युद्धास कारण की…

युद्धास कारण की…

मुळातच रशियाला युक्रेनवर कब्जा करण्यास कसलेही स्वारस्य नसले तरी त्याने नाटोमध्ये सहभागी होऊ नये हीच मुख्य अट आहे जी युक्रेनला मान्य नाही. या एकमेव कारणाने सध्या युद्धाचा आगडोंब उठला आहे.

नेपाळमध्ये मध्यावधी निवडणुका
‘भारत हल्ला करेल या भीतीने पाक लष्करप्रमुख घाबरले’
वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जूनमध्ये

रशियाने अखेर युक्रेनच्या विरोधात लष्करी कारवाईचे पाऊल उचलले असल्याने ही तिसऱ्या महायुद्धाची नांदी तर नाही ना अशी शंका सर्वांच्या मनात असली तरी असे म्हणणे या क्षणी घाईचे ठरू शकते. कारण नाटोचे सैनिक आणि रशियाचे लष्कर यांच्यामध्ये युद्ध सुरू होत नाही तो पर्यंत हा मुद्दा बाजूला पडू शकतो. नाटोचे सैनिक अद्यापही युक्रेनच्या मदतीला धावले नाहीत हे येथे लक्षात घेतले पाहिजे. मुळातच रशियाला युक्रेनवर कब्जा करण्यास कसलेही स्वारस्य नसले तरी त्याने नाटोमध्ये सहभागी होऊ नये हीच मुख्य अट आहे जी युक्रेनला मान्य नाही. या एकमेव कारणाने सध्या युद्धाचा आगडोंब उठला आहे.

रशियानं युक्रेनच्या विरोधात उचललेली पावलं आणि त्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक चर्चांनी जोर आला आहे. रशियाची विधानं आणि कृत्यं यामुळं पाश्चात्य देशांना निर्बंध आणि इतर गोष्टींचा मार्ग अवलंबावा लागला आहे. सध्या रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर जी स्थिती आहे ती कितीही वाईट असली तरी नाटो आणि रशियाच्या लष्करामध्ये थेट संघर्ष पाहायला मिळालेला नाही ही यामधील एक समाधानाची तूर्तास तरी बाजू आहे. रशियाने गुरुवारी सकाळी अखेर युक्रेनवर आक्रमण केले. रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी सरकारी टीव्हीवर देशाला उद्देशून एक भाषण केले. या भाषणात त्यांनी युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास या प्रदेशावर रशियाच्या लष्कराकडून कारवाई सुरू झाल्याचे जाहीर केले.

