बसपाची उ. प्रदेशातील आजपर्यंतची खराब कामगिरी

बसपाची उ. प्रदेशातील आजपर्यंतची खराब कामगिरी

लखनऊः उ. प्रदेशच्या राजकारणात तीन दशकाहून अधिक काळ प्रभावशाली पक्ष म्हणून बहुजन समाज पार्टीचे काम आहे पण नुकत्याच आटोपलेल्या २०२२च्या उ. प्रदेश विधानस

आरोपामुळे वानखेडेंचीच एनसीबीकडून चौकशी
टीआरपी घोटाळाः १४०० पानांचे आरोपपत्र
हाथरस तरुणीचा फोटो ट्विटरवर : भाजप आयटी सेलचा प्रताप

लखनऊः उ. प्रदेशच्या राजकारणात तीन दशकाहून अधिक काळ प्रभावशाली पक्ष म्हणून बहुजन समाज पार्टीचे काम आहे पण नुकत्याच आटोपलेल्या २०२२च्या उ. प्रदेश विधानसभा निवडणुकांत बसपाची आजपर्यंत सर्वाधिक निराशाजनक कामगिरी पाहावयास मिळाली. या पक्षाला राज्यातल्या एकूण ४०३ जागांपैकी केवळ १ जागा मिळाली आहे. जी जागा मिळाली आहे ती बलिया जिल्ह्यातील रसडा मतदारसंघाची असून येथून विजयी झालेले उमाशंकर सिंह यांना. सिंह यांचा हा सलग तिसरा विजय आहे. उमाशंकर सिंह हे येथील मातब्बर नेते समजले जातात. त्यांनी भाजपच्या गेल्या दोन लोकसभा व दोन विधानसभा निवडणुकांतील झंझावातात आपली जागा राखून ठेवली आहे.

जागेंचा हिशोब केला तर १९८९ नंतर बसपाची २०२२मधील कामगिरी अत्यंत निराशजनक म्हणावी लागेल. १९९१च्या विधानसभा निवडणुकांत बसपाने ३८६ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते, त्या वेळी त्यांना १२ जागा मिळाल्या. ही त्यांची दुसरी निवडणूक होती. बसपाला एकूण मते १२.८८ टक्के मिळाली होती. १९९३मध्ये त्यांना ११.१ टक्के व ६७ जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर मात्र झालेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकांत बसपाला सरासरी १९ टक्क्यापेक्षा कमी मते मिळालेली नाहीत.

१९९६च्या विधानसभा निवडणुकांत बसपाला १९.६ टक्के मते व ६७ जागा मिळाल्या होत्या. त्यांनी त्यावेळी काँग्रेससोबत आघाडी केली होती.

२००२मध्ये ४०१ जागा लढवलेल्या बसपाला २३.२ टक्के व ९८ जागा मिळाल्या होत्या. त्यांनी भाजपच्या पाठिंब्यावर सरकार बनवले होते.

२००७मध्ये बसपाने पूर्ण बहुमताने सरकार बनवले होते. त्यावेळी त्यांना ३०.४ टक्के मते व २०६ जागा मिळाल्या होत्या.

पूर्वी बसपाचा मतदार दलित वर्ग होता. त्यामुळे या पक्षावर दलितांचा पक्ष असा आरोप केला जात होता. पण २००७मध्ये त्यांनी उच्चवर्णियांना, ब्राह्मणांना सोबत घेत सोशल इंजिनिअरिंगची किमया दाखवत बहुमत मिळवले होते. उ. प्रदेशात २१ टक्के लोकसंख्या दलित समाजाची असून मायावतींनी त्या बळावर राज्यात ४ वेळा मुख्यमंत्रीपद भूषवले आहे, त्यातील एक टर्म त्यांनी पूर्ण बहुमत मिळवले होते. मायावतींच्या या यशानंतर त्या पंतप्रधानपदाच्या दावेदारही समजल्या जात होत्या.

बसपाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा सुमारे २० टक्के मतदार आजपर्यंत झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांत तुटलेला नाही. पण २०१४च्या लोकसभा निवडणुकांत १९.४ टक्के मते मिळूनही बसपाला एकही जागा मिळाली नव्हती. ही त्यांची सर्वात खराब कामगिरी समजली गेली. भाजपने दलित मतांमधील काही टक्का आपल्याकडे वळवला हे दिसून आले.

द वायरशी बोलताना काही राजकीय विश्लेषकांनी बसपाच्या कामगिरीबद्दल विश्लेषण केले. त्यांच्या मते जाटव जाती बसपाचे मतदार समजले जातात. उ. प्रदेशात २१ टक्के लोकसंख्या दलितांची असून त्यातील १२ ते १३ टक्के लोकसंख्या जाटव जातींची आहे. योगायोगाने २०२२ च्या विधानसभा निवडणुकांत बसपाच्या खात्यात १२ ते १३ टक्के मते आहेत. यावरून जाटव बसपाचे विश्वासू मतदार असल्याचे दिसून येते.

या निवडणुकांत जमिनीवर लढताना बसपा दिसली नाही. उलट काँग्रेससारखा पक्ष पाच वर्षे लढताना दिसला. त्या तुलनेत बसपाचे उमेदवार व कार्यकर्ते रस्त्यावर संघर्ष करताना दिसले नाहीत.

बसपाच्या अशा पवित्र्यामुळे त्यांच्यावर भाजपची बी टीम असल्याचा आरोप सुरू झाला. मायावती व पक्षातील काही नेत्यांकडे बेसुमार संपत्ती असल्याच्या मुद्द्यावरून केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव असल्याचे सांगितले जात होते. या आरोपावर बसपाचे नेते आपली बाजू सांगत होते. कोविडच्या महासाथीतही बसपा मौन बाळगून बसली होती.

एकूणात उ. प्रदेश विधानसभा निवडणुकांत बसपा मतदारापासून पूर्णपणे दुरावली होती, हे दिसून आले.

मूळ लेख

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0