हिंदुत्वाला धोका नवहिंदुंपासून – उद्धव

हिंदुत्वाला धोका नवहिंदुंपासून – उद्धव

हिंदूत्व धोक्यात आहे ते परक्यांपासून नाही तर ह्या नवहिंदूंपासून, असे म्हणत मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका क

धनुष्यबाण शिवसेनेचेच चिन्ह राहणारः उद्धव ठाकरे
कोरोनाकाळातील आश्वासक शिवसेना
ए लाव रे तो……!

हिंदूत्व धोक्यात आहे ते परक्यांपासून नाही तर ह्या नवहिंदूंपासून, असे म्हणत मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले, “माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली गेली, की या देशात हिंदूंत्वाला धोका आहे का. पण केंद्रीय गृहमंत्रालयाने उत्तर दिले, की हिंदूत्वाला धोका नाही. आता हिंदुत्व खऱ्या अर्थाने धोक्यात आहे, ते उपटसुंभ नवहिंदू जे उगवलेले आहे, त्यांच्यापासून धोका आहे. हिंदुत्वाची शिडी करून जे वर सत्तेत गेले आहेत ते सत्ता राखण्यासाठी इंग्रजांची निती वापरतील. त्यांचा हेतु साध्य होऊ देऊ नका, असे सांगतानाच मराठी माणसाची भक्कम एकजूट दाखवा आणि त्याचवेळी मराठी अमराठी हा भेद गाडून हिंदुत्व वाढवा.

उद्धव ठाकरे यांनी आज शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात भाजप, पंतप्रधान मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजच्या विजयादशमी मेळाव्यात मोहन भागवत यांनी केलेल्या भाषणावरून देखील सूचक वक्तव्य केले.

दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा यावर्षी षण्मुखानंद सभागृहात घेण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते, मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, “हल्ली काय झालेलं आहे केवळ बोलत जायचं. टीका करायची, विचारांचा पत्ता नाही. कशात काही नाही, एकाचा पायपोस दुसऱ्यास नाही. आज देखील मोहन भागवातांनी सांगितलं आहे की, हिंदुत्व म्हणजे काय? आणि हे खरंय त्यात काही चूक नाही. की या आपल्या देशात सर्वांचे पूर्वज हे एक होते. पण या देशापुरता जरी विचार करायचा झाला, तर सर्वांचे पूर्वज एक होते, आहेत हे जर आपल्याला मान्य असेल. तर मग विरोधी पक्षांचे पूर्वज काय परग्रहांवरून आले होते का? आता जे शेतकरी आंदोलन करत आहेत, त्यांचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते का? लखीमपूरला जे शेतकरी दिवसा ढवळ्या मारले, त्यांचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते? हा जो काही विचार आहे की आपण सर्व एक आहोत, हिंदुत्व म्हणजे काय आम्ही दुसऱ्यांचा द्वेष, मत्सर करत नाही. पण हे जे दिवसा ढवळ्या दिसते आहे, हे मोहनजी तुम्हाला तरी पटतंय का? तुम्हाला तरी मान्य आहे का?

मोहन भागवत याना उद्देशून ठाकरे म्हणाले, “तुमच्या विचारधारेतून तुमच्या वर्गातून जे आता लोक बाहेर पडलेले  आहेत आणि सत्ता काबीज करून बसलेले आहेत, त्यांनाही शिकवणी परत लावा जरा एकदा. सध्या जो काय सगळा खेळ सुरू आहे, वाटेल ते करायचं पण मला सत्ता पाहिजे. व्यसनाधिनता हा जो एक प्रकार आहे, अंमली पदार्थ हा एक वेगळा भाग झाला. त्याचा तर नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचं व्यसन हा देखील एक अंमली प्रकारच आहे.”

नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता ठाकरे म्हणाले, “अगदी बाजार उद्यान समित्यांपासून लोकसभेपर्यंत सर्वकाही माझ्याच अंमलाखाली पाहिजे, हा देखील एक अंमली प्रकारच आहे. या अंमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार? कोणी करायचा? आज ज्या पद्धतीने एक-एक प्रकार सुरू आहेत, काय वाटेल ते करा. आता पुढील महिन्यात तुमच्या आशीर्वादातून या आपल्या हक्काच्या सरकारला दोन वर्षे पूर्ण होतील. अनेक प्रयत्न केले. फोडण्याचे प्रयत्न केले, पाडण्याचे प्रयत्न केले. मी तर आज देखील सांगतो हिंमत असेल तर पाडून दाखवा, आजपण सांगतो मी. पण तसं करून पडत नाही. मग आपल्याकडे जसा छापा की काटा खेळ आहे, तसा छापा टाकायचा आणि काटा काढायचा. छापा की काटा? मग तिकडून विचारतात टाकला छापा, काढला काटा? ही थेरं जास्त चालू नाही शकत.” असं देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी बोलून दाखवलं.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका करताना ठाकरे म्हणाले, “मला तर सोडाच, पण माझ्या सर्व जनतेला देखील मी मुख्यमंत्री आहे असं वाटता कामा नये. मी तुमच्या घरातला कुणी तरी आहे तुमचा भाऊ आहे.असं वाटो ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आहे.”

ठाकरे पुढे म्हणाले, “काही जणांना असं वाटत होते, की मी पुन्हा येईन.. ते आता बोलत आहेत, मी गेलोच नाही, गेलोच नाही. आईने शिकवलं मला. ही पदं काय आहेत? सत्ता तरी काय आहे? पदं येतील जातील, परत येतील. सत्ता येईल-जाईल, परत येईल. ती आली तरी पुन्हा येईल. पण कधीही मी कुणी आहे, अहमपणा तुझ्या डोक्यात जाऊ देऊ नकोस. ज्या क्षणी तुझ्या डोक्यात हवा जाईल, त्या क्षणी तू संपलास. नेहमी जनतेशी नम्र रहा. तो प्रयत्न मी माझा करत असतो, नम्रपणाने आशीर्वाद घेत असतो.

तुम्ही चिरकत रहा पण माझा वाडा चिरेबंद आहे, असे म्हणत मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. काही जण माझे भाषण संपण्याची वाट बघत आहेत. भाषण संपले की ते चिरकायला तयार आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: