निर्भय व नीडर पत्रकारांना शांततेचे नोबेल

निर्भय व नीडर पत्रकारांना शांततेचे नोबेल

फिलिपाइन्सच्या मारिया रेस्सा व रशियाचे दिमित्री मुरातोव्ह या दोन पत्रकारांची यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी निवड झाली आहे. फिलिपाइन्स व रशिया

लॉर्डस् कसोटी: भारताचा “न भूतो न भविष्यति” विजय….
संजीव भट्ट जन्मठेप प्रकरण – कायदारक्षकांची संशयित भूमिका
हिवाळी अधिवेशनात २६ विधेयके व अध्यादेश

फिलिपाइन्सच्या मारिया रेस्सा व रशियाचे दिमित्री मुरातोव्ह या दोन पत्रकारांची यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी निवड झाली आहे. फिलिपाइन्स व रशियाच्या सरकारकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर सतत होत असलेल्या हल्ल्याविरोधात या दोन निर्भय पत्रकारांचा संघर्ष उल्लेखनीय व अतुलनीय असल्याचे नोबेल समितीचे म्हणणे आहे. या दोन पत्रकारांचा संघर्ष केवळ त्यांच्या देशातील सत्ताधार्यांविरोधात नाही तर त्यांच्या पत्रकारितेने जगभरातील पत्रकारांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्कासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली. लोकशाही व स्वातंत्र्य या मूल्यांसाठीचा पत्रकारांचा संघर्ष अधिक प्रखर झाला असे नोबेल समितीचे म्हणणे आहे.

१९३५ मध्ये जर्मनीकडून सुरू असलेल्या युद्ध तयारीचा पर्दाफाश जर्मन पत्रकार कार्ल व्होन ओसिएटझ्की यांनी केला होता. त्यावेळी नोबेल समितीने त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला होता. त्यानंतर २०२१मध्ये दोन पत्रकारांची शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

‘रॅपलर’ ही स्वतंत्र पत्रकारिता करणारी न्यूज वेबसाइट मारिया रेस्सा यांनी फिलिपाइन्समध्ये सुरू केली आहे. या वेबसाइटच्या माध्यमातून फिलिपाइन्समधील रॉड्रिगो दुतेर्ते सरकारच्या अधिकारशाहीवर सतत आसूड ओढण्याचे काम रेस्सा यांनी केले आहे. दुतेर्त सरकारने अमली पदार्थांच्या विरोधात सुरू केलेली कारवाई वादग्रस्त होती. यावरचे वृत्तांकन रेस्सा यांनी सातत्याने केले. प्रशासनातील भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे त्यांनी उघडकीस आणल्याने रेस्सा यांच्यावर फिलिपाइन्समधील न्यायव्यवस्था व ऑनलाइन टीकाकारांकडून सतत हल्ले केले गेले. त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या, मानसिक छळ, बलात्काराच्या धमक्याही देण्यात आल्या. पण अशा कोणत्याही दबावापुढे न डगमगता रेस्सा यांनी व्यवस्थेविरोधात आवाज उठवला. जगभरात लोकशाही व पत्रकारिता यावर चौफेर बाजूंनी हल्ले होत असताना रेस्सा यांची पत्रकारिता अशा दडपशाहीच्या विरोधात ठामपणे उभी असल्याचे जिवंत उदाहरण म्हणून पाहात येते, असे उद्गगार एका न्यायाधीशाने रेस्सा यांच्यासंदर्भात काढले होते.

मारिया रेस्सा यांना २०२१मध्ये प्रतिष्ठेचा गुईलेर्मो कानो वर्ल्ड प्रेस फ्रीडम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याच बरोबर २०१८मध्ये टाइम मासिकाने ‘पर्सन ऑफ द इअर’साठी त्यांची निवड केली होती.

रशियाचे पत्रकार दिमित्री मुरातोव्ह हे रशियातील वर्तमानपत्र ‘नोव्हया गॅझेता’ या वर्तमान पत्राचे मुख्य संपादक आहेत. १९९५ ते २०१७पर्यंत त्यांच्या नेतृत्वाखाली हे वर्तमानपत्र रशियातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीविरोधात आवाज उठवत असल्याने ते रशियात लोकप्रिय आहे. मध्यंतरी पुतीन सरकारने ‘नोव्हया गॅझेता’वर दबाव आणण्याचा प्रयत्न केला होता पण स्वतंत्र व निःपक्ष पत्रकारितेपुढे सरकारला झुकावे लागले. आजही सर्वसामान्य रशियाच्या नागरिकांमध्ये या वर्तमानपत्राची विश्वासार्हता अग्रलेख व बातम्यांमुळे टिकून आहे.

मूळ बातमी

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0