भारत, जर्मनीसह अनेक देशातील राजदूत युक्रेनने हटवले

भारत, जर्मनीसह अनेक देशातील राजदूत युक्रेनने हटवले

कीव्हः भारतासमवेत काही देशांमध्ये नियुक्त केलेले आपले राजदूत युक्रेनने बरखास्त केले आहेत. युक्रेनच्या राष्ट्रपतींच्या वेबसाइटवर ही माहिती शनिवारी प्रसिद्ध करण्यात आली.

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेनने भारत, जर्मनी, झेक प्रजासत्ताक, नॉर्वे, हंगेरी येथील आपल्या राजदूतांना बरखास्त केले, त्यांच्या बरखास्तीमागचे कारण मात्र सरकारने जाहीर केलेले नाही.

दरम्यान, युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी रशियाविरोधात लढण्यासाठी आपल्या देशाला अधिक मदत मिळावी अशी मागणीही केली आहे.

द हिंदूने दिलेल्या बातमीनुसार युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा हे युरोपच्या राजनयिक वर्तुळात अत्यंत ज्येष्ठ समजले जातात, त्यांचा युरोप व भारत संबंधांत व्यापक अनुभव आहे. पोलिखा यांनी सरकारच्या निर्णयावर आश्चर्यही व्यक्त केलेले नाही. आम्ही या निर्णयाने हैराण किंवा निराश झालेलो नाही, कोणताही राजदूत ७ वर्षे दुसऱ्या देशात काम केल्याने मायदेशी जात असतो, काही निर्णय नेहमीचे प्रशासकीय असतात.

२०१४मध्ये रशियाने क्रिमियावर आक्रमण केले त्या दरम्यान युक्रेनने पोलिखा यांची भारतात राजदूत म्हणून नेमणूक केली होती. युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तेथील खारकीव्ह, कीव्ह, ल्वीव व अन्य शहरांमध्ये शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी अडकून पडले होते. या भारतीय विद्यार्थ्यांना माघारी बोलावण्याच्या प्रक्रियेत पोलिखा यांनी अमूल्य योगदान दिले होते.

मूळ वृत्त

COMMENTS