२०१४ पासून डोनबासमधील काही भागावर रशियाचे समर्थन असणाऱ्या बंडखोर गटाचा कब्जा आहे. पण पुतीन यांनी आपल्या भाषणात युक्रेनचा कोणताही प्रदेश ताब्यात घेणार नाही असेही स्पष्ट केले. आमची लष्करी कारवाई ही स्वसंरक्षणासाठी असून कोणतीही परदेशी शक्ती या प्रकरणात हस्तक्षेप करत असल्याचे आढळल्यास त्यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी युक्रेनच्या सैन्याने आपली शस्त्रास्त्रे खाली टाकावीत व सैन्य माघारी बोलवावे अशी धमकी दिली होती. पण युक्रेनने आपणही कोणत्याही परिस्थितीशी लढण्यास सज्ज असल्याचे जाहीर केल्याने रशिया-युक्रेन युद्ध अटळ ठरले. युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर जेलेन्स्की यांनीही आपल्या देशवासियांना आवाहन करताना युक्रेन रशियाला जोरदार प्रत्युत्तर देईल अशी धमकी दिली. त्यांनी देशात ‘मार्शल लॉ’ही पुकारला. काही क्षेपणास्त्र रशियाच्या लष्करी तळांवर, लष्करी विमानतळांवरही डागली गेल्याचे जेलेन्स्की यांनी सांगितले. पण रशियाच्या संरक्षण खात्याने युक्रेनचे हे दावे फेटाळले.
पण रशियाच्या युक्रेनची राजधानी कीव्ह व क्रोमातोर्स्कवर हल्ले केले. या ठिकाणी बॉम्बस्फोटाचे आवाज ऐकायला मिळाले. त्याचबरोबर युक्रेनचे लष्करी तळ, निप्रो व खार्कीव येथील लष्करी मुख्यालय, विमानतळ व लष्करी गोदामावर रशियाने हल्ले केले. रशियाचे सुमारे दोन लाख सैन्य युक्रेनच्या सीमेवर अनेक दिवसांपासून तैनात आहे. रशियाच्या रणगाड्यांनी युक्रेनच्या पूर्व, दक्षिण व उत्तर सीमा ओलांडल्या. रशियाच्या सैन्याची एक तुकडी बेलारुसमधून युक्रेनच्या उत्तरेकडील चेर्निहाइव भागात शिरली असल्याचा युक्रेनचा दावा आहे. बेलारुस हा रशियाचा मित्र देश आहे. रशियाचे सैन्य लुहान्स्क, खार्विक व क्रिमियाच्या खेरसन प्रदेशातही घुसले. पण प्रत्यक्षात, जेव्हा रशियानं युक्रेनवर आक्रमण करण्यासाठी सैन्य उभारणी करण्यास सुरुवात केली त्यावेळी अमेरिका आणि ब्रिटन यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनीही लगेचच काही प्रमाणात सुरक्षा सल्लागार आणि लष्करी प्रशिक्षक समोर आणले. ज्यावेळी अमेरिका आणि रशियाचे सैनिक एकमेकांवर गोळीबार सुरू करतील, त्यावेळी ते जागतिक किंवा महायुद्ध असेल, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन या आधी एकदा म्हणाले होते. कोणत्याही परिस्थितीत युक्रेनमध्ये अमेरिकेचं लष्कर तैनात करणार नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. मात्र, पाश्चिमात्य देशांच्या नेत्यांना अजूनही ही भीती आहे की, रशिया संपूर्ण युक्रेनवर हल्ला करण्याच्या तयारीत आहे.

नाटोच्या कलम पाच नुसार कोणत्याही सदस्य राष्ट्रावर हल्ला झाल्यास, संपूर्ण पाश्चिमात्य लष्करी आघाडीला त्याच्या संरक्षणासाठी येणं अनिवार्य आहे. युक्रेननं या पूर्वीही नाटोमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली असली, तरी अद्याप तो नाटोचा सदस्य नाही. आणि रशियाला नेमके तेच नको आहे. कारण युक्रेन जर नाटोचा सदस्य झाला तर आपसूकच नाटोच्या फौजा या युक्रेनमध्ये स्थिरावतील आणि हे रशियासाठी धोकादायक ठरू शकते. हा धोका लक्षात घेऊनच पुतीन यांनी दबाव वाढविण्यासाठी आता युक्रेन वरच हल्लाबोल केला. हे करताना त्यांनी नाटो आणि सदस्य देशांना यामध्ये हस्तक्षेप न करण्याचा इशारा देताना प्रसंगी युद्धाची धमकीही दिली आहे. त्यामुळे नाटो आणि अमेरिका द्विधा मनस्थितीत पडले आहेत. पुतीन यांना युक्रेनवर कब्जा करायचा नाही हे येथे स्पष्ट करणे गरजेचे आहे पण युक्रेनने नाटोचे सदस्यपद स्वीकारण्यास त्यांचा विरोध आहे. आणि हीच रशियाची पहिली अट आहे जी युक्रेनला मान्य नसल्याने हा कठीण प्रसंग उभा राहिला आहे.

इस्टोनिया, लाटव्हिया, लिथुआनिया किंवा पोलंड असे देश हे एकेकाळी सोव्हिएत रशियाच्या काळात मॉस्कोच्या कक्षेत होते. ते सर्व आता नाटोचे सदस्य आहेत. रशियाचं सैन्य हे युक्रेनपर्यंत येऊन थांबणार नाही तर ते पारंपरिक रशियन अल्पसंख्याकांना मदत करण्याच्या नावाने काही तरी कारण पुढं करून बाल्टिकमध्येही आक्रमण करतील, अशी भीती या सर्वांना आहे. त्यामुळं नाटोनं नुकतीच पूर्व युरोपातील सदस्यांना खबरदारी म्हणून काही मदत पाठवली आहे. पण जोपर्यंत रशिया आणि नाटोमध्ये थेट संघर्ष होत नाही, तोपर्यंत हा संघर्ष कितीही वाढला तरी पूर्णपणे जागतिक युद्धाची भीती वाटण्याचं अजिबात कारण नाही.

