गोरखपूरमध्ये आदित्यनाथ विरुद्ध चंद्रशेखर आझाद

गोरखपूरमध्ये आदित्यनाथ विरुद्ध चंद्रशेखर आझाद

नोएडाः भीम आर्मी व आझाद समाज पार्टी (कांशींराम)चे नेते चंद्रशेखर आझाद यांनी उ. प्रदेशचे मुख्यमंत्री व भाजपचे उ. प्रदेशमधील प्रमुख नेते योगी आदित्य नाथ यांच्याविरोधात गोरखपूर सदर येथून निवडणूक लढवण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा व कांशीराम यांची बहुजन हिताय व बहुजन सुखाय विचारसरणी पुढे नेण्यासाठी आझाद गोरखपूर सदर मतदारसंघातून आदित्य नाथ यांच्याविरोधात निवडणुकीस उभे राहात असल्याचे पत्रक भीम पार्टी व आझाद समाज पार्टीने काढले आहे. उ. प्रदेशात आझाद समाज पार्टी या पक्षाच्या नावाने निवडणूक लढवली जाणार आहे, असेही या पत्रकात स्पष्ट केले आहे.

चंद्रशेखर आझाद (३५) हे पेशाने वकील असून त्यांनी दलित हक्कांसाठी भीम आर्मीची स्थापन काही वर्षांपूर्वी केली होती. सध्या ते याचे राष्ट्रीय अध्यक्ष असून गेल्या मार्च २०२०मध्ये त्यांनी आझाद समाज पार्टी या पक्षाची स्थापनाही केली होती. हा पक्ष आता राजकारणात उतरेल असे त्यांनी जाहीर केले होते.

गोरखपूर सदरमधील मतदान येत्या ३ मार्चला असून निकाल १० मार्चला आहे. उ. प्रदेशात सहा टप्प्यात निवडणूक होत आहे.

काही दिवसांपूर्वी आझाद यांच्याकडून समाजवादी पार्टीशी युती करण्याचे प्रयत्न झाले होते. पण समाजवादी पार्टीने त्यांना केवळ २ जागा देण्याचे सांगितल्यानंतर बोलणी फिस्कटली होती.

मंगळवारी आझाद यांनी आपला पक्ष यापुढे समाजवादी पार्टीशी चर्चा करणार नाही, वेळ पडल्यास अन्य पक्षांशी बोलणी करू असे सांगितले.

मूळ वृत्त

COMMENTS