खेळ प्रतिमाभंजनाचा!

खेळ प्रतिमाभंजनाचा!

कोणतेही नेतृत्व हे योग्य आणि स्वच्छ असले की त्याला तडे देण्यासाठी व्यूव्हरचना केली जाते. वैयक्तिक आरोप अथवा करून बदनामीचे सत्र सुरू केले जाते.

जेईई, एनईईटी पुढे ढकला; विरोधक ठाम
प्रियंकांना नोटीस; अडवाणी-जोशी नियमाला अपवाद
मनपरिवर्तनः भाजप खासदाराचा राजीनामा मागे

युद्धात आणि प्रेमात सर्व काही क्षम्य असते, असे म्हणतात. हाच नियम लोकशाहीची आरती ओवाळताना त्या आडून अनेक कृत्य करतानाही तेवढाच लागू होतो. सत्तेची हाव ही भल्याभल्यांना सुटत नाही. मग या सत्ता सुंदरीसाठी वाट्टेल ते, अशी मग स्पर्धाच सुरू होते. राजकीय डावपेचांच्या या साठमारीत मग प्रतिमाभंजनचा सारीपाट मांडला जातो.

गेली २५ वर्षे एकत्र संसार केलेल्या शिवसेना आणि भाजप यांच्यात जी उभी दरी निर्माण झाली ती मुख्यमंत्रीपदावरून. गुप्त आणि बंद दाराआड दिल्या घेतलेल्या वचनाना इंद्रायणीच्या डोहात बुडवून हे जोडपे वेगळे झाले. खरे तर आपल्या शिवाय शिवसेना काहीच करू शकणार नाही आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादी या भिन्न विचारसरणी असलेल्या पक्षासोबत ते कदापी जाणार नाहीत या भ्रामक कल्पनेत असलेल्या भाजपला महाविकास आघाडीची स्थापना आणि महत्त्वाचे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री या दोन घटनेने ४४० व्होल्टेजपेक्षा जास्त धक्का बसला. आपल्या व्यतिरिक्त सेनेला पर्यायच नाही ही भाजपची भाबडी आणि अतिआत्मविश्वास असलेली आशा घात करणारी ठरली. ‘मी पुन्हा येईन…’ हा दर्प याच आशावादातून आलेला होता.

मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे हाच भाजपला बसलेला मोठा धक्का काही दिवस कायम होता. त्यातून हळूहळू सावरत असताना तीन टेकूंवरील हे सरकार फार काळ टिकणार नाही, आज ना उद्या ते पडेलच, हे मांडे खात बरेच दिवस गेले. सरकार पडण्याच्या तारखा आणि महिने देऊन ज्योतिष विद्या आत्मसात केल्याचे अनेक नेते दाखवू लागले. त्यातच अचानक कोरोना या महासाथीच्या विळख्यात संपूर्ण जग अडकले. लॉक डॉउन आणि लॉक डॉउनमध्ये जीवनाचे रहाटगाडगे बंद झाले.

प्रशासनाचा गंध नसलेल्या उद्धव ठाकरे यांनी या संकट काळात संयम पाळत अनेक निर्णय घेतले. अर्थात भाजपने केवळ विरोधासाठी विरोध म्हणून त्यालाही आक्षेप घेतले. उद्धव ठाकरे हे प्रशासन चालविण्यात कसे लायक नाहीत तसेच ते किती निष्क्रिय आहेत यासाठी भाजपने रान उठवले. प्रसंगी शिवसैनिकांना कंगना आणि अन्य प्रकरणात उद्युक्त करून आक्रमक भूमिका घेण्यासाठी भाजपच्या अनेक नेत्यांनी प्रयत्न केले. सत्तेत असलेल्या पक्षाचेच कार्यकर्ते दंगा, हाणामाऱ्या करू लागले तर आपसूक सरकारची बदनामी आणि महत्त्वाचे म्हणजे उद्धव ठाकरे यांची बदनामी होईल असा त्यामागील एक प्रयत्न होता. राज्याला आणि येथील पोलीस यंत्रणेलाही बदनाम करण्याचे अथवा दूषणे देण्याचे काम जाणीवपूर्वक करण्यात आले. चारही बाजूंनी उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपद सांभाळण्यास कसे पात्र नाहीत यासाठी प्रयत्न करण्यात आले. राज्यात राष्ट्रपती राजवटीची कशी आवश्यकता आहे याचे चित्रण जाणीवपूर्वक करण्यात आले. कोरोना रोखण्यात आणि लॉक डॉउन नंतर जनजीवन पूर्ववत करण्यासाठी ठाकरे यांचे निर्णय कसे चुकीचे ठरले याचा गाव दंडा पिटण्यात आला.

