ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा राजीनामा

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (५८) यांनी गुरुवारी हुजूर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. जॉन्सन यांच्याविरोधात पक्षातल्या जवळपास ५० खासदारांनी बंड

बोरिस जॉन्सन यांच्या विजयाचा अर्थ काय?
खोटारडे पंतप्रधान
जॉन्सन यांच्या जहाजाच्या तळात भोक पडलंय!

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन (५८) यांनी गुरुवारी हुजूर पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला. जॉन्सन यांच्याविरोधात पक्षातल्या जवळपास ५० खासदारांनी बंड केल्याने त्यांच्यापुढे पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याशिवाय पर्याय नव्हता. नवा नेता निवडीपर्यंत ज़ॉन्सन ब्रिटनचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कायम राहतील.

बोरिस जॉन्सन हे तीन वर्षे ब्रिटनचे पंतप्रधान होते. त्यांच्या ब्रेक्झिट समर्थनामुळे ते ब्रिटनमध्ये लोकप्रिय होते. पण त्यांची लोकप्रियता कालानुक्रमे कमी होत गेली.

काही महिन्यांपूर्वी संसद सदस्य क्रिन्स पिंचर यांना डेप्युटी चीफ व्हीपपदी नेमल्यानंतर जॉन्सन अडचणीत आले होते. त्यांच्या या निर्णयाला पक्षातील सदस्य व मंत्रिमंडळातील बहुसंख्य सदस्यांचा विरोध होता. हा विरोध जॉन्सन यांनी मान्य केला व आपली चूक झाल्याची कबुली दिली होती. या दरम्यान गेल्या ३० जूनला ‘द सन’ या वृत्तपत्राने क्रिन्स पिंचर यांच्या समलैंगिक वर्तनासंदर्भात एक बातमी प्रसिद्ध केली. या बातमीत पिंचर यांनी लंडनमधील एका प्रायव्हेट क्लबमध्ये दोन पुरुषांना स्पर्श केल्याचे खुलासे होते. या वृत्तानंतर पिंचर यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर ब्रिटनच्या प्रसार माध्यमांमध्ये पिंचर यांच्या कथित लैंगिक दुर्व्यवहाराची कमीत कमी ६ प्रकरणे प्रसिद्ध झाली, त्याने बोरिस जॉन्सन यांची डोकेदुखी वाढली.

पिंचर यांना या प्रकरणी हुजूर पक्षाने निलंबित केले. त्यावर पिंचर यांनी माफी मागत आपण सर्व चौकशीला सामोरे जाऊ असे आश्वासन दिले. आपण वैद्यकीय उपचार घेत असल्याचेही त्यांनी जनतेला सांगितले.

पिंचर यांच्या सेक्स स्कँडलमुळे जॉन्सन यांच्यावर टीका होऊ लागली. जॉन्सन यांनी आपल्याला पिंचर यांच्या नियुक्तीवेळी त्यांच्या वरच्या लैंगिक आरोपाची माहिती नव्हती असे प्रसार माध्यमांपुढे स्पष्ट केले. जॉन्सन यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनीही हीच भूमिका प्रसार माध्यमांना सांगितली.

पण ४ जुलैला बीबीसी या वृत्तवाहिनीने २०१९-२० या काळात पिंचर यांच्याविरोधातील एक तक्रार जॉन्सन यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे वृत्त दिले. या वेळी पिंचर हे परराष्ट्रमंत्री होते. या वृत्ताला जॉन्सन यांनी दुजोरा दिला पण माझ्यापुढे पिंचर यांच्याविरोधात आलेली तक्रार तोंडी होती व त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.

पण पिंचर प्रकरणानेच बोरिस जॉन्सन यांना पक्षातील असंतुष्टांचा सामना करावा लागला व त्यात त्यांना राजीनामा द्यावा लागला.

दरम्यान, बोरिस जॉन्सन यांनी गुरुवारी आपल्या १० डाऊनिंग स्ट्रीट या निवासस्थानाबाहेर येऊन आपण पंतप्रधानपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. आपण राजीनामा द्यावा अशी हुजूर पक्षाची इच्छा असल्याने आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. नेतृत्व निवडीसंदर्भातील हुजूर पक्षाचे एक वेळापत्रक पुढील आठवड्यात येईल असेही जॉन्सन यांनी सांगितले.

बीबीसी व अन्य प्रसार माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार येत्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत जॉन्सन पंतप्रधानपदावर राहतील व त्यानंतर नवा पंतप्रधान सूत्रे घेईल, असे सांगण्यात येत आहे.

हुजूर पक्षाला ब्रिटनच्या संसदेत बहुमत आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: