मोदी- योगींचे फोटो कचरा म्हणून नेल्याने सफाई कर्मचारी निलंबित

मोदी- योगींचे फोटो कचरा म्हणून नेल्याने सफाई कर्मचारी निलंबित

मथुराः पंतप्रधान नरेंद्र मोदी व उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या खराब झालेल्या फोटोफ्रेम पोस्टर कचऱ्याच्या गाडीत नेत असल्याच्या कारणावरून मथुरा-वृंदावन महानगर पालिकेच्या एका सफाई कर्मचाऱ्यास निलंबित करण्यात आले. या सफाई कर्मचाऱ्याचे नाव बॉबी असून ते एका कचऱ्याच्या गाडीतून नरेंद्र मोदी व आदित्यनाथ यांचे फोटोफ्रेम नेत होते. हा व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर शहर प्रशासन आयुक्त सत्येंद्र कुमार तिवारी यांनी बॉबी यांना नोकरीवरून तडकाफ़डकी निलंबित केले. ब़ॉबी यांनी मोदी व आदित्यनाथ यांची फोटोफ्रेम कचऱ्याच्या गाडीतून न्यायला नको होती, असे मत कुमार यांचे होते.

मोदी व आदित्यनाथ यांचे फोटोफ्रेम कचऱ्याच्या गाडीत दिसल्यावरून काही जणांनी बॉबींशी वाद घालण्यास सुरूवात केली. हा वाद वाढत गेला पण काही जणांनी मध्यस्थी करत या दोघांची पोस्टर कचऱ्याच्या गाडीतून काढण्यास बॉबी यांना सांगितले. त्यांनी तसे केले पण या दरम्यान कुणी अज्ञात व्यक्तीने घटनेचे व्हीडिओ चित्रण केले व ते सोशल मीडियावर प्रसिद्ध केले. हे व्हीडिओ चित्रण राजस्थानच्या काही जणांनी केल्याची माहिती पुढे आली.

या घटनेबाबत आपल्या कृत्याचे बॉबी याने समर्थन करताना सांगितले की, ‘मी सगळा कचरा एकत्र करून कचऱ्याच्या गाडीत टाकला. या कचऱ्यात मोदी व आदित्यनाथ यांच्या फोटोफ्रेम आल्या त्याला मी काय करू? ही माझी चूक नाही. कचरा साफ करणे हे माझे काम आहे व ही नोकरी आहे, ती मी केली. माझ्यावर कारवाई करण्याअगोदर नेमके काय घडलेय याच्याबाबत माझ्याशी बोलले असते व त्यात कुणाची चूक कळली असती तर सर्व चित्र साफ झाले असते.’

इंडियन एक्स्प्रेसमध्ये आलेल्या वृत्तानुसार महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याने सांगितले की, ‘बॉबीने महापालिका प्रशासनाला आपली बाजू स्पष्ट केली असून आपण निर्दोष असल्याचे त्याने सांगितले. आपण निरक्षर आहोत व ही पोस्टर कुणाची आहेत, ते आपल्याला कळले नाही, आपण केवळ कचरा साफ केला, असे बॉबीने स्पष्टीकरण दिले.’

दरम्यान या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली असून संबंधित अधिकाऱ्यांना दोन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहेत.

मूळ बातमी

COMMENTS