रशिया आणि अमेरिका या दोघांकडे असलेली एकूण हल्ला करण्यायोग्य अशा आण्विक शस्त्रांची संख्या ही जवळपास ८ हजारापेक्षा अधिक आहे, रशियाचं लष्कर नेमकं किती आतपर्यंत शिरकाव करणार आहे, हे केवळ रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन आणि त्यांच्या निकटवर्तीय वर्तुळातील मंडळींनाच माहिती आहे. जोपर्यंत रशियाचं आक्रमणासाठी सज्ज असलेलं लष्कर हे सीमेवर तैनात आहे, तोपर्यंत युक्रेनची राजधानी असलेले कीव्ह आणि इतर शहरंही हल्ल्यापासून सुरक्षित असू शकणार नाहीत. मात्र, रशियानं नाटोच्या सदस्य देशासाठी धोका निर्माण केला तर नाटो आणि पाश्चिमात्य राष्ट्रांसाठी ही धोक्याची घंटा असेल.

यूक्रेनबाबत आपण केलेल्या कृतींमध्ये कुणीही हस्तक्षेप केल्यास त्याला इतिहासात कधीही पाहिले नसतील असे परिणाम भोगावे लागतील असा इशाराही पुतिन यांनी इतर राष्ट्रांना दिला आहे. याच धमकीमुळे परिस्थिती तणावाची झाली असली, तरी युरोपमध्ये मोठे युद्ध भडकण्याच्या भीतीने कुणाही देशाने स्वत:हून लष्करी हालचाल करण्याचे आणि युक्रेनचे संरक्षण करण्याचे आश्वासन अजूनही दिलेले नाही. रशियाने घेतलेल्या या भूमिकेमुळे रशियावर ब्रिटनने निर्बंध लावले आहेत. तर अमेरिका आणि जर्मनीनं आणखी पुढं जात पावलं उचलली आहेत. उदाहरण  द्यायचे झाल्यास त्यांनी रशियाच्या मोठ्या प्रमाणातील नॉर्ड स्ट्रिम 2 या गॅस पाइपलाइन प्रकल्पाची मंजुरी रखडवली आहे. त्यामुळे रशिया याला कोणत्या ना कोणत्या प्रकारे उत्तर नक्की देईल हे पाहावे लागेल. रशियातील पाश्चिमात्य देशांच्या व्यवसायावर त्याचा काही प्रमाणात परिणाम होईल, वास्तविक रशियाला युक्रेनला बेलारुससारखं त्यांची मालकी असणारे राष्ट्र बनवायचे आहे, ज्याला नाटो आणि युरोपीय देशांचा विरोध आहे ही यामधील एक महत्त्वाची बाजू आहे.
अनेक वर्षांपासून घसरत चाललेल्या रशिया बरोबरच्या संबंधामुळे आता पाश्चिमात्य देश आणि रशिया यांच्यात परस्परांवर विश्वासाचं प्रमाण हे जवळपास संपलं आहे. त्यातच रशिया-युक्रेन संघर्षाची व्याप्ती वाढताना दिसत आहे. अशावेळी जग पुन्हा एकदा दोन गटांमध्ये विभागू शकते असा अंदाज व्यक्त होत आहे. अमेरिका आणि युरोपीयन देशांनी उघडपणे युक्रेनची बाजू घेतली आहे. तर सद्यस्थितीमध्ये रशियाबरोबर चीन, क्रोएशिया, पाकिस्तान, बेलारूस, आणि भारताचा समावेश असल्याचे सांगितले जाते. चीनने युक्रेनला नाटोचे सदस्यत्व देण्यास या आधीच विरोध केला आहे.

इराण- इराक युद्धाप्रमाणे आगामी काही काळ रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध संघर्ष सुरूच राहील आणि त्याचा दाह सर्वाना भोगावा लागेल.

ओंकार माने हे आंतरराष्ट्रीय घडामोडीचे अभ्यासक आहेत.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: