर कंपनीला तसेच रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना टीआरपीमध्ये (टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट्स) फेरफार करण्यास मदत केली असा आरोप त्यांच्यावर आहे. आउटलायर कंपनी रिपब्लिक टीव्हीचे सर्व चॅनल्स चालवते. रिपब्लिक टीव्हीने हे आरोप फेटाळले आहेत.

‘लाइव्हलॉ’ने दिलेल्या बातमीनुसार, गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यात पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत झालेल्या कथित संभाषणांचे अधिक तपशील न्या. नाईक यांनी विचारले आणि ‘पुलवामा हल्ल्यामुळे चॅनलच्या रेटिंगला फायदा झाला’ या गोस्वामी यांच्या विधानावरून स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे का, असाही प्रश्न केला. मात्र, सरकारी वकिलांनी यावर ‘नाही’ असे उत्तर दिले.

दासगुप्ता यांना यापुढे कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नाही, असा युक्तिवाद त्यांचे वकील आबाद पोंडा यांनी केला. या प्रकरणातील बहुतेक आरोपींना यापूर्वीच जामीन मिळाला आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. व्हॉट्सअॅप चॅट्स या सहज मारलेल्या गप्पा आहेत असा दावा पोंडा यांनी केला. मात्र, २० ऑगस्ट, २०१९ रोजी झालेल्या एका चॅटमध्ये दासगुप्ता यांनी गोस्वामी यांना आपण “मित्र” असलो तरी मी माझ्या मूल्यांशी तडजोड करणार नाही असे स्पष्ट सांगितल्याचे पोंडा यांनी नमूद केले.

बीएआरसीशी संलग्न असलेल्या हंसा रिसर्च ग्रुप प्रायव्हेट लिमिटेडने केलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने कथित टीआरपी घोटाळ्याप्रकरणी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फिर्याद नोंदवली. त्यानंतर डिसेंबरमध्ये दासगुप्ता यांना अटक झाली.१६ जानेवारी रोजी रक्तातील साखरेची पातळी वाढल्याने त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. २२ जानेवारी रोजी त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाल्यानंतर त्यांच्या वकिलांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0