When looting starts, shooting starts... असं ट्रम्प म्हणतात, त्यामागील ते ‘सामान्य’ आणि ‘असामान्य’ असा भेदच अधोरेखित करत असतात. ‘ते’ आणि ‘आपण’ अशी सत्ताधाऱ्यांची भाषा त्यांच्या समर्थकांमध्ये हीच भावना निर्माण करते.
काही माणसे असामान्य असतात तर काहीजण अगदीच
अतिसामान्य असतात .
असामान्यांना
सामान्यांचे रक्त वाहाण्याचा, त्यांचे मुडदे
ओलांडून पुढे जाण्याचा जणू निसर्गदत्त अधिकारच असतो.’
पश्चातापाच्या अग्नीत जळत असलेला ‘क्राईम अँड पनिशमेंट’ या कादंबरीचा नायक रोद्या (रस्कोलनिकोव्ह) हा स्थानिक वृत्तपत्रात ‘असामान्य’ आणि ‘अतिसामान्य’ यावर आपल्या विमनस्क अवस्थेत लेख लिहितो. त्याच्या हातून दोन गरीब, दुबळ्या वृद्ध जीवांची हत्या झालेली असते. तो पकडला गेलेला नसला तरी पण त्याच्या सद्सद्विवेकबुद्धीला सतत अपराधाची टोचणी लागलेली असते. त्या म्हाताऱ्या जीवांची हत्या करते वेळी आपली पण हत्या झाली, असे त्याला कायम वाटत असतं. आपण ‘अतिसामान्य’ आहोत. ‘असामान्य’ लोकांसारखे निर्ढावलेले, निर्लज्ज नाही, हे त्याला कळून चुकते. आपल्या या ‘दयनीय’ स्वरूपाला सामोरे जाताना मेंदूच्या चिंधड्या उडालेल्या असतात..
फ्योदर दस्तयेवस्कीच्या या कादंबरीचा गाभा गुन्ह्यानंतरचा पश्चाताप हा आहे. रोद्याच्या लेखात या ‘असामान्य’ लोकांत त्याने नेपोलियनचा उल्लेख केला असतो.
केवळ सत्तेची अभिलाषा नेपोलियनला, हुकुमशहा अथवा लोकनियुक्त हुकुमशाह यांना निष्पाप लोकांचे बळी घ्यायला परवानगी देते. सत्तेच्या या मग्रुरीतून अतिसामान्यांच्या खुनाचा परवाना मिळाल्यामुळे, त्यांना असे खून करताना काही वाटत नसत. असाच प्रकार आपल्याला जॉर्ज फ्लॉयडच्या केसमध्ये दिसतो. वर्णद्वेष, पूर्वग्रह यामुळे झालेल्या एकतर्फी अन्यायाच्या घटना सारख्या होत आहेत.
धर्म, वर्ण, वंश, जात हे डोक्यात घेऊन व्यक्तीकडे बघण्याचा दृष्टिकोन कधी बदलणार? साध्या व्यक्तीचा निकोपपणे स्वीकार आपण करत नाही तर एखाद्या आरोपीकडे किती पूर्वग्रह दूषित नजरेने बघत असू?
असाच एक प्रसंग २०१५ ला अमेरिकेत घडला होता. अहमद मोहम्मद, वय १४ याला कोणतीही शहानिशा न करता अमेरिकन पोलिसांनी बेड्या घातल्या होत्या. कारण त्याने घरी एक डिजिटल घड्याळ केले होते आणि आपल्या शिक्षकांना दाखवण्यासाठी शाळेत नेले. वर्गात टिक..टिक असा बारीक आवाज कशाचा येतो आहे म्हणून शिक्षकाने चौकशी केली तर याने आपले घड्याळ दाखविले. शिक्षकाला तो बॉम्ब वाटला. त्याने शाळेच्या प्रशासनाला कळवले. शाळेने पोलिसांना. पोलिसांनी येऊन त्याला बेड्या घातल्या. त्याला गजाआड टाकले. दोन दिवस कसून चौकशीअंती समजले ते साधं घड्याळ आहे. हा सर्व प्रकार केवळ त्याच्या नावामुळे आणि वर्णामुळे झाला. हे अधिक भीषण होते. काही ‘असामान्य’ लोकांनी अमेरिकेत शाळेत हिंसाचाराच्या घटना होत असतात म्हणून त्या समजातून ही कारवाई झाली, असे सांगून या कृतीचं समर्थन केलं. त्यावर प्रश्न असा उपस्थित केला गेला की प्रशासनाने मग शाळेची बिल्डींग रिकामी करायला हवी होती. तो बॉम्ब वाटत असल्यास तो निकामी करणाऱ्या यंत्रणेला बोलावायला हवं होतं. तसं न करता पोलिसांनी येऊन अहमदला बेड्या घातल्या. या सर्व गोंधळात अहमदची मनस्थिती काय असेल? शिक्षकांची शाबासकी मिळण्याऐवजी जेलमध्ये जावं लागल. एक अतिशय हुशार आणि विज्ञानात रुची असलेला मुलाला ‘दहशतवादी’ ठरवण्यात आलं. त्याच्याशी पोलीस अत्यंत कठोरपणे वागले. त्याच्या अटकेनंतर २४ तासांत १२ लाखांहून अधिक नागरिकांनी त्याच्या अटकेचा निषेध नोंदवला. त्याच्या समर्थनासाठी चळवळ सुरू झाली. पोलिसांच्या या अन्यायामुळे त्याच्या मनावर झालेल्या आघाताबद्दलची जाणीव ठेवून अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी त्याला व्हाइट हाऊसमध्ये बोलावले. गुगलने त्यांच्या विज्ञान जत्रेत बोलावून त्याचा सत्कार केला. ट्विटर, फेसबुक, रेडिट यांनी त्याला स्पेशल ट्रेनी म्हणून घेतले. समाजमाध्यमांनी त्यावेळी घेतलेल्या भूमिकेमुळे त्याला न्याय मिळाला असला तरी खरा प्रश्न तसाच राहिला.
त्यावर When looting starts, shooting starts… असं ट्रम्प म्हणतात, त्यामागील ते ‘सामान्य’ आणि ‘असामान्य’ असा भेदच अधोरेखित करत असतात. ‘ते’ आणि ‘आपण’ अशी सत्ताधाऱ्यांची भाषा त्यांच्या समर्थकांमध्ये हीच भावना निर्माण करते.
माणसाचे जागृत मनाचे दर्शन म्हणजे वर्तन. हे वर्तन सामाजिक पातळीवर कसं व्यक्त होईल, यावर समाजाची सुदृढता अवलंबून आहे. सुप्त मन जगताना काय टिपत असत हे समजणं अवघड. त्यामुळे समाजजीवनाचे निकोप अनुभव जास्तीत जास्त येणं जरुरीचे. कोणत्याही घटनेकडे विवेकी दृष्टीने बघणं जरुरीचं. कारण कोणत्याही घटनेबाबत कोणीच सुनिश्चित काही सांगू शकत नाही, नेमकं त्यावेळी काय घडलं ? घडलेल्या घटनेचे फक्त आडाखे बांधता येतात. घटनेकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन भिन्न. आजकाल जो तो न्यायाधीश झालेला आहे.. वेगवेगळ्या मतप्रवाहाची लाट येते. सद्सद्विवेकबुद्धीच्या अनेक छटा बघायला मिळतात. यामध्ये घटनेचे गांभीर्य कमी कमी होत जातं.
‘एक रुका हुआ फैसला’ (Twelve Angry Men) या सिनेमाचा विषय आरोपीकडे दूषित, पूर्वग्रहाने बघणाऱ्या ११ ज्युरी व एक जो या खटल्याबद्दल साशंक आहे, यांच्यातील चर्चा वजा वादविवाद यावर आधारित आहे.
पूर्वी समाजातील विविध स्तरातील, समाजातील लोकांना घेऊन ज्युरी पॅनल बनवले जायचे. खटल्याची सुनावणी संपल्यावर, हे १२ जण एका खोलीत खटल्याची चर्चा करून एकमताने निर्णय देत असे. कोणत्याही निष्कर्षांवर आल्याशिवाय ती खोली सोडण्याची परवानगी नसायची. एका १९ वर्षाच्या, झोपडपट्टीतल्या मुलावर वडिलांचा खून करण्याचा आरोप असतो. दर्शनीय पुरावे मुलाला अपराधी ठरवायला पुरेसे असतात. निर्णय एकदम सोपा असतो, आरोपी दोषी ! पण एकाच्या साशंकतेमुळे न जाणवणारे मुद्दे समोर यायला लागतात आणि गंभीर वळणे येत राहातात. त्यातील एक स्वतःला ‘मी’ म्हणजे ‘प्रॅक्टिकल’ व ‘तर्कबुद्धीने’ वागणारा असे समजत असतो, पण जेव्हा बहुमत आरोपी निर्दोषकडे जातं तेव्हा त्याचा राग अनावर होतो. तो संतापाने जे बरळतो ते समाजमनात असलेल्या कलुषित विचारप्रवाहाचा पगडा किती खोलपर्यंत पोचला आहे, त्याचा नमुना आहे.
तो म्हणतो, ‘मी जे सांगतो आहे ती काळ्या दगडावरची रेघ आहे. ही लोक खोटारडे, घाणेरडे, हलकट असतात. ती लोक आपल्यापेक्षा वेगळी आहेत. त्यांच विचार करणं, वागणं, जगणं आपल्यापेक्षा वेगळं असतं. जगातली सर्व वाईट गोष्टी, दुर्गंधी यांच्या आत असते. ते दारू पितात, खून करतात, वेश्यागमन करतात.. त्यांच्यासाठी हे नेहमीच आहे. सर्व साले जनावरांसारखे जन्माला येतात. किडेमकोड्यांप्रमाणे याची संख्या वाढत चाललेली आहे. ते आपल्यावर राज्य करू इच्छितात. आपल्याला नष्ट करू बघतात. अरे मूर्ख बुद्धिमान लोकांनो! तुम्हाला माझं बोलणं समजत नाहीये.. ते आपले शत्रू आहेत. त्या सापांच्या पिल्लावळीपैकी एकाची मान आपल्या हातात आहे, ती आवळायला हवी. सुधारणा काय नंतर होत राहील. आणि कायदा? कायदाचं काय आहे? त्याच नाक मेणाचं
आहे, जे हवं तसं वळवता येत.’
त्याच्या अशा बोलण्यामुळे एका समतोल विचार करणाऱ्या ज्यूरीचा तटस्थपणा गळून पडतो आणि तो बडबड करणाऱ्या ज्युरीची कॉलर पडकून, त्याला आपले दळभद्री बोलणं ताबडतोब आवरत घेण्यासाठी दम भरतो. एक ज्युरी म्हणतो, ‘फार अवघड असते, अशा केसमधे आपले पूर्वग्रह आणि वैयक्तिक कारणं वेगळे ठेवणे, त्यामुळे खरी परिस्थिती समजून घेण्याचा मार्ग बंद होतो.’
यात ज्याने साशंकता व्यक्त केली असते तो आर्किटेक्ट दाखवला आहे. एखाद्या प्लॉटकडे बघताना जसा चौफेर विचार करून, सर्व शक्यता लक्षात घेऊन त्याचं डिझाइन बनवले जाते. तसेच तो त्या खटल्याकडे बघत जातो. सुरवातीला इतर पात्रांच्या स्वभावाची झलक दिसत असली तरी त्यांच्या वर्तनाचा उलगडा हळूहळू होत राहतो. प्रत्येकाची वेगळी बाजू दिसायला लागते. ती चांगली आणि वाईट दोन्ही स्वरूपाची असते. त्यांच्या अंधाऱ्या मनाचे कोपरे जसजसे प्रकाशित होत जातात, तसे अंतस्थ हेतूंचा बोध होतो. त्यातील काही ‘असामान्यांची’ हीन मानसिकता दिसायला लागते. त्यांचे अहंगंड, न्यूनगंडाने ग्रासलेलं विद्रुप स्वरूप समोर येतं.
अशाच एका ‘असामान्य’ समजणाऱ्या वर्गाच्या एका सरपंचाच्या घृणास्पद कृतीची बातमी वाचून श्याम बेनेगल यांनी ‘समर’ नावाचा सिनेमा केला होता. १९९२ साली बुंदेलखंडमधल्या सवर्ण सरपंचाने गावातल्या दलितावर भरचौकात लघवी केली. कारण त्या दलिताने काही हक्क मागितले होते. स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे झाली होती. तरीही अशी माणुसकीला काळिमा फासणारी घटना वाचून बेनेगल अस्वस्थ झाले. हा छुपा जातीयवाद जगासमोर आणायला हवा, असे वाटून त्यांनी सिनेमात सिनेमा अशी योजना केली. किशोर कदम यांनी त्या दलित व्यक्तीरेखा साकारली आहे. ती भूमिका करणारा किशोर हा खरा दलितचं असतो. मूळ कथानकाबरोबर शुटिंगमध्येही ‘असामान्य’ लोक व त्यांचा सुप्त जातीयवाद हे सिनेमाचे उपकथानक आहे. आपल्याला मिळत असलेल्या वागणुकीचा निषेध म्हणून सिनेमातील किशोर शेवटचा लघवीचा सीन शूट करायला नकार देतो. तेव्हा वैतागलेला दिग्दर्शक लेखकाला मनूस्मृती वाचून दुसरी कुठली वेगळी शिक्षा शोधायला सांगतो. तेव्हा लेखक एकापेक्षा एक अतिभयंकर शिक्षा सांगतो.. शेवट चित्रित न करता युनिट परत निघत. ‘असामान्यांचे’ बीभत्स दर्शन घडते.
डॅनियल गोलमन या मानसशास्त्रज्ञाने माणसाच्या अशा वागण्याबद्दल असं लिहिलं आहे की पूर्वीच्या काळापासून अनेक संकटांना तोंड देण्यासाठी माणसाचा मेंदू घडत गेला. त्यातून विचार करण्यापूर्वीच आपली कृती घडत गेली. येणारा बाण किंवा भाला चुकवणं किंवा रानटी जनावर आल्यावर पळ काढणं या गोष्टी त्या काळी अनेकदा कराव्या लागल्याने मेंदूची घडणही एका विशिष्ट तऱ्हेनं होत गेली. अजूनही आपण गुहेत राहणाऱ्या माणसाचा पुरातन काळापासून चालत आलेलाच मेंदू घेऊन एकविसाव्या शतकात वावरतोय.
त्यामुळे ‘असामान्य’ व ‘अतिसामान्य’ यांच्यातील दरी वाढत जाते.
दस्तयेवस्कीचं एक वाक्य आहे.
‘The causes of human action are usually infinitely more complex than our subsequent explanation of them.’
देवयानी पेठकर, या शॉर्टफिल्म लेखिका व दिग्दर्शक आहेत.
COMMENTS