कोर्टाचा आदेश डावलून खलीदला हातकड्या

कोर्टाचा आदेश डावलून खलीदला हातकड्या

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता उमर खलीद याला 'हातकड्या किंवा बेड्या न घालता' न्यायालयापुढे हजर करण्याचा, न्यायालयाने नुक

वैश्विक लिंगभेद यादीः 156 देशात भारताचे स्थान 140
युक्रेनमध्ये अडकलेले २१९ विद्यार्थी मुंबईत परतले
जहांगिरपुरी दंगलीमागे भाजपचः आपचा आरोप

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता उमर खलीद याला ‘हातकड्या किंवा बेड्या न घालता’ न्यायालयापुढे हजर करण्याचा, न्यायालयाने नुकताच दिलेला आदेश धाब्यावर बसवून, खलीदला १७ फेब्रुवारी रोजी हातकड्या घालून पटियाला हाउस न्यायालयापुढे हजर करण्यात आले.

उमर खलीद आणि दुसरा आरोपी खलीद सैफी यांना हातकड्या घालून न्यायालयात हजर करण्याचा दिल्ली पोलिसांचा अर्ज दिल्लीतील न्यायालयाने गेल्या वर्षी फेटाळला होता. तसेच असा अर्ज का करण्यात आला याचे स्पष्टीकरण संबंधित पोलिस उपायुक्तांना मागण्यात आले आहे.  खलीदला दिल्ली दंगलींतील फिर्यादीच्या संदर्भात न्यायालयात हजर केले जात होते.

न्यायाधीश अमिताभ रावत यांच्या न्यायालयात खलीदला हातकड्या घालून हजर करण्यात आले असे निवेदन खलीदच्या वकिलांनी जारी केले आहे. न्यायाधीश रावत रजेवर असल्याने खलीदला न्यायाधिशांपुढे हजर करता आले नाही. खलीद व सैफी यांना हातकड्या किंवा बेड्या घालून न्यायालयापुढे हजर करण्याची परवानगी मागणारा दिल्ली पोलिसांचा अर्ज, अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनोद यादव यांनी, ६ मे २०२१ रोजी, स्पष्टपणे फेटाळला असताना, खलीदला हातकड्या कशा घालण्यात आला असा प्रश्न वकिलांनी केला आहे.

खलीदला हातकड्या का घातल्या असे विचारले असता, मुख्य महानगर दंडाधिकारी (सीएमएम) पंकज शर्मा यांच्या ७ एप्रिल, २०२१ या तारखेच्या आदेशानुसार, हातकड्या घालण्यात आल्याचे संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. न्यायाधिशांचा आदेश आपल्याकडे असून, तो वॉरंटला जोडला आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यावर खलीदला हातकड्या किंवा बेड्या घालू नये असा स्पष्ट आदेश मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांनीही १७ जानेवारी, २०२२ रोजी काढल्याचे वकिलांनी सांगितले.

कोविड-१९ साथीच्या पार्श्वभूमीवर खलीदला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयापुढे हजर करावे, असेही सीएमएम शर्मा यांनी याच आदेशात नमूद केले होते. साथीमुळे आलेले निर्बंध दूर झाल्यानंतर खलीदला न्यायालयापुढे ‘नेहमीच्या पद्धतीने, हातकड्या किंवा बेड्या न घालता’ हजर करावे असेही त्यात म्हटले होते. १७ जानेवारी रोजी दिलेल्या आदेशाची प्रत तुरुंग अधीक्षकांना पाठवावी अशी सूचनाही सीएमएम शर्मा यांनी केल्याचे खलीदचे वकील त्रिदीप पैस यांनी सांगितले.

हातकड्यांबाबत केलेला अर्ज नामंजूर

खलीदला हातकड्या न घालता न्यायालयापुढे हजर करण्याचा आदेश यापूर्वीही दिल्लीतील एका न्यायालयाने दिला होता. खलीद व सैफी ‘अतिधोकादायक कैदी’ आहेत असा दावा करून त्यांना हातकड्या घालण्याची परवानगी मागणारा अर्ज दिल्ली पोलिसांनी एप्रिल २०२१ मध्येही केला होता. अतिरिक्त सत्र न्यायाधीश यादव यांनी हा पोलिसांच्या दाव्यात कोणतीही गुणवत्ता नाही असे सांगत, हा अर्ज फेटाळला होता.

दोन्ही आरोपींना आपल्यापुढे प्रलंबित खटल्यामध्ये यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे आणि अन्य न्यायालयापुढे दुसरा खटला चालू आहे, याची नोंद न्यायालयाने घेतली होती. “दिल्ली पोलिस खात्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अर्जदारांच्या जामीन आदेशांबद्दल माहिती असणार असे गृहीत धरले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अशी परवानगी मागण्याचे कोणतेही कारण अर्जामध्ये दिसत नाही,” असे अतिरिक्त सत्र न्यायाधीश यादव म्हणाले होते.

याशिवाय या अर्जावर तीव्र आक्षेप घेत, डीसीपी (विशेष सेल) यांच्यासह अन्य काही पोलीस अधिकाऱ्यांनी हा अर्ज का दाखल झाला याचे स्पष्टीकरण सादर करावे, असे निर्देशही न्यायाधीश यादव यांनी दिले होते.

मूळ वृत्त

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0