पण या सर्वाला पुरून उरत आणि अत्यंत संयम आणि शांतपणे उद्धव ठाकरे यांनी आपला कारभार सुरू ठेवला. कोणताही आक्रस्ताळेपणा न करता योग्य निर्णय घेणे तसेच भाजपने कितीही डिवचले तरी त्याकडे दुर्लक्ष करत आपले काम करत जाणे यामुळे अल्पावधीतच उद्धव हे सर्वसामान्य जनतेला आपलेसे वाटू लागले. जनतेशी संवाद साधताना आपल्याच कुटुंबातील एक मोठा माणूस म्हणून जबाबदारीने बोलणे हा त्यांचा स्वभाव आपलेसे करून गेला. प्रशासनाचा कोणताही अनुभव नसताना त्यांनी काही निर्णय अत्यंत चाणाक्षपणे आणि निग्रहाने घेतले. आपणही प्रशासन चोख चालवू शकतो हे त्यांनी भाजपला दाखवून दिले. अशक्य कोटीतील गोष्ट शक्य झाल्याने भाजपचे सर्व पर्याय फुसके ठरले आणि उद्धव ठाकरे यांनी आपले मुख्यमंत्रीपद आणखी बळकट केले.

या सर्वाचा परिणाम विविध सर्वेक्षणातून स्पष्ट झाला. ‘सी व्होटर्स’ने केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणात ७२ टक्के पसंती मिळवून उद्धव हे सर्वोत्तम मुख्यमंत्री यादीत विराजमान झाले, तसेच टाइम्सने केलेल्या सर्वेक्षणात सुद्धा त्यांनी स्थान मिळवले. उद्धव ठाकरे यांची राजकारण विरहित स्वच्छ आणि चांगली प्रतिमा तसेच संयमी आणि शांत स्वभाव ही महाविकास आघाडी सरकारची बलस्थाने ठरली. सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला त्यातून बाहेर काढण्यासाठी विविध प्रयत्नही करण्यात आले आणि अद्यापही ते सुरूच आहेत. पण सरकार मात्र डळमळीत न होता अधिक भक्कमच होत गेले.

कोणतेही नेतृत्व हे योग्य आणि स्वच्छ असले की त्याला तडे देण्यासाठी व्यूव्हरचना केली जाते. वैयक्तिक आरोप अथवा करून बदनामीचे सत्र सुरू केले जाते. पण उद्धव ठाकरे हे या सर्व कोणत्याही चौकटीत बसत नाहीत. म्हणूनच की काय माजी मंत्री संजय राठोड प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना राजधर्माची आठवण करून दिली . तर भाजपच्याच चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे हे संवेदनशील व्यक्ती असून आपणाला त्यांच्या बद्दल नितांत आदर आहे असे सांगत राठोड यांच्या राजीनाम्यासाठी ठाकरे हे अजिबात वेळ घालवणार नाहीत असे सांगत त्यांच्या संवेदनशीलतेला आव्हान दिले. सुधीर मुनगंटीवार यांनी तर आमचे मित्र हे सत्यवादी आहेत असे सांगत उद्धव यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.

उद्धव ठाकरे यांची स्वच्छ आणि संवेदनशील प्रतिमा हेच दोन मोठे अडथळे भाजपसमोर आहेत. त्यामुळेच कधी हिंदुत्ववादाची आठवण तर कधी संवेदनशीलपणाला आव्हान देणे हेच काम भाजपकडून करण्यात येत आहे. हे सरकार राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाचे असले तरी भाजपचा प्रथम क्रमांकाचा शत्रू हे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच राहिले आहेत. वास्तविक विभिन्न विचारसरणीला सातत्याने विरोध करताना वर्षोनुवर्षे एकमेकांना पाण्यात पाहणारे भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यातील शत्रुत्व केव्हाच हद्दपार झाले असून भाजपसमोर केवळ एकच पर्याय उरला आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे यांचे प्रतिमाभंजन करणे.

आगामी मुंबई महापालिका निवडणूक आणि उद्धव ठाकरे यांची राजकीय कोंडी करण्यासाठी मग त्यांच्या सहकाऱ्यांची प्रकरणे बाहेर काढण्याचे काम सध्या सुरू आहे. जसे की राठोड प्रकरणात केवळ ठाकरे हेच लक्ष्य करण्यात आले. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या हवाल्यानुसार भविष्यात शिवसेनेच्याच काही नेत्यांची जुनी प्रकरणे बाहेर काढून उद्धव यांच्यामागे ‘किटकिट’ लावण्याचा प्लॅन शिजत आहे. यामुळे राज्य सरकार अडचणीत येईलच तसेच मुंबई महापालिका निवडणुकीत त्याचा सेनेला फटका बसेल असा भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांचा व्होरा आहे. तसेच शिवसेनेत अंतर्गत काही कुरबुरी लावून देता येतील का यासाठीही प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यामुळेच विधानसभेत सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांना तुमच्याकडे मुख्यमंत्रीपदाचे मटेरिअल आहे असे सांगणे म्हणजे काही मासे गळाला लावण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे.

राजकारणातील स्वच्छ आणि संवेदनशील प्रतिमा टिकविण्यात उद्धव ठाकरे हे यशस्वी ठरले आहेत. आक्रमक शिवसेनेचे हे संयमी आणि विचारी धोरण लोकांनाही भावत आहे. त्यालाच तडे देण्यासाठी मग प्रतिमाभंजन करण्याचा भाजपचा प्रयत्न यशस्वी होतो की उद्धव ठाकरे त्याचा आपल्याकडील बाणाने वेध घेतात हे लवकरच समजेल.

अतुल माने, मुक्त पत्रकार आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0