‘गिरणी कामगारच्या चळवळीतला एक सच्चा सखा सोबती’

‘गिरणी कामगारच्या चळवळीतला एक सच्चा सखा सोबती’

गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या निधनामुळे गिरणी कामगारांच्या संघर्षातील एक पर्व संपल्याची भावना निर्माण झाली आहे. १९८९ साली त्यांनी गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू केला. त्याच वेळी गिरणी कामगार संघर्ष समिती स्थापन झाली होती.

अमेरिका-तालिबान दोहा करार : एक अनपेक्षित वळण
उमर खलीदचा सरकारी पक्षावर वेळकाढूपणाचा आरोप
नर्मदेत बस कोसळून १२ जणांचा मृत्यू

मुंबईः गिरणी कामगार नेते दत्ता इस्वलकर यांच्या निधनामुळे गिरणी कामगारांच्या संघर्षातील एक पर्व संपल्याची भावना निर्माण झाली आहे. १९८९ साली त्यांनी गिरणी कामगारांच्या हक्कांसाठी संघर्ष सुरू केला. त्याच वेळी गिरणी कामगार संघर्ष समिती स्थापन झाली होती. त्यानंतर स्थापन झालेल्या गिरणी चाळ भाडेकरू संघर्ष कृती समितीचे इस्वलकर अध्यक्ष आणि किसन साळुंखे हे जनरल सेक्रेटरी होते. ७३ वर्षीय किसन साळुंखे यांनी द वायर मराठीला इस्वलकर यांच्यासोबतच्या काही आठवणी सांगितल्या.

ते म्हणाले की, माझी इस्वलकरांसोबतची पहिली भेट ‘गिरणगाव बचाव’ या नाऱ्याच्या निमित्ताने झाली. ते त्या काळात वेगवेगळ्या मिलच्या गेटवर गेट सभा घेत होते. मी त्यांना बावला मशीदच्या शेजारी असलेल्या मफतलाल मिलमध्ये भेटायला गेलो होतो. मी त्यांना म्हटले की फक्त गिरणगावमधील मिलच्या चाळी वाचवणं खूप गरजेचं  आहे. त्या काळात गिरण्यांच्या चाळी पाडत होते.

तेव्हा माझ्याकडे १६ मिलच्या संघटना होत्या. निवेदन आणि घोषणांवर आपलं काम होणार नाही तर एक मोठं आंदोलन उभारावं लागेल असं मत इस्वलकरांचं होतं. आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल. उपोषणं करावी लागतील. त्यानुसार मोठं आंदोलन उभारण्यात आलं. आम्ही गिरणी कामगारांचा एक खूप मोठा लढा उभारला. सरकारने आमच्या या ऐतिहासिक आंदोलनाला मान्यता देत २० मार्च २००० ला गिरण्यांच्या चाळींचा जीआर काढला. आमच्या अटी मान्य केल्या. आम्ही गिरणी कामगारांनाही घरं देण्याची मागणी केली होती. त्या संदर्भातलाही जीआर सरकारने काढला आणि आमच्या अटी मान्य केल्या. इस्वलकरांचं मार्गदर्शन आणि संघटनांची एकूण शक्ती या सर्वांमुळे  हे सर्व शक्य झालं. यासाठी आम्हाला तब्बल १५ वर्षं लढा द्यावा लागला. दिवस-दिवस उपोषणं केली.

त्यानंतर कायदाही अस्तित्वात आला. मागच्या अनेक वर्षांपासून आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांवर अनेक खटले चालू होते. अवघ्या सात-आठ महिन्यांपूर्वी ते निकाली निघाले आहेत. आम्ही हे खटले इस्वलकरांसोबत लढलो आणि त्यात यशस्वीही झालो. दत्ता इस्वलकर, विठ्ठल वाघ असे सगळे आम्ही अनेकदा एकत्र असायचो. मी त्यांच्यासोबत माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांना भेटलो आहे. त्याचबरोबर प्रवीण घाग, मेधा पाटकर यांच्यासोबतही मला इस्वलकरांमुळे भेटण्याची संधी मिळाली, असं साळुंखे म्हणाले.

इस्वलकरांच्या मृत्यूमुळे आपला एक जवळचा साथी गमावल्याची भावना साळुंखे यांच्या मनात होती. त्यांनी गिरणी कामगारांच्या चळवळीतला एक सच्चा सखा सोबती आज आपल्यातून गेला या शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली.

शब्दांकनः कोमल कुंभार

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0